गौरव सोमवंशी

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने वापरलेल्या ‘एनिग्मा मशीन’चे रहस्य उलगडून युद्धाचा निकाल हिटलरविरोधात लागण्यात सिंहाचा वाटा असलेल्या अ‍ॅलन टय़ुरिंग यांची ओळख ‘संगणकशास्त्राचे जनक’ अशी आहे. त्यांनी मांडलेल्या दोन संकल्पनांचा संबंध व्हिटालिक ब्युटेरिनच्या ‘ईथिरियम’ या तांत्रिक व्यासपीठाशी कसा आहे?

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक

‘ईथिरियम’ आणि ‘बिटकॉइन’ यांच्यामधील साम्य किंवा फरक समजून घेताना त्यांना उदयास आणणाऱ्या संशोधकांचा दृष्टिकोन जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सातोशी नाकामोटो आणि व्हिटालिक ब्युटेरिन यांची काही विधाने पाहू.

११ फेब्रुवारी २००९ रोजी एका संकेतस्थळावर सातोशी नाकामोटो यांनी लिहिले होते की, ‘मी एका मुक्त आणि सर्वाना वापरता येईल अशा इलेक्ट्रॉनिक कॅश प्रणालीवर काम करतोय, जी पूर्णपणे विकेंद्रित आहे. सध्याच्या चलनात आणि पैशाच्या प्रणालीत अनेक त्रुटी आहेत, त्यापैकी प्रामुख्याने एक ही की- यात व्यवहार करणाऱ्यांना तिसऱ्या व्यक्ती वा संस्थेवर ‘विश्वास’ ठेवावा लागतो. इतिहास सांगतो की, या केंद्रीय संस्थांनी वेळोवेळी सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. बँकांबाबत आपल्याला विश्वास असतो की, आपले पैसे तिथे सुरक्षित राहतील; पण याच बँका हाच पैसा अतिशय बेजबाबदारपणे वाटून बुडवतात.’ ३१ ऑक्टोबर २००८ रोजी ‘बिटकॉइन’ची संकल्पना पहिल्यांदाच शब्दबद्ध करून जगासमोर मांडताना नाकामोटोने लिहिले आहे की, ‘ही संकल्पना इलेक्ट्रॉनिक पैशाचे व्यवहार कोणत्याही इतर व्यक्ती वा संस्थेवर विश्वास न ठेवता कशी राबवता येईल याकरिता प्रस्तावित केली आहे.’ हे सांगताना नाकामोटो तोच विचार जगासमोर मांडत होता जो ‘सायफरपंक’ चळवळीद्वारे अनेक दिग्गज आधी मांडून गेले होते (पाहा : ‘सातोशी नाकामोटो कोण आहे?’, १२ मार्च २०२०); नाकामोटोने फक्त ते व्यावहारिकरीत्या करून दाखवले होते. हा विचार प्रत्यक्षात उतरवताना नाकामोटोने काही बाबी नव्याने घडवल्या, तर काही आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण उपयोग केला.. आणि ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान जन्मास आले!

व्हिटालिक ब्युटेरिन या तरुणाने २०११ साली वयाच्या १७ व्या वर्षी ‘बिटकॉइन’विषयी लिहायला सुरुवात केली. चलन प्रणालीत घडू पाहणाऱ्या या क्रांतीबरोबरच ब्युटेरिनला ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या आणखी व्यापक वापराच्या शक्यता दिसू लागल्या. ब्युटेरिनच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘आजपर्यंतचे बहुतांश तंत्रज्ञान अमलात आल्याने वेळोवेळी सामान्य काम करणाऱ्या वा खालील स्तरावरील कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा आली. पण ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे थेट केंद्रस्थानी किंवा उच्चपदावर स्थित असलेल्या जागांनाच स्वयंचलित करून बंद करू शकते. म्हणजे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे टॅक्सीचालकाला नोकरीवरून न काढता, संपूर्ण ‘उबर’सारखी कंपनीच नष्ट करू शकते; जेणेकरून टॅक्सीचालक थेट ग्राहकाशी व्यवहार करू शकेल.’ इथे ब्युटेरिनने फक्त उदाहरण म्हणून ‘उबर’चे नाव घेतले आहे; पण इतर कोणत्याही क्षेत्रात जिथे विश्वासाचा अभाव आहे किंवा शक्ती-अधिकारांचे असंतुलन आहे अथवा जिथे मध्यस्थांना बाजूला सारून अधिक कार्यक्षमता वा प्रामाणिक मोबदला दिला जाऊ शकतो, तिथे तिथे ‘ब्लॉकचेन’चा वापर होऊ शकतो, असे त्यास आढळून आले.

परंतु हे करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे ‘ब्लॉकचेन’ पहिल्यापासून बनवावे का? कारण ‘बिटकॉइन’ हा पैसा वा चलनाला एक संपूर्ण पर्याय असला आणि त्यामधील तंत्रज्ञान हे सर्वासाठी उपलब्ध असले, तरीसुद्धा इतर काही काम करताना हे तंत्रज्ञान एक तर कमी पडेल किंवा काही ठिकाणी तर अशक्यच असेल. याबाबत ब्युटेरिनने विचार केला की, विविध क्षेत्रांत ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान कसे वापरावे याचा विचार करण्यापेक्षा, ज्याचा वापर करून कोणीही, अगदी कसल्याही प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन बनवू शकतील असे तांत्रिक व्यासपीठ आपण घडवले तर ते खऱ्या अर्थाने क्रांतिकारी ठरेल. म्हणजे एका अर्थी मासे पकडून न देता फक्त मासे पकडण्याचे साहित्य-साधन पुरवणे.. आणि यातून ‘ईथिरियम’चा जन्म झाला!

त्याविषयी जाणून घेताना, अ‍ॅलन टय़रिंग यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या दोन संकल्पना पाहू. ‘संगणकशास्त्राचे जनक’ अशी अ‍ॅलन टय़ुरिंग यांची ओळख आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने गोपनीय पद्धतीने प्रचंड प्रमाणात वापरलेल्या ‘एनिग्मा मशीन’चे रहस्य उलगडून युद्धाचा निकाल हिटलरच्या विरोधात लागण्यात या टय़ुरिंग यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘कधी कधी ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नसतात, तीच मंडळी कल्पनातीत गोष्टी घडवून जातात,’ हे टय़ुरिंग यांचेच अजरामर वाक्य त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने अक्षरश: खरे ठरवले. आधुनिक संगणकशास्त्राला त्यांनी मांडलेल्या संकल्पनांचीच जोड आहे. त्या संकल्पनांचा ‘ईथिरियम’बरोबर कसा संबंध आहे, ते पाहू या..

(१) टय़ुरिंग कम्प्लिट भाषा : संगणकशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे संगणक प्रणालीची भाषा ही ‘टय़ुरिंग कम्प्लिट’ आहे की नाही हे पाहणे. थोडक्यात, जर त्या संगणक प्रणालीच्या भाषेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रोग्राम वा अ‍ॅप्लिकेशन बनवणे शक्य असेल, तर त्या भाषेस  ‘टय़ुरिंग कम्प्लिट’ म्हटले जाते. ‘बिटकॉइन’मध्ये वापरली जाणारी भाषा ही फक्त काही कामासाठीच उपयुक्त असून अनेक ठिकाणी कमी पडते. हे असे आहे याचे कारण ‘बिटकॉइन’चा उद्देश हा पैसा व चलनास विकेंद्रित करण्यापुरताच मर्यादित होता. म्हणून ब्युटेरिनने एक ‘टय़ुरिंग कम्प्लिट’ भाषा आखली, जिचे नाव ‘सॉलिडिटी’ असे आहे. तिचा वापर करून कोणत्याही प्रकारचे प्रोग्राम वा अ‍ॅप्लिकेशन बनवता येते. मग तो एखाद्या केंद्रित यंत्रणेला बाजूला सारणारा मुक्त प्रोग्राम असो अथवा उत्तम नोंदी करणाऱ्यांना मोबदला मिळणारे समाजमाध्यम असो.

(२) टय़ुरिंग हॉल्टिंग प्रॉब्लेम : समजा कोणी चुकून किंवा काही गैरहेतूंनी असा एक संगणकीय प्रोग्राम लिहिला जो अविरत सुरूच राहील. म्हणजे त्याला काही अंतच नसेल आणि तुमचा संगणक तो सोडवण्यातच अनंत काळापर्यंत गुंतलेला राहील. म्हणजे ही प्रक्रिया ‘हॉल्ट’च होणार नाही, कधी थांबणारच नाही. असे करणे अवघड नाही. पण असे काही झाल्यास त्यासंदर्भात काही उपाययोजना तयार ठेवणे हे मात्र नक्कीच अवघड आहे. १९३६ मध्येच टय़ुरिंग यांनी हे सिद्ध केले होते की, प्रत्येक ठिकाणी वापरून समस्या सोडवता येईल अशी एखादी विशिष्ट कार्यप्रणाली बनवता येणार नाही; ती प्रत्येक उदाहरणासाठी वेगळीच आखावी लागेल.

त्यामुळे ज्यात कोणी कसलेही प्रोग्राम वा अ‍ॅप्लिकेशन बनवू शकेल आणि हे करण्याचे अधिकार व स्वातंत्र्य प्रत्येकाला असेल असा सार्वत्रिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म बनवताना, वरील ‘हॉल्टिंग प्रॉब्लेम’ला कसे सोडवावे हा प्रश्न व्हिटालिक ब्युटेरिनपुढे होताच. ‘बिटकॉइन’मध्ये ही समस्या नाहीच, कारण त्यामध्ये इतर प्रोग्राम बनवता येतील यावरच मर्यादा आहेत. मग प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देऊ इच्छिणाऱ्या ‘ईथिरियम’बद्दल हा प्रश्न कसा सोडवायचा? कारण स्वातंत्र्य म्हटले की त्यात चुका किंवा खोडकरवृत्तीसुद्धा आलीच. त्यामुळे ‘टय़ुरिंग हॉल्टिंग प्रॉब्लेम’ला सामोरे जाण्यासाठी ब्युटेरिनने आपल्या ‘ईथिरियम’च्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्ममध्ये एक योजना आखली. त्याने ‘ईथर’ नावाचे एक मूळ टोकन तयार केले, जे कोणताही प्रोग्राम चालवण्यासाठी वापरावे लागेलच. म्हणजे गाडी चालण्यासाठी जसा इंधनाचा उपयोग होतो, तसाच उपयोग ‘ईथर’चा होईल. ‘ईथर’ जितके असेल तितकेच प्रोग्रामिंग होईल. ‘ईथर’ कधीच अमर्यादित नसेल, कारण ते तुम्हाला कमवावे लागेल. ब्युटेरिनच्या या अतिशय उत्तम व कार्यक्षम युक्तीने ‘टय़ुरिंग हॉल्टिंग प्रॉब्लेम’ तर सुटलाच, पण ‘ईथर’ला एक स्वतंत्र मूल्य आपोआप मिळाले. वयाच्या १९ व्या वर्षीच ब्युटेरिनने कोटय़वधी रुपये कमावले, ते ‘ईथर’ची विक्री करूनच. ही विक्री ‘ईथर’ नावाचे टोकन प्रत्यक्षात बनण्याआधीच केली होती. यास ‘प्री-सेल्स’ असे म्हणतात. याचे मूल्य प्रथमदर्शनीच दिसले म्हणून त्यात अनेकांनी गुंतवणूक केली आहे.

पुढील लेखात ‘ईथिरियम’बाबत आणखी काही संकल्पना समजून घेऊ. त्या समजून घेताना, एक सार्वत्रिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म बनवताना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, याचा उलगडाही आपोआप होईलच!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io

Story img Loader