गौरव सोमवंशी

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

व्यवहार करायचे, त्यांची नोंदही ठेवायची आणि त्यांची सत्यताही तपासायची, हे ‘बिटकॉइन’मध्ये कसे केले जाते?

आपण आज थेट बिटकॉइन कसे काम करते,  हे पाहू या. यासाठी आपण मागील लेखात उल्लेख केलेल्या चार जणांचे उदाहरण घेऊ : अ‍ॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन! हे एकमेकांत काही व्यवहार करतील. त्या व्यवहारांची नोंदणी स्वत:हून करण्याचा प्रयत्नही ते करतील. यात त्यांना अडथळे येतील, तसे आपण एक एक अडथळा दूर करू. लेखासोबत दिलेल्या चित्राकृत्या त्या त्या वेळी पाहू आणि त्यांचा अर्थ जाणून घेऊ..

तर.. असे समजू की, अ‍ॅलिस, बॉब, चार्ली, आणि डीलन यांनी नुकताच महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे आणि महाविद्यालयाजवळच एक सदनिका भाडय़ाने घेऊन ते एकत्र राहत आहेत. एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात बरेच खर्च, खरेदी, उधारी वगैरे व्यवहार सुरू असतात. त्यांना सुरुवातीच्या काही दिवसांतच वाटू लागते की, हे सगळे पैशाचे व्यवहार लिहून ठेवायला हवेत. पण कुठे लिहून ठेवणार? तर.. ते त्यासाठी एक नोंदवही बनवायचे ठरवतात, ज्यात सगळ्या नोंदी असतील. ती नोंदवही एखाद्या संकेतस्थळावरही ठेवण्याचा त्यांचा विचार असतो. विद्यार्थीच ते. उत्साहीदेखील. ते हा प्रयोग सिद्धीस नेण्याचे ठरवतात.

ही साधीसोपी नोंदवही कशी दिसेल? तर, या चौघांचा सर्वात पहिला प्रयत्न तुम्हाला पहिल्या चित्राकृतीत (पाहा : चित्राकृती- १) दिसेल. त्यात या चौघांनी सुरू केलेली नोंदवही दर्शवली आहे. यामध्ये फक्त कोण कोणाला किती देणे आहे किंवा दिले, याची नोंद आहे. इथपर्यंत सगळे ठीक. पण हे चौघे काही लहानपणापासूनचे सवंगडी नाहीत, त्यामुळे त्यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वासही नाही. परिणामी काही समस्या उद्भवतील. आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यावरून जे शिकू, त्यास मार्गदर्शक सूचना म्हणून ध्यानात ठेवू.

तर.. आतापर्यंत आपण इतकेच पाहिले की, नोंदवही ठेवणे ही चांगली युक्ती आहे.

पण लगेच पहिली समस्या उद्भवते. समजा, या नोंदवहीमध्ये कोणी अनधिकृत नोंद करत असेल तर? म्हणजे चार्लीने खोडी म्हणून स्वत:हून नोंद केली की- ‘बॉबीने अ‍ॅलिसला १०० रु. दिले.’; तर? ती-ती नोंद नेमकी त्याच व्यक्तीने केली आहे याची खात्री कशी द्यावी? इथे ‘डिजिटल स्वाक्षरी’ आठवा. डिजिटल स्वाक्षरी दोन कामे करते. पहिले काम हे साध्या स्वाक्षरीसारखेच आहे; म्हणजे, व्यवहारास दुजोरा देणारी व्यक्ती नक्की तीच आहे ना, हे स्पष्ट करते. पण दुसरे काम साध्या स्वाक्षरीला नाही जमत, ते फक्त डिजिटल स्वाक्षरीच करते. ते असे की, मी काही मजकूर डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करून कोणाला पाठवल्यास, पुढे त्या मजकुरात कोणी थोडा जरी फेरबदल केला की ते ओळखता येते. प्रत्येक व्यक्तीला एकच डिजिटल स्वाक्षरी मिळते, पण ती प्रत्येक मजकुरानुसार बदलत जाते- जेणेकरून कोणी स्वाक्षरी झाल्यानंतर मजकुरात काही बदल केल्यास ते लगेच कळेल.

त्यामुळे आपल्या उदाहरणातील चौघे ठरवतात की, कोणीतीही नोंद करण्याआधी प्रत्येकाने आपली डिजिटल स्वाक्षरी वापरावी; तरच नोंदवहीमध्ये नवीन व्यवहार नोंदवता येतील. डिजिटल स्वाक्षरी वापरून प्रत्येक नोंद व्हायला सुरुवात होते. हेच दुसऱ्या चित्राकृतीमध्ये (पाहा : चित्राकृती – २) दर्शवले आहे. इथे या डिजिटल नोंदवहीतील प्रत्येक नोंद ही डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित आहे. यातून एक मार्गदर्शक सूचना मिळाली : डिजिटल नोंदवहीत कोणीतीही माहिती त्या-त्या व्यक्तीच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करता यावी.

तिसऱ्या चित्राकृतीकडे पाहण्यापूर्वी आपण तिसरी समस्या पाहू. डिजिटल स्वाक्षरी आल्यामुळे कोणी खोटी किंवा अनधिकृत माहिती टाकली की लगेच कळेल. पण समजा, बॉबने पहिल्या ओळीतील अ‍ॅलिसच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित असलेली नोंद नकलून चार-पाच वेळा तशीच लिहिली तर? कारण डिजिटल स्वाक्षरीचा उपयोग नोंद नक्की त्याच व्यक्तीची आहे का आणि मजकुरात काही बदल तर केलेला नाही ना, हे समजण्यासाठीच होऊ शकतो. पण एक प्रमाणित नोंद चार-पाच किंवा कितीही वेळा तशीच्या तशी नकलायला (मराठीत- ‘कॉपी करायला’!) काही अडचण येत नाही. मग बॉबला असे करण्यापासून कसे रोखायचे?

ही समस्या सोडवणे सोपे आहे. प्रत्येक नोंद ही अद्वितीय असावी यासाठी सोपी युक्ती करता येईल. प्रत्येक नोंदीला आपण अनुक्रमणिकेने जोडायचे आणि त्या अनुक्रमणिकेतील आकडय़ाला नोंदीच्या मजकुराचा भाग बनवायचे. आता चित्राकृती – ३ पाहा. आपण ‘अ‍ॅलिसने बॉबला १०० रु. दिले.’ एवढय़ाच मजकुराला डिजिटल स्वाक्षरी न लावता ‘१. अ‍ॅलिसने बॉबला १०० रु. दिले.’ या पूर्ण नोंदीला स्वाक्षरीने अधिकृत केले. समजा बॉबने आधीची खोडी पुन्हा करण्याचा प्रयत्न केलाच, तर अनुक्रमणिकेतील त्या नोंदीचा आकडा प्रत्येक नकलेत पुनरावृत्त होईल. प्रत्येक आकडा अद्वितीय असणे, हाच अनुक्रमणिकेचा अर्थ असतो!

बिटकॉइनमध्ये ही अनुक्रमणिका म्हणजे ‘वेळ’ (बिटकॉइनच्या भाषेत यास ‘टाइम-स्टॅम्प’)! यात प्रत्येक ‘ब्लॉक’ बनतो, तेव्हा त्या ब्लॉकमध्ये तो कधी बनला आहे याची वेळसुद्धा नोंदवली जाते. म्हणजे तो ब्लॉक अद्वितीय असेल, त्यामध्ये असणारे व्यवहार पुन्हा जसेच्या तसे झाले तरी दोन ब्लॉक हे सारखे येणार नाहीत. यातून आपल्याला आणखी एक मार्गदर्शक सूचना मिळाली : प्रत्येक नोंद अद्वितीय असावी यासाठी काही मार्ग हवा.

चौघांचे व्यवहार महिनाभर चालू राहतात आणि महिनाअखेरीस एक समस्या उद्भवते.. डिजिटल नोंदवहीनुसार चार्लीने इतरांना एकूण १,२०० रु. देणे आहे. पण चार्ली म्हणतो, ‘माझ्याकडे पैसेच नाहीत, मी नाही देत कोणाला!’ मग काय करायचे? तर, महिना सुरू झाल्यावर अगोदरच काही ठरावीक रक्कम एका सामायिक ठिकाणी सुरक्षित ठेवणे. इथे डिजिटल नोंदवहीत एक सुधारणा करायची, तिला थोडे ‘स्मार्ट’ बनवायचे. समजा अ‍ॅलिस, बॉब, चार्ली व डीलन यांनी मिळून सुरुवातीलाच प्रत्येकी एक हजार रुपये सामायिक खात्यात टाकले. यामुळे आपल्या पहिल्या चार नोंदी कशा दिसतील ते चित्राकृती-४ मध्ये पाहा. आता आपली डिजिटल नोंदवही थोडी स्मार्ट झाली आहे. ती प्रत्येकाचा खर्च मोजत राहाते आणि ज्या क्षणी कोणी आपल्या जमा रकमेपेक्षा अधिक खर्च करू पाहील किंवा त्यापेक्षा अधिक उसने घेईल, तेव्हा आपली डिजिटल नोंदवही ती नोंद होऊच देणार नाही. यामुळे कोणी नसलेले पैसे कोणास द्यायचे वचन वगैरे देणार नाही. म्हणजे, प्रत्येकाने सुरुवातीला काही रक्कम जमा केली तरच त्याला पुढील व्यवहार करता येतील.

तसेच बिटकॉइनच्या दुनियेत पाय ठेवताना स्वत: काही बिटकॉइन कमावणे किंवा विकत घेणे गरजेचे आहे आणि ती डिजिटल नोंदवहीच तुमचा सगळा खर्च बघत राहील.

आतापर्यंत आपण काही समस्या सोडवल्या. पण आपण ही डिजिटल नोंदवही ज्या संकेतस्थळावर ठेवली आहे, त्यावर कोणा एकाचाच ताबा असल्यास धोका असेलच की! त्याला कसे सामोरे जावे? किंवा कोणत्याही बँकेशिवाय व्यवहारांबद्दल असलेले मतभेद कसे मिटवायचे? या समस्या आणि त्या सोडवून मिळणाऱ्या मार्गदर्शक सूचना पुढील लेखात पाहू!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io