सतीश कामत satish.kamat@expressindia.com
आंब्याचे उत्पादन कमी असले तरी दर चांगला मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा फायदाच होतो, असा नेहमीचा अनुभव. यंदा मात्र गेल्या मोसमातला पाऊस लांबला आणि नंतर थंडीही समाधानकारक न पडल्याने उत्पादन कमी आणि त्यात करोना प्रादुर्भावामुळे उठाव नसल्याने दरही कमी, अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या आंबा उत्पादकांसमोर आव्हान आहे ते ग्राहकराजापर्यंत पोहोचण्याचे..
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, कोकणच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्याची सर्वत्र प्रतीक्षा सुरू होते. शिमग्याचा सण होईपर्यंत आसमंतात आंब्याच्या मोहराचा सुगंध दरवळू लागतो आणि अलीकडच्या काळातील बदलत्या हवामानालाही नेटाने तोंड देत कोकणचा हा राजा गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत बाजारपेठेत प्रवेश करतो. अक्षय्य तृतीयेपर्यंत चांगलाच स्थिरावतो आणि त्यापुढे सुमारे दीड-दोन महिने, अगदी पावसाळ्याची वर्दी देणाऱ्या रोहिणी नक्षत्रापर्यंत फळांच्या दुनियेत अधिराज्य गाजवतो. या वर्षी मात्र अनपेक्षिपणे झालेल्या करोनाच्या हल्ल्यापुढे हा राजाच काय, अवघी मानवजात भेदरली आहे. त्यामुळे एरवी या राजाच्या स्वागतासाठी सजून वाट पाहणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे आणि आता राजावरच गुणग्राहकाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
गेल्या मोसमात पाऊस लांबल्यामुळे आणि नंतर थंडीही समाधानकारक न पडल्याने यंदाही आंब्याचे उत्पादन कमी आणि उशिरा येईल, असा अंदाज होता. त्यानुसार गेल्या आठवडय़ापासूनच ते काही प्रमाणात सुरू झाले आहे. पण त्याच सुमारास करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हाही आंबा बाजारात नीटपणे पोहोचू शकलेला नाही आणि त्याला या काळातील अपेक्षित दरही मिळालेला नाही. आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने मार्च-एप्रिल महिना महत्त्वाचा असतो, कारण या काळात त्यांच्या चार-पाच डझनांच्या पेटीला सुमारे तीन ते चार हजार रुपये दर मिळतो आणि पुरवठा चांगला राहिला तर वर्षांचा फवारण्या-खते आणि इतर खर्च वसूल होतो. त्यानंतर मे महिन्यातील विक्री हा त्यांचा नफा असतो. यंदाच्या वर्षी मुळात उत्पादन कमी आणि उशिरा सुरू झाले. मार्च अखेरीला दरवर्षीच्या तुलनेत निम्म्या, जेमतेम २२ ते २५ हजार पेटय़ा मुंबईच्या घाऊक बाजारपेठेत जाऊ लागल्या आणि दुसरीकडे करोनामुळे बाजारात हुकमी गिऱ्हाईक नसल्याने आंब्याच्या पेटीचे दर निम्म्यावर आले. आता तर पुढील आदेश येईपर्यंत या घाऊक बाजारपेठाही बंद राहणार आहेत. त्यामुळे आंबा उत्पादकांवर स्वतंत्रपणे, स्वबळावर ग्राहक शोधण्याची वेळ आली आहे. त्या दिशेने त्यांनी हात-पाय मारायला सुरुवातही केली आहे. पण टाळेबंदीमुळे वाहतूक अािण वितरणावर कमालीच्या मर्यादा येत आहेत.
या परिस्थितीवर भाष्य करताना कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संघाचे अध्यक्ष आणि अभ्यासू बागायतदार डॉ. विवेक भिडे म्हणाले की, ‘‘यंदा एकूण सरासरीच्या जेमतेम ४० टक्के उत्पादन होईल असे चित्र आहे. आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन या चार घटकांवर कोकणची सुमारे ७० टक्के अर्थव्यवस्था आधारलेली आहे. मार्च ते जून हाच या चारही घटकांचा मुख्य हंगाम असतो आणि त्याच काळात करोनाचे संकट आल्यामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा यंदा मोडला आहे.’’ यापैकी आंब्याच्या थेट विक्रीसाठी शासनाचा कृषी विभाग, पणन मंडळ, अपेडा आदी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. पुण्या-मुंबईतील गृहरचना संस्थांपर्यंत हा आंबा थेट पोहोचवण्याची योजना ते राबवत आहेत. पण कोकणातून तेथपर्यंत आंब्याची विनासायास वाहतूक हेच यंदा मोठे आव्हान झाले आहे. शिवाय या गाडय़ांबरोबर जाणाऱ्या चालक-साहाय्यकाच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होण्याचा धोका असल्यामुळे हे काम जोखमीचे झाले आहे. तसेच पुणे, मुंबई अािण गुजरातमधील तीन प्रमुख बाजारपेठा बंद असण्याचा मोठा फटका या विक्री यंत्रणेला बसला आहे.
आंब्याचे उत्पादन कमी असले तरी दर चांगला मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा फायदाच होतो, असा नेहमीचा अनुभव आहे. यंदा मात्र उत्पादन कमी आणि उठाव नसल्यामुळे दरही कमी, अशी विचित्र परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणून देऊन प्रमुख आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी- ‘‘या वर्षी उत्पादन खर्चही निघणार नाही,’’ अशी भीती व्यक्त केली.
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, यंदा उशिरा सुरूझालेले उत्पादन शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले असले तरी या आठवडय़ापासून ते वाढणार असून पुढील महिन्यात उच्च बिंदू गाठणार आहे. दरम्यानच्या काळात करोनाचा प्रभाव ओसरू लागल्याने टाळेबंदीमध्ये हळूहळू शिथिलता आणण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली तरी ती दरवर्षांइतकी पूर्वपदावर येणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे तयार आंब्याला उठाव नसेल तर तो बागेतच पडून राहण्याची अभूतपूर्व परिस्थिती उद्भवण्याचा धोका शेतकऱ्यांना दिसत आहे. हा नाश टाळण्यासाठी ‘कॅनिंग’ (म्हणजे पल्पनिर्मिती) हा सोपा उपाय वाटणे स्वाभाविक आहे. पण त्या क्षेत्रातील बाजाराची अवस्था विशद करताना, या उपक्रमासाठी ‘क्लस्टर’ पद्धतीचा प्रकल्प उभा करण्यात पुढाकार घेतलेले जाणकार बागायतदार अमर देसाई म्हणाले की, ‘‘गेल्या हंगामातील कॅनिंग केलेला आणि फेब्रुवारी ते मे या काळात खपणे अपेक्षित असलेला सुमारे ३५ ते ४० टक्के माल मंदीमुळे शिल्लक आहे. तरीसुद्धा यंदाचा आंबा फुकट जाऊ नये म्हणून कॅनिंग सुरू करायचे तर त्यासाठी दरवर्षी सुमारे ४० ते ६० लाख टीनचे डबे लागतात. ते गुजरात व दीव-दमण येथून येतात. लॉकडाऊनमुळे नजीकच्या काळात ते उपलब्ध होणे शक्य नाही आणि पुढील महिन्यातही किती प्रमाणात मिळतील, याची खात्री नाही. आमच्या उत्पादनापैकी सुमारे ६० टक्के माल युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इत्यादी देशांमध्ये निर्यात होतो. तेथे तर सध्या अशी परिस्थिती आहे की, कोणी पुढील हंगामासाठी मागणी नोंदवण्याच्याही मन:स्थितीत नाही. मग येथे उत्पादन कशाच्या भरवशावर करायचे, हा आमच्यापुढे मुख्य प्रश्न आहे आणि तरीही सुरू करायचे म्हटले तर त्यासाठीचा मजूर कर्नाटक-उत्तर प्रदेशातून येतो. तो कधी येऊ शकेल, त्यासाठी काय अटी असतील आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक पथ्ये पाळून उत्पादन किती होणार, हेही महत्त्वाचे मुद्दे आहेत.’’
या एकूणच निराशाजनक वातावरणात राज्याचा कृषी विभाग मात्र आपल्या परीने कोकणातील शेतकऱ्यांचा आंबा पुण्या-मुंबईतील ग्राहकापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उपक्रमाबाबत ठाण्याचे साहाय्यक कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितले की, ‘‘मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी महापालिकांच्या हद्दीतील सर्व गृहरचना संस्थांना पत्रे पाठवली असून किमान १०० बॉक्स आंबा खरेदी करणाऱ्या संस्थेच्या सदस्यांना संबंधित शेतकरी घरपोच आंबा देऊ लागले आहेत. गेल्या आठवडाभरात या पद्धतीने सुमारे पाच हजार बॉक्सची विक्री झाली असून एकूण प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.’’ येत्या काही दिवसांत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी शहरांमध्येही ही योजना कार्यान्वित होणार आहे. मात्र तेवढय़ाने भागणार नाही, याची जाणीव असलेल्या बागायतदारांनी स्वत:ही या शहरांमध्ये ग्राहक वर्गापर्यंत थेट पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण आज तरी सगळे जण अंधारात चाचपडतच या अकल्पित संकटाचा सामना करत असल्याचे चित्र आहे.