राजकारणी सत्ताधारी झाला की त्याच्यात एका दुर्गुणाचा प्रादुर्भाव होतो. तो म्हणजे समोरच्या व्यक्तीची उपयुक्तता जोखणे आणि त्यानुसारच त्याचे आदरातिथ्य करणे वा न करणे. या दुर्गुणाने मुंडे यांना कधीही स्पर्श केला नाही. आपले पद, मोठेपण विसरून आपल्यास आपले म्हणण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यात कधीही बदल झाला नाही..
गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा इतका तगडा गडी एका किरकोळ अपघातात प्राणास मुकावा हा नियतीचा खेळ क्रूर आणि अतक्र्यच. त्यांना अपघात नवे नव्हते. एकदा तर त्यांचे हेलिकॉप्टरच शेतात कोसळले. पण त्याचा कोणताही परिणाम न झालेले मुंडे चिखल तुडवत चालत निघाले. मराठवाडय़ासारख्या मागास भागात आणि एका मागास, साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला केवळ योगायोगाने राजकारणात येतो काय आणि थेट राज्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहतो काय! ती कहाणी उभारी देणारी. हवीशी. पण त्याच कहाणीचा असा करुण अंत अशाश्वताच्याच शाश्वताची आठवण करून देणारा. नकोसा.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे यांचे असणे आणि आता नसणे अनेक अर्थानी महत्त्वाचे आहे. हे महत्त्व केवळ मुंडे सत्ताधारी पक्षाचे मंत्री होते म्हणून अर्थातच नाही. ती एक तुलनेने क्षुल्लक अशी बाब. मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वास अनेक सामाजिक पदर आहेत आणि ते अधिक महत्त्वाचे आहेत. वंजारा या मागास समाजातल्या पांडुरंग आणि लिंबाबाई यांच्या पोटचे हे दुसरे अपत्य. घरची परिस्थिती हलाखीचीच. आई-वडील वारकरी संप्रदायाचे. घरची गरिबी होती तरी आपल्या पोरांनी शिकावे ही आई-वडिलांची इच्छा. त्या वेळच्या बीडमध्ये शाळेचा वर्ग झाडाखाली भरत असे. ही झाडाखालची शाळा आणि पुढे जिल्हा परिषद हेच त्या वेळचे गरिबांचे पर्याय होते. पुढे गोपीनाथ २० वर्षांचे असताना वडील पांडुरंग यांच्या निधनामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु आई आणि ज्येष्ठ बंधूंच्या पाठिंब्यामुळे गोपीनाथ महाविद्यालयात कायम राहिले. याच टप्प्यावर त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्याला दिशा देणारा सवंगडी मिळाला. त्याचे नाव प्रमोद महाजन. वास्तविक महाराष्ट्रातील सामाजिक उतरंडीचे वास्तव लक्षात घेता गोपीनाथ मुंडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या रा स्व संघप्रणीत संघटनेकडे नैसर्गिकरीत्या वळले नसते. त्यांना त्या दिशेने नेले प्रमोद महाजन यांनी. महाजन अभाविपमध्ये झपाटय़ाने प्रगती करीत असताना मुंडेदेखील त्यांच्या अंगभूत गुणांनी नाव कमावू लागले होते. अंबाजोगाई, बीड हा परिसर ही महाजन-मुंडे यांची कार्यशाळा. त्या काळातील मराठवाडय़ास जमीनदारी नेतृत्वाने ग्रासलेले होते. परंतु या प्रस्थापितांना धक्का लागू शकतो ही उमेद ब्राह्मण पाश्र्वभूमीचे महाजन आणि मागास जमातीतील मुंडे यांच्या जोडगोळीने पहिल्यांदा निर्माण केली. तो काळ आणीबाणीचा. हे दोघेही आणीबाणीविरोधात लढताना तुरुंगात गेले आणि त्यातून सुटका झाल्यावर मुंडे वेगळय़ाच बेडीत अडकले. महाजन यांच्या बरोबरचे त्यांचे राजकीय साहचर्य एव्हाना खासगी आयुष्यातील जीवश्च मैत्र बनले होते. त्यातूनच महाजन यांच्या सख्ख्या बहिणीशी गोपीनाथ यांचा विवाह झाला. तिकडे राजकीय आघाडीवर महाजन आणि मुंडे यांच्या जोडगोळीची ताकद पहिल्यांदा ओळखली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवत यांनी. काँग्रेसच्या दलित, मुसलमान आदी पारंपरिक मतपेढीस छेद द्यावयाचा असेल तर जनसंघाने आणि पुढे भारतीय जनता पक्षाने आपले स्वत:चे स्वतंत्र जातीय समीकरण उभे करावयास हवे हे भागवतांनी ताडून ‘माधव’ हे नवे सूत्र या पक्षासमोर ठेवले. माळी, धनगर आणि वंजारी अशा तीन समाजांकडे त्यानंतर भाजपने लक्ष केंद्रित केले आणि देशभर त्यातूनच मुंडे यांच्या बरोबरीने कल्याणसिंग, उमा भारती आदी नेत्यांची नवी फळी तयार झाली. आजही इतर मागासांचा मोठा पाठिंबा भाजपकडे आहे कारण त्यामागची ही व्यूहरचना. त्यानंतरचा काळ हा मुंडे आणि महाजन यांच्या राजकीय कर्तृत्वाच्या भरभराटीचा. महाजन यांनी राष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित करावे आणि मुंडे यांनी भर महाराष्ट्रावर द्यावा हा त्याच व्यूहरचनेचा भाग. तो या दोघांनीही तंतोतंत पाळला. पुढे मुंडे विधानसभेत गेले आणि महाजन संसदेत. जवळपास दोन-अडीच दशके महाजन आणि मुंडे या जोडगोळीने महाराष्ट्राचे एकमती नेतृत्व केले. या दोघांची व्यवस्था अभेद्य अशी होती. त्या दोघांत कितीही जरी मतभेद झाले तरी जगासमोर येताना हे दोघेही एकमतानेच येत. खासगीतही या दोघांनी कधी एकमेकांतील कोणत्याही मतभेदाविषयी कधीही वाच्यता केली नाही.
मुंडे यांचे गोपीनाथराव व्हायला प्रारंभ झाला तो नव्वदीच्या सुरुवातीस. तोपर्यंत महाराष्ट्र म्हणजे शरद पवार असे समीकरण होते. ते पहिल्यांदा भंगले मुंडे यांच्यामुळे. पवार यांचे समाजविघातक घटकांशी असलेले कथित संबंध, जमीनजुमल्यांचे वादग्रस्त व्यवहार आणि त्यांच्या सरकारने हाती घेतलेला एन्रॉन प्रकल्प यांविरोधात मुंडे यांनी शब्दश: रान उठवले. या निमित्ताने त्यांनी किती वेळा महाराष्ट्र पिंजून काढला असेल यास गणती नाही. त्याचमुळे महाराष्ट्राचा कानाकोपरा मुंडे यांना माहीत होता आणि त्याबाबत पवारांच्या खालोखाल, किंबहुना बरोबरीने, त्यांची ख्याती होती. फर्डे, रांगडे वक्तृत्व, अपार कष्ट करायची तयारी आणि कोणत्याही साध्याभोळय़ा कार्यकर्त्यांच्या गळय़ात हात टाकून बोलण्याइतका मोकळाढाकळा स्वभाव यामुळे मुंडे राज्यभर लोकप्रिय होते. राजकारणातील मतभेदास त्यांनी कधीही शत्रुत्व मानले नाही. त्याचमुळे महाजन, पवार यांच्या बरोबरीने मुंडे यांचे संबंध सर्वपक्षीय राहिले. त्यांच्याच कष्टाची परिणती १९९५ साली भाजप-सेना सत्तेवर येण्यात झाली. त्याआधी विरोधी पक्षनेता म्हणून समुद्रात बुडवलेला एन्रॉन प्रकल्प सत्तेवर आल्यावर पुन्हा वर काढण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त झाला तरी गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगीच होती. मुंबईतील गुंडगिरीचा कणा मोडला गेला तो त्यांच्याच काळात. पुढे १९९९ साली सेना-भाजपची सत्ता गेली. परंतु तरीही मुंडे यांचा अधिकार गेला असे झाले नाही. राज्याच्या प्रश्नावर अत्यंत अभ्यासू वृत्ती, उत्तम हजरजबाबी वक्तृत्व आणि प्रसंगावधान यामुळे मुंडे यांना विधानसभेत ऐकणे हा अतीव आनंदाचा भाग असे. त्यांचे वक्तृत्व जिवंत होते. त्यात पुस्तकी घोटीवपणा नसे. ग्रामीण लहेजाने मुंडे सत्ताधाऱ्यांच्या टोप्या इतक्या सहजपणे उडवत की त्याचा आनंद प्रसंगी सत्ताधारीही घेत. हाताला जे लागतील ते कागद फडकावत मुंडे असे काही घणाघाती हल्ले करीत की पाहणाऱ्यास त्यांच्या हातातील कागदांवर सर्व तपशील लिहिलेला आहे की काय, असे वाटावे. हातातील कागदावरील मजकूर जणू आपण वाचत आहोत, असा आभास तर त्यांनी अनेकदा निर्माण केला. कोणत्याही पक्षाचे अन्य नेते कितीही बोलून गेले तरी मुंडे बोलायला उभे राहिले की बघता बघता चित्र पालटत असे. स्वत:वर त्यांचे प्रेम होते. त्यामुळे उत्तम भाषण झाले की खाली बसता बसता ते खिशातून हळूच कंगवा काढत, केसावर फिरवत उलटी मान करून वार्ताहर कक्षाकडे नजर टाकत भाषणाचा योग्य तो परिणाम झाला की नाही याची दखल घेत. राजकारणी सत्ताधारी झाला की त्याच्यात एका दुर्गुणाचा प्रादुर्भाव होतो. तो म्हणजे समोरच्या व्यक्तीची उपयुक्तता जोखणे आणि त्यानुसारच त्याचे आदरातिथ्य करणे वा न करणे. या दुर्गुणाने मुंडे यांना कधीही स्पर्श केला नाही. आपले पद, मोठेपण विसरून आपल्यास आपले म्हणण्याचा, कोणाच्याही अडीअडचणीस मदतीला जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यात कधीही बदल झाला नाही. त्यामुळे मुंडे यांच्या भोवतालचा कार्यकर्त्यांचा गराडा अक्षय्य असे. पक्षीय, इतकेच काय पण वैयक्तिक मतभेददेखील, त्यांनी कधी मानवी संबंधांच्या आड येऊ दिले नाहीत. माणसे जोडणे हे त्यांचे अंगभूत कौशल्य होते आणि कोणत्याही पदामुळे ते झाकोळले गेले नाही.
असा हा रांगडा गडी आपल्या मेहुण्याच्या निधनामुळे मात्र पार कोलमडून पडला. प्रमोद महाजन यांचे जाणे हे मुंडे यांना मोडून पाडणारे होते. महाजन काही केवळ त्यांचे सहकारीच नव्हते. तर वैयक्तिक आयुष्यातील सुहृददेखील होते. त्यामुळे महाजनांच्या निधनानंतर कित्येक दिवस मुंडे शोकमग्न होते आणि अश्रूंना मोकळी वाट करून देण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. सख्ख्या भावाच्या हल्ल्यात विदग्ध झालेल्या महाजनांना मांडीवर घेत रुग्णालयात दाखल केले ते मुंडेंनीच. त्यानंतर दिवसरात्र ते महाजनांच्या उशाशी बसून होते. आठ वर्षांपूर्वीच्या मे महिन्यात महाजनांचा अंत झाला. आज मुंडे यांचा. या प्रसंगी एका दुर्दैवी करुण योगायोगाची वाच्यता करावयास हवी. २०१४ साली भाजप स्वत:च्या बळावर सत्तेवर येईल आणि माझे नाव पंतप्रधानपदासाठी घेतले जाईल, अशी स्वच्छ भविष्यवाणी महाजन यांनी वर्तवली होती. ती अर्धी खरी ठरली. भाजप सत्तेवर आला. पण ते राहिले नाहीत. त्याच वेळी महाराष्ट्रात भाजप सत्तेवर येऊ पाहत असताना आणि महाजन यांच्या लाडक्या गोपीनाथाचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात असताना त्या टप्प्यावर मुंडेही गेले. या दोघांशीही आमचा उत्तम स्नेह. राजकारण आणि समाजकारणाचा त्यांचा अभ्यास थक्क करणारा होता. चर्चेत मुंडे यांना थोपवू गेल्यास राव.. आईकाना.. असे म्हणत ते नव्या उत्साहाने आपली बाजू मांडत. कधी त्यांना फोन जरी केला तरी आईकाना.. तुम्ही काय सांगता.. असे म्हणत मुंडे सुरुवात करीत. आज ते मात्र सर्व ऐकण्याच्या आणि ऐकवण्याच्या पलीकडे गेले.
आग्रह आणि अतिरेक यांतील सीमा अस्पष्ट होण्याच्या काळात मुंडे यांच्यासारख्या मध्यममार्गी नेत्याचे जाणे हे लोकशाहीसाठी नुकसानकारक असते. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.
आईकाना.. !
राजकारणी सत्ताधारी झाला की त्याच्यात एका दुर्गुणाचा प्रादुर्भाव होतो. तो म्हणजे समोरच्या व्यक्तीची उपयुक्तता जोखणे आणि त्यानुसारच त्याचे आदरातिथ्य करणे वा न करणे. या दुर्गुणाने मुंडे यांना कधीही स्पर्श केला नाही.

First published on: 04-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rural development minister gopinath munde passes away