भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे नाव भारतीय जनसंघ होते आणि त्याच्या स्थापनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रिय सहभाग होता, हे आताच्या पिढीला कदाचित माहीत नसण्याची शक्यता आहे. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी आपापले अस्तित्व जनता पक्ष या नव्या राजकीय पक्षात विलीन करण्याचे ठरवले, तेव्हा भारतीय जनसंघ हा कट्टर उजवा पक्ष म्हणूनच परिचित होता. जनसंघातील कुणाही कार्यकर्त्यांला त्याबद्दल जराही संकोच वाटू नये, अशीच तेव्हाची परिस्थिती होती. देशाच्या राजकारणात तेव्हाही फार मोठा प्रभाव न दाखवताही जनसंघ आपले अस्तित्व मात्र राखून होता. जनसंघात काम करणाऱ्या बहुतेक कार्यकर्त्यांचे रा. स्व. संघाशी घनिष्ठ संबंध होते आणि ते उघड स्वरूपाचे होते. मात्र संघाने कधीही अधिकृतपणे जनसंघ हे आपले राजकीय रूप आहे, असे जाहीर केले नव्हते. आणीबाणीत तुरुंगात सर्व राजकीय पक्षांचे नेते जसे स्थानबद्ध होते, तसेच संघाचेही अनेक नेते होते. आणीबाणी उठल्यानंतर जेव्हा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी जाहीरपणे पुढाकार घेऊन जनता पक्षात सामील होण्यासाठी जनसंघाला प्रोत्साहन दिले होते. आता रा. स्व. संघ आताच्या भारतीय जनता पक्षामध्ये आपले सुमारे दोन हजार कार्यकर्ते पाठवणार असल्याचे वृत्त वाचून भाजपमधील नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना जरासे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. मात्र अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्या पिढीतल्या सगळ्यांना ‘त्यात नवे ते काय?’ असेच वाटण्याची शक्यता आहे. आजपर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी मतदारसंघातील एक हजार मतदारांचा ‘हजारी भाग’ सांभाळला आहे. हजारी भागाची ही कल्पना देशातील अनेक राजकीय पक्षांना हेवा वाटणारी होती, मात्र तिचे अनुकरण करणे त्यांना शक्य झाले नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता या हजार मतदारांपर्यंत पोहोचणारी ही विश्वासार्ह यंत्रणा आत्ता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही कार्यरत राहील, याची भाजपला खात्री आहे. गेल्या दोन दशकांत भारतीय जनता पक्षात हेतुत: बदल करण्यात आले आणि त्यात गांधीवादी समाजवादापासून पुन्हा मूळ पदावर येण्याचे वर्तुळही पूर्ण झाले. पण या नादात पक्षात नव्याने आलेल्या स्वयंपूर्ण कार्यकर्त्यांचे नेते कधी झाले आणि त्यांची मांड घट्ट कधी झाली, ते संघाच्याही लक्षात आले नाही. इतर राजकीय पक्षांप्रमाणेच भाजपमध्येही अंतर्गत कलह, गटबाजी आणि वशिलेबाजी यांसारखे कली घुसले आणि त्यामुळे भाजप मूळ वैचारिक बैठकीपासून दूर जाऊ लागल्याची चिंता व्यक्त होऊ लागली. निवडणुकीत आपल्याच मुलाबाळांना वा नातेवाइकांना उमेदवारी देऊन आपण वेगळे नाही, हेच सिद्ध होऊ लागले. संघाच्या विचारांबद्दल जाज्ज्वल्य वगैरे अभिमान असणाऱ्या स्वयंसेवकांच्या डोळ्यात ही गोष्ट न खुपती तरच नवल. त्यामुळे आता भाजपमध्ये विविध पातळ्यांवर संघाचे स्वयंसेवक अधिकृतपणे काम करू लागतील आणि त्यामुळे या असल्या प्रकारांना आळा बसेल, अशी आशा बाळगून संघाने ही नवी व्यूहरचना आखली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून अडवाणी यांना माघार घेण्यास ज्या संघाने भाग पाडले, त्या संघाला येत्या निवडणुकीत कोणत्याही स्थितीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आणायचे आहे. परंतु सत्तेत बसलेल्या पक्षातील सत्ताकारणाच्या साठमारीत मूळ विचारांपासून भाजप दूर जाऊ नये, या कारणासाठी संघाने आपणहून हे पाऊल उचलायचे ठरवलेले दिसते. आपल्या हेकेखोर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र मोदी यांना रा. स्व. संघाचा हा घुसखोरीचा निर्णय कितपत मानवेल, याबाबत मात्र शंकेला भरपूर वाव आहे.

Story img Loader