भाजप हा पार्टी विथ डिफरन्स असल्याचा दावा केला जात असला, तरी एका बाबतीत पुन्हा एकदा भाजपचे काँग्रेसशी साम्य दिसू लागले आहे. ते म्हणजे, दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची देशसेवा करण्याची आस, आणि त्यांचा देशसेवेचा ध्यास! निवडणुका तोंडावर येऊ लागताच, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे सध्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या देशसेवेच्या स्वप्नांना हिरवे धुमारे फुटू लागले आहेत. काँग्रेसच्या पटलावर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून युवराज राहुलजींचे नाव पुढे आणण्याचे नेटाचे प्रयत्न सुरू असतानाच, सत्ता विषसमान असल्याची जाणीव आईने करून देणे आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण असणारच नाही असे नाही, असे सांगत मनमोहन सिंग यांनी आपल्या स्वप्नांची वाट मोकळी करून देणे हा निव्वळ योगायोग मानता येणार नाही. त्याला आणखीही एक अर्थ आहे. काँग्रेसकडे सत्ता आलीच, आणि राजकारणात अजूनही मुळाक्षरे गिरविणाऱ्या राहुल गांधींनी सत्ताविषभयाने पंतप्रधानपद नाकारलेच, तर दुसऱ्या क्रमांकाचा दावा आपल्याच नावाशी बांधलेला राहावा हा धूर्त राजकीय बाणा मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यात डोकावतो. सिंग यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच भाजपमध्येही याच नीतीची नक्कल केली गेली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील यासाठी भाजपमधील एक दमदार फळी जोमाने कामाला लागलेली असली, तरी रालोआमधील मतैक्य तुटण्याच्या भयामुळे मोदी यांच्या वाटेवर कमी काटे नाहीत, याची जाणीव असलेल्या बुजुर्ग नेत्यांना पंतप्रधानपदाचा दावा वाऱ्यावर सोडणे शहाणपणाचे वाटत नाही. सत्तेच्या राजकारणात दीर्घकाळ वावरणाऱ्यांच्या राजकीय शहाणपणात एवढे साम्य असणारच! त्यामुळेच, आगामी निवडणुका लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष विजय गोयल यांनी जाहीर करून टाकले. नंतर त्यांनी जीभ चावली, असे म्हणतात; पण त्याकडे फारसे कुणाचे लक्ष जाणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली असावी. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील बुजुर्ग राजकारणी नेत्यांमधील साम्यस्थळ एकाच पदाशी निगडित आहे. ‘राहुल गांधी यांच्यासाठी पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा करण्यास आपण सदैव तयार आहोत, पण तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळाले तर ते स्वीकारणारच नाही असे नाही’, असे धूर्त उत्तर देणारे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पंतप्रधानपद सांभाळण्याची क्षमता असल्याचे प्रमाणपत्र देतानाच ‘बलशाली भारताच्या निर्मितीच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण राजकारणात सक्रिय आहोत’ असे सांगत पंतप्रधानपदाची मनीषा अलगद उघड करणारे लालकृष्ण अडवाणी हे दोन्ही नेते सध्या पंतप्रधानपदाचे दुसऱ्या क्रमांकाचे दावेदार म्हणून स्वत:ला प्रस्थापित करू पाहात आहेत. अडवाणी यांना येत्या ८ नोव्हेंबरला वयाची ८६ वर्षे पूर्ण होतील, तर डॉ. मनमोहन सिंग यांना २६ सप्टेंबरला ८१ वर्षे पूर्ण होतील. राजकारणातील या वयोवृद्ध नेत्यांची स्वप्ने मात्र अजूनही ‘टवटवीत’ आहेत. देशाचे ऋण फेडणे हे काही केवळ नरेंद्र मोदींचेच स्वप्न नव्हे, तर प्रत्येकाचेच स्वप्न असले पाहिजे. या स्वप्नपूर्तीची पहिली संधी आपल्याला मिळावी, असे राजकारणात मुरलेल्या अडवाणी आणि मनमोहन सिंग यांना वाटते, यातच सत्ता हे ‘विष’ नव्हे तर ‘टॉनिक’ आहे, हे स्पष्ट होते. तसेही, राजकारणात निवृत्तीचे वय आपल्या देशाला मान्यच नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा