परिवाराची ‘शाखा’ असलेल्या भाजपमध्ये सुरू झालेला मानसिक आणि वैचारिक गोंधळ अखेर संपला आणि सारे मनासारखे मार्गी लागले. अडवाणींची तप्तवाणी अखेर थंडावली, पक्षात मोदीमंत्राचा जपही सुरू झाला. आता भाजपच्या मातृसंस्थेत ‘पुढचे पाऊल’ पडले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर आणायचे आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर बसवायचे यासाठी आता आखणी सुरू झाली आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच राजकारणात थेट भाग घेत नाही. तांत्रिकदृष्टय़ा ते खरेच असते. कारण राजकारणात भाग घेणारा संघ नव्हे, तर संघाचे स्वयंसेवक असतात. ती व्यक्तिगत कृती असते. या वेळीदेखील, हा अलिप्ततावाद जपतच, मोदींचा ‘कंटकाकीर्ण’ मार्ग मोकळा करण्यात मोलाची भूमिका बजावली गेली. ‘परिवारा’चे बिनीचे नेते भाजपमधील नाजूक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी काळजीपूर्वक मार्गदर्शनही करत होते. संघ मात्र, ‘संघटना’ म्हणून यापासून चार हात लांबच होता. या काळात भाजपच्या नेत्यांनी मोहनराव भागवतांच्या भेटीगाठी घेतल्या, पण हे सारे अक्षरश: ‘व्यक्तिगत’ होते.. जे जे मार्गदर्शनाच्या अपेक्षेने येतात, त्या कुणालाही, ‘पक्षभेद’ न पाळता मार्गदर्शन करावयाचे हा संघाचा स्वभावच असल्याने, मोहनराव भागवत यांनी तसे केले. काँग्रेसला मार्गदर्शनाची गरज भासली असती, तरीही संघाने ते केले असते, असे भागवत यांनी मागेच सांगून टाकले आहे. देशहितासाठी जे जे आवश्यक ते ते सारे करण्यासाठीच संघाचा जन्म झालेला असल्याने, भाजपला देशहिताच्या चार गोष्टी सांगण्यात आणि त्यासाठी स्वयंसेवकांचा ताफा मदतीला देण्यातही काही गैर मानण्याची शक्यता नसतेच. त्यामुळे, कालपर्यंत संघ-भाजपमध्ये जे झाले, त्यामध्ये ‘भाजपधार्जिणेपणा’पेक्षा देशहिताचा विचारच मोठा होता, असा संघाचा दावा असू शकतो. विजयादशमीच्या मुहूर्तावर संघाच्या नागपूरस्थित मुख्यालयातून खुद्द सरसंघचालकांनीच ‘बदलाचा बिगूल’ फुंकला आहे. यामागेदेखील भाजपला मदत करण्यापेक्षाही, देशाला संकटातून वाचविण्याचाच व्यापक विचार असल्याचा दावा केला जाईल. तसे भाजप आणि संघ यांचे ‘पारिवारिक’ नाते जगजाहीर असले, तरी उभयतांपैकी कुणीच त्याची कबुली देत नाही आणि त्याची वाच्यताही केली जात नाही. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी रेशीमबागेच्या मैदानावर दसरा उत्सवाच्या निमित्ताने बौद्धिकातून मतदारांनाच बदलाची साद घातली. महागाईच्या ओझ्याने सामान्य माणूस पिचला आहे. देशाला महासत्ता बनविण्याच्या घोषणा करणाऱ्यांच्या राज्यात रुपयाची किंमत रसातळाला चालली आहे, असे दाखले देत थेट काँग्रेसवर नेम न साधताही भागवत यांनी काँग्रेसप्रणीत सरकारवरच कोरडे ओढले, आणि ‘शत प्रतिशत मतदान करून लोकशाही बलदंड करा’, असा संदेशही त्यांनी दिला. देशाचे भविष्य घडविण्याची ताकद मतदारांना दाखवून देताना, भाजपला सत्ता द्या किंवा मोदींना पंतप्रधानपदी बसवा असा कोणताही थेट ‘आदेश’ मात्र त्यांनी दिला नाही. ताकाला जाताना भांडे लपवावे, हे परिवारात सगळ्यांनाच माहीत असते आणि भांडे लपविणारा ताकालाच आला आहे, हेही सारे जाणून असतात. आता संघाच्या साऱ्या फळ्यांना ‘मोदीमंत्राची दीक्षा’ मिळाली आहे. भागवत यांच्या बौद्धिकातून योग्य तो संदेश संघ परिवारापर्यंत पोहोचलाच आहे.

Story img Loader