संदीप पाटीलच्या नेतृत्वाखालील निवड समितीने कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघ जाहीर केला. नव्या निवड समितीची ही पहिलीच निवड असल्याने त्याबद्दल बरीच उत्सुकता होती. परंतु, निवड समितीने जोखीम पत्करण्याचे टाळलेले दिसते. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीर जोडीलाच पुढे चाल देण्याचे धोरण समितीने ठेवले व वेगवान गोलंदाज झहीर खानवर विश्वास टाकला. लोकांना उत्सुकता होती युवराज सिंगची. कर्करोगावर मात करून युवराज ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत जेव्हा मैदानावर उतरला, तेव्हा त्याने चांगला खेळ केला असला तरी त्याच्या शारीरिक हालचाली तंदुरुस्त खेळाडूप्रमाणे सहज नव्हत्या. पण त्यानंतर भारतात आल्यावर दुलीप करंडक स्पध्रेत उत्तर विभागाकडून युवीने शानदार द्विशतक झळकावले. याचप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी घेत चमक दाखविली. तरीही युवराज दोन दिवस कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करू शकेल का, असा सवाल भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीने केला होता. युवराजला सहाव्या क्रमांकावर संधी देऊन धोनीच्या या शंकेला निवड समितीने परस्पर उत्तर दिले. भारतीय खेळपट्टय़ांवर फिरकीच्या बळावरच कसोटी जिंकण्याचे स्वप्न पाहता येते, हे निवड समितीला पक्के ठाऊक आहे. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा या फिरकी जोडगोळीने वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताला दणक्यात विजय मिळवून दिला. मात्र त्यावर विसंबून न राहता ‘बॅक अप प्लान’ म्हणून अनुभवी हरभजनचा संघात समावेश करण्यात आला आहे. हरभजन प्रत्यक्ष खेळला वा न खेळला तरी त्याच्या अनुभवाचा संघाला व नवीन गोलंदाजांना नक्कीच उपयोग होईल. भारतीय संघाला गेले वर्षभर सतावणारी मुख्य समस्या सलामीच्या जोडीची आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध सेहवाग आणि गंभीर ही भारताची सलामीची जोडी अपयशी ठरल्याचेच वारंवार प्रत्ययास आले. ही जोडी अपयशी ठरत असली तरी सध्या तरी भारताकडे सलामीला योग्य असे हेच दोन फलंदाज आहेत. सेहवाग खेळतो तेव्हा डोळ्याचे पारणे फिटते, पण सातत्यात तो कमी पडतो. मात्र रणजीत दुखापत झाल्यानंतरही शतक झळकावून इंग्लंडसाठी सज्ज असल्याचे त्याने दाखवून दिले. रणजीमधील तडफ त्याने कसोटीतही ठेवावी अशी निवड समितीची अपेक्षा असावी. झहीर खान सध्या दुखापतीबरोबर फॉर्मशीही झगडताना दिसतो. आजमितीला तोच भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे, हे गृहीत धरून झहीरला निवडण्यात आले. सचिन तेंडुलकरला विश्रांती द्यावी की नाही हा नाजूक प्रश्न. न्यूझीलंडविरुद्ध तीनदा त्रिफळा उडाल्यानंतर तेंडुलकरने आता विश्रांती घ्यावी असा सूर पुन्हा उमटला होता. त्याच्या हालचाली पूर्वीइतक्या सहज होत नाहीत याकडे गावसकरसारख्यांनी लक्ष वेधले होते. परंतु त्याच्या सरासरीकडे आणि नंतर रणजीमध्ये त्याने  झळकाविलेल्या शतकाला निवड समितीने महत्त्व दिले. पण आता लवकरच सचिनबाबत निर्णय घेणे निवड समितीला भाग पडणार आहे.  भारतीय संघात लक्षणीय बदलांची अपेक्षा करण्यात येत होती. परंतु पाटील अ‍ॅण्ड कंपनीने आधीच्याच निवड समितीचा कित्ता गिरवीत, पहिल्या प्रयत्नात  सावध फलंदाजी करण्याचा पवित्रा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा