मराठा समाजाचे मोर्चे मराठवाडय़ात तरी उत्स्फूर्तपणेच निघाले. इतके की, नेते किंवा बडी मंडळी मदत देऊ करत असूनही नाकारली गेली. या खदखदीला आता हळूहळू रिंगणासारखे, मागण्यांचे कुंपण पडते आहे..
एका बीअर बारचालकाने मराठा मोर्चासाठी लागणाऱ्या गाडय़ांची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली, तर बैठकीतच त्याला कडाडून विरोध झाला. त्याला सांगण्यात आले, गावात ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे, त्याचे भाडे न घेता ते यायला तयार आहेत. त्यामुळे तुम्ही काही पैसे खर्च करू नका. आम्ही आमची पदरमोड करून येतो, प्रश्न आमचे आहेत. ही काही एका जिल्हय़ातील एक घटना नाही. अशा घटना मराठवाडय़ातील जवळपास सर्व जिल्हय़ांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजनांमध्ये दिसून आल्या.
नांदेड जिल्हय़ातील मराठा क्रांती मूक मोर्चात हजेरी लावण्यासाठी खासदार संभाजीमहाराज येणास तयार होते. त्यांनी ‘मी येतो’ असा संदेश दिला आणि नांदेडमधील बहुतांश मराठा संघटनांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून कळविले, ‘ते न आलेलेच बरे’ नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी ही भावना कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना कळविली आणि रविवारी झालेल्या नांदेडच्या मोर्चात खासदार संभाजी महाराज सहभागी झाले नाहीत.
मराठा मोर्चावर प्रतिक्रिया देत विनायक मेटे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगाबाद शहरातील २० मराठा संघटनांनी सांगितले, श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका. जर असा पुन्हा प्रयत्न झाला तर वेळ पडल्यास योग्य वेळी उत्तर देऊ, असेही कार्यकर्ते सांगत होते. अशीच अवस्था भय्यू महाराजांची आहे. त्यांच्या मुलाखती सुरू झाल्या आणि उस्मानाबादमधील मराठा संघटनांनी प्रश्न विचारला की, कोण भय्यू महाराज? त्यांचा काय संबंध? मराठवाडय़ात सध्या मोर्चाना होणारी गर्दी आणि त्याचे व्यवस्थापन हा चर्चेचा मुद्दा आहे. अनेक बारीकसारीक बाबींचे नियोजन मोर्चाच्या निमित्ताने करणाऱ्या मराठा समाजातील धुरिणांनी मोर्चादरम्यान काय करायचे नाही, याचे संदेश अगदी पद्धतशीर दिले होते. मोर्चात सहभागी होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने त्या दिवशी सिगारेट ओढायची नाही, दारू प्यायची नाही. मोर्चात कोणी पुढे जायचे, हे ठरले होते. औरंगाबादच्या मोर्चात क्रांती चौकात जेव्हा गर्दी जमू लागली तेव्हा महाविद्यालयीन तरुणींना गर्दीतून पुढे जाता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही बाजूला कार्यकर्ते थांबायचे आणि मधल्या मोकळ्या जागेतून आकाशी रंगाचा शर्ट आणि जीन्सची पँट घातलेल्या अनेक महाविद्यालयीन तरुणी मोर्चात पुढे सरकत होत्या. ‘देवगिरी’ प्रदेशातील या मोर्चात आपल्या शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे, अशा सूचना होत्या. त्या पद्धतशीरपणे पाळल्याही जात होत्या. एवढय़ा मोठय़ा संख्येने एकत्रीकरण झाल्यानंतर कोठेही कोणतीही गडबड होणार नाही. मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करण्यात आयोजकांना यश आले. मराठवाडय़ात औरंगाबादचा पॅटर्न सर्वत्र राबवला गेला. पाच युवतींनी निवेदन सादर करायचे. कोणीही भाषणे करायची नाही. आयोजक कोण, याविषयी कोणीही श्रेय घ्यायचे नाही, हे ठरले आणि ते पाळलेही गेले. ज्यांनी ज्यांनी मोर्चानंतर श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येकाला पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आले. त्यात संभाजी महाराज, भय्यू महाराज आणि अगदी राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे. हे सगळे घडले कसे?
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाडय़ात असलेल्या दुष्काळामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या बहुतांश मराठा समाजाचे अर्थकारण आक्रसलेले आहे. अडीच-तीन एकराच्या शेतीत फारसे काही पिकत नाही, नोकऱ्या नाहीत, तरुणांच्या हाताला काम नाही. प्रत्येक गावात किमान २५-३० मराठा समाजातील तरुण मुलांचे विवाहदेखील रखडलेले आहेत. या सगळ्या सामाजिक अस्वस्थतेवर उपाय म्हणून व्यक्त होण्याची जागा म्हणजे ‘व्हॉट्सअॅप’! प्रत्येकाचे एक गाऱ्हाणे आहे. एकेक जण जेव्हा हे गाऱ्हाणे मांडायचा, तेव्हा प्रत्येकाला वाटायचे, आपलीही अशीच अवस्था आहे. आपला आवाज दाबला जातो, अशी भावना त्यातून निर्माण होत गेली. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आलेल्या युवती मेळाव्यांमध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने युवती काही प्रश्न आवर्जून विचारायच्या, ते दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते. ‘आमच्या घरातही खायला-प्यायला नाही. दुष्काळात बाप होरपळतो आहे. आम्ही अभ्यास करतो, पण एका क्षणी कमी गुणवत्तेचा माणूस प्रवेशासाठी पात्र ठरतो, केवळ आरक्षणामुळे. मग आम्ही काय करावे?’ या अस्वस्थतेला कोपर्डी घटनेमुळे वाट मिळाली. कोपर्डी घटनेची माहिती समजताच उस्मानाबादमध्ये पहिल्यांदा सर्वपक्षीय मोर्चा निघाला. तेथे जिल्हा बंदचीही हाक देण्यात आली. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला. ही घटना औरंगाबादचा मोर्चा (९ ऑगस्ट) होण्यापूर्वीची. सर्वपक्षीय मोर्चामुळे औरंगाबादच्या मोर्चास जमलेली गर्दी लक्षात आली आणि पुढे उस्मानाबादला मराठा समाजाचा स्वतंत्र मोर्चा निघाला. एकाच घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय एकजूट होती आणि त्याच घटनेच्या विरोधात जातीय एकजूटही दिसून आली. कोपर्डी घटनेची संवेदनशीलता एवढी की, मराठा समाजातील तरुण विशेषत: ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण एकवटला गेला आणि त्याने या मोर्चानाही दिशा दिली. यात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या धुरिणांनी पद्धतशीरपणे एकत्रीकरण करण्यास सुरुवात केली आणि मोर्चाच्या मागण्यांत एकेक भर पडत गेली. आजही मराठा समाजातील तरुण आक्रमकपणे विचारतात, अॅट्रॉसिटीबद्दलची मागणी पाचव्या-सहाव्या क्रमांकाची आहे. पण जणू तीच मागणी महत्त्वपूर्ण आहे, असे मानून तेवढीच पुढे रेटली जात आहे. या मागे मराठा समाजातील पुढाऱ्यांचा वाटा अधिक आहे. औरंगाबादनंतर झालेल्या मोर्चामध्ये नवीन दोन मागण्या निवेदनांमध्ये खालच्या बाजूला आता टाकल्या जात आहे. यात बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार काढून घ्यावा आणि जालन्याच्या मोर्चात आणखी एक मागणी पुन्हा जोडण्यात आली. ती अशी होती- मराठा समाजाचे विकृत दर्शन ज्या चित्रपट आणि नाटकांमधून होते त्यावर बंदी आणावी. या दोन मागण्या हळूहळू पुढे सरकवल्या जात आहेत. नव्यानेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींचाही उल्लेख निवेदनामध्ये दिसू लागला आहे. ‘सैराट’च्या निमित्ताने विचारला जाणारा प्रश्न शालिनीताई पाटील यांनी ‘सामना’ चित्रपटाचे नाव घेत समाजाचे विकृत चित्र रंगविले जाऊ नये, असे सांगत उभा केला होता.
मोर्चाच्या व्यवस्थापनात शैक्षणिक संस्थांचा मोठा सहभाग आहे. मोर्चाच्या दिवशी महाविद्यालयांना अघोषित सुट्टय़ा होत्या. जालन्याच्या मोर्चाची संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांना घरी येणे-जाणे जिकिरीचे होईल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनीच सर्व शाळांना सुट्टी देऊन टाकली. बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये मोर्चाच्या आयोजनात शिक्षकांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मोर्चाबाबतचे संदेश दिले गेले. संख्या वाढविण्यासाठी मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या अनेक बाजूंवर चर्चाही करण्यात आल्या. समाजकल्याण विभागाकडून मधल्या काळात विहिरीवरच्या मोटारी वितरित झाल्या होत्या. याच काळात पाणी मिळत नाही म्हणून अनेकांच्या मोटारी जळाल्या होत्या. ‘त्यांना’ शासनाकडून मोटार मिळते, मग आम्हीच काय घोडे मारले आहे, असाही सवाल केला जायचा. छोटय़ा; पण अन्यायाची (?) जाणीव करून देणाऱ्या बाबी पद्धतशीरपणे पेरल्या जात होत्या, त्यातून निर्माण झालेली खदखद या मोर्चाच्या गर्दीत दिसू लागली आणि राजकीय नेते या गर्दीमागून चालू लागले. काही नेत्यांनी मोर्चासाठी आवश्यकता असेल तर पाच लाख रुपयेसुद्धा देण्याची तयारी दाखविली. हे पैसे कोणी घेतले नाहीत. तरीदेखील औरंगाबादनंतरच्या काही मोर्चामध्ये पुढाऱ्यांनी दुसरे दरवाजे उघडले. जालन्याच्या मोर्चासाठी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी त्यांच्या भावाला पुढे केले. राजेश टोपेंचा भाऊ सतीश टोपे पुढे आले. त्यांनी नंतर बरीच मदत केली. आता सर्वपक्षीय नेते मोर्चाना आर्थिक रसद पुरविण्यासाठी तयार आहेत. लातूरच्या मोर्चात धीरज देशमुख सहभागी झाले. नांदेडमध्ये काँग्रेसच्या मराठा पुढाऱ्यांनी रसद पुरविली. जालन्याच्या मोर्चात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबन लोणीकर सहभागी झाले. मात्र कोणत्याही एका व्यक्तीचे नाव, कोठेही पुढे आले नाही. सर्वसामान्य मराठा माणूस आपल्या मागण्यांसाठी पुढे येतो आहे, असेच चित्र सर्वत्र होते. या सगळ्या घटना घडामोडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणताहेत, हे माध्यमांत गांभीर्याने घेतले जात असले तरी सर्वसामान्य मराठा तरुण सरसकट आरक्षण हवेच कशाला, या प्रश्नांच्या भोवती चर्चा करताना दिसतो आहे.
आता मराठा मोर्चाना उत्तर देण्यासाठी दलित संघटना मोर्चा काढणार आहेत. त्याच्या आयोजनाच्या बैठकीलाही तीन हजारांचा जमाव होता. बीडमधूनच ओबीसींचाही मोर्चा निघणार आहे. कोपर्डीचा विषय पहिल्या क्रमांकाचा असला तरी त्याच्या भोवताली आरक्षणाचे रिंगण ओढण्यात आले आहे. त्यात अॅट्रॉसिटीही पेरण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक जातीय व्यवस्थेची उतरंड अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे रचले जात आहेत. काही वर्षांपूर्वी स्वत:ची जात सोडून इतर जातींत मित्र बनविणाऱ्या तरुणाला चांगले समजले जायचे. पुरोगामीपणा असाच रुजावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी अनेक पिढय़ा मराठवाडय़ात खपल्या. त्याच मराठवाडय़ात आता एखाद्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्यावर अन्याय करणारा पकडला गेला का, तिला काही मदतीची गरज आहे का, ती बरी आहे ना, असे प्रश्न विचारले जाण्यापूर्वी तिची जात विचारली जाते आहे. हे अधोगतीकडे जाणारे दाहक वास्तव सर्व जण विसरून जात असल्यासारखे वातावरण आहे.
suhas.sardeshmukh@expressindia.com