दोन दशके गांधी समजून घेण्यात घालवणारे रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा अभ्यासूपणा शालेय अभ्यासात दिसला नव्हता, पण चित्रपटांत- त्यातही ‘गांधी’मध्ये तो झळाळलाच! प्रचंड अभ्यास, चिकाटी आणि प्रसंगी स्वत: खंक होण्याची तयारी असे सारे काही ‘गांधी’ चित्रपटासाठी देणारे अ‍ॅटनबरो सेटवर मात्र सर्वाचे लाडकेच असत..

फ्रेडरिक अ‍ॅटनबरो यांची तीनही मुले थोर निघाली. थोरले रिचर्ड, मधले डेव्हिड आणि धाकटे जॉन तिघांनीही आपापल्या क्षेत्रात घराण्याचे नाव काढले. यातील सर्वात धाकटे जॉन मोटारींच्या व्यवसायात होते आणि त्यांचे अकाली निधन झाले. अन्य दोघांनीही आपापली माध्यमे गाजवली. प्लॅनेट अर्थसारख्या अनेक सर्वागसुंदर वृत्तमालिका हे डेव्हिड यांचे कर्तृत्व. निसर्गाला समजावून घेत, त्यावर कोणताही ओरखडा न पाडता निसर्ग आणि प्राणिजीवनावर बीबीसी आदी वाहिन्यांसाठी डेव्हिड यांनी अक्षरश: शेकडय़ांनी वृत्तमालिका बनवल्या. एखाद्या सिनेमाच्या डीव्हीडी वा सीडींप्रमाणे त्या आजही मोठय़ा प्रमाणावर विकल्या जातात आणि पुढच्या पिढीच्या चित्रपट वा माहितीपट निर्मात्यांसाठी त्या अभ्यासाचा विषय असतात. हा अचंबित करणारा सखोल अभ्यास हे अ‍ॅटनबरो यांचे.. मग तो डेव्हिड असो वा थोरले रिचर्ड.. व्यवच्छेदक लक्षण. ही अशी अभ्यास करण्याची सवय त्यांच्यात वडिलांकडून उतरली. ते लब्धप्रतिष्ठितांच्या केम्ब्रिज विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई मेरी ही त्या काळी स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारी. वडील अध्यापक आणि आई कार्यकर्ती. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा यहुदी निर्वासितांचा लोंढा लंडनमध्ये वाढू लागला तेव्हा आपणही काही करायला हवे या भावनेने या दाम्पत्याने दोन यहुदी मुली दत्तक घेतल्या. त्या दोघींचे आयुष्य अ‍ॅटनबरो कुटुंबीयांनी कौतुकाने घडवले आणि अमेरिकेत चांगल्या घरी दोघींची लग्ने करून दिली. हे असे बांधीलकी मानण्याचे गुण अ‍ॅटनबरो बंधूंत पुरेपूर उतरले. एकदा एखादी गोष्ट करायची तर पदराला खार लावायची वेळ आली तरी मागे हटायचे नाही, हा खाक्या. मग त्यासाठी कितीही वेळ, ऊर्जा आणि पैसा खर्च होवो. बाजारपेठीय दडपणांना बळी न पडता हे असे पायाभूत काम करणारी एक पिढीच्या पिढी जीवनाच्या विविधांगांना स्पर्श करणारे मूलभूत काम त्या काळी देशोदेशी करीत होती. अ‍ॅटनबरो हे या पिढीचे प्रतिनिधी.
