गौरव सोमवंशी

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि वस्तुजाल (इंटरनेट ऑफ थिंग्स) या नवतंत्रज्ञानांशी समन्वय साधल्याने अभूतपूर्व शक्यता निर्माण होऊ शकतात. त्या कशा?

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
electing Donald Trump as the President of the United States for the second time
दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत

‘उदयोन्मुख तंत्रज्ञान (ईमर्जिग टेक्नोलॉजी)’ या श्रेणीत अनेक आशादायक तंत्रज्ञानांचा समावेश होतो. उदाहरणार्थ- कृत्रिम प्रज्ञा (एआय), वस्तुजाल अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), रोबोटिक्स, पुंजसंगणन, आभासी वास्तव, ३-डी प्रिंटिंग आणि अर्थात ब्लॉकचेन तंत्रज्ञानही! ज्या प्रमाणात इंटरनेटने आपल्या जीवनात तंत्रक्रांती घडवून आणली, त्याच किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असणारे म्हणून यापैकी तीन तंत्रज्ञानांकडे पाहिले जाते : कृत्रिम प्रज्ञा, वस्तुजाल आणि ब्लॉकचेन! या तिघांचा उगम जरी स्वतंत्रपणे झाला असला, तरी भविष्यात यांच्या अभिसरणातून काही अभूतपूर्व शक्यता निर्माण होऊ शकतात. पुढील काही लेखांमध्ये आपण ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे कोणकोणत्या क्षेत्रांत उपयोग होतात वा होऊ शकतात हे पाहणार आहोतच, परंतु त्याआधी ब्लॉकचेनचे इतर तंत्रज्ञानांबरोबर होणारे संयोजन समजून घेणेसुद्धा गरजेचे आहे.

कारण ब्लॉकचेन हे काही सगळ्याच संगणकशास्त्राला पर्याय नाही. तर ब्लॉकचेन हे केवळ त्यात अत्यंत महत्त्वाचे योगदान देण्यास आकाराला आले आहे. जसे इंटरनेटमुळे संगणकशास्त्र प्रगल्भ झाले, तसेच काहीसे ब्लॉकचेनच्या बाबतीतसुद्धा आहे. इंटरनेट आणि वैयक्तिक वापरासाठी संगणकनिर्मिती या दोन्ही क्षेत्रांची उत्क्रांती ही स्वतंत्रपणे झाली असली, तरी जेव्हा योग्य वेळ होती तेव्हा दोघांचे संयोजन होऊन ‘स्मार्टफोन’ने जन्म घेतला. अगदी असेच काहीसे येत्या काळात ब्लॉकचेन, कृत्रिम प्रज्ञा आणि वस्तुजाल या तंत्रज्ञानांबाबत होईल हे स्पष्ट दिसत आहे.

ते कसे? ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान माहिती साठवून त्या माहितीची देवाण-घेवाण कशी होईल हे नियमबद्धरीत्या सुरळीत करू शकते. पण माहिती येणार कुठून? प्रत्येक वेळेस ब्लॉकचेन हे माणसांमधील व्यवहार नोंदवायचे काम करेल असे नाही. आपण त्यामध्ये कोणतीही माहिती ठेवू शकतो हे खरे; पण माहितीचा स्रोत हे इतर संगणक किंवा यंत्रसुद्धा असू शकतात. हे काम वस्तुजाल अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्स करू शकते. म्हणजे माहिती आली आणि त्याला सुरक्षित पद्धतीने आपण साठवूनसुद्धा ठेवले. मग या माहितीचे करायचे काय? त्यावरून काही परिणामकारक निष्कर्ष काढू शकलो अथवा निर्णय घेऊ शकलो तर ते उत्तमच. इथे कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान कामी येते. म्हणजे या तीन तंत्रज्ञानांना मिळून एक जीव तयार होतो असे समजण्यास हरकत नाही. ज्ञानेंद्रियांतून जशी माहिती मिळते, तसेच काम वस्तुजालातील यंत्रे करू शकतात. ही माहिती स्मृतीत कायमस्वरूपी सुरक्षित साठवण्याचे आणि या माहितीवर कोणत्या नियमांनी प्रक्रिया करायची, हे ब्लॉकचेन ठरवू शकते. या विश्वासार्ह माहितीच्या आधारावर काही तार्किक निष्कर्ष काढणे वा निर्णय घेणे हे काम कृत्रिम प्रज्ञा करू शकते.

ओरॅकलचे आव्हान

ब्लॉकचेन तंत्रज्ञानात ब्लॉकमध्ये कोणतीही माहिती साठवून ठेवताना अगोदर ती माहिती बरोबर आहे की नाही याची पडताळणी करणे हे मोठे आव्हानात्मक असते. एक चलन म्हणून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असेल तर हे करणे सोपे आहे; कारण आपण सुरुवातीपासून सगळे व्यवहार बघत आलेलो असतो. परंतु समजा, मला आता ब्लॉकचेन हे एक चलन म्हणून न वापरता, कृषी क्षेत्रात ‘शेतापासून ग्राहकापर्यंत’ अशी मूल्यसाखळी एका ब्लॉकचेनवर रेखाटायची आहे. त्यासाठी ब्लॉकचेनमध्ये आपण नक्की कापणी किती झाली आहे, त्यामध्ये एकूण अन्नाची नासाडी किती झाली आणि तत्सम इतर अनेक गोष्टींची माहिती टाकू. मात्र, या माहितीची पडताळणी झाली नाही तर ब्लॉकचेनमध्ये चुकीची माहिती साठवली जाईल. या आव्हानाला ब्लॉकचेनच्या दुनियेत ‘ओरॅकलचे आव्हान’ असे म्हणतात. ओरॅकल म्हणजे माहितीचा स्रोत.

वस्तुजाल आणि कृत्रिम प्रज्ञा

इथे वस्तुजाल कामी येऊ शकते. म्हणजे असे यंत्र जे बाह्य़ जगतातील कोणतीही माहिती घेऊन इंटरनेटद्वारे पुढे पाठवते. उदाहरणार्थ, तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तापमापकामध्ये काही बदल करून अशी यंत्रणा केली की, ते आता मोजलेल्या तापमानाची माहिती इंटरनेटद्वारे फॅमिली डॉक्टरच्या मोबाइलवर पाठवत राहील. असा तापमापक मग वस्तुजालात समाविष्ट होईल. अशा प्रकारच्या विविध यंत्रांनी ‘स्मार्ट-घर’ बनवण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत. अशा घरात फ्रिजमध्ये दूध संपत आले आहे हे वस्तुजालाच्या ध्यानात येईल आणि पूर्वनियोजित प्रोग्रामला अनुसरून जवळच्या दुकानदारास दूध घरी पाठवण्याची सूचना दिली जाईल! अशा वस्तुजालाची इतक्या झपाटय़ाने वाढ होत आहे की दर सेकंदाला १२७ वस्तुजाल यंत्रे इंटरनेटशी जोडली जाताहेत आणि २०३० पर्यंत अशी १,२५,००० कोटी यंत्रे जगभर इंटरनेटशी जोडली जातील.

पण ही सगळे यंत्रे केंद्रित पद्धतीने चालवली तर त्यांस अनेक मर्यादा येतात. केंद्रित पद्धतीने काम चालवणे धोकादायक असतेच; कारण एकाच ठिकाणी हल्ला केला की सगळीच यंत्रणा ठप्प. अशा वेळेस ब्लॉकचेन कामी येऊ शकते. यात प्रत्येक यंत्राला एक स्वतंत्र ओळख दिली जाईल आणि एका सामायिक ब्लॉकचेन तंत्रव्यासपीठावर सर्व यंत्रे माहिती पाठवत राहतील. कोणती माहिती कोणत्या पद्धतीने वापरायची आहे आणि याचे हक्क कोणाकोणाला आहेत, हे सगळे नियम ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’द्वारे आधीच आखलेले असतील. याने दोन्ही तंत्रज्ञानांना एकमेकांचा फायदा होईल. कृषी मूल्यसाखळीतील उदाहरणात आपण हळूहळू करीत माहिती घेण्याचे माध्यम म्हणून वस्तुजाल यंत्रे वापरू शकतो. निकोलस विण्डपासिंजर यांनी त्यांच्या ‘डिजिटाइझ ऑर डाय’ या पुस्तकात असे ठामपणे सांगितले आहे की, वस्तुजाल हे झपाटय़ाने मोठे होण्यासाठी त्यास ब्लॉकचेनची जोड लागेलच.

आता येऊ या कृत्रिम प्रज्ञेकडे. जी कामे अनेक वेळा मानवी बुद्धीवर अवलंबून असतात, ती संगणकांना चांगल्या पद्धतीने करायला शिकवणे, हे या तंत्रज्ञानात अभिप्रेत आहे. पण संगणक हे शिकतील कुठून? तर.. आपण त्यांना माहितीच्या भल्यामोठय़ा साठय़ाचा पुरवठा करतो; त्याचा ‘अभ्यास’ करून कृत्रिम प्रज्ञा साध्य होते. उदा. एका प्रोग्रामला तुम्ही मानवी चेहऱ्यांची लाखो छायाचित्रे पुरवली आणि त्यांचा अभ्यास करायला सांगितले, तर तो प्रोग्राम स्वत:हून मानवी चेहरा ओळखण्यास शिकेल. जर कृत्रिम प्रज्ञा प्रगल्भ करण्यासाठी आपण पूर्णपणे माहितीवर निर्भर असू, तर त्या माहितीची विश्वासार्हता आणि दर्जा महत्त्वाचा ठरेल. इथे ब्लॉकचेनद्वारे साठवलेली माहिती नक्कीच उपयोगी पडेल. माहितीवर सध्या बडय़ा कंपन्यांची मक्तेदारी आहे. त्यात विकेंद्रीकरण करून सर्वाना समान संधी मिळवणेसुद्धा शक्य होऊ शकते. कृत्रिम प्रज्ञा ही ब्लॉकचेनमध्ये कोणती माहिती चालली आहे यावरही लक्ष देऊ शकते. जर एखादे वस्तुजाल यंत्र बिघडल्याने ते ब्लॉकचेनमध्ये काही चित्रविचित्र माहिती पुरवत असेल, तर कृत्रिम प्रज्ञा ते ओळखून सावध करू शकते. इतकेच नव्हे, तर मानवी चुकांमुळे उद्भवू शकणारे धोकेही कृत्रिम प्रज्ञेद्वारे आधीच ओळखता येतील.

या वर्षी एप्रिलमध्ये ‘युरोपियन युनियन ब्लॉकचेन ऑब्झव्‍‌र्हेटरी अ‍ॅण्ड फोरम’ने प्रकाशित केलेल्या अहवालातही वरील तीन तंत्रज्ञानांच्या अभिसरणाची शक्यता अधोरेखित केली आहे. त्यात दिलेल्या अनेक उदाहरणांत मुख्यत: ‘स्मार्ट सिटी’चा समावेश आहे. त्यात वैद्यकीय मदतीपासून कचरा व्यवस्थापनापर्यंत या तीन तंत्रज्ञानांच्या संयोजनातून कामे पार पाडता येतील.

तसेच, आणखी एक तंत्रज्ञान जिथे ब्लॉकचेनचे संयोजन महत्त्वाचे ठरेल, ते म्हणजे- क्लाऊड कम्प्युटिंग! म्हणजे तुम्हाला स्वत:ची ब्लॉकचेन यंत्रणा उभारायची असेल, तर ती तुम्ही क्लाऊड वापरून ते करू शकता. ओरॅकल, अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि अनेक क्लाऊड सेवा पुरविणाऱ्यांनी खास ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला पूरक होईल अशा अनेक सेवा बाजारात आणल्या आहेत.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io