गौरव सोमवंशी
‘बँकांना दिवाळखोरीतून वाचवण्यात सरकार अपयशी ठरू शकते.’ – हे विधान दशकभरापूर्वी इंग्लंडमधील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीतले; तरी तेच ‘बिटकॉइन’च्या उत्पत्तीचे पहिले सूत्र ठरले, ते कसे?
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’ची सुरुवात होण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश होता; तो असा की- प्रचलित जागतिक चलनाला बाजूला सारणे आणि एक नवीन ‘पसा’ वापरात आणून आतापर्यंतच्या प्रस्थापित प्रणालींना तडा देणे. त्या जुन्या किंवा प्रस्थापित, प्रचलित प्रणाली काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपण आतापर्यंत या लेखमालेत पशाच्या इतिहासापासून ते बँका कशा सुरू झाल्या इथपर्यंतचा इतिहास थोडक्यात पाहिला. मात्र, आजवरच्या या प्रणालींमधल्या त्रुटींवर अनेकांची नाराजी होतीच. त्या नाराजीतूनच नव्वदच्या दशकात संगणकशास्त्राच्या विश्वात ‘सायफरपंक’ चळवळीचा उदय झाला. प्रचलित प्रणालींविषयीचा प्रतिकार तंत्रज्ञानाच्या रूपाने व्यक्त होण्यासाठी या चळवळीद्वारे अनेक संशोधकांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचे एक फळ म्हणजे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’ हे चलन!
‘बिटकॉइन’चा शोध ज्याने लावला त्या सातोशी नाकामोटोने स्वतची ओळख आजपर्यंत जगापासून लपवून ठेवली आहे. या नावाची व्यक्ती आहे की एखादा संशोधक गट हेही कोणास अद्याप कळू शकलेले नाही. मात्र त्याने/तिने/ त्यांनी स्वतला ‘सातोशी नाकामोटो’ असे संबोधले आहे. सातोशी नाकामोटोच्या अस्तित्वाबद्दल ठोस काही माहीत नसताना, सातोशी नाकामोटोला प्रस्थापित रचनेबद्दल राग वा नाराजी होती असा दावा आपण कसा काय करू शकतो?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी फार काही कल्पक किल्ले रचण्याची गरज नाही; आपण थेट ‘बिटकॉइन’च्या आत डोकावून पाहू शकतो. ते कसे?
तर.. ‘बिटकॉइन’ हे ‘ब्लॉकचेन’ नामक तंत्रज्ञानाचे फक्त एक उदाहरण आहे. कुठलेही ‘तंत्रज्ञान’ हे त्याच्या कोणत्याही विशिष्ट वापरापेक्षा बरेच व्यापक असते. या लेखमालेचे नाव ‘साखळीचे स्वातंत्र्य’ असे आहे; कारण ‘ब्लॉकचेन’मध्ये ज्या ‘चेन’चा उल्लेख येतो, ती माहितीच्या ‘ब्लॉक्स’नी म्हणजे माहितीच्या डब्यांनी बनलेली आहे. म्हणजे एखाद्या रेल्वेसारखी. जसे- रेल्वेचा प्रत्येक डबा स्वतंत्र असतोच; पण ते पुढील वा/आणि मागील डब्याशी जोडले गेलेले असतात; अगदी तसेच ‘ब्लॉकचेन’चे आहे. यातील तांत्रिक बाबी या लेखमालेत जाणून घेऊच; पण आजच्या लेखाचा उद्देश केवळ ‘सायफरपंक’ चळवळकर्त्यांमध्ये पैसा, चलन आणि बँकिंग क्षेत्र यांच्याबद्दल असलेल्या नाराजीचे कारण जाणून घेणे, हा आहे. त्यासाठी या ‘रेल्वे’च्या फक्त पहिल्या डब्याकडे लक्ष देणे पुरेसे आहे. याचा अर्थ असा की, ‘बिटकॉइन’च्या ‘ब्लॉकचेन’मधील पहिल्या माहितीच्या ‘ब्लॉक’मध्येच सगळे सार दडले आहे.
पहिला ब्लॉक..
सातोशी नाकामोटोने आपले ‘बिटकॉइन’बद्दलचे विचार ३१ ऑक्टोबर २००८ रोजी एका संकेतस्थळाद्वारे जगासमोर मांडले. परंतु त्या विचारांचे उपयोजन, म्हणजे ‘बिटकॉइन’ची ‘ब्लॉकचेन’ ३ जानेवारी २००९ रोजी सुरू झाली. त्या दिवशी ‘बिटकॉइन’चा पहिला ‘ब्लॉक’ अस्तित्वात आला. या माहितीच्या ‘ब्लॉक’मध्ये नेमके काय असते, तो संगणकशास्त्रातील कोणत्या संकल्पना वापरून बनला आहे, याबद्दल लेखमालेत ओघाने पाहूच; पण आतापुरता महत्त्वाचा आहे तो पहिला ‘ब्लॉक’! या पहिल्या ‘ब्लॉक’मध्ये एका बातमीतले विधान आहे. ती बातमी ३ जानेवारी २००९ रोजी इंग्लंडमधील वर्तमानपत्रात झळकली होती. बातमीत म्हटले होते- ‘इंग्लंडचे सरकार आपल्या बँकांना पैसे पुरवूनसुद्धा त्यांना जागतिक मंदीच्या विळख्यातून वाचवण्यात अपयशी ठरू शकते.’
असे काय झाले होते २००९ साली, की इंग्लंड सरकारला स्वत: पैसे देऊन बँकांना वाचवण्याची वेळ आली? अनेकांना आठवत असेल, त्याच काळात जगाने प्रचंड मोठी आर्थिक मंदी पाहिली. अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते, मागील ८० वर्षांतील ती सर्वात मोठी जागतिक आर्थिक मंदी होती. पण ही मंदी आपोआप आली का? की कोणाकडून नकळत झालेल्या चुकांमुळे किंवा अनवधानाने हे आर्थिक संकट ओढवले होते?
अर्थसंकटाचे मूळ बँकिंग प्रणालीत
तर या संकटाचे मूळसुद्धा मागील लेखात पाहिलेल्या बँकिंग प्रणालीशी निगडित आहे. याबद्दल थोडक्यात पाहू या.. आपण बँकांमध्ये आपले पैसे ठेवतो. मात्र, ते पैसे बँकेतच राहत नाहीत. बँक ते इतर गरजू (?) लोकांना देते आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या व्याजातून नफा कमावते. इथपर्यंत सारे ठीक आहे. परंतु अमेरिकेत घडले ते निराळेच. तिथे असा समज होता की, घरांच्या किमती कधी कमी होऊच शकत नाहीत. त्यामुळे तिथल्या बँकांनी बिनधास्त गृहकर्ज वाटप सुरू केले. कोणी हे कर्ज फेडले नाही, तर ते घर विकून कर्जाचे पैसे परत मिळवता येतील, असा त्यामागे विचार होता. इथून पुढे वित्तीय आणि आर्थिक जादूगारांनी आपले काम सुरू केले. त्यांनी या गृहकर्जाना हजारोंच्या संख्येने एकत्र करून एक गठ्ठा बांधला आणि त्यातून एक नवे आर्थिक कंत्राट वा करारनामा तयार केला. म्हणजे असे की, या हजारो लोकांना दिलेल्या गृहकर्जाच्या एकत्रित कंत्राटासही विकण्याची एक पद्धत या वित्तीय आणि आर्थिक जादूगारांनी बनवली. खरे तर, बँक कर्ज देते तेव्हा ते कर्ज वेळेवर फेडले जाईल हे पाहण्याची जबाबदारी बँकेची असायला हवी आणि ही जबाबदारी नीट पार पाडली नाही तर नुकसानसुद्धा बँकेचेच आहे. पण या तत्त्वाकडे डोळेझाक करून अमेरिकी बँकांनी कोणालाही उठसूट गृहकर्ज देण्यास सुरुवात केली. म्हणजे हजारोंच्या संख्येने एकत्रित केलेल्या या गृहकर्जाचे गठ्ठे विकायला त्या मोकळ्या.
या गठ्ठय़ांमध्ये जागतिक पातळीवर गुंतवणूकही सुरू झाली; कारण ‘घरांच्या किमती कमी होणार नाहीतच, त्यामुळे गृहकर्जामध्ये जोखीम नाहीच’ या समजाने सर्वाना भुरळ पाडली होती. अमेरिकेतील या गृहकर्जाच्या वाटपात जागतिक वित्त क्षेत्रातील मंडळींना गुंतवणुकीची सुरक्षित आणि किफायतशीर संधी दिसली. मुख्य म्हणजे सुरक्षिततेची खात्री देणाऱ्या अनेक पतमानांकन संस्थासुद्धा यामध्ये सामील होत्या. त्यामुळे डोळे झाकून विश्वास ठेवायला आणि गडगंज पसा ओतायला सगळे तयार. पण यात जी गुंतवणूक होत होती, तीदेखील अनेक लोकांच्या बँकेतील ठेवींतूनच आलेल्या पैशातून होत होती. म्हणजे आपल्या बँकेत ठेवलेल्या पशाचे काय होत आहे, तो कुठे जातोय, याची कोणाला काहीच माहिती नाही आणि तसा कोणता माहितीचा अधिकारसुद्धा नाही.
नंतर काय झाले? जे व्हायचे तेच! काहीच शहानिशा न करता दिलेले कर्ज हे शेवटी बुडवले जाणारच. मग बँकांना वाटले की, आपण आता घरांना विकून आपले पैसे परत मिळवू. पण जेव्हा लाखोंच्या संख्येने कर्जे बुडायला सुरुवात झाली, तेव्हा बाजारात लाखो घरे विक्रीत निघाली. म्हणजे विक्रीसाठी घरे जास्त आणि ती विकत घेण्यासाठी इच्छुक कमी. कोणत्याही गोष्टीचा पुरवठा हा गरजेपेक्षा वाढतो तेव्हा काय होते? तर त्या गोष्टीची किंमत घसरते. अशा परिस्थितीत त्या हजारो गृहकर्जाच्या गठ्ठय़ाने बनलेल्या आणि ‘सुरक्षित व किफायतशीर’ मानल्या गेलेल्या कंत्राटांनासुद्धा काहीच अर्थ उरला नाही. मग हे एकावर एक रचलेले मनोरे ढासळत गेले. त्यास ‘जागतिक आर्थिक मंदी’चे स्वरूप आले, ज्यामध्ये जवळपास सर्वाचे नुकसान झाले.
ही गोष्ट इथेच थांबली नाही. या चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होऊन ज्या बँका दिवाळखोरीत येणार होत्या, त्यांना वाचवण्यासाठी सरकारचा पसा वापरण्यात आला. अशाच एका गोष्टीची बातमी सातोशी नाकामोटोने ‘बिटकॉइन’च्या पहिल्या ‘ब्लॉक’मध्येच अजरामर केली आहे : ‘बँकांना दिवाळखोरीतून वाचवण्यात सरकारसुद्धा कमी पडत आहे’!
म्हणून या सगळ्या विळख्यातून मुक्ती हवी असेल तर सुरुवात पशातून आणि चलनापासूनच करू या, असा विचार ‘सायफरपंक’ चळवळीने केला. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाची आणि त्यावर आधारित ‘बिटकॉइन’ची उत्पत्ती याच चळवळीतून झाली; त्याबद्दल आपण पुढील लेखात पाहू या!
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io