संतोष प्रधान

जनसंघर्ष यात्रेचा पश्चिम महाराष्ट्रातील टप्पा पार पडताना, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत अद्याप चैतन्याचा अभाव आहे हेच दिसले..

काँग्रेसला चांगले दिवस असताना राज्यात २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसला गेल्या निवडणुकीत अवघ्या ४२ जागांवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रात १९९० पासून काँग्रेसचा आलेख तसा घसरतच गेला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर तर काँग्रेसला तिहेरी आकडाही गाठता आलेला नाही. गेल्या साडेचार वर्षांत विरोधी बाकांवर बसलेल्या काँग्रेसला आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजाविता आली नाही. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांप्रमाणे भाजपवर तुटून पडत होता, पण काँग्रेस नेते ‘कारवाईच्या भीतीने’ बोटचेपी भूमिका घेताना दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे दौरे किंवा पक्षाच्या नेत्यांच्या सभांमुळे राष्ट्रवादीच्या आघाडीवर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसमध्ये मात्र आनंदी आनंदच होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यावर तरी काँग्रेस पक्ष आक्रमक होऊ लागला. संजय निरुपम यांनी नवी मुंबईतील जमीन घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. त्यातून निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमावा लागला. यापाठोपाठ काँग्रेसने आता राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली. सणासुदीच्या काळात राजकीय पक्ष आंदोलने किंवा सभा आयोजित करीत नाहीत. काँग्रेसने नेमकी हीच वेळ निवडल्याने वेळ चुकल्याची काही नेत्यांचीच धारणा आहे. पण जनसंघर्ष यात्रेची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून करून काँग्रेसने राजकीयदृष्टय़ा प्रभावी असलेल्या या भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

पुढील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसह आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. तरीही काँग्रेसने पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्राची निवड केली. राष्ट्रवादीच्या ताब्यातील काही मतदारसंघांवर यात्रेत दावा करून काँग्रेसने सुरुवातीलाच मिठाचा खडा तर टाकला. विधानसभेच्या ५८ जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर (नगरसह) आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भिस्त आहे. या भागातून जास्तीत जास्त खासदार-आमदार निवडून यावेत, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये भाजपने चांगली मुसंडी मारली आहे. पुण्यातही राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रात आघाडीच्या माध्यमातून भाजपला शह देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पश्चिम महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रेला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. नेत्यांमधील अंतर्गत वाद मिटविण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून झाला. अगदी पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील या विळ्याभोपळ्याचे सख्य असलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. मनोमीलनाचा हा प्रयत्न कितपत यशस्वी  होतो हे निवडणुकीतच कळेल, पण पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरणार आहे.

कोल्हापूरमधून सुरू झालेल्या या यात्रेने मरगळलेल्या काँग्रेसला चेतना आली. गटबाजीतून मुक्तता होण्याच्या दृष्टीने चार पावले पुढे पडली. निवडणुकांना अवधी असला तरी आतापासूनच स्थानिक नेत्यांना प्रचाराला सुरुवात करावी इतका हुरूप आणण्याइतकी शक्ती या यात्रेने दिली. कोल्हापूर जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाबद्दल बरे बोलावे किंवा काही बरे घडावे असे चित्र गेल्या चार वर्षांत तरी कोठे दिसले नाही. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेले नेते अगदीच कोलमडून गेले होते. भाजप-शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवण्यास फारसे कोणी पुढे येत नव्हते. विरोधी पक्ष म्हणून झुंजण्याचा बाणाच काँग्रेसने हरवला होता. अस्तित्वशून्य होण्याचा धोका असणाऱ्या जिल्ह्य़ातील काँग्रेसला उभारी आणण्यात आणि एकविचाराने लढलो तर विजयाच्या वाटेने जाऊ  शकतो, इतका आत्मविश्वास यानिमित्ताने आला. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा करणे म्हणजे तारस्वरात भाषणे करणे, असा काँग्रेसच्या नेत्यांचा ग्रह दिसतो. या यात्रेत एकजात साऱ्या नेत्यांची भाषणे कंटाळवाणी, एकसुरी होती. नव्या पिढीला साद घालणाऱ्या नर्मविनोदी भाषणाचा अभाव असल्याने कार्यकर्ते, नागरिकांना चेतवण्यात त्याचा फारसा लाभ झाला असे काही दिसले नाही.

