गौरव सोमवंशी

सरकार आणि बँका यांची मक्तेदारी मोडण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न काही जणांनी ‘ब्लॉकचेन’ येण्याच्याही आधी केला होता. ‘ब्लॉकचेन’ आणणारा सातोशी नाकामोटो हा त्यांपैकीच कोणी एक नव्हे?

prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?
tigress Bijli walking with three cubs
Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…
explosion in bhugaon steel company in wardha
Video : भूगांव येथील पोलाद प्रकल्पात स्फ़ोट, २१ कामगार जखमी

समजा, जगातील सर्वात श्रीमंत अशा १०० लोकांची यादी आपण बनवली. या यादीमध्ये ‘अ‍ॅमेझॉन’च्या जेफ बेझोसपासून ‘मायक्रोसॉफ्ट’च्या बिल गेट्सपर्यंत सर्वच नावे दिसतील. याच यादीत एक अनोखे नाव असेल, ज्याच्याबद्दल आपल्याला फारसे माहीत नसेल. ते नाव म्हणजे सातोशी नाकामोटो. २०१७ च्या डिसेंबरमध्ये ‘बिटकॉइन’च्या मूल्याने उच्चांक गाठला होता, तेव्हा हा सातोशी नाकामोटो जागतिक पातळीवरील ४४ व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता. या सातोशी नाकामोटोच्या खात्यामध्ये किती बिटकॉइन आहेत, ते शेवटी कधी खर्च केले होते आणि आज या बिटकॉइनचे रूपांतर डॉलरमध्ये केल्यास किती रक्कम हाती येईल, वगैरे तपशील आपल्याला माहीत असले; तरी आपण हे ठामपणे सांगू शकत नाही की, हा सातोशी नाकामोटो नक्की कोण आहे- पुरुष की स्त्री किंवा एकच व्यक्ती आहे की काही निवडक व्यक्तींचा समूह आहे? असे असताना जर कोणी दावा केला की, सातोशी नाकामोटो या लेखात नमूद केलेल्या काही नावांपैकीच एक असावा; तर?

असा दावा केला जाऊ शकतो; कारण सगळा इतिहास पाहून अनेकांनी सातोशी नाकामोटोच्या ओळखीबद्दल काही अंदाज बांधले आहेत. सातोशी नाकामोटो हा ‘सायफरपंक’ चळवळीच्या ईमेलद्वारे होणाऱ्या चच्रेत बराच सक्रिय होता. सातोशी नाकामोटोने जे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान विकसित केले, ते तंत्रज्ञान आणि त्यामागील सरकार आणि बँकांना दूर सारण्याचा उद्देश साधण्याचा प्रयत्न त्याहीआधी काही जणांनी केलेला होता. त्यांच्या प्रयत्नांच्या जोरावर आणि त्यांनी साधलेल्या मर्यादित यशावरच ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आज उभे आहे. अनेकांच्या मते तर, या मर्यादित यशस्वी ठरलेल्या मंडळींचे योगदान इतके मोठे आहे की, सातोशी नाकामोटो यांपैकी कोणी असल्यास नवल नाही. मागील लेखाचा शेवट आपण त्यांपैकी पाच नावांनी केला होता : डॉ. अ‍ॅडम बॅक, हॅल फिनी, निक झाबो, डेव्हिड चॉम आणि वेई दाई. आजच्या लेखात यांच्याविषयी जाणून घेऊ या..

डिजिकॅश

सुरुवात करू या डेव्हिड चॉमपासून. चॉम यांच्या १९८१ साली प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातूनच ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाकडे जाणारी पाऊलवाट तयार झाली. ‘क्रिप्टोग्राफी’ (कूटशास्त्र) वापरून संदेश पाठवणाऱ्याची ओळख गोपनीय कशी ठेवायची, हे चॉम यांनी त्यात सांगितले होते आणि तेही इंटरनेट, ईमेल, वेबसाइट वगैरे प्रचलित होण्याच्या फार पूर्वीच. मोठय़ा कंपन्या, सरकार आणि बँका या बलाढय़ संस्था डिजिटल युगात आणखी बलाढय़ होणार, या भाकिताचा प्रभाव त्या वेळच्या बऱ्याच संशोधनांवर होता. चॉम यांचे संशोधनही त्यास अपवाद नव्हते. संदेश पाठवणाऱ्याच्या ओळखीमध्ये गोपनीयता आणल्यानंतर त्याच्यापुढील पायरी होती : आर्थिक व्यवहारामध्ये बँकांना फक्त गरजेपुरती माहिती पुरवणे आणि बाकी माहितीचा अधिकार व नियंत्रण हे सामान्य व्यक्तीकडेच राहू देणे. चॉम यांनी ‘सायफरपंक’ चळवळ सुरू होण्याआधीच या विषयावर १७ संशोधने प्रसिद्ध केली होती आणि नुसत्या संशोधनावर ते थांबले नाहीत. १९८९ साली, जेव्हा ‘सायफरपंक’ चळवळीला आपले नावसुद्धा मिळाले नव्हते, ईमेल वा वेबसाइट हे कोणास नीटसे ठाऊकही नव्हते, तेव्हा चॉम यांनी ‘डिजिकॅश’ नामक कंपनी अ‍ॅम्स्टरडॅमला सुरू केली. ‘डिजिकॅश’ हे बऱ्याच अर्थाने आजच्या ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सी(कूटचलन) प्रमाणेच चालते; पण यांत काही मूलभूत फरकही आहे. चॉम हे काही व्यवस्थाविरोधी किंवा परिवर्तनवादी म्हणून ओळखले जात नाहीत. त्यांचे बहुतांश काम हे सरकार किंवा बँकांना सोबत घेऊन पुढची दिशा कशी आखावी, यावर आहे. फक्त या एकाच कारणामुळे डेव्हिड चॉम हेच सातोशी नाकामोटो असण्याची शक्यता थोडी धूसर होते.

बिटगोल्ड

सध्याच्या ‘ब्लॉकचेन’ क्षेत्रात सातोशी नाकामोटो या ओळखीचे सर्वात प्रबळ दावेदार कोणी असतील, तर ते आहेत- निक झाबो! अर्थात, तेच सातोशी नाकामोटो आहेत किंवा ते सातोशी नाकामोटो यांना ओळखतात, असे अनेक तर्क झाबो यांनी स्पष्टपणे उडवून लावले आहेत. झाबो यांना असे करावे लागते, कारण त्यांनी २००५ साली ‘बिटगोल्ड’ नामक संशोधन जगासमोर मांडले. यामध्ये अगोदरच्या संशोधनाची दखल घेतली गेली होतीच; पण त्याउपर बरीच सुधारणासुद्धा करण्यात आली होती. झाबो हे विचारांनी आणि कार्याने क्रांतिकारीच समजले जातात. ‘बिटगोल्ड’मध्ये माहितीला एका अविरत साखळीच्या रूपाने संचालित करीत एक जागतिक खाते निर्माण व्हावे, हा उद्देश होता. यामध्ये काही तांत्रिक त्रुटी नक्की होत्या आणि त्या झाबो यांनी मान्यही केल्या होत्या. आश्चर्य म्हणजे, तीन वर्षांनंतर या त्रुटी दूर करून सातोशी नाकामोटोने ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित बिटकॉइन जगासमोर मांडले! दुसरे म्हणजे, लेखनशैलीविषयक एका शोधाभ्यासात- निक झाबो आणि सातोशी नाकामोटो यांच्या लिहिण्याच्या शैलीतही बरेच साम्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. पण झाबो यांनी हा तर्क स्पष्टपणे नाकारला आहे.

हॅशकॅश आणि बी-मनी

सातोशी नाकामोटोने ज्या दोन व्यक्तींना सर्वात आधी संदेश पाठवले, ते होते- डॉ. अ‍ॅडम बॅक आणि वेई दाई! डॉ. अ‍ॅडम बॅक यांनी ‘हॅशकॅश’ नामक संशोधन १९९७ साली मांडले होते. त्यात ‘हॅशिंग’ या प्रक्रियेचा उपयोग करून एक चलन विकसित केले आहे. (‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानसुद्धा या ‘हॅशिंग’वर पूर्णपणे अवलंबून असतेच, त्याबाबत आपण स्वतंत्र लेखात जाणून घेऊ!) तर वेई दाई यांनी १९९८ मध्ये ‘बी-मनी’ ही संकल्पना जगासमोर मांडली होती, ज्यामध्ये त्यांनी आभासी चलनाचे काय काय गुणधर्म असावेत, हे अधोरेखित केले होते. त्यातल्याच काही गुणधर्माना अवलंबत आज क्रिप्टोकरन्सी (कूटचलन) तयार होते.

आता येऊ हॅल फिनी यांच्याकडे. चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती म्हणजे नील आर्मस्ट्राँग, हे सर्वाना ठाऊक असते. पण दुसरी व्यक्ती कोण, असे विचारले की अनेक जण अडखळतात. ती दुसरी व्यक्ती होती- बझ आल्ड्रिन! त्याप्रमाणेच, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित बिटकॉइनचा निर्माता सातोशी नाकामोटो आहे, हे आतापर्यंत आपल्याला ठाऊक झाले आहे. सातोशी नाकामोटोने ज्या व्यक्तींशी सर्वात आधी संपर्क साधला, त्यांचा उल्लेख वर आलाच आहे. पण ती व्यक्ती कोण, जिला सातोशी नाकामोटोने सर्वात आधी बिटकॉइन पाठवले? चलनाची निर्मिती केली खरी, पण सुरुवातीला कोणा एकासोबत तरी आर्थिक व्यवहार करावा लागेलच ना? त्यासाठी सातोशी नाकामोटोने १० बिटकॉइन हॅल फिनी यांना पाठवले होते आणि नंतर फिनी यांनी अनेक बिटकॉइन ‘माइन’सुद्धा केले. (‘मायनिंग’ काय असते, याची माहिती स्वतंत्र लेखात घेऊ या.) फिनी यांनी सुरुवातीला बिटकॉइनच्या बऱ्याच लहानसहान त्रुटी तिथल्या तिथे दुरुस्त केल्या होत्या. २०१४ साली फिनी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पण हॅल फिनी हे व्यक्तिमत्त्व इतके आशावादी की, त्यांनी बिटकॉइनवरून कमावलेला पसा वापरून स्वत:चा मृतदेह अत्यंत कमी तापमानात गोठवून ठेवला आहे; या आशेने की, भविष्यामध्ये मृत शरीरास जिवंत करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाल्यास त्यांचे शरीर उपलब्ध असावे!

आतापर्यंत, या पाच जणांपैकी कोणी सातोशी नाकामोटो आहे का, हे निश्चित करता आलेले नाही. परंतु ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान विकसित करण्यात या पाच जणांचे प्रचंड योगदान आहे. हे योगदान खुद्द सातोशी नाकामोटोसुद्धा आपल्या बिटकॉइनबद्दलच्या लिखाणात मान्य करतोच!

या लेखमालेत आतापर्यंत आपण, ‘ब्लॉकचेन’ समजून घेण्यासाठी त्याचा वैचारिक वारसा महत्त्वाचा आहे म्हणून पशाचा इतिहास थोडक्यात जाणून घेतला. काही निवडक लोकांनी ‘ब्लॉकचेन’वर आपली ठळक छाप पाडली आहे, हेही पाहिले. आता, संगणकशास्त्रातील ज्या संकल्पना मिळून ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान विकसित झाले, त्याविषयी पुढील लेखांत पाहू या..

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io