साधनेच्या प्रारंभिक स्थितीत साधक हा सद्गुरूमय नव्हे तर प्रपंचमय असतो. त्या प्रपंचमयतेमुळे जे भ्रामक आहे तेच त्याला वास्तव वाटत असतं. त्या प्रपंचमयतेमुळेच साधन पूर्ण नेटानं आणि विश्वासानं होत नाही. सद्गुरूमयतेशिवाय प्रपंचातला भ्रम ओळखता येणार नाही. सद्गुरूमयतेशिवाय त्या भ्रमाच्या प्रभावातून सुटता येणार नाही. सद्गुरूमयतेशिवाय साधनेवर खरा विश्वास जडणार नाही. सद्गुरूमयता म्हणजे त्यांना जे आवडतं ते मला आवडू लागणं, त्यांचा विचार आणि माझा विचार, त्यांचा निर्णय आणि माझा निर्णय यातला भेद संपणं. जीवन त्यांच्या इच्छेत विलीन करून त्यांच्या बोधानुरूप वाटचाल करणं. ही सद्गुरूमयता काही सोपी नाही. ही मोठीच तपस्या आहे. या गुरु-शिष्य संबंधांची सुरुवात अगदी अनाहूतपणे झाल्यासारखी भासते. अकराव्या अध्यायाचा प्रारंभ ती भेटच दाखवतो! दहाव्या अध्यायात भगवंतानं अर्जुनाला विभूतीयोग सांगितला. समस्त जगत म्हणजे मीच आहे, मीच ते व्यापून आहे आणि त्यापलीकडेही आहे, हे सांगितलं. तेवढय़ानं अर्जुनाचं समाधान झालं नाही. जे ऐकलं ते अनुभवाचं व्हावं, अशी त्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच सर्व चराचरातलं भगवंताचं विराट रूप त्याला पाहावंसं वाटलं. ते दर्शन अकराव्या अध्यायात आहे. पण हे दर्शन साधेल कशानं? भगवंतही सांगतात, केवळ एकस्थिती साधली तरच. ही स्थिती आहे सद्गुरूमयता! अकराव्या अध्यायाच्या प्रारंभीच्या श्लोकांचा अर्थ भाषिक अंगानंच लावला जातो. त्यातला आध्यात्मिक मधुर अर्थ शोधण्याचा आपण आता प्रयत्न करू. या ओव्या काय आहेत? तर त्या अशा : ‘‘आता यावरी एकादशीं। कथा आहे दोन्ही रसीं। येथ पार्था विश्वरूपेंसी। होईल भेटी।। जेथ शांताचिया घरा। अद्भुत आला आहे पाहुणेरा। आणि येरांही रसा पांतिकरां। जाहला भानु।। अहो वधुवरांचिये मिळणीं। जैशीं वऱ्हाडियांही लुगडी लेणीं। तैसे देशियेच्या सुखासनीं। मिरवले रस।।’’ १ ते ३ क्रमांकांच्या या ओव्यांचा प्रचलित अर्थ असा : ‘‘आता अकराव्या अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत हा रस पाहुणा म्हणून आला आहे. इतर रसांनाही या दोन रसांच्या पंगतीचा मान मिळाला आहे. अहो नवरा-नवरीच्या लग्नात ज्या प्रमाणे वऱ्हाडय़ांनाही लुगडी व दागिने मिळतात ना? त्याप्रमाणे मराठी भाषेच्या या पालखीत इतर रसही सुखासनी विराजमान झाले आहेत.’’ आता हा झाला भाषिक अंगानं विचार. त्यांचा गूढ अर्थ काय असावा? त्याचा मागोवा घेऊ. असं पाहा, चराचरात केवळ एक परमात्माच भरून आहे, हे मला कधी अनुभवता येईल? तर केवळ सद्गुरूमयतेमुळेच. या ‘एकदशा’ स्थितीची अनिवार्यता अध्यायाच्या प्रारंभी प्रकट केली आहे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? ‘एकादशी’ म्हणजे केवळ भक्तीच्या एका दशेत असणं! ही एकदशा काही एकदम साधलेली नाही. त्याची सुरुवात कशी झाली? तर जीव (अद्भुत) हा सद्गुरूंच्या (शांत) घरी पाहुणा म्हणून गेला होता!
१७८. सद्गुरूमयता
साधनेच्या प्रारंभिक स्थितीत साधक हा सद्गुरूमय नव्हे तर प्रपंचमय असतो. त्या प्रपंचमयतेमुळे जे भ्रामक आहे तेच त्याला वास्तव वाटत असतं. त्या प्रपंचमयतेमुळेच साधन पूर्ण नेटानं आणि विश्वासानं होत नाही.
First published on: 10-09-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadgurumayata