गरजू रुग्णांना शक्य ती मदत करण्याबरोबरच रुग्णसेवेचे अनेक उपक्रम ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ संस्थेतर्फे गेली ऐंशी वर्षे सेवेच्या भावनेतून राबवले जात आहेत आणि आता सातत्याने डायलिसीस कराव्या लागणाऱ्या रुग्णांना रक्तासह इतर आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे नवे कामही संस्थेने हाती घेतले आहे. एकीकडे या कामाची फार मोठी गरज निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे एका मोठय़ा ट्रस्टने निधी देण्याबाबत यंदा असमर्थता दर्शवली आहे.
अशा कात्रीत सापडलेल्या ‘भावे प्रयोगा’ला आता समाजाच्याच ‘टॉनिक’ची गरज आहे.
रुग्णांची सर्वतोपरी सेवा करण्यासाठी ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ या संस्थेची स्थापना स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे ऊर्फ भावे गुरुजी यांनी सोलापुरात ऐंशी वर्षांपूर्वी केली. पुण्यातही गेली पस्तीस वर्षे हे काम सुरू असून संस्थेतर्फे ‘भावे गुरुजी रक्तदान सेवा’ हे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. वयोवृद्ध रुग्ण, महिला रुग्ण आणि गरीब रुग्ण यांच्यापैकी ज्यांना ज्यांना रक्ताची गरज भासते, त्यांच्यासाठी या योजनेत सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाते किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्यदेखील उपलब्ध करून दिली जाते. गरजू रुग्णांसाठी नव्या योजना हाती घेत असतानाच संस्थेच्या कामालाही मर्यादा येत आहेत. गरजू रुग्णांसाठी खूप काम करण्याची गरज आहे, काम करण्याची तयारीदेखील आहे; पण हाती तेवढा निधी नाही, अशा परिस्थितीत सापडलेल्या या संस्थेला आता समाजानेच पाठबळ देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. इच्छुकांनी रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह (सोलापूर) शाखा, पुणे किंवा पेशंट्स रिलीफ असोसिएशन (सोलापूर) या नावाने धनादेश काढावेत. 

Story img Loader