सध्या त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना मूळ धरू लागली आहे. या त्रिकोणी कुटुंबात चौथा कोणी आला तर त्याची अडचण भासू लागते. त्यामुळेच विभक्त कुटुंब पद्धतीत पाळणाघरांप्रमाणेच आता वृद्धाश्रम संस्कृतीही अपरिहार्य ठरली असून अनेक ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने अथवा अनिच्छेने वानप्रस्थाश्रमाची ही आधुनिक पद्धतीचे अनुसरण करू लागले आहेत.
त्यातूनच मुंबईच्या परिघात शहरापासून दूर ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात अनेक वृद्धाश्रम उभे राहिलेले दिसून येतात. कल्याण-शीळ मार्गावरील ठाणे महापालिका हद्दीतील खिडकाळी मंदिरालगत असणारे साईधाम हे वृद्धाश्रम त्यापैकीच एक.
नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती पत्करल्यानंतर डोंबिवली येथील गीता कुलकर्णी यांनी पुढील आयुष्य वृद्धांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डोंबिवलीजवळील खिडकाळी मंदिरालगत साईधाम वृद्धाश्रम सुरू केला. गेली दोन दशके ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वाने साईधाम वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना आसरा दिला जात आहे. गीता कुलकर्णी यांच्या कार्यात त्यांचा मुलगा प्रवीण आणि सून प्रियाही सहभागी झाले आहेत. महागाईच्या काळातही अत्यल्प शुल्क आकारण्याचा घेतला वसा कसोशीने पाळणाऱ्या या संस्थेला विस्तारीकरण तसेच अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची अत्यंत आवश्यकता आहे.. ना नफा, ना तोटा तत्त्वावर सुरू असलेल्या या आश्रमाचा आर्थिक गाडा हाकताना संचालकांना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. इच्छुकांनी श्री साईधाम वृद्धाश्रम ट्रस्ट या नावाने धनादेश काढावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा