गौरव सोमवंशी
ठरावीक काळात झालेल्या व्यवहारांना माहितीबद्ध करणे म्हणजे ‘ब्लॉक’. या ‘ब्लॉक’ची साखळी कशी गुंफली जाते?
अॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन! या चौघांचा परिचय आपल्याला ‘बिटकॉइनची मार्गदर्शक नोंदवही’ या लेखात (२८ मे) झाला. जर या चौघांमधील आर्थिक व्यवहारांची नोंदवही आपल्याला सुरळीत चालवता आली, तर आपण हाच उपाय चौघांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जगासाठी योजू शकतो. बिटकॉइन म्हणजे सरतेशेवटी एक जागतिक नोंदवहीच आहे. ते सारे कसे घडते, हे आजच्या लेखात पाहू या..
अॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन या चौघांकडे स्वत:ची डिजिटल स्वाक्षरी आहे. याचा फायदा असा होतो की, व्यवहार हा त्याच व्यक्तीने केला आहे आणि केलेल्या व्यवहारात नंतर मधेच कुठे बदल घडवून आणलेला नाही, याची हमी मिळते. शिवाय आपण ही डिजिटल नोंदवही कोण्या एकाकडे किंवा एकाच ठिकाणी ठेवलेली नसून, प्रत्येकाकडे त्याची प्रत ठेवली आहे. ती अनेक ठिकाणी ठेवल्यामुळे तिला आपण ‘वितरित’ (डिस्ट्रिब्युटेड) म्हणतो; आणि कोण्या एकाकडेच तिचे सर्व नियंत्रण नाही म्हणून तिला आपण ‘विकेंद्रित’ही (डिसेन्ट्रलाइज्ड) म्हणतो. बिटकॉइनचे तांत्रिक वर्णन हे ‘वितरित विकेंद्रित नोंदवही’ असेच केले जाते.
पण इथे काहींना प्रश्न पडला असेल, की जर कोणा एकाकडे नियंत्रण नाही आणि ही डिजिटल नोंदवही प्रत्येकाकडे ठेवली आहे, तर एका प्रतीत केलेला बदल हा तसाच्या तसा दुसऱ्या प्रतीत दिसायला हवा ना? नाही तर चार्लीची नोंदवही जे दाखवेल, त्यापेक्षा वेगळेच काही बॉबची नोंदवही दाखवेल! तसेच यामध्ये कोणा एकाला कुठले विशेषाधिकारसुद्धा नाहीत. इथे ही समस्या आपल्यासमोर या चौघांच्या व्यवहारांतच उभी ठाकली आहे; मग संपूर्ण जगासाठी एकच जागतिक डिजिटल नोंदवही, म्हणजेच आभासी चलन, कसे बनवायचे? हाच तर ‘बिटकॉइन’चा मूळ उद्देश आहे! मागील तीन लेखांत (जेव्हापासून ंआपण अॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन यांचे उदाहरण पाहायला सुरू केली तेव्हापासून) समजून घेतलेल्या संकल्पना वापरूनच आपण पुढे जाणार आहोत.
समजा, काही वेळात- उदा. एका तासात अॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार घडतो. जसे की, बॉबने चार्लीला १०० रु. आणि डीलनने अॅलिसला ५० रु. दिले. बॉब आणि डीलन आपल्या डिजिटल स्वाक्षरीने आपापले आर्थिक व्यवहार स्वत:च्या नोंदवहीत लिहितात, आणि एकाच वेळी इतर तिघांकडे ते प्रसारित करतात. समोरच्याची ओळख माहीत नसतानासुद्धा कुठलाही संदेश प्रसारित करून त्याची साखळी कशी बनवतात, हे आपण एका कैद्याच्या उदाहरणाने पाहिले (‘संदेशांची साखळी’, ६ मे) होते. त्याप्रमाणेच वरील दोन आर्थिक व्यवहारांचे संदेश सर्वाकडे प्रसारित होतात.
आता आकृती-१ पाहा. सर्वात आधी या व्यवहारांना एकत्र जोडून ते स्वायत्त, अद्वितीय बनावेत म्हणून त्यांना क्रम दिला जातो. पहिलाच व्यवहार असल्यामुळे आपण त्यास क्रमांक ‘१’ दिला आहे. आकृती- १ मध्ये आणखी कोणती माहिती दिसते आहे? तर, झालेल्या इतर व्यवहारांची माहिती. आकृती- १ मध्ये तिसऱ्या माहितीचा डब्बा म्हणजे ‘मागील हॅश’ असं लिहिलं आहे. पण इथे मागील कोणताच हॅश नाही, म्हणून ती माहिती भरायची गरज नाही. मग आता काय होते? आपण मागील लेखात (‘चार शून्य..बिटकॉइन’, ११ जून) पाहिल्याप्रमाणे एक ‘नॉन्स नंबर’ शोधण्याची स्पर्धा सुरू होते. हा ‘नॉन्स नंबर’ शोधून त्यास आधीच्या माहितीसोबत (व्यवहार क्रमांक, व्यवहारांची माहिती, मागील हॅश) जोडून एक असा हॅश निर्माण होईल, ज्याची सुरुवात चार शून्यांनी होईल. आकृती- १ मध्ये दाखवले आहे की, ‘११२१९९६’ ही संख्या ‘नॉन्स नंबर’ आहे. ही संख्या वरील माहितीसोबत जोडली आणि या सगळ्यांचा एक हॅश आउटपुट निर्माण केला, तर त्या आउटपुटमध्ये पहिले चार आकडे हे शून्य येतील (पाहा : आकृती- १ मधील शेवटचा माहितीचा तुकडा, ‘ब्लॉक हॅश’ हा ००००२०५१९९० आहे). हे होताना, व्यवहाराची माहिती वैध तर आहे ना, म्हणजे कोणी स्वत:कडे नसलेले पैसे देण्याची नोंद करत नाहीत ना, हेदेखील यादरम्यान तपासले जाते. यासाठी त्या व्यक्तीच्या पहिल्या व्यवहारापासून आजपर्यंत त्याने/तिने किती पैसे ओतले आणि किती खर्चले या साऱ्यांची पडताळणी आपोआप केली जाते.
तर.. व्यवहाराची माहिती प्रसारित केल्यानंतर प्रत्येक जण तो ‘नॉन्स नंबर’ शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. ज्या कोणाला तो मिळतो (गणिताचा नियम असा की, ती संख्या शोधून काढायची प्रत्येकाला समान संधी आहे), ती व्यक्ती तो इतरांना सांगते. मग इतरांनी त्याची वैधता पडताळून पाहिली, की लगेच ‘नॉन्स नंबर’ आणि त्यामधून आलेला विशेष ‘ब्लॉक हॅश’ मिळून आपल्या पहिल्या ‘ब्लॉक’चा जन्म होतो! याला ‘जेनेसिस ब्लॉक’ म्हणतात, जो ‘बिटकॉइन’मध्ये ३ जानेवारी २००९ रोजी बनला होता. अजून आपण ‘ब्लॉकचेन’पर्यंत आलेलो नाहीत, हा नुसता एक ‘ब्लॉक’ झाला. मात्र, ‘ब्लॉक’ बनल्या-बनल्या ज्याने कोणी तो ‘नॉन्स नंबर’ शोधून काढला, त्यास काही ‘बिटकॉइन’ किंवा नोंदवहीचे चलन बक्षीस म्हणून दिले जाते. हे चलन कोठून येते? तर गणिताच्या खाणीतून- जिच्यावर कोणाचीच मालकी नाही. एकदा का हा ‘ब्लॉक’ बनला, की त्याची नोंद प्रत्येक जण आपापल्या नोंदवहीत करून घेतो. म्हणजे प्रत्येकाची डिजिटल नोंदवही ही प्रत्येक वेळी सारखीच असेल.
याचा अर्थ, त्या ठरावीक कालावधीत झालेल्या व्यवहारांना आपण ‘ब्लॉक’मध्ये बद्ध केले. पण व्यवहार थांबतात कुठे? ते तर होतच राहतील. आता आपण येऊ दुसऱ्या आकृतीकडे. इथे आपण ‘ब्लॉक’पासून ‘ब्लॉकचेन’कडे जाऊ या. आकृती- २ मध्ये दाखवले आहे की, पहिला ‘ब्लॉक’ बनलेला आहे. आपल्याला ‘चार्लीने डीलनला २०० रु. दिले’ ही माहिती ‘ब्लॉक’मध्ये बद्ध करायची आहे. आकृती- २ मध्ये मधल्या ‘ब्लॉक’कडे लक्ष द्या. याचा क्रमांक आपोआप ‘२’ असेल, म्हणजे याला आपण अद्वितीय, स्वायत्त केले. व्यवहार कोणता झाला? तर ‘चार्लीने डीलनला २०० रु. दिले’ हा. आता आपल्याकडे मागील हॅश आहे, म्हणजे पहिल्या ‘ब्लॉक’चा ‘ब्लॉक हॅश’. त्याला आपण इनपुट म्हणून घेतले. ही माहिती आता आधीसारखीच प्रसारित झाली आणि सगळी मंडळी ‘नॉन्स नंबर’ शोधण्यात मग्न झाली. म्हणजे अशी संख्या जिला ‘ब्लॉक’मधल्या माहितीसोबत जोडले की, पहिले चार आकडे शून्य असलेला ब्लॉकचा हॅश तयार होईल. ज्या कोणाला तसा ‘नॉन्स नंबर’ मिळेल त्यास डिजिटल नोंदवहीचे चलन बक्षीस म्हणून दिले जाईल.
आता आकृती- २ मध्ये तिसरा ‘ब्लॉक’ कसा बनला असेल, हे नीट निरखून पाहा. घटनाक्रम समजून घ्या. पहिले काय होते? तर, प्रत्येक नवीन ‘ब्लॉक’मध्ये मागील ‘ब्लॉक’चा ‘ब्लॉक हॅश’ हा एक इनपुट म्हणून दिला जातो. यातून एक साखळी तयार होते, ज्यामध्ये प्रत्येक ‘ब्लॉक’चे ‘ब्लॉक हॅश’ हे चार शून्यांनी सुरू होईल. ‘ब्लॉक’ची ‘ब्लॉकचेन’ अशी बनते! एकदा का ‘चेन’ बनली, की नंतर यातील कोणत्याही ‘ब्लॉक’मध्ये कोणी चुकून वा मुद्दामहून काही खाडाखोड केली अथवा माहिती बदलली तर त्या ‘ब्लॉक’च्या ‘नॉन्स नंबर’ला अर्थ उरणार नाही. कारण बदललेल्या माहितीचा कोणता तरी नवीन ‘नॉन्स नंबर’ असेल! इतकेच नाही, तर या बदललेल्या माहितीचा ‘ब्लॉक हॅश’ हा त्यापुढच्या ‘ब्लॉक’मध्ये इनपुट म्हणून असल्याने पुढचा ‘ब्लॉक’सुद्धा बदलून जाईल. त्यामुळे त्याच्या पुढचादेखील. असे करत करत सगळी साखळी त्या ‘ब्लॉक’च्या पुढे अशी दिसेल की, कोणताच ‘ब्लॉक हॅश’ हा चार शून्यांनी सुरू झालेला नसेल.. आणि त्यामुळे खाडाखोड कुठे झाली आहे, ते सगळ्यांनाच कळेल!
इथवर आपण ‘ब्लॉक’ आणि ‘ब्लॉकचेन’ हे दोन्ही पाहिले. मात्र ती खाडाखोड कशी पकडली जाते, हे पुढील लेखात पाहू..
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.
ईमेल : gaurav@emertech.io