भारतीयांना सचिनची इतकी सवय लागण्यामागे त्याची लोभस प्रतिमा आहे. त्यास काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये हे उत्तमपणे कळते. आणि आपण फक्त क्रिकेटसाठी आहोत हेही.
क्रिकेट हा देशाचा धर्म नाही आणि सचिन देव नाही. तो तसा आहे असे म्हणणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण. मग सचिन रमेश तेंडुलकर या व्यक्तीचे आपल्याशी नाते काय? तर सचिन ही या देशाची गेल्या २४ वर्षांची सवय आहे. एरवी काहीही फारसे भले घडत नसलेल्या, गरिबी, दारिद्रय़, भ्रष्टाचार यामुळे गांजलेल्या, महागाई आणि जगण्याचा अन्य संघर्ष यामुळे पिचलेल्या, बोटचेप्या धोरणांमुळे जगाच्या बाजारात लाजलेल्या अशा सव्वाशे कोटींच्या भारत देशाला लागलेली आनंददायी सवय म्हणजे सचिन. सत्तरीच्या दशकात आणीबाणी आणि अन्य व्याधींमुळे ग्रस्त आणि सतत मारच खाण्याचे प्राक्तन भाळी आलेल्या भारतीयास चित्रपटाच्या पडद्यावर अशी सवय अमिताभ बच्चन यांनी लावली. ‘अगले हफ्ते और एक कुली पैसा देने से इन्कार करेगा..’ असे म्हणणारा निळ्या शर्टातला ‘दीवार’मधला मजूर अमिताभ भारतीयांच्या अंगावर रोमांच फुलवत होता कारण ते पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला आपणही पिळवणुकीस असाच विरोध करायला हवा असे वाटत होते. ते वास्तवात शक्य नाही. तेव्हा ही वास्तवाची गरज अमिताभ यांनी आभासातून पूर्ण केली आणि आपणच काही केल्यासारखा आपला ऊर आनंदाने भरून आला. पुढच्या काळात हा मनातल्या बंडाचा अग्नी भारतीय समाजात मोठय़ा प्रमाणावर शांत झाला. कारण कितीही नाही म्हटले तरी मध्यमवर्ग म्हणवून घेणारा पुढच्या काळात उच्च मध्यमवर्गीयांत जाऊन स्थिरावला. हृदयातील आग बँक खात्यातील जमेच्या रकान्याच्या लांबीरुंदीने शांत होते. भारतातल्या एका मोठय़ा वर्गास ती शांतता मिळाली. परिणामी त्या वर्गासाठी पडद्यावरच्या अमिताभचे निखारे विझले नाहीत तरी शांत झाले. तेव्हा अशा वातावरणात सुस्थितीतल्या मध्यमवर्गास रस्त्यावरती मारामाऱ्या करणारा नायक तितका काही न भावणे नैसर्गिकच. त्या वर्गाला नवा नायक हवा होता. आर्थिक सुस्थितीतला, गरिबी, त्याग वगैरेची भाषा न बोलणारा, मनातल्या हिंसक भावनेला विधायक रूप देणारा. सचिन रमेश तेंडुलकर ही खुंटी या समाजाच्या मानसिक गरजांच्या छिद्रांत फिट्ट बसली. त्यामुळे अत्यंत वर्णद्वेषी अशा मस्तवाल ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला कस्पटासमान मानत सचिनने सीमापार पाठवल्यावर भौतिक विकासात आपल्यापेक्षा कितीतरी पुढे असलेल्या ऑस्ट्रेलियाला आपण मागे टाकल्याचा आनंद आपल्याला होत असे. आपल्या कराल ताकदीने समोरच्यास घाबरवणाऱ्या वेस्ट इंडिजच्या दैत्यरूपी गोलंदाजांना हा वीतभर उंचीचा सचिन बॅटच्या तडाख्याने झटकून टाकू लागला की ती ताकद आपल्याच अंगात असल्याचा साक्षात्कार भारतीयांना होत असे आणि शोएब अख्तरसारख्या वादळी गोलंदाजास क्रीजच्या बाहेर येऊन सचिनने किरकोळीत हाणले की ती पाकिस्तानच्या काश्मिरी खुस्पटांची शिक्षाच जणू असे आपल्याला वाटे. अशाने आपल्याला त्याची सवय लागली.
ही सचिन नावाची खुंटी इतकी सुदृढ निघाली की पुढील २४ वर्षे समस्त भारत त्या खुंटीला आंधळेपणाने लोंबकळत राहिला. इतका की आज ना उद्या कधीतरी ती सैल होईल याची जाणीवही या आत्ममग्न वर्गाला राहिली नाही. सचिन नावाची सवय देशाला लागली ती यामुळे.
