केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा नवी दिल्ली येथे अपघातात झालेला मृत्यू चटका लावणारा होता. आपण वाहतुकीचे नियम पाळत नाही. नियम मोडणारे सापडत नाहीत व त्यांना शिक्षाही होत नाही. शिक्षा झाली तरी ती इतकी नाममात्र असते, की कायद्याचा धाक राहत नाही. आपल्याकडे रस्त्यांची रचना मोटार चालवणाऱ्यांसाठी आहे. खरे तर शहरात रस्ते तयार करताना पदपथ व सायकल मार्ग असायलाच हवेत, पण धोरणात असूनही त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही ही शोकांतिका आहे. आपण मोटारी घ्यायला सक्षम झालो तरी वाहतुकीचे नियम पाळायला सक्षम झालो नाहीत.
भारतात रस्ते अपघात हे आरोग्याच्या विषयपत्रिकेत समाविष्ट केले जात नाहीत. आता तरी आपण त्यात बदल करण्याची वेळ आली आहे. जेव्हा केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे हे दुर्दैवी अशा रस्ते अपघातात दिल्ली येथे मरण पावले, तेव्हा आता हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. असे असले तरी वाहतूक अपघातांच्या प्रश्नांचे गांभीर्य आपल्याला पुरेसे कळलेले आहे असे म्हणता येत नाही. भारतासारख्या आता मोटारी जास्त प्रमाणात वाढू लागलेल्या देशात याबाबत कृती करण्याची खूप निकडीची वेळ आली आहे याचेही कुणाला भान नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी निश्चितच चटका लावणारी होती. मला तर त्यामुळे फारच धक्का बसला, कारण सात महिन्यांपूर्वी त्याच रस्त्याने म्हणजे दक्षिण दिल्लीतील अरिवद मार्गावरूनच सायकलने मी जात होते तेव्हा विरुद्ध बाजूने येणाऱ्या मोटारीने मला धडक मारली होती. माझे नशीब चांगले, की काही भल्या माणसांनी उचलून मला, मुंडेंना नेले होते त्याच, अखिल भारतीय आयुर्वज्ञिान संस्था म्हणजे ‘एम्स’च्या जयप्रकाश नारायण अपघात उपचार विभागात नेले. त्याच चांगल्या डॉक्टरांनी मुंडे यांचेही प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले होते व माझ्या हात व नाकाला झालेली दुखापत व अंतर्गत रक्तस्राव त्यांनीच थांबवला होता. मी नशीबवान ठरले आणि वाचले, पण मुंडे यांना आयुष्यात अजून बरेच काही करायचे असताना ते करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. अशा प्रकारे माणसांचे बळी हकनाक जातात. हा निष्काळजीपणा आहे, त्याची आपल्याला चीड यायला हवी. नुसते तेवढेच घडून चालणार नाही; तर आपण आपल्या रस्त्यांची रचना बदलली पाहिजे, वाहतुकीचे नियम बदलले पाहिजेत व आपण ज्या पद्धतीने गाडी चालवितो ते सुरक्षित आहे का, याचीही काळजी घेतली पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीनुसार आरोग्याच्या विषयसूचीत रस्ते अपघातांचा मुद्दा महत्त्वक्रमाने दिला आहे. जगात अनेक तरुण माणसे रस्ते अपघातांत दगावतात, त्यांची वये १५ ते २९ या दरम्यान असतात. कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या आपल्या देशात वाहने कमी आहेत तरी ९० टक्के अपघात याच देशामध्ये होतात. आपण गाडी चालवायला शिकलो, पण रस्ते कसे असावेत, वाहतुकीला नियम असतात, हे काही शिकलो नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जे लोक रस्ते अपघातात मरतात, त्यांच्यापकी निम्मे पादचारी, सायकलस्वार व मोटरसायकलस्वार असतात.
दिल्लीत वाहतूक पोलिसांकडे असलेली अपघातांची आकडेवारी पाहिली, तर ती खूप कमी दिसेल. चांगली बातमी आहे, पण त्याच माहितीनुसार २०१३ मध्ये जे १६०० लोक रस्ते अपघातात मरण पावले त्यातले ६७३ पादचारी होते. त्यांची चूक एवढीच होती की, त्यांच्या शहराने त्यांना रस्त्याने चालण्याचा हक्क दिला नव्हता. सायकलस्वार, पादचारी, सायकल रिक्षा, मोटरसायकलस्वार यांची मरणाऱ्यांमधील टक्केवारी ८१ टक्के आहे. आपल्या इतर सर्व शहरांत स्थिती जवळपास अशीच आहे. आपले रस्ते ज्यांच्याकडे शक्तिशाली वाहन नाही अशांसाठी नाहीत.
आश्चर्य म्हणजे दिल्ली पोलिसांच्या मते यातील साठ टक्के अपघात हे चालकांच्या चुकीमुळे झालेले आहेत. एक तर ते वाहने वेगाने चालवतात, वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, धोकादायक पद्धतीने वाहने चालवतात. अनेकदा ज्या वाहनाने धडक दिलेली असते ते कधीच पकडले जात नाहीत.
माझ्याबाबतीतला अनुभव म्हणजे ती मोटार चुकीच्या माíगकेतून मागे येत होती, तिने मला ठोकरले व गाडी निघून गेली. त्या गाडीचा नंबर घेण्याइतका वेळ माझ्याकडे नव्हता. दिल्लीत कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, ज्यात हे अपघात खऱ्या अर्थाने बंदिस्त होऊ शकतील. त्यामुळे अपघात करणाऱ्या आरोपींना, गुन्हेगारांना पकडण्याची सोय नाही.
एवढेच काय, आपण आपले रस्तेही सुरक्षित वापराच्या दृष्टीने तयार केलेले नाहीत. आपण या रस्त्यांवरून चालू शकत नाही व सायकलही चालवू शकत नाही. बस पकडण्यासाठी आपण रस्ता ओलांडू शकत नाही. आपले रस्ते मोटारींसाठी आहेत. दिल्लीत मोटारींमधून १३ टक्के लोक ये-जा करतात, पण ते रस्त्यावरील ९० टक्के जागा व्यापतात. पदपथांची कथा काय वर्णावी, त्यांचे अस्तित्वच नाही. पदपथ ही सामान्य माणसासाठीची जागा असते, पण तिथे पथारीवाले, प्रसाधनगृह, बस थांबवण्याचे ठिकाण, मोटार पाìकगची जागा म्हणून अतिक्रमण झालेले दिसते. पदपथावर तुम्ही काहीही करू शकता, पण चालू शकत नाही.
हे सगळे बदलता येणार नाही असे नाही. त्यासाठी आपण आपले जुनेपुराणे मोटार वाहन कायदे बदलायला हवेत. बेदरकार वाहन चालवणारे, बेकायदेशीर कृत्ये करणारे यांना या कायद्याची जरब वाटली पाहिजे. सध्या शिक्षा होते काय, तर म्हणे शंभर रुपये दंड. त्यामुळे पदपथावर मोटारी लावणाऱ्यांना आडकाठी होणारच नाही किंवा बेदरकार वाहन चालवणाऱ्यांना कायद्याची भीती वाटणारच नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे. रस्त्यांवरची गस्त वाढवली पाहिजे. कायद्याचे पालन होते की नाही हे पाहिले पाहिजे. दिल्लीत बेकायदा पाìकग केलेली वाहने उचलण्यासाठी शंभर क्रेन आहेत. इतर जगात पाìकग मीटर व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून कायद्याची अंमलबजावणी होते.
तिसरी गोष्ट म्हणजे वाहनचालकांच्या माहितीची सूची तयार केली पाहिजे, त्यामुळे जो कायद्याचे उल्लंघन करील त्याला पकडणे, शिक्षा करणे सोपे जाईल. वार्षकि वाहन निगा व नोंदणी पद्धतीने हे साध्य करता येईल.
चौथी गोष्ट प्रत्येक शहरात रस्त्यांची रचना करताना पदपथ व सायकल पथ त्यात समाविष्ट केले पाहिजेत. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्तेबांधणीत पदपथांना महत्त्व दिले आहे, पण ते अनिवार्य नाही. कारण ते कुणालाच हिताचे वाटत नाही.
तात्पर्य हे की, जर आपण मोटारी चालवण्याइतके श्रीमंत झालो असू तर वाहन चालवण्याच्या जबाबदारीतही ती श्रीमंती यायला हवी. थोडक्यात, वाहने चालवताना काळजी घेण्याचे शिकायला हवे.
* लेखिका दिल्लीतील विज्ञान व पर्यावरण केंद्र (सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट- सीएसई) या संस्थेच्या संचालक आहेत.
रस्ते चालण्यासाठी असतात..
केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा नवी दिल्ली येथे अपघातात झालेला मृत्यू चटका लावणारा होता. आपण वाहतुकीचे नियम पाळत नाही. नियम मोडणारे सापडत नाहीत व त्यांना शिक्षाही होत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-06-2014 at 12:28 IST
मराठीतील सर्व ताल-भवताल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safety precautions to avoid road accidents