गौरव सोमवंशी
आफ्रिकेत हिऱ्यांच्या खाणी सापडू लागल्यावर तेथील राष्ट्रांना संपत्तीनिर्माणाचे साधन गवसले. पण शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर रसद थांबलेल्या अतिरेकी संघटनांनी हिरे व्यापारावर ताबा मिळवला अन् त्यास रक्तरंजित स्वरूप मिळाले. अशा व्यापारातील गैरप्रकार आणि त्रुटी दूर करण्यास ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येऊ लागला आहे..
नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान असेल तर आर्थिक भरभराट होणे हे साहजिक ठरते. पण अनेकदा नेमके याचमुळे मोठय़ा संकटांना आमंत्रण मिळते. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील हिऱ्यांच्या खाणी. आफ्रिकेत हिऱ्यांचा मुबलक साठा आहे हे एकोणिसाव्या शतकातच कळाले होते. तिथे एका शेतात काही हिरे सापडले, ते शेत डी बीअर या डच बंधूंच्या मालकीचे होते. काही उद्योजकांनी त्यांच्याकडून ते शेत काही हजारांत विकत घेतले आणि डी बीअर बंधू शेत विकून निघून गेले. पण उद्योजकांनी त्यांच्या नावाने (डी बीअर्स ग्रुप) कंपनी सुरू करून त्या शेतातून कोटय़वधींचे हिरे पुढील काळात खणून काढले. जागतिक हिरे व्यापारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी डी बीअर्स समूहाने हिऱ्यांच्या नव्या खाणी विकत घेण्यास सुरुवात केली. एका टप्प्यावर जगातील ९० टक्के हिरेपुरवठा डी बीअर्स समूहाच्या ताब्यात होता. हिऱ्यांच्या मागणीवरही आपला प्रभाव राहावा म्हणून डी बीअर्सने अमेरिका आणि युरोपात जोरदार जाहिरात मोहीमही सुरू केली. ‘अ डायमण्ड इज फॉरेव्हर’ हे त्यांचे घोषवाक्य तर जाहिरात क्षेत्रात नावाजले गेले. या साऱ्यामुळे हिऱ्यांचा दर अचानक अनेक पटींनी वाढला आणि पुरवठा तसेच मागणीवरही वर्चस्व असल्यामुळे डी बीअर्सचीही वाढ झाली.
पण हिरे फक्त खाणीतच मिळतात असे नाही. अनेकदा ते ज्वालामुखीच्या नळ्यांमधूनही जमिनीवर येतात आणि अनेक उथळ पाण्याच्या स्रोतांमध्ये आढळतात. असेच हिरे आफ्रिकेत अनेक ठिकाणी आढळू लागले. सिएरा लियोन, अँगोला, काँगो अशा आफ्रिकी देशांत भरमसाट हिरे मिळू लागले आणि अनेक दशके चाललेले यादवी युद्ध सुरू झाले. सिएरा लियोनसारख्या देशांनी आधी सरकारी मालकीच्या राष्ट्रीय कंपन्या स्थापन करून हिऱ्यांचा व्यवहार करून देशासाठी भरपूर धन कमावले. तेच पुढे शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवण्यात आले. पण ही आदर्श अवस्था फार काळ टिकली नाही. शीतयुद्धात जागतिक महासत्तांच्या आधाराने उदय पावलेल्या अतिरेकी संघटनांना शीतयुद्धानंतर रसदपुरवठा बंद झाला. अशा वेळी या संघटनांनी हिऱ्यांच्या खाणींवर बळजबरीने ताबा मिळवला आणि हिऱ्यांची विक्री सुरू केली. हिरेबाजारातील बडय़ा व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून खरेदी सुरू केली. पण या व्यवहारात या संघटनांना हिऱ्यांच्या मोबदल्यात पैशांऐवजी शस्त्रास्त्रे मिळू लागली. अगदी एके-४७ ते थेट रणगाडे वगैरेही. यामुळे सरकारचा हिऱ्यांचा अधिकृत व्यापार जवळपास कोलमडलाच आणि सैन्यालाही पगार देता येईल इतके पैसे सरकारजवळ उरले नाहीत. अशा परिस्थितीत आफ्रिकेत घडले ते अनाकलनीयच होते. लाखोंच्या संख्येत लोक मारले गेले, त्याहून अधिकांना जायबंदी करण्यात आले, हजारो लहान मुलांच्या हाती शस्त्रास्त्रे देण्यात आली; आणि हे सारे घडवून आणण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ हिरे व्यापारातून मिळत होते. म्हणूनच या हिऱ्यांचे नाव ‘ब्लड डायमण्ड’ म्हणजेच ‘रक्तरंजित हिरे’ असे पडले. एकदा तर हिऱ्यांच्या जागतिक पुरवठय़ात १५ टक्के हिस्सा या ‘ब्लड डायमण्ड’चा होता, असा अंदाज आहे.
नव्वदच्या दशकाच्या शेवटाकडे ‘पार्टनरशिप आफ्रिका-कॅनडा’, ‘ग्लोबल विटनेस’ अशा काही संस्थांनी हे सारे उघडकीस आणले. या संस्थांनी सादर केलेल्या सर्वेक्षणात डी बीअर्ससारख्या बलाढय़ कंपन्यांचेसुद्धा नाव घेण्यात आले होते. पुढे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने आणि ‘ग्लोबल विटनेस’ या संघटनेने असेही मांडले की, २००१ मध्ये अमेरिकेवर अतिरेकी हल्ला घडवून आणलेल्या अल्-कायदा या दहशतवादी संघटनेनेसुद्धा ‘ब्लड डायमण्ड’चा आर्थिक आधार घेतला होता. हे सगळे थांबावे यासाठी दक्षिण आफ्रिकेतील किम्बर्लीत २००० साली एक अधिवेशन घेण्यात आले, ज्याचे रूपांतर २००३ मध्ये ‘किम्बर्ली प्रोसेस’मध्ये झाले. यात अनेक नागरी संस्था, हिऱ्यांचे व्यापारी, मोठमोठय़ा कंपन्यांबरोबरच भारतासह ८१ देशांनी सहभाग नोंदवला. प्रत्येकाने ‘ब्लड डायमण्ड’ला आळा घालण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याचे ठरवले.
खाणींपासून आपल्या दुकानांपर्यंत हिरे येण्याची साखळी बरीच गुंतागुंतीची आहे. वार्षिक आकडेवारी पहिली तर, मूळ स्थितीत असलेल्या हिऱ्यांची उलाढाल ही १.१ लाख कोटी रुपये इतक्या रकमेची असते. सुरतसारख्या ठिकाणी या मूळ स्थितीत असलेल्या हिऱ्यांना आकार देऊन चकाकी दिली जाते, तेव्हा हाच आकडा ३५ लाख कोटींपर्यंत जातो. हिरे दुकानांत येईपर्यंत हाच आकडा ५३ लाख कोटींपर्यंत पोहोचतो. या साऱ्या प्रक्रियेत हिऱ्यांचा बऱ्याच देशांतून प्रवास होतो आणि अनेक वेळा मालकीही बदलते. जेव्हा हिऱ्यांची मालकी बदलते किंवा ते सीमा पार करून दुसऱ्या देशात येतात तेव्हा त्याबरोबर एक प्रमाणपत्र जोडण्यात यावे, असे ‘किम्बर्ली प्रोसेस’मध्ये ठरले. हिऱ्यांचा खाणीपासून पुढचा सर्व प्रवास त्या प्रमाणपत्रात नोंदवण्यात येईल आणि ग्राहकांना तो तपासायचा असेल तर त्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येतील, अशी तरतूद यात करण्यात आली. ‘किम्बर्ली प्रोसेस’मुळे ‘ब्लड डायमण्ड’च्या मागणी वा घुसखोरीला बऱ्याच प्रमाणात रोखण्यात आले.
मात्र, ‘किम्बर्ली प्रोसेस’ची सर्व कार्यवाही कागदोपत्री होते. त्यातली प्रमाणपत्रे युरोपात साठवली जातात. देशात येणारे हिरे आणि देशातून बाहेर जाणारे हिरे हे त्याच प्रमाणपत्रांशी संलग्न आहेत की नाहीत, हे सांगणे तसे अवघड आहे. बाहेरील व्यक्ती वा संस्थांना या प्रक्रियेची तपासणी करण्याचे अधिकार नाहीत. इतकेच काय, अगदी ग्राहकांनासुद्धा ते सहजशक्य नाही.
मग ‘ब्लॉकचेन’चा या साऱ्याशी काय संबंध आहे?
तर.. ‘एव्हरलेजर’ या कंपनीच्या संस्थापिका लिआन केम्प यांना हिऱ्यांच्या व्यापारसाखळीत ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञाना’च्या उपयोजनाच्या शक्यता दिसल्या. जिथे कुठे स्वतंत्र अथवा अनोळखी व्यक्ती वा संस्थांमध्ये व्यवहार होतो, तिथे विश्वासाची जोड देण्यात ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ उपयोगी ठरते, याची जाणीव त्यांना होती. पण नुसते ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरून काही साध्य होणार आहे का? कारण ‘ब्लॉकचेन’ हीदेखील नोंदणीची एक पद्धतच. जी नोंदणी आधी कागदोपत्री होत होती, तीच ‘ब्लॉकचेन’द्वारे डिजिटल स्वरूपात केल्याने समस्या सुटेल का?
इथे दोन संकल्पना येतात :
(१) ‘डिजिटल ट्विन’ (डिजिटल जुळे बनवणे) : ही प्रक्रिया ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञाना’च्या आधी विकसित झाली आहे. सजीव वा निर्जीव घटकाची डिजिटल प्रतिकृती यात बनवली जाते.
(२) ओरॅकल आव्हान : कोणतीही माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवताना, तिला खऱ्या जगातून डिजिटल जगात घेऊन जाणाऱ्या सेतूचे फार महत्त्व आहे. ‘ब्लॉकचेन’मध्ये सुरुवातीपासूनच चुकीची किंवा अर्धवट माहिती नोंदवली तर तीच माहिती पुढे पाठवली जाईल आणि तिचा गैरफायदा घेतला जाईल. मग माहितीची डिजिटल नोंद होण्यातील ‘सेतू’ची विश्वासार्हता कशी राखायची? यालाच ‘ब्लॉकचेन’च्या क्षेत्रात ‘ओरॅकल आव्हान’ असे म्हणतात.
यासाठी केम्प यांनी कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि वस्तुजाल (इंटरनेट ऑफ थिंग्स) या नवतंत्रज्ञानांचा उपयोग करून घेतला (आठवा : ‘तंत्रज्ञान समन्वय’, ८ ऑक्टोबर). हिऱ्यांना फक्त एखाद्या आकडय़ाने ओळख देण्याऐवजी त्यांची पूर्ण माहिती ‘ब्लॉकचेन’मध्ये कैद करण्याचे केम्प यांनी ठरवले. हिऱ्याचे छायाचित्र, दृक्मुद्रण, रंगाची माहिती अशी जवळपास १४ प्रकारची माहिती घेऊन प्रत्येक हिऱ्याला ओळख देण्यात आली. यामुळे कोणी या हिऱ्यांना बाजूला करून दुसरेच हिरे व्यापारसाखळीत घुसडण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच ओळखू येईल. ‘डिजिटल ट्विन’द्वारे एखाद्या वस्तूबरोबर खऱ्या जगात जे जे घडते/घडू शकते त्याची जशीच्या तशी नोंद ही ‘ब्लॉकचेन’ तंत्रव्यासपीठावर केली जाते. असे केल्याने संपूर्ण कागदोपत्री व्यवहार टळतो, अनधिकृत हिऱ्यांचा व्यापारसाखळीत प्रवेश थांबवता येतो, विविध व्यक्ती वा संस्थांना नमूद केलेल्या माहितीवर विश्वास असतो आणि सर्व माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे केवळ काही सेकंदांत शक्य होऊ शकते. आजघडीला केम्प यांच्या ‘एव्हरलेजर’ला डी बिअर्सपासून सामान्य ग्राहकांपर्यंत मान्यता मिळाली आहे आणि हाच भविष्याचा मार्ग आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही!
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.
ईमेल : gaurav@emertech.io