स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय उदारमतवादाची धुरा सांभाळणाऱ्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे सहकारी व त्यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत असणारे एस व्ही राजू यांचे मंगळवारी (१९ मे) अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. तशा अर्थाने त्या उदारमतवादी पिढीतील मिनू मसानींनंतर राहिलेल्या दुव्यांचा अंत म्हटला पाहिजे. आताच्या नव्या पिढीला मात्र त्यांची ‘फ्रीडम फर्स्ट’ या स्वातंत्र्याचा मंत्र जागवणाऱ्या नियतकालिकाचे संपादक म्हणून ओळख आहे. देशातील अनेक समस्यांवर उपाय व भूमिका मांडताना उदारमतवादाचा मूळ धागा न सोडता या नियतकालिकाने उदंड साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विशेषत: आíथक विषयावरची त्यांची मांडणी आजही उद्योगक्षेत्रात महत्त्वाची मानली जाते.
‘फ्रेडरिक नॉमेन फाऊंडेशन फॉर फ्रीडम’ च्या मदतीतून, आíथक प्रश्नांना वाहिलेल्या प्रोजेक्ट फॉर इकॉनॉमिक एज्युकेशन या चळवळीतून त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले होते. देशाचा आíथक अर्थसंकल्प कसा असावा याची झलक देणारा ‘लिबरल बजेट’ या नावाने त्यांचा अर्थसंकल्प देशाचा अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच ते प्रसिद्ध करीत व त्यानिमित्ताने महत्त्वाच्या विषयांवर माध्यमांतून अगोदरच चर्चाना चालना मिळत असे. अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांनी अग्रलेख लिहून या पर्यायी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. देशातील लिबरल चळवळीचे ते सर्वेसर्वा होते. अगदी अविश्रांत प्रयत्नांनी इंडियन लिबरल ग्रुप ही चळवळ देशभर नेली. केवळ ‘विचार पोहोचावेत’ म्हणून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तके-पुस्तिकांचा व्याप बघितला तर हा माणूस इतक्या स्तरांवर कसे काम करीत असे याचेच आश्चर्य वाटते.
स्वतंत्र पक्षाच्या अनेक प्रलंबित खटल्यांतील काही विषय जिवंत ठेवत, प्रसंगी घटनादुरुस्त्यांना आव्हान देत भारतीय उदारमतवादालाही त्यांनी ऐरणीवर आणले होते. घटनेत झालेल्या अनेक दुरुस्त्यांत राजकीय पक्षांना नोंदणी करताना समाजवादावर निष्ठा असल्याची शपथ घ्यावी लागते. तिला विरोध करताना त्यांची मांडणी अत्यंत तर्कशुद्ध असे व ‘आम्ही समाजवादाचे जाहीर विरोधक व टीकाकार असताना एकाच वेळी त्यावर निष्ठा कशी व्यक्त करता येईल?’ असा त्यांचा सडेतोड सवाल असे. व्यक्तिस्वातंत्र्य, स्वेच्छामरण वा मालमत्तेचा अधिकार.. अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने चर्चा घडवत ‘फ्रीडम फर्स्ट’ या नियतकालिकाला उच्च वैचारिक दर्जा प्राप्त करून दिला होता. अशा या द्रष्टय़ा उदारमतवाद्याची जागा भरून काढणे ही त्यांनी रुजवलेल्या साऱ्या संस्था व चळवळींना आव्हानात्मक वाटावे यातच त्यांच्या कार्याचा गौरव आहे हे मात्र खरे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा