शांततेची शिक्षा (१२ सप्टें.) या अग्रलेखात भारतीय समाजाच्या उन्मादी वृत्तीवर अचूक बोट ठेवले आहे. कितीही कायदे केले नि स्त्री -पुरुष समानता (मुंबई, दिल्लीसारख्या महानगरात तरी) निर्माण झाल्याचा आभास आपण दाखवत असलो तरी आजही उच्चशिक्षित घरांमध्येही दुसरी मुलगी झाल्यावर मनापासून, सहज तिचा स्वीकार क्वचितच होताना दिसतो. ४/५ वर्षांच्या मुलालाही तो रडायला लागल्यावर ‘रडतोस काय मुलीसारखा?’ किंवा अंधाराला एखादा मुलगा घाबरला तर ‘भित्रीभागुबाइर्’ असे शब्द वापरून आपणच पुरुष म्हणून तू श्रेष्ठ आहेस हे त्याच्या मनावर बिंबवत असतो ना?
दिल्लीच्या गुन्हेगारांना कोर्टाने फाशी सुनावली आहे. परंतु अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे आपण क्षणिक उन्मदापलीकडे जाऊन याचा विचार करणार आहोत की नाही? आणि बलात्काऱ्याला फाशी हा जर न्याय आपण लागू केला तर बलात्कारी आसारामला वाचवण्यासाठी हाच समाज रस्त्यावर उतरतो?
प्रत्येक मुलाच्या मनात आपण स्त्रीबद्दल मग, ती कोणत्याही वयाची असो आदर निर्माण केला पाहिजे ही गोष्ट लहानपणापासूनच व्हायला हवी. पण दुटप्पी समाज अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. उलट घराघरांतून, टीव्ही मालिकांतून, सिनेमांतून स्त्री ही पुरुषाच्या मालकीची वस्तू आहे, तो स्वतला हवा तसा तिचा शारीरिक, मानसिक छळ करू शकतो हेच मुले लहानपणापासून ऐकतात, पाहतात. आणि अशा प्रकारच्या हिंसाचारात स्त्रियाही सामील असतात, तेव्हा अशा घटनांसाठी स्त्रियाही जबाबदार आहेत. म्हणून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील असणाऱ्या सर्वाचीच मानसिकता काय असते याचा अभ्यास व्हायला हवा केवळ ‘आमची वाहिनी स्त्रियांवरील अत्याचारांचे समर्थन करत नाही.’ अशी शाब्दिक पट्टी कार्यक्रम चालू असताना फिरवली की वाहिनीची जबाबदारी संपली का? शब्दांपेक्षा दृश्य मनावर दीर्घकालीन नि चांगला किंवा वाईट परिणाम करते हे माहीत असूनही केवळ टीआरपी वाढवण्यासाठी भडक हिंसाचार दाखवणाऱ्या वाहिन्यांची मानसिकता काय दर्जाची असते?
दिल्ली बलात्कार खटल्यातही दिल्लीतील सुशिक्षित, सुविद्य (?)वकिलाने तिने कसे नि कोणते कपडे घातले होते? रात्री ११ नंतर मुलगी सिनेमा पाहून परतत असेल तर अयोग्यच असे तारे तोडलेले ऐकले तेव्हा अशा व्यक्तीवर कोणत्या प्रकारचे संस्कार आहेत ते लक्षात आलेच.
-शीला देशपांडे, वाशी (नवी मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा