अभिजित बेल्हेकर
गत आठवडय़ातील अतिवृष्टीने शेतकरी कोलमडून पडला आहे, तसेच व्यवस्था-धोरणांतील त्रुटीही दिसून आल्या..
‘सावकाराकडून कर्ज घेत कपाशी लावली. पीकही जोमदार आलं. पीक गेल्यावर यंदा कर्ज फेडू आणि दिवाळी गोड करू असं वाटत असतानाच ही अस्मानी कोसळली. सगळी कपाशी झाडालाच सडून गेली. सगळ्या रानाचा चिखल झालाय. उर फाटेस्तवर रडावं वाटतंय, तुम्ही सांगा, आम्ही कसं जगावं..’ – मोहन पाटील, मुखेड, नांदेड</strong>
०
‘मळभ जमताच सोयाबीन काढून ढीग रचला. मळणीसाठी मशीनवाल्याला निरोप धाडला, तो त्याच रात्री आभाळ फाटलं. तसाच रानात पळालो, तर सगळा सोयाबीन ओढय़ातून वाहत होता. त्या अंधारात, कोसळत्या पावसातही पीक वाचवायची धडपड केली. पण हाताला केवळ निराशाच लागली..’ – विनायक कदम, तासगाव
०
‘अवघ्या चार तासांत त्या पावसाने उभी पिकं, शेतातील साहित्य, पंप सगळं वाहून गेलं. अनेकांची शेतजमीनही वाहून गेली, शेकडो विहिरी या मातीगाळाने बुजून गेल्या..’- तानाजी काळे, पुणे</strong>
०
ही आसवे आहेत, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्यांची. खरे तर या आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या सगळय़ाच शेतशिवारातून हे असे हुंदके सध्या ऐकू येत आहेत.
राज्यात १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत अतिवृष्टीने थैमान घातले. या आपत्तीने होत्याचे नव्हते झाले. शेतशिवार वाहून गेले. त्या पावसाबरोबर अश्रू गाळत आज हा सगळाच भाग जणू थिजून गेला आहे.
गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता ‘शेती’ आणि ‘अनिश्चितता’ हे दोन शब्द आता मराठीत समानार्थी ठरावेत अशी स्थिती झाली आहे. अगदी मागील दोन वर्षांतील नैसर्गिक आपत्तींचे हे पाश जरी तपासले, तरी या अश्रूंमागची वेदना किती खोल आहे, याचा अंदाज येईल. मागच्या वर्षी अगदी सुरुवातीला गारपीट, मग दुष्काळ, त्यानंतर अनेक भागांत आलेले महापूर, त्यानंतरची अवकाळी, मधेच पुन्हा विविध रोगराई आणि साऱ्याला तोंड देत उभे राहतो तोच अवतरलेली ही अतिवृष्टी!
खरे तर गेले सहा महिने हे सगळ्यांसाठीच युद्धवत. करोनाशी लढताना, त्यातून मार्ग काढताना सगळे जग थांबले, अडखळत-सावध चालू लागले. अवघ्या विश्वाला टाळे लागलेल्या या काळात केवळ शेती हे असे एकमेव क्षेत्र जे आपले सर्जनत्वाचे कार्य नित्य करत राहिले. त्यातही यंदा पावसाचे डाव मनासारखे पडत गेले. भात, सोयाबीन, उडीद, तूर, बाजरी, कापूस, बटाटा, कांदा असे एकेक पीक त्या त्या भूमीशी नाते सांगत रुजले, वाढले, फुलोऱ्यात आले. राज्याची आकडेवारीच सांगते की, या पूरक स्थितीने यंदा खरीप लागवडीचे प्रमाण तब्बल १३७ टक्क्यांवर पोहोचले. पाहता पाहता बहुतांश पिके काढणीला आली, काहींची काढणीही झाली. भात, बाजरी, सोयाबीन यांसारखी पिके मळणीसाठी तयार झाली. बोंडातून त्या शुभ्र फुलांचे दर्शन घडवणारा कापूस वेचणीला आला. मूग, भुईमूग आणि नाना कडधान्ये शेंगांमधून भरली, भाजीपाला तरारून आला, दसरा-दिवाळीसाठी फुलांचे मळे बहरले, फळांच्या बागा पोसल्या. एकूणच सारा खरीप परिपक्व झाला.
जणू समृद्धीचे माप पदरी टाकण्यासाठी लक्ष्मी शेतकऱ्याच्या घराकडे निघाली. बारोमास राबणाऱ्या त्या शेतकऱ्याचे डोळेही तिच्या आगमनाकडे लागले. निदान वर्षभर घरचे भागेल, जादाचे विकून सावकाराचे कर्ज उतरेल, दसरा-दिवाळी थोडीफार गोडधोड होईल, मुलाबाळांच्या अंगावर एखादे नवे कापड चढेल.. शेताशिवारात भरात आलेल्या पिकांबरोबरच स्वप्नांचीही गाठोडी अशी भरू लागलेली. नेमका अशा वेळी तो अचानक अवतरला. पाहता पाहता दाटून आला, काळोखला, गरजला, हाती आसूड घेतल्यासारखा तो चाप ओढत राहिला. सलग दोन दिवस, दोन रात्री..!
शेती-पिके बुडाली, धान्य-भाजीपाला भिजला, कुजला. काही काही ठिकाणी उभ्या पिकांबरोबर सगळे शेतच वाहून नेले. एकटय़ा सोलापुरात या ‘अस्मानी’ने तब्बल दीड लाख हेक्टर शेतीची नासाडी केली. काही काही ठिकाणी तर हा पाऊस एवढा भीषण पडला, की छायाचित्रात दिसणारी जागा हे एखादे धरण नसून ती पाण्याने गिळलेली शेकडो एकर शेती आहे, हे सांगावे लागले. शेती, पिके, बागा, जनावरे, माणसे, घरे-दारे, रस्ते-पूल या साऱ्यांनाच आपल्या कवेत घेत या पावसाने अक्षरक्ष: उद्ध्वस्त केले.
अगोदरच करोनामुळे कोलमडून गेलेल्या या ग्रामीण समाजमनाला आता यातून सावरण्याचेही बळ नाही. पंढरपूरमधील एक शेतकरी सांगत होते, ‘शेत नासले, घर बुडाले.. घरच्यांचं पोट भरावं म्हणून ज्वारी दळावी तर त्यासाठीही पैका नाही..’ पाठोपाठ बसत असलेल्या या धक्क्यांनी कोलमडलेल्या जिवांचे हे आर्त स्वर कुणाला ऐकवावे? दुसरीकडे सरकारही करोनामध्ये पुरते अडकलेले. या अतिवृष्टीची ओल त्यांच्यापर्यंत पोहोचायला तिसरा दिवस उजाडला. आता या राजकीय नेत्यांचे त्या उजाड शेतावरचे दौरे, प्रशासनाचे पंचनामे सुरू होतील आणि मग मदतीचे हात फिरतील.
मुळात या अशा एकापाठी एक कोसळणाऱ्या आपत्तीवेळी प्रकर्षांने जाणवणारी गोष्ट म्हणजे या संकटांचा अंदाज बांधण्यात आणि त्यांना गृहीत धरून उपाययोजना करण्यात आम्ही आजही कमी पडतो. भारतीय शेती आजही हवामानातील बदलांवर श्वास घेते. त्यामुळे हवामानाचे अंदाज अधिक अचूक देता आले तर अशा संकटातील हानी खूप कमी होऊ शकते, असे मत अनेक शेती अभ्यासक नोंदवतात. ज्या जत, तासगाव, इंदापूर, माळशिरस, पंढरपूर तालुक्यांची पावसाची वार्षिक सरासरी ही अडीचशे मिलीमीटर आहे, तिथे जर केवळ चार तासांत एवढा पाऊस पडला तर त्यांनी केवळ ‘मेघगर्जनेसह पावसाची शक्यता’ या अंदाजाचा अर्थ कसा लावायचा? दुसरीकडे व्यवस्थाच नाही असे म्हणतानाच याच सोलापुरात उभी केलेली रडार यंत्रणा धूळखात पडलेली निघावी याहून दुसरे वाईट ते काय..?
या संकटाची आणखी एक गडद बाजू म्हणजे, यंदाची ही अतिवृष्टी दुष्काळी पट्टय़ात झाली. खरे तर हा कायम पाण्यासाठी वणवण करणारा भाग. या भागातून वाहणाऱ्या सीना, कऱ्हा, नीरा, बोरी, नागझरी, माणगंगा, येरळा, अग्रणी या नद्याही तशा केवळ ओसाड पट्टय़ांच्या खुणांपुरत्या. पावसाळ्यात कधी चार-दोन पाऊस पडले की या कृश पात्रांमधून थोडीफार कालवाकालव होते. पण परवाच्या महामूर पावसाने या नद्यांच्या आयुष्यातही पूर आले. मात्र, सिंचनाची कुठलीच व्यवस्था नसल्याने हे सगळे पाणी शेताशिवाराचे नुकसान करत वाहून गेले.
एकटय़ा उजनी धरणातून या दोन दिवसांत तब्बल २८ टीएमसी पाणी वाहून गेले. या वाहिलेल्या पाण्याने पुन्हा पंढरपूरला पुराचा विळखा घातला. नदी-समुद्रात सोडून द्यावा लागणाऱ्या या पाण्याच्या नियोजनाच्या केवळ गप्पा किती दिवस करायच्या? पाण्याचे हे असे निव्वळ वाहून जाण्यातले दु:ख, हे केवळ दुष्काळात होरपळलेली मनेच सांगू शकतात. दोनच महिन्यांपूर्वी कृष्णेला आलेल्या पुरावेळी असे वाहून जाणारे पाणी टेंभू, म्हैसाळ योजनेमार्फत सांगोला, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी भागात वळवले होते. असे प्रयोग सार्वत्रिक व्हायला हवेत. पण कुठे मोठाली धरणे आहेत, तर त्याला कालवे नाहीत. कुठे कालवे आहेत, तर साठवण्यासाठी तलाव नाहीत. दुसरीकडे आहे त्या व्यवस्था तरी धड आहेत का? लातूरमधील मांजरा नदीवरील शिवणी येथील बंधारा या अतिवृष्टीत एका रात्रीत शंभर टक्के भरला. परंतु या बंधाऱ्याचा स्वयंचलित दरवाजाच उघडला आणि जमा झालेले तब्बल १० दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले. याला काय म्हणावे?
एखादी आपत्ती येते त्या वेळी ती व्यवस्थेतील, धोरणांमधील अशी अनेक गळकी दारे दाखवत असते. आज अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकरी मोडलेला आहे. या साऱ्यातून योग्य धडा घेऊन काही धोरण-दिशा तातडीने ठरवली तरच त्या ‘अस्मानी’पाठी वाहिलेल्या अश्रूंना अर्थ आहे.
(या लेखासाठी दिगंबर शिंदे, एजाजहुसेन मुजावर यांचे सहकार्य मिळाले.)
abhijit.belhekar@expressindia.com