इस्रायलच्या अध्यक्षपदाची सूत्रे येत्या २४ जुलैपासून कुणाकडे जावीत, याचा निर्णय त्या देशाच्या लोकप्रतिनिधीगृहाने (‘नेसेट’ने) मंगळवारी घेतला आणि रुवेन ऊर्फ ‘रुबी’ रिव्हलिन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे जुलैनंतर त्या देशाचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे कट्टर आणि अध्यक्ष तर त्यांच्याहीपेक्षा कट्टर, अशी स्थिती होणार आहे. पॅलेस्टिनींना निराळा देश नव्हे, आमच्याकडे नागरिकत्व देऊ, अशा थाटाची वक्तव्ये रिव्हलिन यांनी यापूर्वी केली आहेत. याच रिव्हलिन यांनी कुराणाचे हिब्रू भाषांतर केले आहे आणि इस्रायलची आंतरराष्ट्रीय बदनामी टाळूनच आपली धोरणे राबवली पाहिजेत, एवढे शहाणपण त्यांच्याकडे नक्कीच आहे. ही तंत्रे सांभाळून, इस्रायली/ अरबविरोधी राष्ट्रवादाची धग कशी टिकवायची हे त्यांना चांगलेच माहीत आहे. नेसेटचे सभापतीपद भूषवत असतानाच, २०१२ साली माजी पंतप्रधान यित्झाक राबिन यांना आदरांजली वाहताना रिव्हलिन म्हणाले, ‘‘ओस्लो कराराला आता २० र्वष झालीत. दोन्ही देशांना तो मान्य नाही, असंच दिसतं. त्यामुळे आता तो इतिहासजमा करणंच बरं’’.. म्हणजे ज्या ओस्लो कराराद्वारे इस्रायलने पॅलेस्टिनींचे हक्क मान्य केले आणि ज्यासाठी राबिन यांना (पॅलेस्टिनी नेते यासर अराफत आणि तत्कालीन परराष्ट्रमंत्री शिमॉन पेरेझ यांच्यासह) शांततेचे ‘नोबेल’ मिळाले, तो करार मोडीत काढण्यास अवघ्या दोन वर्षांपूर्वी रिव्हलिन उत्सुक होते.
 इस्रायलच्या भूमीवर १८०९ सालापासून (तेव्हाच्या तुर्की कब्जातील पॅलेस्टाइनमध्ये) राहात असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या कुटुंबातील ‘रुबी’ ९ सप्टेंबर १९३९ रोजी जन्मले. कायद्याचा अभ्यास करून, वकिली करू लागले आणि अधिकाधिक भूमी बेने इस्रायलींच्या ताब्यात यावी यासाठी वसाहती स्थापण्याच्या धोरणाला उघड पाठिंबा देण्यासाठी राजकारणात आले. १९७८ साली जेरुसलेमचे नगरसेवक, १९८१ ते ८६ इस्रायली विमानसेवेच्या कार्यकारी मंडळावर, ८६ मध्येच हेरत या अतिउजव्या पक्षाचे जेरुसलेम जिल्हाध्यक्ष, तो पक्ष लिकुड पक्षात विलीन झाल्यावर १९८८ ते ९३ मध्ये त्याही पक्षाचे प्रांताध्यक्ष, २००१ ते फेब्रुवारी २००३ पर्यंत इस्रायलचे माहिती व प्रसारणमंत्री, पुढे मार्च २००६ पर्यंत आणि पुन्हा २००९ ते २०१३ या काळात नेसंटचे सभापती, अशी त्यांची कारकीर्द आहे.
आता रिव्हलिन सूत्रे घेतील, ती शिमॉन पेरेझ यांच्याकडून. पेरेझ शांततावादी असल्याने नेतान्याहू यांच्या विस्तारवादी विचारांना अटकाव होत होता. नेतान्याहू आणि रिव्हलिन हे दोघे लिकुड पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आहेत. नेतान्याहूंनी त्यांना ‘संपूर्ण साथ’ देण्याचा इरादा मंगळवारी अभिनंदनपर भाषणातच जाहीर केला. ही साथ कोठे जाणार, ते लवकरच कळेल.

Story img Loader