सतीश कामत यांच्या ‘आज.. कालच्या नजरेतून’ या सदरातील ‘ ‘साहेब’ ते ‘बाबा’’ (२९ मार्च) या लेखात त्यांनी म्हटले आहे की, अलीकडे राजकारणात ‘साहेब’ हा शब्द तालुका किंवा जिल्हा पातळीवरील नेते, आमदार, खासदारांपासून कोणालाही उद्देशून वापरला जातो. त्याचबरोबर तो सर्वपक्षीयही झाला आहे. १९७० च्या दशकातील महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचा दबदबा होता. या पक्षात वसंतरावदादा पाटील, वसंतराव नाईक, नाशिकराव तिरपुडे, बॅ. शेषराव वानखेडे, मधुकरराव चौधरी यांसारखी मातबर मंडळी होती. त्याचप्रमाणे विखे-पाटील, मोहिते पाटील सारखी तालेवार घराणीही होती. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आश्वासक युवा नेत्याच्या टप्प्यावर होते, पण या साऱ्यांसाठी एकच ‘साहेब’ होते – यशवंतराव चव्हाण!
या संदर्भात मला ज्ञात असलेली माहिती येथे देत आहे. वाईचे क्रांतिवीर दे. भ. किसन वीर (आबासाहेब) यांच्या चरित्रग्रंथाची तयारी सुरू होती. त्या वेळी आबासाहेबांच्या चळवळीतील त्यांचे निकटचे सहकारी जमले होते. कासेगावकर वैद्य, घोरपडे, देशपांडे इ. त्यात होते. आठवणी सांगताना घोरपडे गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे चळवळीतील प्रमुख व्यक्तींची नावे शासनाला कळू नयेत. यासाठी काही टोपण नावे ठेवण्यात आली. यात यशवंतराव चव्हाण यांना ‘साहेब’, श्री. किसन वीर यांना ‘आबासाहेब’, ‘घोरपडे गुरुजी यांचा ‘रावसाहेब’, तर कासेगावकर वैद्य यांना ‘धन्वंतरी’ अशी नावे ठेवण्यात आली. चळवळीच्या काळात त्याचा उपयोग होई. समकालीन नेते मा. यशवंतरावजींना ‘साहेब’ नाही तर ‘यशवंतराव’ असेच संबोधत. त्यानंतरच्या काळात हा शब्द ‘वरिष्ठ नेत्यां’साठी वापरला जाऊ लागला, असे दिसते.
– डॉ. वसंत स. जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा