रशियन सरकार आणि चेचेन यांच्यातील संघर्षांचा नवा रक्तरंजित अध्याय सुरू होण्याची चाहूल रशियातील हल्ल्यांनी लागली आहे. रशियानेही यापूर्वी चेचेन्यावर अनेक हल्ले केले, कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे चेचेन दहशतवादाला राजकीय समस्या मानण्यास तयार नाहीत, असाच आजवरचा इतिहास आहे..
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या नाझी फौजांना पाणी पाजणारे तेव्हाच्या सोविएत युनियनमधील स्टालिनग्राड सध्या स्वत:च विव्हळ झाले आहे. लागोपाठ दोन दिवसांच्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यांनी हे शहर हादरले असून त्यामुळे दोन महिन्यांवर आलेल्या हिवाळी ऑलिम्पिक्स स्पर्धावर अनिश्चिततेचे सावट तयार होऊ शकेल. हे दोन्ही हल्ले चेचेन दहशतवाद्यांनी केल्याचा संशय असून त्यामुळे रशियन सरकार आणि चेचेन यांच्यातील २० वर्षांच्या संघर्षांचा नवा रक्तरंजित अध्याय सुरू होत असल्याचे मानले जात आहे. स्टालिनग्राड, म्हणजे आताचे वोल्गोग्राड, या शहरापासून साधारण ६०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साची येथे या हिवाळी स्पर्धा होणार असून त्या उधळून लावण्याचे आवाहन रशियातील चेचेन बंडखोरांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियात होत असलेले दहशतवादी हल्ले हे याच ऑलिम्पिकविरोधी धमकीचा भाग असल्याचे मानले जाते. अर्थात या ऑलिम्पिक स्पर्धा हे काही चेचेन आणि रशियन यांच्यातील तणावाचे कारण नाही. स्वतंत्र देशाच्या निर्मितीसाठी, म्हणजेच्या रशियाच्या जोखडातून सुटका करून घेण्यासाठी, चेचेन बंडखोरांचा जवळपास गेली दोन शतके संघर्ष सुरू आहे. अलीकडे या संघर्षांस चांगलीच हिंसक धार येऊ लागली असून त्यास वेगवेगळय़ा रशियन सरकारांची दमनशाहीही कारणीभूत आहे, यात शंका नाही. रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन हे आपल्या कराल राजवटीसाठी ओळखले जातात आणि त्यांनी मिळेल त्या मार्गानी आपल्या विरोधकांना ठेचण्याचा प्रयत्न चालवला आहे. आताही ते वेगळे काही करतील असे नाही. मुळचे सुन्नी मुस्लीम असलेले हे चेचेन दहशतवादी अन्यत्रही पसरू लागले असून अमेरिकेतील बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही चेचेनच होते हे लक्षात घ्यावयास हवे.
चेचेन्सच्या फुटीर चळवळीस खरी गती आली १९९० पासून. १९८९ साली बर्लिनमधील भिंत कोसळल्यानंतर कम्युनिझमला घरघर लागली. याच काळात अक्राळविक्राळ पसरलेल्या सोविएत रशियाचे विघटन सुरू झाले. कम्युनिझमचा पोलादी पडदा वितळल्यानंतर पूर्व युरोपातील अनेक देशांच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणा पालवल्या गेल्या. त्या परिसरातून अनेक नवनवे देश तयार होत असताना त्याचमुळे चेचेन्सनाही आपल्याला स्वातंत्र्य हवे असे वाटू लागले. त्याच उद्देशाने त्यांनी ऑल नॅशनल काँग्रेस ऑफ द चेचेन पीपल ही संघटना स्थापन केली आणि तिच्यामार्फत मायभूमीसाठी चळवळ सुरू केली. तत्कालीन रशियनप्रमुख बोरिस येल्तसिन यांचा अर्थातच या चळवळीस विरोध होता. कॉकेशस पर्वतराजींच्या परिसरातील हा चेचेन प्रदेश रशियाचाच अविभाज्य घटक असल्याची भूमिका येल्तसिन यांनी घेतली आणि चेचेन्सना कोणतीही स्वायत्तता वा सवलत द्यावयास विरोध केला. एकीकडे रशियाच्या नकाशावर नवनव्या देशांचे स्वतंत्र अस्तित्व दिसू लागले असताना आपल्याला मात्र स्वातंत्र्य वा स्वायत्तता नाकारली जाते, यामुळे चेचेन्समध्ये संताप झाला असेल तर तो समजून घ्यावयास हवा. तेव्हा त्या काळात १९९४ ते १९९६ अशी दोन वर्षे रशियाच्या फौजांनी चेचेन्सच्या विरोधात सशस्त्र युद्धच पुकारले. पहिले चेचेन युद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात रशियाच्या फौजांनी चेचेन्सना जबर हानी केली. परंतु त्यामुळे स्वतंत्र चेचेन चळवळ अशक्त होण्याऐवजी तिने अधिकच लक्ष वेधून घेतले. या चळवळीस उलट पाठिंबा वाढू लागला. या संघर्षांत अक्षरश: हजारोंचे बळी गेले. परंतु तरीही रशियन फौजांना चेचेन्सचा पूर्ण बीमोड करणे शक्य झाले नाही. परिणामी कॉकेशसच्या पर्वतराजीत चेचेन्सचे अनधिकृत आणि अनौपचारिक असे सरकारच तयार झाले. ही परिस्थिती आटोक्यात आणणे रशियाच्या राज्यकर्त्यांना शक्य झाले नाही आणि अखेर येल्तसिन यांना चेचेन्सबरोबर शांतता करार करावा लागला. काही काळ ही युद्धबंदी दोन्ही बाजूंनी पाळली गेली. परंतु शेजारील दाजेस्तान या प्रजासत्ताकातील फुटीरतावादी चळवळीस चेचेन्सनी सक्रिय पाठिंबा द्यावयास सुरुवात केल्यानंतर उभय बाजूंत पुन्हा तणाव निर्माण होऊ लागला. दाजेस्तानात रशियाधार्जिणी राजवट होती. ती उलथून पाडण्यासाठी चेचेन्सनी स्थानिकांच्या बरोबरीने प्रयत्न सुरू केल्यावर पुन्हा एकदा दोघांतील संबंध चिघळले. ते इतके की त्यानंतर रशियाच्या विविध शहरांत बॉम्बहल्ले झाले आणि त्यात तीनशेहून अधिकांचे प्राण गेले. रशियाच्या इतिहासातील या सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्यानंतर रशियन फौजा शांत राहणे शक्यच नव्हते. तेव्हा या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून रशियाने चेचेन प्रांताची राजधानी ग्रॉझनीवर सर्व शक्तीनिशी हल्ला केला आणि त्या शहरावर कब्जा मिळवला. ही घटना २००० सालातील. हे दुसरे चेचेन युद्ध. दोन्हींत मिळून हजारो रशियन्स आणि चेचेन्स यांनी प्राण गमावले आहेत. परंतु तरीही परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. उघड युद्धाच्या जोडीला रशियन गुप्तहेर संघटनांनी चेचेन्सच्या विरोधात गनिमीकाव्याने हल्ले सुरू केले. त्यात २००६ साली शामील बसायेव हा चेचेन बंडखोर नेता मारला गेल्याने चेचेन चळवळ काही काळ मंदावली. परंतु दोन वर्षांपुरतीच. या काळात चेचेन्सनी आपल्या संघटनांची पुनर्बाधणी केली आणि २००८ पासून पुन्हा एकदा रशियन फौजांविरोधात एल्गार सुरू केला. त्या वर्षांत जवळपास ८०० हल्ले-प्रतिहल्ले नोंदले गेले आणि पुढील वर्षांत ती संख्या ११००चा आकडा पार करून गेली. यातील गंभीर बाब म्हणजे चेचेन बंडखोरांची स्वत:ची अशी एक संघटना नसून अनेक फुटकळ तुकडय़ा या कारवायांत गुंतल्या आहेत. त्यातील काही अतिआक्रमक मंडळींनी अल कईदा आदी अन्य इस्लामी संघटनांशी संधान बांधून रशियाविरोधात एक सार्वत्रिक आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु चेचेन्स आणि अल कईदा यांच्यात किती सौहार्द आहे याविषयी वेगवेगळे मतप्रवाह असून त्यामुळे चेचेन्सविरोधातील कारवाईबाबतही मतभेद आहेत. अर्थात अल कईदाशी संबंध असले वा नसले तरी त्यामुळे चेचेन्सचे क्रौर्य काही कमी होत नसून जगातील अत्यंत क्रूर अशा दहशतवादी संघटनांत त्यांची गणना होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे चेचेन्सच्या स्वातंत्र्य मागणीसही पाठिंबा वाढताना दिसतो. अशा वेळी ही चळवळ हा केवळ कायदा वा सुव्यवस्था प्रश्न मानून चालणार नाही. त्याकडे राजकीय समस्या म्हणून पाहावयास हवे.
परंतु त्यास पुतिन तयार नाहीत, असे दिसते. या दहशतवाद्यांशी कोणतीही चर्चा करण्यास त्यांनी दिलेला नकार योग्य असला तरी त्यांतील काही सनदशीर संघटना वा व्यक्ती यांच्याशी पुतिन यांनी चर्चेचा मार्ग खुला करणे आवश्यक ठरते. अस्ताव्यस्त पसरलेल्या एके काळच्या सोविएत रशियाच्या आसपासच्या अनेक देशांनी या महासत्तेवर दमनशाहीचा आरोप केला आहे आणि तो संपूर्ण असत्य आहे, असे नाही. या नव्या राष्ट्रातील स्वातंत्र्यप्रेरणांना बंदुकीच्या धाकाने दाबून ठेवणे काही काळ शक्य होईल. कायम नव्हे. तेव्हा कॉकेशसमधील ही खदखद शांत करण्यासाठी रशियाला चर्चेच्या मार्गानेच जावे लागेल. स्टालिनसारख्या नेत्यास जे जमले नाही, ते पुतिन यांना जमेल असे मानायचे कारण नाही.
खदखदता कॉकेशस
रशियन सरकार आणि चेचेन यांच्यातील संघर्षांचा नवा रक्तरंजित अध्याय सुरू होण्याची चाहूल रशियातील हल्ल्यांनी लागली आहे. रशियानेही यापूर्वी चेचेन्यावर अनेक हल्ले केले, का
आणखी वाचा
First published on: 31-12-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia and the faces of chechen terror