भारतीयांना रिचर्ड अ‍ॅटनबरो यांची महती कळली ती ‘गांधी’ या अजरामर निर्मितीमुळे. तसे होणे साहजिकच. हा सिनेमा १९८२ सालचा. त्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला गांधी माहिती झाले ते या सिनेमामुळे. एरवी एखादा कथानायक समजून घेण्यासाठी चित्रपटासारख्या माध्यमाचा आधार घ्यावा लागत असेल तर त्याची गणना विद्वानांनी पोरकट या विशेषणाने केली असती. पण गांधी या सिनेमाबाबत तसे झाले नाही. याचे कारण म्हणजे अ‍ॅटनबरो यांनी गांधी या व्यक्तीचा आणि वृत्तीचा सखोल अभ्यास केला होता. किती? तर आपल्या आयुष्यातील दोन दशके रिचर्ड अ‍ॅटनबरो या ब्रिटिश कलाकाराने केवळ गांधी समजून घेण्यात घालवली. १९६२ साली त्यांना पहिल्यांदा सिनेमासाठी गांधी हा विषय मोतीलाल कोठारी यांनी सुचवला. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मदतीचे आश्वासन दिले. नेहरूंच्या कारकिर्दीत या चित्रपटासाठी प्राथमिक चाचपणी झाली, पटकथाही तयार झाली, परंतु चित्रपटाचा बेत नेहरूंच्या हयातीत तडीस गेला नाही आणि १९६९ मध्ये मोतीलाल कोठारीही निवर्तले. पण अ‍ॅटनबरो यांनी त्यांच्या सूचनेचे आणि भारताने देऊ केलेल्या मदतीचे चीज केले. त्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टासाठी भारतीयांनी त्यांचे कायमचे ऋ णी राहावयास हवे. या सिनेमासाठी अ‍ॅटनबरो यांना कोणी पैसे देईनात. अनेकांनी त्यांना सिनेमासाठी गांधी हा विषय घेतल्याबद्दल वेडगळच ठरवले होते. एखाद्या वाळक्या झाडाच्या खोडाला फडके बांधावे त्याप्रमाणे भासणारा एक नेता सिनेमाचा नायक कसा, असा अनेकांचा त्यांना प्रश्न होता. पण हा चित्रपट करायचा या कल्पनेने त्यांना इतके भारले होते की त्यांनी आपले घर विकले, पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि त्यातून उभा राहिलेला निधी सिनेमासाठी खर्च केला. जवळपास २.२ कोटी डॉलर त्यांनी या दरिद्रीनारायण-नायकासाठी गुंतवले होते. त्यात ते इतके खंक झाले की महिन्याचे स्वयंपाकाच्या गॅसचे बिल देण्याइतके पैसेदेखील त्या वेळी त्यांच्याकडे उरले नाहीत. जे करायचे ते भव्य, हा खाक्या. त्यामुळे गांधी सिनेमात त्यांच्या अंत्ययात्रेच्या दृश्यासाठी त्यांनी तब्बल तीन लाखांचा खरा समुदाय गोळा केला होता. तांत्रिक चलाखीच्या माध्यमातून ही एवढी गर्दी त्यांना दाखवता आली असती. पण हे असले कामचलाऊ आणि कातडीबचाऊ मार्ग त्यांना कधीच पसंत नव्हते. या सिनेमात संवादाची ४३० हून अधिक दृश्ये आहेत. जितकी अशी जास्त दृश्ये तितका त्याच्या संपादनाचा व्याप अधिक. पण तो वाढतो म्हणून अ‍ॅटनबरो यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. बेन किंग्जले या तुलनेने नव्या कलाकाराला घेऊन त्यांनी अशा काही ताकदीने हा सिनेमा बनवला की त्याने इतिहासच घडला. त्या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांत या चित्रपटासाठी ११ नामांकने होती. त्यापैकी आठ पुरस्कार एकटय़ा ‘गांधी’ने जिंकले. एकाच सिनेमाने इतके पुरस्कार जिंकण्याचा विक्रम अन्य कोणत्याही ब्रिटिश कलाकृतीला त्यानंतर अद्याप एकदाही साधता आलेला नाही. त्यानंतर अनेक भारतीय चित्रपटकारांनी आपापल्या नायकांवर असे चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकही चित्रपट ‘गांधी’च्या जवळपासदेखील जाऊ शकला नाही. ते यश जसे मोहनदास करमचंद गांधी यांचे तसेच सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचेही. किंबहुना चित्रपटापुरते हे यशाचे माप अ‍ॅटनबरो यांच्या पारडय़ात कांकणभर अधिकच पडावे.
याचे कारण प्रचंड अभ्यास. त्यांच्या चित्रपटांतून शिकायचे ते डिटेलिंग. सर्व प्रक्रिया, पद्धती, समाजजीवन, संस्कृतीचे यमनियम याचा प्रचंड म्हणता येईल इतका अभ्यास अ‍ॅटनबरो करीत. एका अमेरिकी समीक्षकाने त्यांच्यावर टीका करताना हा माणूस चित्रपटाच्या मजकुरावर प्रत्यक्ष सादरीकरणापेक्षा अधिक लक्ष देतो अशा स्वरूपाचे विधान केले होते. अ‍ॅटनबरो यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना माझा याइतका बहुमान कोणी केलेला नाही, असे उद्गार काढले होते. अ‍ॅटनबरो आपल्या कृतीत झोकून देत. ही सवय त्यांना शालेय पातळीपासूनच होती. खरे तर वडील महाविद्यालयाचे प्राचार्य. तेदेखील शिक्षण-काशी केम्ब्रिज विद्यापीठातील. परंतु तरीही रिचर्ड यांना अभ्यासात गती नव्हती. त्यांचे दोन्ही बंधू तुलनेने अभ्यासात हुशार. पण या शालेय अभ्यासाचे रिचर्ड यांच्याशी कधीच जमले नाही. लहानपणी वडील त्यांना एकदा चार्ली चॅप्लिन याचा सिनेमा दाखवण्यासाठी लंडनला घेऊन गेले होते. आपल्या अभिनयाच्या ताकदीवर प्रेक्षकांना रडण्या-हसवण्याची ताकद बघून आपणही मोठेपणी असेच करायचे असे त्यांच्या मनाने घेतले. त्या क्षणापासून रिचर्ड यांनी स्वत:ला या क्षेत्रात झोकून दिले. पुढे यातील शोकांतिका ही की याच चार्ली चॅप्लिन याच्यावर अ‍ॅटनबरो यांनी ‘गांधी’नंतर बनवलेला चित्रपट दणदणीत आपटला. अर्थात, निर्मितिमूल्ये आणि शैली यासाठी अभ्यासू आजही त्याचे नाव काढतात. ब्रिटिश रंगभूमी आणि चित्रपटविश्वात रमलेल्या रिचर्ड यांची ओळख जगाला झाली ती १९६३ सालच्या ‘द ग्रेट एस्केप’ या अप्रतिम चित्रपटाने. वास्तविक त्यात काही ते नायक नव्हते. स्टीव्ह मॅक्वीन हे त्यातील प्रमुख कलाकार. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर जर्मन अधिकाऱ्यांच्या तावडीतून पलायनाचा प्रयत्न करणारा सर रिचर्ड यांनी रंगवलेला ब्रिटिश डॉक्टर अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. तीच गत ज्युरासिक पार्कचीदेखील. स्टिव्हन स्पिलबर्ग याची ही कलाकृती ओळखली जाते आदीमकालीन महाकाय डायनोसोर्सच्या कहाणीसाठी. पण त्या संगणकीय जीवांच्या बरोबरीने भाव खाऊन जातात गोल, गरगरीत काहीसे विक्षिप्त भासणाऱ्या संशोधकाच्या भूमिकेतील रिचर्ड. जवळपास ६० वर्षांची त्यांची कारकीर्द. आपल्याला जरी ते ‘गांधी’कार म्हणून माहीत असले तरी त्यांची दिग्दर्शकीय कारकीर्द जेमतेम १२ सिनेमांची आहे. ते मुख्यत: ओळखले जातात ते अभिनेते म्हणून. अगाथा ख्रिस्ती यांच्या माउसट्रॅप या नाटकातल्या भूमिकेसाठी आणि ग्रॅहम ग्रीन यांच्या ब्रायटन रॉक यावर आधारित त्याच नावाच्या चित्रपटासाठीदेखील. सर लॉरेन्स ऑलिव्हिए, जॉन गिलगुड अशांच्या पंक्तीत सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचे नाव घेतले जाते.
विविध संस्था आणि कलाक्षेत्रात सर रिचर्ड आणि त्यांची पत्नी शीला सिम यांच्यासह शेवटपर्यंत कार्यरत होते. २००४ सालच्या त्सुनामीने मात्र या दाम्पत्याच्या सुखी जीवनास हादरा दिला. त्यांची कन्या, नात आणि कन्येची सासू तिघेही थायलंडमध्ये या त्सुनामीच्या तडाख्यात सापडले आणि नाहीसे झाले. ते दु:ख सर रिचर्ड शेवटपर्यंत बाळगून होते. त्यात त्यांची गेली काही वर्षे आजारपणाला तोंड देण्यातच गेली. त्यासाठी त्यांना आपले आवडते घरही विकावे लागले. सर रिचर्ड म्हणजे मूर्तिमंत ब्रिटिश सभ्यता आणि सौजन्य. वयाच्या आणि कर्तृत्वाच्या सीमा ओलांडण्याचा त्यांचा स्वभाव. चित्रपटाच्या सेटवर प्रत्येकाला ते डार्लिग असेच संबोधत आणि मला रिचर्ड न म्हणता डिक या टोपणनावानेच हाक मारा असा त्यांचा आग्रह असे. ‘एंटायरली अप टू यू डार्लिग’ हे त्यांनी डायना हॉकिन्स यांच्यासह लिहिलेले आत्मपर पुस्तक त्यांच्या उत्तम अभिरुचीची साक्ष देते. त्यांच्या निधनाने हा लोभस मिस्टर डार्लिग काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Story img Loader