बद्ध, मुमुक्षु आणि साधक स्थितीतील जिवानं अनुक्रमानुसार कोणत्या स्वधर्माचं पालन करायचं आहे, हे स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील दोन ओव्यांपासून सांगायला सुरुवात झाली आहे. या ओव्या अशा-
स्वधर्म जो बापा। तो नित्ययज्ञ जाण पां। म्हणौनि वर्ततां तेथ पापा। संचारू नाही।।१९।। (अ. ३ / ८१)
हा निजधर्म जैं सांडे। आणि कुकर्मी रति घडे। तैं चि बंध पडे। सांसारिक।।२०।।  (अ. ३/ ८२) प्रचलितार्थ : अरे बाबा, आपला जो धर्म आहे, तोच नित्य यज्ञ होय, असे समज. म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही (८१). स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसारबंध प्राप्त होतो.
विशेषार्थ विवरण : स्वरूपी राहाण्याचा अभ्यास हाच स्वधर्म आहे. या स्वधर्माचं आचरण कशानं साधेल? आपल्याला आपल्या बद्धपणाची जाणीव होऊन जाग आली आहे हे खरं. जीवनातील समस्त चिंतांपासून सुटका होऊन खरं अखंड सुख लाभावं यासाठी आपण काहीबाही साधनही करू लागलो आहोत, हेदेखील खरं. तरीही स्वरूपाची खरी ओळख नाही, जाण नाही. त्यामुळे आपण स्वरूपात नव्हे, तर देहबुद्धीनुसार आपली जी ओळख झाली आहे त्या ओळखीतच सहजपणे राहात आहोत. आपण देहमनबुद्धीपलीकडे आहोत, आपणच आत्मतत्त्व आहोत, असं मानून जगू लागलो तरी ‘मी’पणाला झळा बसणारच. सत्याचा अवलंब करायचा तर असत्य म्हणून जे काही अंतरंगात आहे त्याला झळा बसणारच. प्रामाणिक अभ्यास सुरू असेल तर या झळांनी माझ्या अंतरंगात जे काही संकुचित आहे, जे काही भ्रामक आहे, जे काही आसक्तभावानं बरबटलेलं आहे ते भस्मसात होणारच. अंतरंगातील दोष तीव्रपणे समोर उभे ठाकल्यावाचून राहाणार नाहीत. या झळांनी ते भस्मसात होतील, असं मात्र नाही. ते नष्ट झाल्यासारखे भासतील, पण पुन्हा वारंवार उत्पन्न होत राहातील. तरीही ते पुन्हापुन्हा ताब्यात आणण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा अभ्यास सुरू ठेवावाच लागेल. हाच बद्ध स्थितीतून बाहेर पडून मुमुक्षु भावानं साधन जाणून घेऊन ते करीत असलेल्या साधकाचा नित्ययज्ञ आहे. यज्ञात काय असतं? ‘अग्नये स्वाहा, इदं न मम्’ असा मंत्रोच्चार करून यज्ञात अग्नीला वस्तू समर्पित केल्या जातात. साधकाचा नित्ययज्ञ हा अंतरंगात नित्य धगधगत असलेला ज्ञानाग्नीच आहे. त्या ज्ञानाग्नीत आपले दोष, आपल्यातील वाईटपणा जाळून टाकण्याचा सतत अभ्यास साधकानं करावा, हीच संतांची इच्छा असते. असा नित्ययज्ञ सुरू असेल तर पापाचा संचार होणारच नाही. संतांच्या मते भगवंताचं विस्मरण हेच एकमात्र पाप आहे. भौतिकाच्या प्रभावाने आणि ओढीने भगवंताचं विस्मरण होतं. अंतरंगातला नित्ययज्ञ हा भौतिकाचा प्रभाव आणि ओढच जाळत असल्यानं तिथं पापाचा संचार व्हायला वावच नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा