व्यक्तीपेक्षा समष्टी मोठी मानणाऱ्या संघाला त्याच मुशीतून तयार झालेल्या भाजपचे सध्याचे नमोखूळ अती वाटत असेल तर ते समजण्यासारखे आहे. संघाच्या मुशीतून घडलेल्या व्यक्ती भाजपमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवल्या जातात आणि बघता बघता त्यांना सत्तेची चटक लागून संघमूल्ये ते विसरतात हे वास्तव आहे. याच भाजपकरणाची काळजी वाटल्यामुळे सरसंघचालकांवर ‘मर्यादा पाळा’ असा इशारा स्वयंसेवकांना द्यावयाची वेळ आली असणार.
आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षास निवडून आणणे ही आपलीच जबाबदारी आहे असा समज संघ स्वयंसेवकांच्या मनी दृढ होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. निवडणूक आहे म्हणून नरेंद्र मोदी यांचे गुणगान करण्याच्या नादात नमो नमोचा जप करीत बसणे हे आपले काम नाही, असे सरसंघचालकांनी बजावले आहे. व्यक्तीपेक्षा समष्टी मोठी मानणाऱ्या संघाला त्याच मुशीतून तयार झालेल्या भाजपचे सध्याचे नमोखूळ अति वाटत असेल तर ते समजण्यासारखे आहे. एरवी संघ आणि भाजप हे व्यक्तिपूजा मानीत नाहीत. परंतु सध्या नरेंद्र मोदी यांचे जे काही सुरू आहे ते व्यक्तिपूजेपेक्षाही केविलवाणे आणि म्हणून हास्यास्पद आहे. केंद्रात गेली दहा वर्षे सत्तेबाहेर राहावे लागलेल्या भाजपस मोदी यांचे प्रेम वाटणे काही प्रमाणात साहजिक आहे. भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तराधिकारी लालकृष्ण अडवाणी यांना सत्ता मिळवण्यात यश आले नाही. तेव्हापासून पक्षातील त्यांचा टक्का घसरला. २००४ आणि पुढे २००९ सालात हुकलेली ही सत्तासंधी हातची जाऊ नये म्हणून भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्यात काही गैरही नाही. परंतु इतके दिवस काँग्रेसच्या व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेवर झोड उठवणाऱ्या भाजपचे रूपांतरही अलीकडच्या काळात व्यक्तिकेंद्रित पक्षात झाले असून मोदी म्हणजेच भाजप अशी स्थिती झाली आहे. गुजरातसारख्या राज्यात भाजप पक्षास मोदींशिवाय चेहरा नाही आणि ओळखही नाही. अस्तित्वही असले तरी ते अगदीच नगण्य. आता याच प्रकाराची पुनरावृत्ती राष्ट्रीय स्तरावर होऊ घातली असून मोदी या एकाच व्यक्तीभोवती भाजपचा प्रचार फिरताना दिसतो. काँग्रेस या पक्षाचे केंद्र ज्याप्रमाणे गांधी कुटुंबीय त्याप्रमाणे भाजपचा अक्षदेखील मोदींभोवतीच अशीच रचना दिसते. इतर अनेक अडचणींप्रमाणे अशा व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेत एक मोठा धोका असतो. तो म्हणजे केंद्रस्थानी असलेल्या व्यक्ती वा कुटंबाचे लांगूलचालन होण्याचा. काँग्रेसप्रमाणे सध्या भाजपमध्येदेखील हेच सुरू आहे. जणू मोदी यांची मर्जी राखणे हेच फक्त भाजपच्या नेत्यांचे प्राथमिक कर्तव्य असून ते केले म्हणजे निवडणुकीतील यशाची हमी, असे चित्र निर्माण झाले आहे. वाराणसी, लखनऊ वा विदिशा आदी मतदारसंघांतून कोणी निवडणुका लढवायच्या यावरून पक्षात सध्या जो वाद सुरू आहे तो या व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेचा निदर्शक म्हणावा लागेल. आपण फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठीच आपला लखनऊ मतदारसंघ सोडू, असे पक्षाचे उत्तर प्रदेशातील जुनेजाणते लालजी टंडन म्हणतात तर बाबुल सुप्रियोसारखा बेताचा गायक आणि कोवळा राजकारणी, मोदी हे पक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे जाहीर विधान करतो. या नमोगुणगानाचा अतिरेक भाजपमध्येही सर्वाना मंजूर आहे, असे नाही. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या उमेदवार मानल्या गेलेल्या सुषमा स्वराज यांनी जे काही सुरू आहे त्याबाबत नाराजी व्यक्त करून पाहिली. परंतु त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. याचे अर्थातच कारण म्हणजे भाजपमध्ये सध्या फक्त लक्ष दिले जाते ते एकाच व्यक्तीकडे. ते म्हणजे मोदी यांच्याकडे. डबघाईला आलेल्या कुटुंबाचा तारणहार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या एखाद्या मुलाचे जसे घरात कोडकौतुक होते, तसे सध्या मोदी यांचे झाले आहे.