ती अधिकच दृढ झाली. कारण भारतीय मानसिकतेला आवडणार नाही असे सचिनने. निदान उघडपणे. काहीही केले नाही. या भारतीय मानसिकतेत स्वत:च्या कर्तृत्वाचेदेखील श्रेय मागायचे नसते हे या कविपुत्राला चांगलेच ठाऊक. श्रेय मागितले नाही तर किती तरी अधिक पटीने हा समाज ते आपल्या पदरात घालतो हे ज्याला कळते तो या समाजाच्या गळ्यातील ताईत होतो. सचिनने जाणतेपणाने असेल वा अजाणतेपणाने. पण ते तत्त्व पाळले. त्यामुळे स्वत:च्या लखलखीत कर्तृत्वावर त्याने कधीच मालकी सांगितली नाही. कधी ते श्रेय त्याने गुरू रमाकांत आचरेकर यांना दिले, कधी आईला तर कधी ज्येष्ठ भावास. मैदानावर विक्रमी कामगिरी नोंदवल्यानंतर आकाशाकडे पाहत स्वर्गवासी झालेल्या वडिलांना अभिवादन करण्याच्या त्याच्या कृतीत वडिलांचे छत्र गमावलेल्या अनेकांनी आपापल्या पितृऋणांची भरपाईच पाहिली. या अशा सौहार्दी वागण्याचा परिणाम सचिनच्या चणीमुळे अधिक होत गेला. त्यात किरकोळ मालिकेतल्या यशामुळे चमकेश झालेले आपल्याकडे पैशाला पासरी. त्यांच्या तुलनेत क्रिकेटच्या मूठभर जगात का असेना, स्वत:चे साम्राज्य निर्माण करणाऱ्या सचिनने पाटर्य़ा झोडत, दीड दमडीच्या मदनिकांसमवेत वा उच्चभ्रूंतील पदरपाडू महिलांसमवेत पेज थ्रीगिरी कधी केली नाही. आपण फक्त क्रिकेट खेळण्यासाठी अवतरलो आहोत आणि बाकी सारे दुय्यम आहे हे त्याचे भान कधीही सुटले नाही. सचिनची सवय लागण्यामागे हेही एक कारण.
आपल्याकडे आकाराने लहान असलेल्यास दुबळे वा बिचारा मानण्याची, कमी बोलणाऱ्यास विद्वान मानण्याची वा अगम्य लिहिणाऱ्यास पंडित मानण्याची सांस्कृतिक परंपरा आहे. त्याचा यथास्थित फायदा सचिनने घेतला वा नकळतपणे त्यास झाला. खरे तर मैदानावर उंचापुऱ्या वेस्ट इंडिजियन वा धष्टपुष्ट ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने सचिनवर झंझावाती चेंडू टाकला तर त्यात वावगे असे काही नाही. जे काही होत होते ते खेळांच्या नियमानुसारच. पण सचिनला मात्र अशा प्रसंगात तोंड द्यावे लागले की क्रिकेटमध्ये फारसे गम्य नसलेल्या बाया- बापडय़ाही‘स्स्.’ अशा सहानुभूतीपूर्ण उद्गारात ‘बिच्चारा सचिन..’ म्हणत हळहळत. कपिलदेव यांचीही कामगिरी इतकी नाही तरी बऱ्याच प्रमाणात उत्तुंग. पण कपिल उंचापुरा आणि तगडा. त्यामुळे ही अशी ‘स्स्.. बिच्चारा कपिल’ अशी प्रतिक्रिया कधी  कोणाच्या तोंडून उमटली नाही. तेव्हा मुद्दा हा की हे असे बिच्चारे वाटणारे अनेकांना आवडतात. सुरक्षित वाटतात. सचिनची सवय आपल्याला का लागली त्यातले हे एक कारण.
खेरीज आणखी एक कारण सचिनच्या लोभस प्रतिमा निर्मितीमागे आहे. त्यास काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये हे उत्तमपणे कळते. त्यामुळे काहीबाही बोलून सचिनने वादळ ओढवून घेतले असे कधीही झाले नाही. अपवाद फक्त एकच. मुंबईविषयी तो बोलल्यावर या शहरावर मालकी सांगणाऱ्या शिवसेनेने त्याच्यावर टीका केल्यावर. पण सचिनचे चातुर्य हे की त्याने या टीकेचा जराही प्रतिवाद केला नाही की खुलासा दिला नाही. परिणामी त्या टीकेच्या वाहय़ात वाग्बाणांमुळे ते सोडणारेच जखमी झाले. त्याचे श्रेय पुन्हा सचिनलाच. त्या बाबतदेखील इतकी चढाओढ होती की क्रिकेटविश्वाला हादरवून सोडणाऱ्या फिक्सिंग प्रकरणात सचिनने ब्रदेखील कधी काढला नाही, हेही अनेकांना कळले नाही. भारतीय क्रिकेटचा इतका अविभाज्य घटक असणाऱ्या सचिनला पडद्यामागे काय चालले आहे याचा गंधही नव्हता असे सवरेदयवादी भाबडेदेखील म्हणणार नाहीत. पण तरीही सचिन काहीही कधीही बोलला नाही. ही आपण बरे आपले काम बरे ही वृत्ती आपल्याकडे अनेकांची आवडतीच. सचिनची सवय लागली त्याला तीही कारणीभूत आहेच.
आणि दुसरे म्हणजे जगताना अशा सवयींची गरज असणे केव्हाही चांगलेच. मग लता मंगेशकर असोत, किंवा आशा भोसले वा भीमसेनजी वा कुमार गंधर्व वा टेनिस कोर्टवरचा फेडरर. या अशा सवयी जगणे श्रीमंत करतात. त्या सुटत नाहीत. सोडायच्याही नसतात. तेव्हा निवृत्ती जाहीर केली म्हणून ही सचिन रमेश तेंडुलकर नावाची गेल्या २४ वर्षांची सवय लगेच थोडी सुटणार? त्यासाठी नवा सचिनच हवा. नव्या सवयीसाठी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा