या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरव सोमवंशी

आर्थिक व्यवहारांच्या माहितीला ‘नॉन्स नंबर’ची जोड दिली की ते ‘ब्लॉक’बद्ध होतात. हा ‘नॉन्स नंबर’ शोधून काढणाऱ्यास ‘बिटकॉइन’ मिळते, आणि ‘ब्लॉक’ची साखळी वाढत जाते. पण बक्षीस म्हणून देण्यासाठी ‘बिटकॉइन’ आहेत केवळ २.१ कोटी इतकेच.. ते संपल्यावर बक्षीस म्हणून काय दिले जाईल? की ‘बिटकॉइन’ची चलनवाढ होईल?

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आधी ‘बिटकॉइन’ समजून घेणे गरजेचे आहे. याचे कारण असे की, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापरच तिथून सुरू झाला. ‘बिटकॉइन’ गेली किमान दहा वर्षे कोणत्याही मोठय़ा तांत्रिक समस्येविना सुरू आहे. त्यामुळे त्यामागील तंत्रज्ञान अधिक खोलात समजून घेऊन त्याचा वापर इतर ठिकाणीही कसा करता येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. पण सुरुवात झाली ती ‘बिटकॉइन’मुळेच! त्यामुळेच आपण ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचे इतर प्रकार, प्रयोग आणि उपयोग पाहण्याआधी ‘बिटकॉइन’मागील प्रक्रिया आणखी सविस्तरपणे समजून घेऊ या..

आपण ‘ब्लॉक’पासून ‘ब्लॉकचेन’पर्यंत कसे जायचे, याविषयी मागील लेखात (‘ब्लॉक ते ब्लॉकचेन’, १८ जून) पाहिले. सोबतची आकृती पाहिली की, ‘बिटकॉइन’ची विशिष्ट ‘ब्लॉकचेन’ कशी दिसते, याची ढोबळ कल्पना येऊ शकते. माहितीची ही साखळी कशी वाढत जाते? तर सर्वप्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की, ‘बिटकॉइन’चा पूर्ण माहितीचा साठा हा कोण्या एका ठिकाणी ठेवलेला नाही. तो कोणा एका संस्थेकडे किंवा व्यक्तीकडेही नाही. ही माहिती अनेक ‘बिटकॉइन मायनर’कडे ठेवलेली असते. (‘नॉन्स नंबर’ शोधून बक्षीस म्हणून ‘बिटकॉइन’ मिळवणारा तो ‘मायनर’ आणि या प्रक्रियेला म्हणतात ‘मायनिंग’.. आठवा : ‘चार शून्य.. बिटकॉइन!’ (११ जून) हा लेख!)

जसे जसे आर्थिक व्यवहार होतील, तसे तसे हे व्यवहार एकत्र मिळून सगळ्या ‘मायनर’ मंडळींकडे प्रसारित केले जातात. या ‘मायनर’ मंडळींकडे शक्तिशाली संगणक असतात. ते त्या व्यवहारांची वैधता तपासतातच, पण त्यासोबतच त्यांच्यात ‘नॉन्स नंबर’ शोधण्याची स्पर्धाही सुरू होते. हा ‘नॉन्स नंबर’ असा हवा की, त्यास जोडलेल्या माहितीच्या ‘हॅश आऊटपुट’चे पहिले चार आकडे हे शून्य असतील. ज्या कोणा ‘मायनर’ला असा ‘नॉन्स नंबर’ सर्वात आधी मिळतो, तो लगेच इतरांना कळवतो. आपण आधीच्या लेखांत पाहिल्याप्रमाणे, हे सुडोकू किंवा शब्दकोडे सोडवण्यासारखे असते. जे सोडवण्यास कठीण असते आणि वेळही लागतोच; पण एकदा का कोणी सोडवले, की ते बरोबर आहे की चूक हे तपासून पाहायला मात्र वेळ लागत नाही. तसेच इतर ‘मायनर’ मंडळींनी तपासून या ‘नॉन्स नंबर’ला सहमती दिली, की या साऱ्या माहितीचा ‘ब्लॉक’ प्रसारित होतो आणि प्रत्येक जण स्वत:कडील ‘ब्लॉकचेन’ त्याप्रमाणे ‘अपडेट’ करतो. हे केल्यावर त्या ‘मायनर’ला त्याने केलेल्या ‘मायनिंग’साठी बक्षीस मिळते. हे बक्षीस म्हणजेच ‘बिटकॉइन’ (पाहा : आकृती क्रमांक २)! सातोशी नाकामोटोने ‘बिटकॉइन’ सुरू करताना अशी तरतूद करून ठेवली होती की, एका गणिताच्या खाणीत तब्बल २.१ कोटी ‘बिटकॉइन’ साठवून ठेवले आहेत, ज्यांवर कोणाचाच हक्क नाही. जसजसे ‘ब्लॉक’ बनत जातील, तसतसे ‘नॉन्स नंबर’ शोधल्याबद्दल बक्षीस म्हणून त्या-त्या ‘मायनर’ला ते दिले जातील. ‘बिटकॉइन’ निर्माण होण्याची ही एकमेव पद्धत आहे. तो ‘मायनर’ मग या मिळालेल्या ‘बिटकॉइन’चा हवा तसा वापर करण्यासाठी पूर्णपणे मोकळा! या पद्धतीने सर्वाकडे व्यवहारांची ‘नोंदवही’ किंवा ‘ब्लॉकचेन’ अथवा ‘बिटकॉइन’ची माहिती ही तंतोतंत सारखीच असते. मात्र, जर कोणी स्वत:कडे असलेली प्रत खोडी करून वेगळी बनवून चालवली तर?

आता आपल्या मनात काही प्रश्न उद्भवतील. उदाहरणार्थ, ‘नॉन्स नंबर’ असाच का हवा, की तो आर्थिक व्यवहाराच्या माहितीसोबत जोडल्यावर मिळणारा ‘हॅश आऊटपुट’ हा चार शून्यांनी सुरू होणारा असेल? १ किंवा १० शून्य का नाहीत? तर याचे कारण पुढीलप्रमाणे : ‘नॉन्स नंबर’ शोधून काढणे हे संगणकांचे काम आहे. ज्याच्याकडे शक्तिशाली संगणक आहे, तो हे कोडे सर्वात अगोदर सोडवेल. पण जवळपास सर्वाकडे तितक्याच ताकदीचे संगणक असल्यामुळे सर्वाना ‘नॉन्स नंबर’ मिळण्याची शक्यता सारखीच असते. अशात कोणी नवीन शक्तिशाली संगणक आणले आणि त्यांद्वारे हा ‘नॉन्स नंबर’ लवकर मिळू लागला, की त्यांना अनुसरून इतर लोकही तेच संगणक वापरतील. असे केल्याने ‘नॉन्स नंबर’ खूप लवकर मिळू लागेल. परंतु ‘बिटकॉइन’मध्ये ‘ब्लॉक टाइम’ (म्हणजे नवीन ‘ब्लॉक’ बनवायची वेळ) ही संकल्पना आहे. त्यानुसार नवीन ब्लॉक बनविण्यासाठी सरासरी दहा मिनिटे वेळ असावी. अर्थात, ‘नॉन्स नंबर’ मिळणे हे पूर्णपणे अनिश्चित असले तरी सरासरी किती वेळ लागतोय हे कळणे सोपेच आहे. हा वेळ दहा मिनिटे असावा अशी सातोशी नाकामोटोने केलेली तरतूद आहे. जर पुढे जाऊन अधिक शक्तिशाली संगणक आले (जे येतीलच!) आणि ‘ब्लॉक टाइम’ हा सरासरी दहा मिनिटांपेक्षा फार कमी झाला, तर ‘बिटकॉइन’ स्वत:ची यंत्रणा बदलून आता चारऐवजी पाच शून्यांची अट घालेल. कारण यामुळे अधिक वेळ लागेल. ‘हॅश आऊटपुट’च्या सुरुवातीला किती शून्य असावेत.. चार किंवा पाच अथवा सहा, हे त्या-त्या काळातील संगणकांच्या क्षमतेवर अवलंबून राहील.

सातोशी नाकामोटोला अशी यंत्रणा बनवायची होती, जी भविष्यात होणाऱ्या बदलांनुसार स्वत:हून परिस्थितीशी जुळवून घेईल. म्हणून सातोशी नाकामोटोने हे नमूद केले की, संगणकांची शक्ती तर दिवसेंदिवस वाढतच राहील आणि त्यानुसार शून्यांची अट घातली आहे. तसेच त्याने ‘बिटकॉइन’ची चलनवाढ कशी रोखावी यासाठीदेखील तरतूद केली आहे. ती कशी? तुम्हाला प्रश्न पडला असेल की, त्या गणिताच्या खाणीत २.१ कोटी बिटकॉइन आहेत. हा आकडा मर्यादित का ठेवला? कारण मर्यादा नसेल तर चलनवाढ होतच राहील ना. त्यामुळे हे ‘नॉन्स नंबर’ शोधून मिळणारे बक्षीस हे कधी ना कधी संपुष्टात येईलच. जेव्हा असे होईल, त्यानंतर कशाला कोण महागडे संगणक लावून ‘नॉन्स नंबर’ शोधेल? पण त्याचीही तरतूद करून ठेवली आहे. जेव्हा गणिताच्या खाणीतील सर्व २.१ बिटकॉइन संपून जातील, त्यानंतर ‘मायनर’ मंडळींना बक्षिसाऐवजी एक छोटे शुल्क मिळेल. कोणाकडून? तर ज्यांचे प्रसारित केलेले आर्थिक व्यवहार हे ब्लॉकबद्ध करायचे आहेत त्यांच्याकडून. सद्य:परिस्थिती पाहून असे भाकीत केले गेले आहे की, या गणिताच्या खाणीतील सगळे बिटकॉइन ‘माइन’ करून संपण्यासाठी २१४० साल उजाडेल. आजघडीला १.८ कोटी बिटकॉइन हे ‘माइन’ केले गेले आहेत.

गणिताच्या खाणीत फक्त २.१ कोटी बिटकॉइन आहेत आणि २००९ ते २०२० या कालावधीत जवळपास १.८ कोटी बिटकॉइन ‘माइन’ केले गेले आहेत, तर सर्व बिटकॉइन ‘माइन’ होण्यासाठी २१४० हे वर्ष का उजाडेल? या आणि इतर प्रश्नांचे उत्तर पुढील लेखांमध्ये पाहू या..

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io