सोलापूर हा काँग्रेसचा जुना बालेकिल्ला; पण गेल्या निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव झाला. या पाश्र्वभूमीवर जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने सोलापुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तालुकास्तरावरील नेतेमंडळी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येत आहेत. त्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनीही जनसंपर्क वाढविला आहे. जिल्ह्य़ातील ११ पैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची चांगली ताकद आहे. हे चारही मतदारसंघ जिंकण्यावर पक्षाने आतापासूनच भर दिला आहे. भाजपमध्ये पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील साप-मुंगुसासारखी असलेली दुष्मनी, त्याचा सत्ताधारी भाजपला बसणारा फटका आणि सत्ताधाऱ्यांविषयी बहुसंख्य वर्गात असलेली कथित नाराजी पाहता त्याचा लाभ घेण्याइतपत मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय काँग्रेसजनांना निर्माण करायचा आहे. त्याची सुरुवात तरी जनसंघर्ष यात्रेने झाल्याचे पाहावयास मिळते.

काँग्रेसचे राज्य पातळीवरील सर्व ज्येष्ठ नेते या यात्रेच्या निमित्ताने सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. सांगलीतील जाहीर सभेला अपेक्षित गर्दी जरी झाली नसली, तरी एवढी दुर्लक्ष करण्याइतपत कमीही झालेली नव्हती. तरीही तळातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या विरुद्ध ‘रीचार्ज’ करण्यात ही यात्रा सांगलीत यशस्वी न होता, पक्षांतर्गत संघर्षांच्या शिळ्या कढीला पुन्हा उकळी आणणारीच ठरली. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी नेत्यांच्या आगमनाचे आणि स्वागताचे डिजिटल फलक लावण्यात आले होते. या फलकातूनच स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत असलेला संघर्ष जनतेच्या समोर नव्याने आला. डिजिटल फलकावर फोटो कोणाचे यावरून हा संघर्ष एवढा विकोपाला गेला की, अखेर प्रत्येकाने आपापल्या मर्जीने फोटो प्रदर्शित करून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. सांगलीतील जाहीर सभेवेळी तर शक्तिप्रदर्शनाचाच प्रयत्न झाला. यामुळे उद्विग्नपणे खडे बोल सुनावण्याची वेळ हर्षवर्धन पाटील यांच्यावर आली. आजपर्यंत सांगलीचे नेते इतरांना समजुतीच्या गोष्टी सांगत होते. आता सांगलीच्या नेत्यांचे अन्य नेत्यांकडून कान उपटावे लागत आहेत हे अधोगतीचे की जिवंतपणाचे लक्षण मानायचे, याचा विचार या मतभेदाला खतपाणी घालणारे करतील, अशी भाबडी आशा आजही दादांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा कार्यकर्ता करीत आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या जागा काँग्रेसच्या वाटय़ाला असतील अथवा मिळतील त्याच मतदारसंघात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. कडेगाव तर आमदार विश्वजीत कदमांचा पारंपरिक मतदारसंघ. यामुळे या ठिकाणी ओढून ताणून का होईना गर्दी करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या तयारीच्या दिशेने कार्यकर्त्यांना ना कोणता कार्यक्रम मिळाला, ना विकासाचा अजेंडा मिळाला. मागील पानावरून पुढे चालू हाच संदेश सांगलीत यात्रेने दिला. आक्रमकता दिसलीच नाही. केवळ औपचारिकता पार पडली, असेच चित्र होते. सांगली महापालिकेच्या पराभवातून काँग्रेस अद्याप सावरलेली नाही हेच स्पष्ट झाले.

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघांवर दावा करून उभयतांमध्ये जागावाटप सुलभ नसेल, हे स्पष्ट केले. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचा खासदार असताना या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला. त्याला अर्थातच सतेज पाटील- धनंजय महाडिक यांच्यातील वादाची किनार होती. पुण्यातील इंदापूरमध्येही हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ही जागा काँग्रेसला हवी असून, अजित पवार हे सहजासहजी हा मतदारसंघ सोडणार नाहीत हेसुद्धा तेवढेच स्पष्ट आहे. सांगली जिल्ह्य़ातील जतवर काँग्रेसने हक्क सांगितला. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी काँग्रेसने मैत्रीचा हात पुढे केला.

काँग्रेससाठी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. लोकसभेतही पक्षाला चांगले संख्याबळ मिळावे ही दिल्लीतील नेत्यांची अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात खानदेश, नंतर मराठवाडा, विदर्भ, कोकण अशी जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. तीन महिने वातावरणनिर्मिती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने पक्षातील ‘संघर्ष’ कमी झाला तरी बरेच काही साध्य केल्यासारखे होईल. कारण काँग्रेसचा पराभव काँग्रेसचे नेतेच करतात, असे म्हटले जाते. मतांसाठी लोकांचा विश्वास संपादन करणे हे शेवटी महत्त्वाचे आहे. त्यात राज्यातील काँग्रेस नेते कितपत यशस्वी होतात यावरच सारे अवलंबून असेल.

(या मजकुरासाठी दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर यांनी माहिती-संकलन केले आहे.)

Story img Loader