या पाश्र्वभूमीवर सरसंघचालकांचा हा इशारा आला असून त्यामुळे उलट संघाच्या भूमिकेबद्दलही काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. आगामी निवडणुकीत भाजपस यश मिळावे यासाठी संघ स्वयंसेवकांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे अशा प्रकारचा सल्ला काही दिवसांपूर्वी खुद्द भागवत यांनीच दिला होता. त्यांचे म्हणणे असे की भाजपसाठी काम करावे, पण स्वयंसेवकांनी मर्यादा ओलांडू नये. परंतु मुदलात प्रश्न असा की ही मर्यादा कोणती? संघ हा भाजपचा कर्मचारी विभागप्रमुख आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. कर्मचारी विभाग आणि संबंधित विभागप्रमुख हे एकत्र आल्याखेरीज कोणत्याही आस्थापनात बढत्या वा बदल्या होऊ शकत नाहीत. म्हणजेच भाजपच्या अध्यक्षपदी नितीन गडकरी यांना नेमण्याचा, नंतर काढण्याचा निर्णय असो वा एकेकाळी संघटन सचिव असलेल्या नरेंद्र मोदी यांना भाजपच्या कामासाठी संघातून मुक्त करण्याचा निर्णय असो, हे सगळे निर्णय घेतले गेले ते भाजप नेतृत्वगण आणि संघ यांनी. शिवराज सिंग चौहान असोत वा दिवंगत प्रमोद महाजन. हे सर्व भाजपचे नेते झाले ते संघाने तसे निर्णय घेतले म्हणून. पुढे एकदा भाजपमध्ये पूर्णपणे गेल्यावर त्यांनी काय दिवे लावले याच्याशी संघाचा दैनंदिन संबंध नसेलही. परंतु या सर्व मंडळींची मूळ नाळ ही संघातीलच हे नाकारता येणार नाही. तेव्हा सरसंघचालकांना अभिप्रेत असलेली मर्यादा नक्की कोणती? बंगळुरू येथे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना भागवत यांनी आपण, म्हणजे संघ- राजकारणात नाही, असेही सांगितले. त्याच वेळी भाजप ज्येष्ठांतील मतभेद मिटावेत यासाठीही भागवत यांनी मध्यस्थी केल्याचे वृत्त आहे. त्यांचा बंगळुरू येथील सल्ला पाहता, हे मतभेद मिटावेत यासाठी सरसंघचालकांनी मध्यस्थी करण्याची आवश्यकता नाही आणि भाजपसाठी ती आहे असे गृहीत धरले तरी संघाने ती पूर्ण करण्याचे कारण नाही. परंतु तरीही सरसंघचालकांनी मध्यस्थी करून भाजप नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला, तो का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
याचे कारण असे की संघासमोर आव्हान आहे ते होऊ घातलेल्या वा काही प्रमाणात झालेल्या भाजपकरणाचे. संघाच्या मुशीतून घडलेल्या व्यक्ती भाजपमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवल्या जातात आणि बघता बघता त्यांना सत्तेची चटक लागून संघमूल्ये ते विसरतात हे वास्तव आहे आणि ते कसे रोखायचे हा प्रश्न संघास भेडसावतो आहे. या सत्तेचा मोह भल्याभल्यांना होतो. अत्यंत सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तीही सत्तापाशात गुरफटल्या की मूल्याधारित राहत नाहीत, याचा अनुभव संघास मोठय़ा प्रमाणावर आला असेल. व्यक्तीपेक्षा समष्टीस मोठे मानत कार्य करावे हा धडा घेऊन समाजकार्यात उतरलेल्यांना राजकारणाची चटक लागली की ते पूर्णपणे व्यक्तिकेंद्रित होतात, हे कटू असले तरी वास्तव आहे. एकेकाळी संघाचा पूर्णवेळ असलेला कार्यकर्ता भाजपत गेल्यावर रस्त्यारस्त्यांवर, वर्तमानपत्रांत वगैरे आपली छबी पाहण्यात किती आनंद मानू लागतो याचे अनेक दाखले आपल्या आसपास वावरत आहेत. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. तेव्हा जे इतरांना दिसते ते सरसंघचालकांना माहीत नाही असे कसे मानणार?
याच भाजपकरणाची काळजी वाटल्यामुळे सरसंघचालकांवर हा इशारा द्यावयाची वेळ आली असणार. संघ कार्यकर्त्यांना भाजप बाधेची इतक्या मोठय़ा प्रमाणावर लागण झाली तर काय, हा प्रश्न त्यांना भेडसावत असल्यास ते नैसर्गिक म्हणावयास हवे. त्याचमुळे नमो मंत्राचा जप कमी करा असे सांगायची वेळ त्यांच्यावर आली. तसे सांगितले नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजप स्वयंसेवक संघ म्हणून ओळखला जाण्याचा धोका होता. तो टाळणे हे संघासमोरचे मोठे आव्हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा