‘जे देऊ शकतो ते पुरेसे नाही हे लक्षात आलं की निर्णय घेण्याची वेळ आलेली असते..’ निवृत्तीचा नेमका क्षण पकडणारे हे उद्गार. ते आले रिकी पॉन्टिंगच्या तोंडून. ‘पंटर’ हे त्याचे टोपणनाव. पंटर हा शब्द आपल्याकडे गौरवाने उच्चारण्यासारखा नव्हे, पण पंटर या शब्दाला विजयाचे मखर चढवीत पॉन्टिंगने तो, निदान क्रिकेटच्या जगात अजरामर केला. क्रिकेटमधील विक्रमादित्य तो कदाचित ठरणार नाही. ते स्थान आपल्या सचिनने घेतले आहे, पण विक्रमांपेक्षा महत्त्वाचा असतो तो जयाचा क्रम. विक्रमांचे थर रचता येतात. विजयाचे थर रचणे कठीण असते. पॉन्टिंगने विक्रम केलेच, पण त्याबरोबर जयाचे थर रचले. कालपासून पर्थ येथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेबरोबरचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर तब्बल १०७ कसोटी विजयांत सहभागी होणारा तो भाग्यवान ठरेल. यातील अनेक विजयांमध्ये पॉन्टिंगचा वाटा मोलाचा होता. मात्र हा वाटा आता वयानुसार कमी होत चालला आहे याची जाणीवही पॉन्टिंगला होती. विजयाची मालिका उभी करण्याचा आनंद उपभोगत असतानाच ही जाणीव होणे हे पॉन्टिंगचे वैशिष्टय़.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे सभ्य, सुसंस्कृत, समजूतदार वागण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. उद्दाम, बढाईखोर स्वभाव व दुसऱ्याला टाकून बोलण्याची वृत्ती यासाठी ते जास्त प्रसिद्ध. टोमणे मारीत दुसऱ्याला हिणविण्यात ते पटाईत. गोडधोड बोलत सर्वाची राजी राखण्याची कला त्यांना साधलेली नाही व ती साधावी म्हणून त्यांनी कधी प्रयत्नही केले नाहीत. रोखठोक कारभारासाठी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू ओळखले जातात. यामुळेच त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सर्वत्र आदर व्यक्त होत असला तरी जगाचे प्रेम सहसा मिळत नाही. ब्रॅडमन हा त्याला अपवाद. ऑस्ट्रेलियाचा असूनही तो जंटलमन होता व राहिला. रिची बेनॉ हा एक दुसरा सभ्य गृहस्थ. पण बाकी पलटण तिखट जिभेची. मात्र या तिखट जिभेला वास्तवाची तिखट चवही चांगली समजते आणि ती योग्य वेळी समजते हे विशेष. रिकी पॉन्टिंगचे विधान ही त्या वास्तवाची चव आहे. कुठे थांबावे हे या उद्दाम माणसालाही कळले.
जॅक कॅलिसने त्रिफळा उडविला तेव्हा तंबूत परत येतानाची त्याची देहबोली निवृत्तीचे संकेत देत होती. सामना संपताच त्याने निर्णय घेतला. तो जाहीर करताना त्याने केलेले निवेदन वाचण्यासारखे आहे. त्याच्या स्ट्रेट बॅटिंगसारखेच ते साधेसरळ असले तरी अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. पॉन्टिंगच्या मनातील क्रिकेट अद्याप संपलेले नाही. खेळण्याची इच्छा व प्रतिस्पध्र्याला चीत करण्याची ईर्षां अजूनही कायम आहे, परंतु मनातील इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी शरीराची मदत लागते. फटका कसा मारायला हवा हे मन सांगत असले तरी हाताने तशी हालचाल करावी लागते. चेंडूच्या वेगाशी मनाचा वेग जुळला तरी हातापायांचा जुळतोच असे नव्हे. तेथे वय आड येते. मन काळावर स्वार होत असले तरी शरीर काळाच्या अधीन असते. मनाला उदयास्त नसतो. जख्ख म्हातारपणातही ते रसरसत्या तारुण्याची स्वप्ने पाहू शकते, पण शरीराला तसे करता येत नाही. ते काळाबरोबर वाढते व काळाबरोबरच अस्ताला जाते. मन आणि शरीराचा मेळ बरोबर जमतो तेव्हा माणसाचे कर्तृत्व बहरून येते. हा काळ मोठय़ा आनंदाचा असतो, पण एक क्षण असा येतो हा मेळ सुटतो. शरीर व मनाचे साहचार्य राहत नाही. फटका समोर साकारला तरी नजर, हात, पाय यांचा एकताल जमत नाही. हा ताल चुकला की खेळातील गंमत जाते. मग पूर्वीच्या विक्रमाचे दाखले देत एखादा खेळाडू संघात ठाण मांडीत असला तरी मैदान त्याला आपलेसे करीत नाही. त्या खेळाडूची इनिंग संपलेली असते.
