गौरव सोमवंशी

Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
Womans leg cut due to nylon manja needs 45 stitches
अकोला : सावधान! नायलॉन मांजामुळे महिलेचा पाय कापला; तब्बल ४५ टाके…
Natasha Poonawalla and Adar Poonawalla
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
Swiggy launches new app Snacc
Swiggy : फक्त १५ मिनिटांत जेवण पोहोचणार तुमच्या घरी! स्विगीची नवी सुविधा नेमकी कशी आहे? जाणून घ्या

बहुमताचा आग्रह धरणाऱ्या बिटकॉइन प्रणालीमध्ये अल्पसंख्येत असणाऱ्या मतांना वगळलेच जाणार का? बिटकॉइन प्रणालीत दोन परस्परविरुद्ध मतांचे गट असतील आणि त्यांच्यात समन्वयही साधला जात नसेल, तर काय घडते?

सातोशी नाकामोटोने दिलेल्या प्रणालीत बहुमतास प्राधान्य आहे. मग ते ‘ब्लॉक’ बनविण्यासाठीचे बहुमत असो (‘बहुमताचे कोडे..’ ३० एप्रिल) किंवा वितरित (डिस्ट्रिब्युटेड) प्रणालीमध्ये बहुमताचा वापर करून चुकीची माहिती वगळण्याचा प्रयत्न असो (‘गोष्ट छोटीच, पण..’, २३ एप्रिल) अथवा मागील लेखात (‘बिरबल, बदल आणि बिटकॉइन’, ९ जुलै) पाहिल्याप्रमाणे, बिटकॉइनमधील कोणते बदल स्वीकारावेत वा नाकारावेत याचा निर्णय असो; बहुमताचे मूल्य यात नेहमीच पाळले जाते. इथे असा प्रश्न पडेल की, बहुमताच्या आग्रहाखाली आपण अल्पसंख्येत असणाऱ्या मतांना वगळायचे का? जर बिटकॉइनच्या जगतात विरुद्ध मतांचे दोन समूह तयार झाले आणि त्यांचा परस्परांमध्ये काहीच समन्वय साधला जात नसेल, तर अशा वेळी काय होते? असे कधी झाले आहे का?

तर.. बिटकॉइन जगतात चाललेल्या अशाच एका मतभेदावर नजर टाकू या. दर दहा मिनिटांच्या अंतराने एक ‘ब्लॉक’ हा बिटकॉइनच्या ‘ब्लॉकचेन’मध्ये जोडला जातो. हा वेळ (ब्लॉक टाइम) सरासरी दहा मिनिटेच राहील अशी तरतूद बिटकॉइनच्या प्रणालीत अगोदरपासूनच करण्यात आली आहे. ते का, हे आपण ‘बिटकॉइनची बक्षिसी’ (२५ जून) या लेखात समजून घेतले आहे. बिटकॉइनच्या प्रणालीत आणखी एक गोष्ट अनिवार्य आहे; ती म्हणजे- एका ‘ब्लॉक’ची क्षमता ही एक मेगाबाइट (एमबी) असावी! याचा अर्थ, ‘ब्लॉक टाइम’ हा १० मिनिटे आणि ‘ब्लॉक साइझ’ (म्हणजे एका ब्लॉकची क्षमता) ही एक एमबी असते. मात्र, या दोन मूलभूत तरतुदींमुळे काही समस्या वा मर्यादा उभ्या ठाकतात.

आता आपण थोडे या दोन आकडय़ांवर लक्ष देऊ. एक एमबी आणि १० मिनिटे. दर दहा मिनिटांनी जगभरात बिटकॉइनमध्ये हजारो व्यवहार होतात. इथे दोन प्रश्न येतात :

(१) एका ‘ब्लॉक’मध्ये किती व्यवहार आपण साठवू शकतो?

उत्तर : एका व्यवहारासाठी सरासरी (उदा. ‘बॉबने चार्लीला २० बिटकॉइन दिले’) ३७० बाइट  जागा लागते. एक एमबीमध्ये असे जवळपास २,७०० व्यवहार आपण साठवू शकतो. म्हणजे सरासरी २,७०० व्यवहार अधिकृत ठरवून, ते ‘ब्लॉक’मध्ये साठवून आपण त्यास ‘ब्लॉकचेन’च्या साखळीत जोडू शकतो. दर दहा मिनिटांनी २,७०० व्यवहार जोडणे म्हणजे दर सेकंदाला सरासरी ४.५ व्यवहार बिटकॉइन हाताळू शकते.

(२) जर दहा मिनिटांच्या कालावधीत २,७०० पेक्षा अधिक, समजा पाच-सात हजार व्यवहार बिटकॉइनच्या जगतात आले, तर?

उत्तर : त्यांना पुढे ढकलले जाईल आणि ते पुढच्या ‘ब्लॉक’मध्ये टाकले जातील. म्हणजे आपला व्यवहार वैध ठरण्यासाठी, तो ‘ब्लॉकचेन’च्या साखळीत जोडला जाण्यासाठी आणखी दहा मिनिटे थांबावे लागेल.

परंतु जसजसे बिटकॉइन हे आणखी प्रचलित होईल, तसतसे व्यवहारांची संख्या वाढतच जाणार. त्यामुळे त्या दृष्टीने काही तरी बदल करावाच लागेल, यावर साऱ्यांचे आता एकमत झाले आहे. पण बदल नक्की कसा आणि कोणत्या पद्धतीचा असावा, याबाबत पुढे दोन गट पडले.

एका गटाला वाटले की, आपण सरळसरळ ‘ब्लॉक’ची क्षमता वाढवू या; ती एक एमबीवरून आठ एमबी करू या. ही ‘ब्लॉक’ क्षमता सोप्या पद्धतीने, हवी तशी वाढवता येईल अशी तरतूद करण्याचा या गटाचा मानस होता. मात्र या बदलामुळे बिटकॉइनच्या जगतातील मायनर मंडळींची ताकद थोडी वाढली असती आणि जी मंडळी केवळ बिटकॉइन वापरतात वा त्यात गुंतवणूक करतात (परंतु मायनिंग करीत नाहीत) अशांची बाजू काही प्रमाणात कमकुवत झाली असती. परंतु या बदलामुळे बिटकॉइनचे व्यवहार हे जास्त वेळ न लावता लवकर ‘ब्लॉक’मध्ये जोडून वैध ठरवता आले असते. यामुळे बिटकॉइनचा चलन म्हणून उपयोग अधिक सोप्या पद्धतीने झाला असता. या अर्थाने या नवीन प्रक्रियेचे ‘बिटकॉइन कॅश’ असे नामकरण झाले.

या बदलास प्रामुख्याने आणि उघडपणे समर्थन करणाऱ्या रॉजर व्हेर याने २०११ सालीच (जेव्हा बिटकॉइन फारसे प्रचलित नव्हते) जवळपास एक लाख बिटकॉइन विकत घेतले. सातोशी नाकामोटोच्या खात्यात १.१ लाख बिटकॉइन आहेत. रॉजर व्हेर याने सुरुवातीच्या काळात बिटकॉइनचा इतका प्रसार केला, की त्याला ‘बिटकॉइन जीझस’ असे म्हटले जाऊ लागले. रॉजर व्हेर हा निवडक ‘बिटकॉइन अब्जाधीशां’पैकी आहे. त्याने काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे नागरिकत्व सोडून एका लहान बेटावर स्थित असलेल्या सेंट किट्स अ‍ॅण्ड नेव्हिस या देशाचे नागरिकत्व स्वीकारले. तर.. बिटकॉइनची ‘ब्लॉक’ क्षमता ही आठ एमबी करावी यास या रॉजर व्हेरचाही पाठिंबा आहेच; पण त्याला आणखी अशा काही तरतुदी करायच्या आहेत, की ज्याने मायनर मंडळींना भविष्यातील निर्णयांमध्ये अधिक बळ मिळेल.

परंतु बिटकॉइनमधील बदलांबाबत वरील गटाच्या विरुद्ध मत असणारेही आहेत. त्या दुसऱ्या गटाच्या मते, व्हेर वगैरे मंडळींनी सुचविलेले बदल हे बिटकॉइनच्या मूळ ‘विकेंद्रीकरण’च्या तत्त्वाविरुद्ध आहेत. त्यामुळे या गटाने एक निराळाच तांत्रिक उपाय सादर केला. ‘ब्लॉक’ची क्षमता एक एमबी इतकीच ठेवूनही त्यामध्ये अधिकाधिक व्यवहार साठवून ठेवता येतील अशी योजना या गटाने सुचवली. म्हणजे प्रत्येक ‘ब्लॉक’मध्ये आतापेक्षा अधिक व्यवहार साठवले जातील आणि स्थगित व्यवहारांची संख्या कमी होईल. तितक्याच जागेत अधिकाधिक व्यवहार साठवून ठेवण्याच्या या प्रक्रियेला ‘सेग्रिगेटेड विटनेस (सेगविट)’ असे म्हणतात. या ‘सेगविट’ मंडळींच्या मते, ‘ब्लॉक’ची क्षमता वाढवली तर त्या मोठय़ा ‘ब्लॉक’ला नेटवर्कमधून इकडून तिकडे जाण्यासाठी वेळ लागेलच; आणि जर ‘ब्लॉक’ क्षमता वाढवूनच उपाय शोधायचा तर अशी वेळ येईल की, जास्त मोठे ‘ब्लॉक’ सहजासहजी नेटवर्कमधून प्रसारित होणार नाहीत. तसेच ‘ब्लॉक’ची क्षमता तितकीच ठेवल्याने मायनिंग करणाऱ्यांना कोणते विशेषाधिकारही मिळणार नाहीत आणि बिटकॉइनच्या जगतात असलेल्या विविध प्रकारच्या मंडळींमध्ये समानता कायम राहील. त्यामुळे असलेल्या जागेतच जास्त व्यवहार साठवून ठेवणेच रास्त आहे, असे ‘सेगविट’ गटाला वाटायचे.

दोन्ही गटांमध्ये अनेक वर्षे हा वाद चांगलाच रंगला आणि कालांतराने दोन्ही गटांना कळून चुकले की, आता समन्वय शक्य नाही. दोन्ही गटांनी आपल्या विचारांना अनुसरून असलेली तांत्रिक तयारीसुद्धा करून ठेवलेली. १ ऑगस्ट २०१७ रोजी बिटकॉइनच्या साखळीचे दोन भाग पडले, त्यात फाटे फुटले. ज्यांना रॉजर व्हेरने मांडलेली बिटकॉइनची क्षमता वाढवायची युक्ती आवडली, त्यांनी त्या प्रकारे स्वत:कडे असलेले सॉफ्टवेअर अपडेट केले. तर ज्या बिटकॉइनधारकांना ‘सेगविट’चे म्हणणे पटले, त्यांनी तो मार्ग निवडला. आता ‘सेगविट’चा मार्ग हा सातोशी नाकामोटोच्या मूळ तरतुदींच्या अधिक जवळ जाणारा आहे आणि त्यामुळे बहुसंख्य लोकांनी याचे अवलंबन केले. त्यामुळे ‘बिटकॉइन कॅश’ची किंमत ही मूळ बिटकॉइनशी जवळीक साधलेल्या ‘सेगविट’पेक्षा कमीच होती.

याला ‘ब्लॉकचेन’च्या जगतात ‘हार्ड फोर्क’ असे म्हणतात. याच्यासह ‘सॉफ्ट फोर्क’सुद्धा असतो. या दोन्ही मार्गामध्ये एक फरक आहे. ज्यांना मूळ बिटकॉइनमधून ‘बिटकॉइन कॅश’कडे जाण्याची इच्छा होती, त्यांना आपले सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याची गरज होती. कारण जुन्या पद्धतीने त्यांची ‘ब्लॉक’ क्षमता एक एमबी इतकीच होती आणि ‘बिटकॉइन-कॅश’मध्ये आता आठ एमबीपर्यंत ‘ब्लॉक’ क्षमता वाढली आहे. याला ‘हार्ड फोर्क’ म्हणतात. पण ज्यांनी कोणतेच बदल केले नाहीत, त्यांना आपोआप कालांतराने ‘सेगविट’चे फायदे मिळाले. कारण ‘सेगविट’मुळे बिटकॉइनच्या मूळ तरतुदींत बदल झालेला नव्हता. याला ‘सॉफ्ट फोर्क’ म्हणतात. आजपर्यंत असे अनेक ‘हार्ड फोर्क’ आणि ‘सॉफ्ट फोर्क’ बिटकॉइनच्या जगतात झाले आहेत. वरील ‘बिटकॉइन कॅश’ हे फक्त त्याचे एक उदाहरण होते. नंतर २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये ‘बिटकॉइन-कॅश’लासुद्धा दोन फाटे फुटलेच! याच ‘फोर्किंग’विषयी पुढील लेखात सविस्तर जाणून घेऊ या..

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io

Story img Loader