रशियाने २४ फेब्रुवारीपासून युक्रेनवर लादलेले युद्ध लवकर संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. गेल्या दोन दिवसांतील तीन घटनांनी युद्धाची व्याप्ती आणि गांभीर्य अधिकच वाढल्याचे दिसून येते. युक्रेनच्या काही मोठय़ा शहरांवर रशियाने कब्जा केलेला असला, तरी युक्रेनने चिवट प्रतिकार केला असून त्या देशाचे निर्भीड अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की इतक्या दिवसांनंतरही हार मानायला तयार नाहीत. त्यांच्या प्रतिकारामुळे बिथरलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या पश्चिमेकडे म्हणजेच ‘नाटो’च्या (उत्तर अटलांटिक सहकार्य संघटना) सीमेवर मोर्चा वळवलेला दिसतो. पोलंडच्या सीमेनजीक ल्विव आणि लुट्स्क या शहरांजवळ रशियन क्षेपणास्त्रे धडकू लागली आहेत. खरे तर तसे काही करण्याची आवश्यकता नाही. तरीही रशियाकडून हे सुरू आहे ते केवळ नाटोला चिथावणी देण्यासाठीच. पोलंड हा नाटोचा सदस्य आहे. उद्या त्या देशात एखादे क्षेपणास्त्र कोसळले, तर तो नाटोवरील हल्ला समजून त्याला प्रतिकार केला जाईल. ल्विवचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे युक्रेन सोडून जाणारे निर्वासितांचे लोंढे अनेकदा पोलंडमध्ये शिरण्यापूर्वी ल्विवमध्ये विराम घेतात. यात युक्रेनेतर निर्वासितांचाही समावेश आहे. पुतिन यांचा रशिया केवळ एवढय़ा साहसावर थांबणारा नाही. रशियन फौजा रासायनिक अस्त्रांचा वापर युक्रेनमध्ये करू शकतात आणि त्याबाबत युक्रेनला दोषी ठरवण्याचे कुभांड-कथानकही रचू शकतात, अशी माहिती मिळू लागली आहे. हे सुरू असताना राजधानी कीव्हपासून जवळ एका शहरात अमेरिकन पत्रकार व माहितीपटकार ब्रेंट रेनॉ यांचा रशियन हल्ल्यात मृत्यू झाल्याचे दु:खद वृत्त प्रसृत झाले. कधी एखादा वैद्यक विद्यार्थी, कधी पत्रकार या हल्ल्यांमध्ये लक्ष्य होताहेत. रशियाची क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब कधी बालरुग्णालये, शाळा, पळून जाणाऱ्या निर्वासितांवर पडतात. कधी ते अणुभट्टी आणि अणुवीज प्रकल्पांवर आदळतात. पहिल्या प्रकारामध्ये रशियाची संवेदनहीनता दिसून येते, दुसऱ्या प्रकारात बेजबाबदारी. अशा उन्मत्त शत्रूला निव्वळ आर्थिक व व्यापारी निर्बंधांनी जेरबंद करता येत नाही हे एव्हाना अमेरिकादी देशांना कळून चुकले असेल. ब्रेंट रेनॉ हे युद्धपत्रकार नव्हते. ते निर्वासितांचे चित्रीकरण करण्यासाठी, त्यांच्या करुण कहाण्या जगासमोर मांडण्यासाठी कीव्हला गेले होते. वास्तविक ज्या प्रमुख कारणासाठी रशियाने युक्रेनवर चढाई केली, त्यांपैकी एक मुद्दा – नाटोमध्ये सहभागी होण्याचा – युक्रेनने सोडून दिल्याचे जाहीर झाले आहे. तरीही रशियाच्या फौजा माघारी फिरण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट क्रिमियाच्या पश्चिमेकडे ओडेसा शहराच्या दिशेने त्यांचा एक ताफा सरकू लागला आहे. चेर्नोबिल अणुभट्टी आणि झापोरिझ्झिया अणुवीज प्रकल्प हे रशियाच्याच ताब्यात आहेत. सोमवारी युक्रेन व रशिया यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होणार होती. पण यातही युक्रेनने अनेक मुद्दय़ांवर सपशेल माघार घ्यावी, असाच रशियाचा हेका असतो. चीनकडून मदतीची अपेक्षा रशियाने बाळगलेली असल्याचे वृत्त आहे आणि हल्ल्यावाचून रशियाकडे पर्याय होताच कुठे, हे कथानक आपल्याकडे भारतातही अनेकांना विनाआधार पचनी पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे रशियाच्या विरोधकांची संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत. उलट चीन आणि भारतामध्ये युद्धाच्या समर्थकांची संख्या मात्र वाढताना दिसते, ही बाब रशियन क्षेपणास्त्रांइतकीच धोकादायक ठरते.

Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image of Indian nationals returning home or a related graphic
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात केरळच्या तरुणाच्या मृत्यूनंतर भारत आक्रमक, युद्धात लढत असलेल्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करुन रोकड लूटीचा प्रयत्न; शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
Binil and Jain were among the several Indian youths who had travelled to Russia
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; अनेक महिन्यांपासून मायदेशी पाठवण्याची विनवणी केली, पण…
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Nagpur jio tower scam loksatta news
जिओ टॉवर स्कॅम : देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणारी टोळी जेरबंद, कोलकातावरून सुरू होते…
Story img Loader