निवृत्त केले जाणे पॉन्टिंगला पसंत नव्हते. ते ऑस्ट्रेलियात कोणालाच पसंत नाही. डॉन ब्रॅडमन यांना आणखी एक कसोटी खेळू दिली असती तर कदाचित त्यांची सरासरी १०० झाली असती, पण त्यांनी तो मोह आवरला. ९९.९६ अशा अद्भुत सरासरीवर ते निवृत्त झाले. शेवटच्या कसोटीत त्यांच्याही शून्य धावा झाल्या होत्या, पण आणखी एक कसोटी खेळून आणखी एखादे शतक नावावर जमा करूया, या मोहात ते रमले नाहीत आणि अशा कल्पनात रमण्यास त्यांना तेथील समाजाने भाग पाडले नाही. खेळताना दाखवायचा रोखठोकपणा आयुष्यात झगडताना दाखविताना ऑस्ट्रेलियन खेळाडू कमी पडत नाहीत. ‘इट्स प्रीटी इझी डिसिजन’ असे पॉन्टिंग सहज म्हणून जातो, कारण शरीर व मनातील विसंवाद त्याला स्वच्छपणे दिसलेला असतो.
हा विसंवाद ओळखणे फारसे कठीण नाही. कठीण असते ते विसंवादाचा मान ठेवून निवृत्त होणे. हे भल्याभल्यांना जमत नाही. फॉम्र्युला वन या मोटार शर्यतीतील शूमाकरला ते जमलेले नाही. दहा वर्षांपूर्वी विक्रमांची माळ त्याने उभी केली, पण पुढे तंत्रज्ञान बदलले. गाडय़ांचे टायर अद्ययावत झाले. मर्सिडिसच्या नव्या तंत्रज्ञानाबरहुकूम हालचाली करणे शूमाकरला जमेना. मोठय़ा डौलात त्याने पुनरागमन केले, पण गेली दोन वर्षे प्रत्येक शर्यतीत त्याच्या मर्यादा उघड होत गेल्या. त्याचे बॉक्स ऑफिस अपील हटलेले नाही. अजूनही फॉम्र्युला वन म्हणजे शूमाकर हे समीकरण चालू असले तरी नवी नावे पुढे येत आहेत. मायकेल जॉर्डन हा अजरामर बास्केटबॉलपटू. त्याने तर दोनदा निवृत्ती घेतली, पण त्याच्या नंतरच्या दोन इनिंगपेक्षा त्याची पहिलीच इनिंग लोकांच्या लक्षात राहिली. मैदानावरील पुनरागमन नेहमीच जमते असे नाही. अपवाद फक्त आंद्रे आगासीचा. दुसऱ्या फेरीतही त्याचा डौल कायम होता. विन्स्टन चर्चिल कधी मैदानावर उतरले नाहीत. पार्लमेंट हेच त्यांचे मैदान. ते मात्र त्यांनी सर्व अर्थानी गाजविले. मानवाच्या इतिहासात चिरस्थायी राहावी अशी कामगिरी तेथे त्यांनी केली, परंतु हाऊस ऑफ कॉमन्सचे मैदान सोडणे त्यांच्याही जिवावर आले होते. हाऊस ऑफ लॉर्ड्सवर जाणे त्यांनी नाकारले. महायुद्धानंतर निवडणुकीत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला व जातिवंत योद्धय़ाप्रमाणे त्यांनी १९५१च्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळविला. ते पंतप्रधान झाले असले तरी महायुद्धातील डौल पुढील कामगिरीत आला नाही व शेवटच्या वर्षांत जागा मोकळी करून द्यावी लागली. महायुद्ध जिंकणारा हा थोर सेनानी व्हीलचेअरवर बसून अट्टहासाने पार्लमेंटमध्ये येत होता. वाक्यांतील स्वल्पविराम, अर्धविराम याबद्दल कमालीचा दक्ष असणाऱ्या या शब्दप्रभूला निवृत्तीचा पूर्णविराम कळला नाही. युद्धातील जयाची कला साधली तरी निवृत्तीची कला साधली नव्हती.
पॉन्टिंगला ती साधली. त्याने ट्वेन्टी २० व वनडे क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती स्वीकारली होती. पॉन्टिंगअगोदर सहा महिन्यांपूर्वी राहुल द्रविडला ती साधली. कसोटी क्रिकेटमध्ये मानाचा पाट पटकाविणाऱ्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणलाही ती साधली. या तिघांनीही याच वर्षी मैदानाचा निरोप घेतला, भावविवश होत, पण अतिशय सन्मानाने.
प्रवृत्तीप्रमाणे निवृत्तीही जीवनाचे एक अंग आहे. ‘स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होतसे’, या जाणिवेने उत्साहात सळसळणारा प्रवृत्तीचा काळ कितीही हवासा वाटला तरी निवृत्तीची सीमारेषा त्याला असतेच. ही सीमारेषा जवळ आली म्हणून खंत बाळगायची नसते, तर मैदान गाजविले या धन्यतेत खेळाचा निरोप घ्यायचा असतो. मग तो खेळ क्रिकेटचा असो, पार्लमेंटचा असो, रंगभूमीचा असो वा संसाराचा असो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा