सचिन तेंडुलकरच्या १९९व्या कसोटी सामन्यानिमित्ताने अवघे कोलकाता सचिनमय झाले, हे समजण्यासारखे आहे. अखेर, सचिनसारख्या क्रिकेटेश्वराला निरोप देण्यासाठी त्याच्या भक्तगणांची मांदियाळी जमणे अपेक्षितच होते. सामन्याच्या पहिल्या दिवशी ईडन गार्डन तुडुंब भरून जाईल असा अनेकांचा कयास होता. तो मात्र फोल ठरला. ईडन गार्डनची क्षमता ६७ हजार प्रेक्षकांची असताना पहिल्या दिवशी केवळ ३३ हजार प्रेक्षकच सामना पाहण्यासाठी आले होते. पण याचा अर्थ सचिनोत्सव फिका ठरला असा नाही. लोकांनी तो या ना त्या प्रकारे साजरा केलाच. लोकांमध्ये असलेल्या उत्सवाच्या या वाहत्या गंगेत प. बंगाल क्रिकेट संघटनेनेही आपले हात धुऊन घेतले. संघटनेने सचिनचे जंगी स्वागत केले. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसासाठी मेजवानी, छायाचित्र प्रदर्शन, मेणाच्या पुतळ्याचे उद्घाटन अशा नाना कार्यक्रमांचे आयोजन केले. ते पाहून कोणालाही वाटावे, की कोलकात्यात वेस्ट इंडिज व भारत यांच्यात क्रिकेट सामना होत नसून, सचिनचा निरोप समारंभच होत आहे. सचिन तेथे खेळण्यासाठी आला आहे, हेच जणू बंगालची क्रिकेट संघटना विसरून गेली. सचिनोत्सवाच्या छायेत बाकीचे खेळाडूही हरवून गेले. अखेर सचिनलाच, मी खेळापेक्षा मोठा नाही. संघात आणखीही १४ खेळाडू आहेत, असे संघटनेला सुनवावे लागले. त्याने कान उपटल्यानंतर मग संघटनेला जाग आली. त्यांनी आपले कार्यक्रम आवरते घेतले आणि सचिनने काही कार्यक्रमांना जाणे टाळले. क्रिकेटच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील सेलेब्रिटी आणि सेलेब्रिटी बनू पाहणाऱ्यांनी धडा घ्यावा अशी ही घटना आहे. सचिनच्या मोठेपणाची चर्चा करताना आपण नेहमीच त्याच्या मैदानावरील कामगिरीचा विचार करीत असतो. तो विचार महत्त्वाचा आहेच. पण त्याच बरोबर या कामगिरीस साह्य़भूत असे जे सचिनचे स्वभावचारित्र्य आहे, तेही महत्त्वाचे आहे. आज सर्वत्र, कोण्या धनदांडग्यांच्या विवाहसोहळ्यातील संगीतसोहळा असो की चित्रपटसृष्टीतील रात्रीच्या पाटर्य़ा आणि कोणतेही पुरस्कार सोहळे असोत की दुकानांची उद्घाटने यांत, म्हणजे क्रिकेटचे मैदान सोडून सर्वत्र रमणारे उंडगे क्रिकेटपटू दिसत आहेत. अशा वेळी केवळ खेळावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी आपल्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमांना न जाण्याचा सचिनचा निर्णय कौतुकास्पदच आहे. महाभारतातला, केवळ पोपटाचा डोळा तेवढाच पाहणारा अर्जुन हाच सचिनचा आदर्श असावा. यात सांगण्याची गोष्ट ही, की सचिनलाही त्याच्या आयुष्यात क्रिकेटशिवाय अन्य काही दिसलेले नाही. किंवा दिसले असूनही त्याने एखाद्या तपस्व्याप्रमाणे त्याकडे उग्र दुर्लक्ष केले असावे. सचिनच्या विक्रमांमागे ही तपश्चर्या आहे. क्रिकेटचे बाजारकरू मात्र नेमकी हीच गोष्ट विसरताना दिसत आहेत. खेळाला आणि खेळाडूंना पैसे मिळावेत, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावर पैशांचा पाऊस पडावा या हव्यासापोटी क्रिकेटच्या संघटकांनी खेळाडूंनाही विक्रीस काढले आहे. स्वत: खेळाडूही ब्रॅण्ड बनले आहेत आणि तो मोडून विकून खात आहेत. अशा प्रवृत्तीला सचिनने त्याच्या कोणत्याही वादात न पडण्याच्या पद्धतीने जाता जाता फटका मारला, ते बरे झाले. त्यातून मुंबई क्रिकेट संघटना शहाणी झाल्याचे वृत्त आहे. त्यातील तथ्य अर्थातच शेवटच्या सामन्यात दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा