शांततेची शिक्षा (१२ सप्टें.) या अग्रलेखात भारतीय समाजाच्या उन्मादी वृत्तीवर अचूक बोट ठेवले आहे. कितीही कायदे केले नि स्त्री -पुरुष समानता (मुंबई, दिल्लीसारख्या महानगरात तरी) निर्माण झाल्याचा आभास आपण  दाखवत असलो तरी आजही उच्चशिक्षित घरांमध्येही दुसरी मुलगी झाल्यावर मनापासून, सहज तिचा स्वीकार क्वचितच होताना दिसतो. ४/५ वर्षांच्या  मुलालाही तो रडायला लागल्यावर ‘रडतोस काय मुलीसारखा?’ किंवा अंधाराला एखादा मुलगा घाबरला तर ‘भित्रीभागुबाइर्’ असे शब्द वापरून आपणच पुरुष म्हणून तू श्रेष्ठ आहेस हे त्याच्या मनावर बिंबवत असतो ना?  
दिल्लीच्या गुन्हेगारांना कोर्टाने फाशी सुनावली आहे. परंतु अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे आपण क्षणिक उन्मदापलीकडे जाऊन याचा विचार करणार आहोत की नाही? आणि बलात्काऱ्याला फाशी हा जर न्याय आपण लागू केला तर बलात्कारी  आसारामला वाचवण्यासाठी हाच समाज रस्त्यावर उतरतो?
प्रत्येक मुलाच्या मनात आपण स्त्रीबद्दल मग, ती कोणत्याही वयाची असो आदर निर्माण केला पाहिजे ही गोष्ट लहानपणापासूनच व्हायला हवी. पण दुटप्पी समाज अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. उलट घराघरांतून, टीव्ही मालिकांतून, सिनेमांतून स्त्री ही पुरुषाच्या मालकीची वस्तू आहे, तो स्वतला हवा तसा तिचा शारीरिक, मानसिक छळ करू शकतो हेच मुले लहानपणापासून ऐकतात, पाहतात. आणि अशा प्रकारच्या हिंसाचारात स्त्रियाही सामील असतात, तेव्हा अशा घटनांसाठी स्त्रियाही जबाबदार आहेत. म्हणून अशा प्रकारच्या  गुन्ह्यांमध्ये सामील असणाऱ्या सर्वाचीच मानसिकता काय असते याचा अभ्यास व्हायला हवा केवळ ‘आमची वाहिनी स्त्रियांवरील अत्याचारांचे समर्थन करत नाही.’ अशी शाब्दिक पट्टी कार्यक्रम चालू असताना फिरवली की वाहिनीची जबाबदारी संपली का? शब्दांपेक्षा दृश्य मनावर दीर्घकालीन नि चांगला किंवा वाईट परिणाम करते हे माहीत असूनही केवळ टीआरपी वाढवण्यासाठी भडक हिंसाचार दाखवणाऱ्या वाहिन्यांची मानसिकता काय दर्जाची असते?
   दिल्ली बलात्कार खटल्यातही दिल्लीतील सुशिक्षित, सुविद्य (?)वकिलाने तिने कसे नि कोणते कपडे घातले होते? रात्री ११ नंतर मुलगी सिनेमा पाहून परतत असेल तर अयोग्यच असे तारे तोडलेले ऐकले तेव्हा अशा व्यक्तीवर कोणत्या प्रकारचे संस्कार आहेत ते लक्षात आलेच.
-शीला देशपांडे, वाशी (नवी मुंबई)

सगुण-उपासनेच्या बाराखडीविना सद्गुणधारणा करणार कशी?
‘उघडले स्वर्गाचे दार’ हे शनिवारचे संपादकीय (१४ सप्टेंबर ) वाचले .  ख्रिश्चन व मुस्लीम करीत असलेल्या धर्मान्तराविषयी लिहिल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. आस्तिक नतिक असतातच असे नाही आणि नास्तिक नतिक नसतातच असेही नाही. देव-धर्म मानणारी व न मानणारी अशी दोन्ही प्रकारची माणसे गरप्रकार करताना, अनीतीने वागताना आढळतात. तेव्हा ‘नतिकता हीच नास्तिकतेची पूर्वअट असते’ हे विधान पूर्णत: असत्य व निराधार आहे. आस्तिक होण्यासाठी जशी काहीही पात्रता वा पूर्वअट लागत नाही तशीच, ती नास्तिक होण्यासाठीसुद्धा लागत नाही.
मुळात ‘नास्तिक’ असा कोणीच नसतो. स्वत:ला नास्तिक समजणारे चार्वाकपंथीय अनुयायी कोणाच्या ना कोणाच्या ( म्हणजे ग्रंथकत्रे, इतिहासकारांच्या) शब्दावर विश्वास (म्हणजे श्रद्धा) ठेवूनच वागतात.  ईश्वर नाकारणारे विज्ञानवादी ज्या चार्वाकाचे  कौतुक करतात, तो चार्वाक विज्ञानसिद्ध असलेले ‘आकाश’ हे  निर्गुण व निराकार आहे, या कारणास्तव अमान्य  करतो. आपले गुरू  बृहस्पती (म्हणजे देवांचे गुरू नव्हेत, हे वेगळे) यांचा’ बृहस्पतिसूत्र’ हा ग्रंथ तो प्रमाण मानत असे.  ‘केवळ इहलोकच खरा’ असे मानणाऱ्या गुरूला प्रतिप्रश्न विचारून त्याने गुरुवचनांना आव्हान दिले नाही. ‘मृत्यू हाच मोक्ष’ असे मानणाऱ्या चार्वाकाने मृत्यूचा अनुभव स्वत: घेतलेला नव्हता. ईश्वराचा शोध घेण्याचा त्याने स्वत: प्रयत्न केला नाही. आपल्या गुरूचे शब्द त्याने प्रमाण मानले. तरीसुद्धा तो नास्तिक असल्याचे व त्याचे सर्व तत्त्वज्ञान ‘प्रत्यक्ष प्रमाणावर’ आधारित असल्याचे मानले जाते. याउलट, ईश्वर मानणाऱ्या सर्व ऋषी-मुनींनी आपल्या गुरूंना प्रतिप्रश्न विचारून ज्ञान प्राप्त  केले,  ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आणि मगच त्यावर भाष्य केले. इंद्रियांना अगोचर असलेल्या शक्तीचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळेच त्यांनी  ईश्वर, परलोक व मोक्ष हे सर्व खरे मानले.  कणाद व कपिल हे अपवाद आहेत, नियम नाहीत आणि कोणत्याही नियमाला अपवाद असतोच.   
मग चार्वाकाचे अनुयायी असा प्रश्न विचारतील की, ईश्वर न मानता जर कणाद व कपिल  हे नीतिमान झाले असतील आणि ऋषी-मुनी म्हणून गणले जात असतील तर, ईश्वरावर श्रद्धा  हवी कशाला? कारण असे की, हिंदू तत्त्वज्ञानाचे सार असलेल्या गीतेत प्रत्येक मनुष्याने कोणते २६ सद्गुण धारण करावेत, ते सांगितले आहे. ते सद्गुण धारण करणारा मनुष्य उन्नत होतो (म्हणजे श्रेष्ठ बनतो), असे म्हटले आहे. कोणताही सद्गुण धारण करायचा असेल तर कठोर आत्मपरीक्षण करावे लागते. त्यासाठी प्रथम अहंकार टाकावा लागतो आणि ते अत्यंत कठीण काम आहे. मात्र, आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे, याची माणसाला सदैव जाणीव असेल, स्मरण असेल तर अहंकार टाकणे सोपे जाते. अन्य कोणाहीपेक्षा चराचर व्यापून उरलेला परमात्मा श्रेष्ठ आहे. पण, निर्गुण निराकार परमात्म्याचे स्मरण ठेवणे सामान्य मनुष्याला शक्य होत नाही. म्हणूनच नामस्मरण, मूर्तिपूजा, स्तोत्रपठण व तत्सम सगुण उपासना स्वीकारावी लागते. म्हणजेच सगुण उपासना ही एका दृष्टीने उपासनेच्या किंवा सद्गुणधारणेच्या अभ्यासक्रमातली बाराखडी आहे. ती न गिरवता सद्गुण धारण करणे,  कणाद व कपिल यांना जमले म्हणजे आपल्यालाही जमेल, या भ्रमात सामान्य मनुष्याने न राहणेच योग्य.
केदार अरुण केळकर, दहिसर(प.)

इथे बुद्धीचा वापर होतो?
बुद्धीच्या देवाचा उत्सव साजरा करताना बुद्धीचा वापर करून पिढीजात चालत आलेल्या परंपरांचा विचार करणे गरजेचे आहे. पण विचार करून प्रत्येक कृती करायची माणसाची सवय लोप पावल्याचे जागोजागी दिसते. उत्सव साजरा करताना बुद्धीचा वापर व्हावा म्हणून काही प्रश्न –
१) गणेशाची मूर्ती घरी आणण्याचा मान फक्त पुरुषाचाच असतो काय? मूर्ती हातात धरलेले पुरुषच दिसतात. महिला उत्सवाची तयारी करतात पण मूर्ती हातात घेण्याचा मान त्यांना नाही काय? की महिलांनी फक्त गौरीच आणायच्या असतात?
२) लोकसत्ताचा ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ उपक्रम अनुकरणीय आहे. त्या अनुषंगाने जेवढा खर्च बुद्धीच्या देवतेवर घरोघरी होतो, निदान तेवढय़ा रकमेचे दान करण्याबद्दल धर्मात काही सूचना नाहीत काय?
३) गणेशोत्सवामध्ये दुसऱ्याच्या बागेतील फुले/दूर्वा गुपचूप तोडून देवाला वाहिल्यास कोणताही देव प्रसन्न होईल काय?
४) उत्सवामध्ये आपण जो पर्यावरणाचा नाश करतो त्याची भरपाई कशी करणार? की त्यासाठी धर्मात सांगितले वा नाही याची वाट बघत आहोत?
– सुहास किर्लोस्कर

प्रबोधन नाही, मग जरब हवीच
दिल्ली बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली गेली यावर काही सामाजिक कार्यकर्तीनी त्यांचे वेगळे मत मांडले आहे. फाशी दिली म्हणजे न्याय मिळाला का? फाशी दिल्यावर सूड उगवल्याचे क्षणिक समाधान मिळेल पण मूळ प्रश्न सुटणार आहे का? इत्यादी. हे सर्व विचार अतिआदर्शवादी परिस्थितीतच योग्य आहेत.
भारतासारख्या खंडप्राय, लोकसंख्याबहुल देशात जिथे अर्धशिक्षित, प्रबोधनहीन, पुरुषी वर्चस्ववादाचा पगडा असलेल्या व्यक्तींचे आधिक्य आहे, तिथे नाही. महानगरांमध्ये पोटापाण्यासाठी येणाऱ्या, वासनांचे दमन-निचरा न होऊ शकणाऱ्या पुरुषांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. थोडे पसे फेकल्यावर वाटेल ते करणारे, राजकीय धनदांडग्यांचा आश्रय व अभय असल्यामुळे पोलीस तथा शासनाचा धाक नसणारे अशा गुन्हय़ांमध्ये सामील असतात. त्यांना जरब बसलीच पाहिजे. अशा न्यायदानामधून हेच दिसते.
जयंत पाटील,  नौपाडा, ठाणे</strong>

अशा कामासाठी वर्गणीही देऊ!
दाऊद टोळीतील गुंड रम्या पवार हा पोलीस चकमकीत ठार झाला होता, त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने, राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठिया यांना दिले. त्यामुळेच जुलै महिन्यात अखेर ही भरपाई द्यावी लागली. ही बातमी आता जुनी असली, तरी दुर्लक्षितच म्हणावी लागेल. वास्तविक, अशा भरपाईच्या आदेशाबद्दल राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे लक्ष-लक्ष आभार मानले पाहिजे.
   दाऊदच्या टोळीतील गुंडांना मारल्याने पाच लाख रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असेल, तर केंद्र व राज्य सरकारने दाऊदच्या टोळीतील किमान शंभर गुंडांना मारण्याची    मोहीम उघडावी. गेली २५ ते ३० वर्षे भारताच्याच नव्हे तर जगातील कोटय़वधी निरपराध सामान्य नागरिकांना व सरकारला वेठीस धरणाऱ्या दाऊदला संपवायची अशी संधी पुन्हा मिळणार नाही.. तीही   फक्त पाच कोटी रुपयांत! किंबहुना   या सत्कृत्यात पाच लाखांची        वर्गणी देणारे कित्येक नागरिक पुढे येतील.
– जयवंत रा. देशपांडे, कोल्हापूर.

Story img Loader