गौरव सोमवंशी
दोन माणसे वा संस्था एकत्र येऊन व्यवहार घडतात. ते करताना परस्परांवर विश्वास नसेल, तेव्हा अन्य व्यक्ती वा संस्था ‘मध्यस्था’ची भूमिका पार पाडतात. परंतु ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हा मानवी हस्तक्षेप दूर सारू पाहते, ते कसे?
‘ब्लॉकचेन’ विश्वात ‘बिटकॉइन’, ‘ब्लॉकचेन’ यांपाठोपाठ सर्वाधिक परिचित असलेली संज्ञा म्हणजे ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’- जिचा उगम ‘ईथिरियम’बरोबरच झाला. पण ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ ही संज्ञा सर्वात आधी निक झाबो यांनी नव्वदच्या दशकातच जगासमोर मांडली होती. जेव्हा केव्हा ‘सातोशी नाकामोटो कोण आहे?’ असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा संभाव्य उत्तरात निक झाबो हे प्रबळ दावेदार ठरतात. वास्तविक झाबो यांनी हा तर्क नाकारला असला, तरी ‘सायफरपंक’ तंत्रचळवळीत ते सक्रिय होते. १९९४ मध्येच त्यांच्या ध्यानात आले होते की, इंटरनेट आणि संगणकशास्त्राच्या क्षेत्रात पुढे कमालीची प्रगती होणार आहे आणि यामुळे आपण व्यवहार कसे करतो, नियमांची वा करारांची अंमलबजावणी कशी करतो या बाबींमध्ये आमूलाग्र बदल घडणार आहेत. जिथे कागदोपत्री व्यवहार म्हणजेच मानवाधारित कामे होतात, तिथे आता तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे. त्यांच्या मते, ‘भौतिक मालमत्तेची मालकी ही कधीच पूर्णपणे सुरक्षित नव्हती. पण भौतिक मालमत्तेला संगणकीय प्रणालींची जोड देऊन त्यास ‘स्मार्ट’ मालमत्ता बनवू शकतो, म्हणजेच ‘स्मार्ट संपत्ती’!’ पण झाबो यांनी हा विषय बाजूला सारून पूर्ण लक्ष ‘बिटगोल्ड’ बनवण्यावर दिले. ‘बिटगोल्ड’ हे कधी प्रत्यक्षात आले नाही; पण याच संकल्पनेला पुढे नेत, त्यात काही सुधारणा करून सातोशी नाकामोटोकडून ‘बिटकॉइन’ जगासमोर आले. पण ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’बद्दल झाबो यांचे भाकीत पूर्णपणे खरे ठरले नाही. ते का?
अजूनही अनेक महत्त्वाचे करार किंवा व्यवहार आपण कागदोपत्री वा मानवी हस्तक्षेपाने करतो. याचे मुख्य कारण डिजिटल वा ऑनलाइन यंत्रणेबद्दल असणारा अविश्वास. कारण चुकीमुळे वा खोडीमुळे मूळ करारातील मजकूर बदलला जाऊ शकतो अथवा व्यवहार पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी दिलेली असते त्या व्यक्ती वा संस्थेवरच विश्वास नसतो. इथे आपण डिजिटल वा ऑनलाइन प्रक्रियेच्या मर्यादांपर्यंत येऊन ठेपतो. पण हीच कहाणी पारंपरिक पैशाचीसुद्धा नाही का? पैसे वा व्यवहार हाताळण्यासाठी बँक, न्यायालय यांसारख्या संस्था आल्याच ना? ‘सायफरपंक’ या तंत्रचळवळीचा उद्देश नेमका हाच होता की, पैशास वा व्यवहारास या अवलंबित्वापासून स्वतंत्र करणे. हे करता करता २००८ साली ‘बिटकॉइन’चा उगम झाला- ज्यात स्वतंत्रपणे पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळवण्यासाठी ‘ब्लॉकचेन’ या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. आपण मागील तीन लेखांत पाहिल्याप्रमाणे, याच ब्लॉकचेन तंत्रज्ञानास केवळ पैसे वा चलनापुरते सीमित न ठेवता, त्यावर कोणतीही संगणकीय प्रणाली बनवता येईल ही युक्ती व्हिटालिक ब्युटेरिनला सुचली आणि ‘ईथिरियम’ हे तंत्रव्यासपीठ उदयास आले.
याच ‘ईथिरियम’ तंत्रव्यासपीठाचा एक मुख्य भाग म्हणजे- ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’! ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान जेव्हा ‘बिटकॉइन’सारखे चलन चालविण्यास वापरले जाते तेव्हा त्याचा वापर आर्थिक व्यवहारांची माहिती नोंदविण्यासाठी केला जातो. त्यात ‘बिटकॉइन’च्या देवाणघेवाणीची माहिती ‘ब्लॉक’मध्ये साठविली जाते. पण व्हिटालिक ब्युटेरिनला जाणवले की, ‘ब्लॉक’मध्ये कोणतीही, कशाचीही माहिती ठेवता येईल; इतकेच नव्हे, तर ‘ब्लॉक’मध्ये संगणकीय प्रोग्रामसुद्धा तंत्रबद्ध करता येईल. वास्तविक संगणकीय प्रोग्राम इतर कोठेही बनवले जाऊ शकतात आणि आपण दिवसभरात मोबाइल-संगणकावर असे अनेक प्रोग्राम वापरत असतोच. पण ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित प्रोग्रामची काही वैशिष्टय़े असतात, जी केवळ ‘ब्लॉकचेन’मुळेच शक्य होऊ शकतात. जसे की, प्रोग्राम ‘ब्लॉकचेन’वर असल्यामुळे तो कोणा एकाच्या मालकीचा राहत नाही आणि यामुळे त्यास स्वतंत्र अस्तित्व, अधिकार व अर्थ प्राप्त होतो.
यात हे ध्यानात घेणे गरजेचे आहे की, ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’चा अर्थ शब्दश: घेतला तर त्यातून चुकीचा अर्थ निघतो. कारण ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ‘स्मार्ट’ नाहीत आणि ते कायद्याच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ‘कॉण्ट्रॅक्ट’ किंवा ‘करार’ यांसारखेसुद्धा नाहीत. मग ते आहेत तरी काय? तर.. ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ हे केवळ ‘जर का असे झाले, तर तसे करा’ सांगणारे प्रोग्राम आहेत- ज्यांस ‘ब्लॉकचेन’च्या सुरक्षा कवचाखाली ठेवले आहे. एक उदाहरण पाहू. भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या घराचे. समजा, या घराला एक डिजिटल लॉक आहे जे उघडण्यासाठी डिजिटल चावी लागते. म्हणजे पासवर्ड. घरमालक आणि भाडेकरू दोघे मिळून एक ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ वापरण्यास राजी होतात. हे ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ अनेक ‘जर का असे झाले, तर तसे करा’ प्रकारच्या तर्काने बनलेले असते. उदा. जर भाडेकरूने वेळेवर पैसे नाही दिले (पैसे बिटकॉइन वा इतर कोणत्याही चलनातून दिले जाऊ शकतात), तर ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ पुढील महिन्याची डिजिटल चावी स्वत:हून बदलून टाकेल आणि घर बंद ठेवेल. जर पैसे भरले आहेत, पण घरमालकाने स्वत:हून नवीन डिजिटल चावी दिली नाही, तर हे ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ भाडेकरूला त्याचे पैसे पुन्हा त्याच्या खात्यात वळते करेल. इतकेच काय, वेळेवर पैसे न भरल्यास किती दंड आकारला जाईल हेसुद्धा ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’मध्ये नमूद असेल आणि हा दंड बरोबर भरला आहे की नाही यावरसुद्धा ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’चे लक्ष असेल. हे ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ आता ‘ब्लॉकचेन’ तंत्रव्यासपीठावर असल्यामुळे त्यात फेरबदल करणे वा काही खोडी करणे सहज शक्य नाही.
व्हिटालिक ब्युटेरिनच्या शब्दांत सांगायचे तर, ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट ही अशी प्रणाली आहे- ज्यात काही मालमत्ता समाविष्ट असेल, दोन वा अधिक व्यक्ती/संस्था असतील आणि त्यांच्यात या मालमत्तेच्या हाताळणीबाबतचे नियम पूर्वनियोजन करून तंत्रबद्ध केलेले असतील. हे नियम भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही घटनेवर आधारित असतील.’
आणखी एक उदाहरण पाहू. अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांची सध्या चर्चा सुरू आहे. करोनाकाळात मतदानासाठी घराबाहेर पडणे अवघड असणार आहे. दुसरे म्हणजे, मतदान डिजिटल पद्धतीने घडविले जात नाही, कारण त्यामध्ये अनेक धोके व त्रुटी आहेत. त्यामुळे अनेक तज्ज्ञांनी ‘ब्लॉकचेन’वर आधारित आणि उपयुक्त ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ने सुसज्ज असलेली एक प्रणाली सुचवली आहे. या प्रणालीनुसार, ज्यांना ऑनलाइन मार्गाने मतदान करणे शक्य असेल, त्यांचे मत नोंदवून त्यांची ओळख पूर्णपणे लपवता येऊ शकते (ज्याप्रमाणे सातोशी नाकामोटो आपली ओळख आजपर्यंत लपवून आहे!). तसेच मतमोजणी ही ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’द्वारे काही क्षणांतच करता येईल आणि प्रत्येकाचे मत वैधरीत्या तपासले गेले की नाही, हे ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ तपासेल. अर्थात, यंदा ही पद्धत अमलात येईल की नाही, हा तांत्रिक नसून राजकीय प्रश्न आहे. मात्र, ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ काही स्वत:हून विचार करत नाही; ते केवळ पूर्वनियोजित नियमांनुसार सहजतेने वागते. अशा प्रणालीला मान्यता मिळण्यासाठी ‘बाहेरून पाठिंबा’ लागतो, त्याशिवाय हे सारे एक प्रोग्राम म्हणूनच राहते.
या ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ प्रोग्राम्सना ‘डॅप’ असेही म्हटले जाते. स्मार्टफोनमधील प्रोग्राम्सना जसे ‘अॅप्लिकेशन’चे संक्षिप्त रूप ‘अॅप’ असे संबोधतात, तद्वत ‘डिसेण्ट्रलाइज्ड (वितरित) अॅप्लिकेशन’ म्हणजेच ‘डॅप’!
पण ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ केवळ इथवरच थांबत नाहीत. एक ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’ दुसऱ्या ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’बरोबर बोलू शकते आणि माहितीची देवाणघेवाण करू शकते. असे झाले तर ही प्रणाली फक्त दोन व्यक्तींपुरती मर्यादित न राहता एक पूर्ण संस्थाच वा कंपनीच ‘ब्लॉकचेन’वर उभारता येईल. ज्यात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणीही आणि कितीही माणसे सहभाग घेऊ शकतील. या संस्थेचे काम, नियम, सूचना आणि इतर सर्व गोष्टी ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’मध्ये तंत्रबद्ध होऊ शकतात. यालाच ‘ब्लॉकचेन’च्या दुनियेत ‘वितरित स्वायत्त संस्था (डिसेण्ट्रलाइज्ड् ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन)’ असे म्हणतात.
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.
ईमेल : gaurav@emertech.io