‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात २२ सप्टेंबर रोजी आमच्या ‘साईधाम’ वृद्धाश्रमाविषयी लेख छापून आल्यानंतर या संस्थेकडे संपूर्ण देशातील संवेदनशील माणसांचे लक्ष वेधले गेले. दूरध्वनीवरून सातत्याने या संस्थेच्या कार्याविषयी चौकशी सुरू झाली. अजूनही फोन येतात. त्याचप्रमाणे मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील अनेकजण संस्थेला भेट देऊन येथील सदस्यांची आपुलकीने चौकशी करीत आहेत. वाढदिवसासारख्या आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण साईधाम सदस्यांसोबत घालविण्यास जसे अनेकजण आले तसेच आपल्या आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आश्रमास यथाशक्ती मदत करू इच्छिणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
‘साईधाम’पुरते बोलायचे झाले तर संस्थेच्या वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे मी मानते. लेखणीची आणि त्यातही ‘लोकसत्ता’ची ताकद किती आहे, याची प्रचीती आम्ही घेतली. यापूर्वी आम्ही संस्थेची कुठेही जाहिरात दिलेली नव्हती. त्यामुळे परस्पर परिचयातूनच संस्थेच्या कार्याची ओळख होत होती. ‘लोकसत्ता’ने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर ‘साईधाम’ला देशभरात नेले. दिल्ली, गुजरात, हैदराबाद, चेन्नई येथून नागरिकांनी आस्थेने चौकशी केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्थेने आपले कार्य सुरू ठेवल्याबद्दल अनेकांनी आमचे अभिनंदन करीत उत्स्फूर्तपणे मदत देत असल्याचे जाहीर केले. तसेच भविष्यातही मदत देण्याची तयारी दाखवली. लेखामध्ये दैनंदिन खर्चासाठी आम्ही तीन हजार रुपये घेत असल्याचे लिहिले होते. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर मध्यंतरी जवळपास महिनाभर दररोज अन्नदान उपक्रमात विविध जण सहभागी झाले. नवरात्र, दसरा, कोजागिरी साईधामवासीयांनी पाहुण्यांसोबत साजरी केली. आता दिवाळीतही अनेकजण आश्रमात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सतत कुणीतरी आपल्याला भेटावे, बोलावे, विचारपूस करावी असे वाटत असते. साईधामवासीही त्यास अपवाद नाहीत. लेख आल्यापासून आश्रमामध्ये विचारपूस करण्यासाठी येणाऱ्यांचा राबता कमालीचा वाढला आहे. नवी मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी येथील सभासदांसोबत एक दिवसभर संवाद साधला. अशा प्रकारचा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांनी ‘लोकसत्ता’सही प्रशस्तिपत्रक दिले. झी वाहिनीवरील सारेगमप कार्यक्रमातील गायिका शाल्मली सुखटणकर यांनी कोजागिरीच्या दिवशी सुरेल गीतांचा कार्यक्रम सादर केला. सर्व आश्रमवासीयांना मसाला दूध व अल्पोपाहार दिला. याच दरम्यान माझा मुलगा एका दुकानात साऊंड सिस्टीमची चौकशी करून आला. साईधामविषयी ‘लोकसत्ता’तील लेख वाचलेल्या त्या सद्गृहस्थांनी एक साऊंड सिस्टीम विनामूल्य उपलब्ध करून दिली. शिवाय या दानाची कुठेही वाच्यता न करण्याविषयी विनंती केली. वृद्धाश्रमात येणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. रोट्रॅॅक्ट क्लब सदस्यांनी तसेच चर्चगेट येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम करून आजी-आजोबांचे मनोरंजन केले. एखाद्या चांगल्या कार्यास ‘लोकसत्ता’सारख्या विश्वासार्ह माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्यास संवेदनशील नागरिक अतिशय सढळ हस्ते मदतीचा हात पुढे करतात, हे आम्ही या उपक्रमातून अनुभवले. आमची जबाबदारी आता शतपटीने वाढली आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा