पंच आणि प्रशिक्षक या दोन भूमिकांखेरीज, क्रिकेटमधल्या साऱ्या भूमिका रिची बेनॉ यांनी निभावल्या; पण समालोचक किंवा खरे तर क्रिकेटचे निरूपणकार हीच त्यांची चिरस्थायी ओळख! एकसुरी आवाजातले त्यांचे समालोचन, ‘तोंड उघडण्याच्या आधी आपल्या मेंदूकडे लक्ष द्या’ या त्यांच्या बाण्यामुळे लक्षात राहात असे..
रेडिओ वा दूरचित्रवाणीवर समालोचन म्हणजे उद्गारचिन्हांचा सढळ वापर, अतिशयोक्तीपूर्ण विशेषणे वा वाह्य़ात किस्से असे मानले जाण्याच्या आजच्या काळात रिची बेनॉ यांच्यासारख्या धुरंधर रसाळ क्रिकेट निरूपणकाराचे महत्त्व आवर्जून समजून सांगावयास हवे. बेनॉ यांनी समालोचन सुरू केले तेव्हा दूरचित्रवाणीचा प्रसार तितका नव्हता. त्यामुळे ऐकणाऱ्यास त्यांचे समालोचन प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद देत असे. गुड मॉìनग लिसनर्स ऑन अ स्प्लेंडिड सनी मॉìनग.. अशी काहीशी सुरुवात करीत आवाजाची पट्टी जराही न बदलता बेनॉ श्रोत्यांच्या मन:चक्षूंसमोर खेळाच्या मदानातील वातावरण उभे करीत. बेनॉ यांचे मोठेपण असे की नभोवाणीची सद्दी संपून दूरचित्रवाणीचे आगमन झाल्यावर त्यांनी आपल्या शैलीत नव्या माध्यमास साजेसा बदल केला आणि ते काळाच्या बरोबर राहिले. खरे तर त्यांच्या संयत शैलीमुळे ध्वनिशास्त्राच्या नियमांचे उल्लंघनच होत असे. पण तरीही ते श्रवणीय वाटे. एखाद्या पट्टीच्या गायकाने लावलेला वज्र्य स्वरदेखील सुरेल वाटावा तसे. बेनॉ पूर्ण तोंड उघडून बोलत नसत. ओठांची ठेवण सर्वच उच्चारांत एकसारखी असे. चंबूसारखी. पण म्हणून शब्द अस्पष्ट  आहेत वा घरंगळत आहेत असे कधी झाले नाही. त्यांच्या आवाजाची पट्टीही कधी चढत नसे. ओह.. वॉव.. अशा विद्यमान निर्थक शैलीचे सर्रास उच्चारण अलीकडचे समालोचक करतात तसे कधी बेनॉ यांनी केले नाही. त्यांच्या शैलीतील अदब उभय माध्यमांत कायम राहिली. तोंड उघडण्याच्या आधी आपल्या मेंदूकडे लक्ष द्या, असा त्यांचा सल्ला असे आणि त्यांच्याकडूनच त्याचे उल्लंघन झाले असे कधी होत नसे. अमुक एखादा खेळाडू आपल्याला कसा जवळचा आहे हे दाखवण्यात अलीकडचे समालोचक धन्यता मानत. असला छछोरपणा बेनॉ यांनी चुकूनही कधी केला नाही. त्यात जर बेनॉ यांच्या संगतीला बिल लॉरी वा टोनी ग्रेग यांच्यासारखा चतुर समालोचक असला तर प्रत्यक्ष खेळापेक्षा त्या खेळाचे वर्णन या मंडळींकडून ऐकणे हे अधिक आनंददायी होत असे. हा मान क्रिकेटच्या क्षेत्रात निव्वळ बेनॉ यांचाच. समालोचन करणाऱ्याने शांततेची, स्तब्धतेची अनुभूती घ्यायला आणि इतरांना द्यायला शिकायला हवे, शब्दांची काटकसर करता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे बेनॉ म्हणत आणि त्याप्रमाणे ते खरोखरच स्वत: वागत. या शिवाय बेनॉ अव्वल दर्जाचे फलंदाज व फिरकी गोलंदाज, कुशल कर्णधार, उत्तम संघटक, प्रभावी समीक्षक, सल्लागार असे बरेच काही होते. अशा अनेक भूमिका पार पाडताना त्यांनी क्रिकेट जगतात आपला स्वतंत्र ठसा उमटविला. पंच व प्रशिक्षक या दोनच भूमिका काय त्या त्यांनी वठवल्या नाहीत. अन्यथा त्या क्षेत्रातही त्यांनी आपले प्रभुत्व गाजविले असते.
जगात रोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी क्रिकेटचा सामना सुरू असतो एवढी लोकप्रियता आज या खेळास आहे. अव्वल दर्जाचे खेळाडू दररोज सामन्यात मग्न असतात. मात्र पूर्वीच्या काळी हा खेळ जरी लोकप्रिय होता तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय मोजकेच सामने होत. हल्लीइतकी वाहतूक व्यवस्थाही सोपी नव्हती. असे असले तरीही रिची यांनी १९४८ ते १९६४ या काळात क्रिकेट क्षेत्र गाजवले. सर डॉन ब्रॅडमन यांच्याइतकेच ते आदरणीय होते. त्यांनी न्यू साऊथ वेल्स या ख्यातनाम संघाचे प्रतिनिधित्व करताना प्रथम दर्जाच्या २५९ सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यामध्ये २३ शतके व ६१ अर्धशतके नोंदवत ११ हजार ७१९ धावा केल्या. लेग  स्पीन गोलंदाजी करणाऱ्या बेनॉ यांच्या नावावर ९४५ बळीही जमा आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ६३ कसोटींमध्ये खेळताना त्यांनी २२०१ धावा केल्या. त्यामध्ये तीन शतके व नऊ अर्धशतके आहेत. कसोटीत दोनशे बळी व दोन हजारहून अधिक धावा करणारा पहिला कसोटीपटू म्हणून त्यांनी कामगिरी केली. ते शेवटच्या फळीत फलंदाजीस येत असत. जर त्यांना पहिल्या फळीत पाठविले गेले असते तर फलंदाजीचे अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर झाले असते. त्यांच्या काळात फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टय़ा फारशा नव्हत्या. तरीही त्यांनी आपल्या गोलंदाजीत विविधता निर्माण केली होती. गुगली, टॉपस्पिन, फ्लिपर आदी विविध शैली त्यांनी विकसित केल्या. यष्टींना वळसा घालत.. राऊंड दि विकेट.. गोलंदाजीवर त्यांची हुकूमत होती. खेरीज ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. बऱ्याच वेळा ते फलंदाजाच्या जवळच उभे राहून क्षेत्ररक्षण करीत असत. त्यामुळे अनेक वेळा त्यांना दुखापतींना सामोरे जावे लागले. काही वेळा जिवावर बेतण्याच्या दुखापतींमधून ते वाचले तरीही खेळपट्टीजवळच उभे राहून क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांचा हट्ट असे. पुढे ते ऑस्ट्रेलियाचे संघनायकही बनले. १९५८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मदानावर झालेल्या मालिकेत त्यांच्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. त्या वेळी वास्तविक त्या संघात नील हार्वे यांच्यासह अन्य तीन-चार वरिष्ठ खेळाडूही होते. पदार्पणाच्या मालिकेतच त्यांनी ऑस्ट्रेलियाला ४-० असा विजय मिळवून दिला. खेळाडूंची व्यूहरचना, कल्पक चाली, फलंदाजीतील क्रमवारीत बदल, गोलंदाजांचा खुबीने उपयोग करीत त्यांनी हे यश मिळविले. क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत म्हणजेच १९६४ पर्यंत त्यांनी संघाचे नेतृत्व केले. २८ सामन्यांमध्ये नेतृत्व करताना त्यांनी १२ सामने जिंकले व ११ सामने अनिर्णीत ठेवले. एक सामना ‘टाय’ झाला.  केवळ चारच सामन्यांमध्ये त्यांनी पराभव स्वीकारला. १९५६ मध्ये ते इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी बीबीसी रेडिओच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेत समालोचनाचा सराव केला. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर समालोचन करायचे त्यांनी ठरवले आणि त्याप्रमाणे ते केले. ते करीत असताना खेळाडूंपकी कोणी सल्ला मागितलाच तर बेनॉ तो आनंदाने देत. त्यांचा विख्यात विद्यार्थी म्हणजे शेन वॉर्न. त्याच्या गुंगवून टाकणाऱ्या फिरकीने इंग्लंडच्या माइक गॅटिंग याच्या यष्टी उडवल्या तेव्हा त्या गॅटिंग याच्या अवस्थेचे वर्णन करताना बेनॉ म्हणाले, ‘चेंडूने नक्की काय आणि कसे केले हे गॅटिंगला मदान सोडून गेल्यावरदेखील समजले नाही!’
इतके सर्व असले तरी ते ओळखले जातात, जातील आणि स्मरणात राहतील ते त्यांच्या अद्वितीय समालोचन शैलीसाठी. चटकदार भाषा हे त्यांचे बलस्थान. पण त्या भाषेचा वापरही ते शांतपणे करीत. म्हणजे त्यांचे एखादे चटपटीत विधानदेखील अन्य साध्या विधानांप्रमाणेच असे. अशा शैलीचा एक वेगळा परिणाम होतो. ती चकवते. त्यामुळे त्यांचे समालोचन नेहमी लक्ष देऊनच ऐकावे लागे. न जाणो आपल्याकडून एखादे वाक्य चुकणार तर नाही अशी भीती श्रोत्यांना असे. त्यात त्यांचा तो नर्मविनोद. एकदा ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ग्लेन मॅग्रा अवघ्या दोन धावांवर बाद झाला. तर त्यावर टिप्पणी करताना बेनॉ म्हणाले.. बिच्चारा.. फक्त ९८ धावांनी त्याचे शतक हुकले.
असा हा क्रिकेटचा प्रज्ञावान आणि रसीला निरूपणकार आता क्रिकेटचे मदान कायमचे सोडून गेला. बेनॉ ८४ वर्षांचे होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर अवघ्या १६ धावांनी त्यांचे शतक हुकले. क्रिकेटप्रेमींना अपार आनंद देणाऱ्या या निरूपणकारास श्रद्धांजली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा