गौरव सोमवंशी gaurav@emertech.io

ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजून घ्यायचे, तर आधी ‘बिटकॉइन’ समजून घेणे गरजेचे आहे; आणि बिटकॉइनबद्दल जाणून घ्यायचे तर- पैसा नक्की काय असतो, पैशाची निर्मिती म्हणजे काय, हे माहीत असायला हवे..

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
banking amendment bill 2024 benefits banking rules
RBI Rules: तुम्ही आता बँक अकाउंटमध्ये जोडू शकता चार नॉमिनी; केंद्र सरकारचा नवीन नियम काय सांगतो? वाचा…
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

समजा.. तुम्ही वर्तमानपत्रात किंवा कुठल्या तरी भिंतीवर वा लोकल ट्रेनच्या डब्यात लावलेली एक जाहिरात पाहता. त्यात लिहिले आहे की- ‘नोकरीची संधी. महिना ५० हजार पगार हमखास मिळेल!’ तर आशेने म्हणा वा कुतूहलाने, तुम्ही त्या जाहिरातीत सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचता. तिथली संबंधित अधिकारी व्यक्ती तुम्हाला अधिक काही विचारपूस न करता म्हणते की, ‘‘उद्यापासून नोकरीला या.’’ तुम्ही विचारता, ‘‘पण नक्की काम काय आहे, ते तरी सांगा!’’ त्यावर ती व्यक्ती उत्तरते, ‘‘याआधीचा माणूस जे काही काम करत होता, तेच काम तुम्हाला सुरू ठेवायचंय.’’ परंतु काम नक्की काय आहे, हे सांगायला ती व्यक्ती तयार नाही.

हे वाचायला विचित्र वाटतेय का? परंतु अशीच काहीशी गत ‘बिटकॉइन’ व ‘ब्लॉकचेन’संदर्भातही होते. कित्येक वेळा अतिशयोक्ती वाटावी अशी विधाने आपल्याला वाचायला मिळतात आणि मिळत राहतीलही. जसे की, ‘बिटकॉइनमुळे आता नवीन चलन सुरू झाले!’ अहो, पण हे ‘चलन’ म्हणजे नेमके काय? अनेक जण असे म्हणतात की, ‘बिटकॉइनमुळे आता आपल्याला पसा कधीच छापावा लागणार नाही!’ पण मग कागदावर छापलेला आपल्या खिशातील पसा नक्की असतो काय आणि त्याला मूल्य येते कुठून, हे तरी आधी माहीत असावे. अनेकदा मांडले जाणारे एक मत असे की, ‘पैसे छापण्याचा अधिकार असणारी मध्यवर्ती बँक बिटकॉइनमुळे इतिहासजमा होणार!’ पण या बँकांचा इतिहास काय आहे?

‘ब्लॉकचेन’ या तंत्रज्ञानाला समजून घ्यायचे असेल, तर त्याला त्याच्या इतिहासासमवेत समजून घेणे अनिवार्य आहे. ब्लॉकचेनचा वापर करून अमुकअमुक माहिती साठवून सुरक्षित ठेवली, असे अनेक प्रकल्प आणि प्रयोग महाविद्यालयांत सुरू होतील; नव्हे, काही प्रमाणात झालेसुद्धा आहेत. मग याचा अर्थ असा समजावा का, की त्या विद्यार्थ्यांना सगळे कोडे उमजले आहे? याउलट, मला अशा अनेक व्यक्ती माहीत आहेत, ज्यांनी कधी संगणकशास्त्राचा अभ्यास केलेला नाही किंवा कधी कोणती संगणकीय आज्ञावली (प्रोग्रामिंग) बनवलेली नाही; पण त्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची समज इतकी आहे, की त्यांनी त्यावर आधारित काही अजब प्रकल्प उभे केले आहेत (त्याविषयी या लेखमालेत जाणून घेऊच!). थोडक्यात, बिटकॉइन किंवा त्यामागील तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉकचेन यांविषयी जाणून घेताना, आपण इतिहासात, अर्थशास्त्रात, क्रिप्टोग्राफी म्हणजे कूट/कोडय़ांचा अभ्यास आणि इतर अनेक क्षेत्रांत फेरफटका मारून येणार आहोत.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजून घ्यायचे, तर आधी बिटकॉइन समजून घेणे गरजेचे आहे. तसेच बिटकॉइन समजून घ्यायचे तर- पसा नक्की काय असतो; पशाची निर्मिती म्हणजे नक्की काय; बँकांचा उगम केव्हा आणि का झाला; या बँकिंग प्रणालीमधील त्रुटी; या त्रुटींविरुद्ध आवाज उठवणारी, पण फार कमी लोकांना माहीत असलेली ‘सायफरपंक’ चळवळ काय होती, या बाबी समजून घेणे गरजेचे आहे. एकदा पैसे म्हणजे नक्की काय, हे कळाले की मग बिटकॉइन नेमके काय करते, त्याचे आपल्या खिशातील पशाशी साम्य किती आणि फरक किती, हे समजून घेणे सोपे जाईल.

तर.. पशाची सुरुवात कशी झाली, हे पाहू. प्राचीन काळी जेव्हा चलन वा पैसे असे काहीच नव्हते आणि फक्त शिकारीतून आणि फळे वेचण्यातून उदरनिर्वाह होत असे, तेव्हा देवाणघेवाण करण्याची गरज भासे तेव्हा वस्तू-विनिमय (बार्टर सिस्टीम) ही पद्धत वापरत. अनेक इतिहासकारांच्या आणि अर्थशास्त्रज्ञांच्या मते, अशी पद्धत खरेच किती काळ प्रचलित होती, हे सांगणे कठीण आहे. कारण या प्रणालीत एक मोठी त्रुटी होती- जिला प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ यांनी ‘गरजांचा योगायोग’ असे म्हटले आहे. काय होती ही त्रुटी? एक उदाहरण पाहू- माझ्याकडे पाच बकऱ्या आहेत व मला आता धान्य हवे आहे आणि तुम्हाला बकरी हवी व तुमच्याकडे धान्य आहे. येथे ‘गरजांचा योगायोग’ उद्भवला म्हणून वस्तू-विनिमय पद्धत काम करू शकेल. पण समजा, तुमच्या आणि माझ्या गरजा अशा असतील की देवाणघेवाण शक्य नाही? म्हणजे- मला धान्य हवे आहे, पण तुम्हाला बकरी नकोय; तेव्हा काय करायचे? अशा वेळी ही वस्तू-विनिमय पद्धत काम करत नाही, आणि म्हणून अनेकांच्या मते ही पद्धत अल्प काळ चालली असावी.

म्हणूनच मग पशाचा उगम झाला का? याबाबत इतिहासकार वा अर्थशास्त्रज्ञांमध्ये दोन गट पडतात. समजा, वरील उदाहरणात लोकांनी ठरवले असेल की, वस्तूंची देवाणघेवाण सोपी होण्याकरिता एक तिसरी सामाईक वस्तू असावी- जिच्याने कोणत्याही वस्तूची देवाणघेवाण शक्य आहे आणि त्या वस्तूला या वैशिष्टय़ामुळे मूल्यसुद्धा प्राप्त होईल. उदा. सोन्याचे किंवा चांदीचे शिक्के. तर, इथे पशाचा उगम होऊ शकतो. या विचाराला ‘मेटॅलिस्ट’ (धातू-आधारित) दृष्टिकोन म्हणतात. देवाणघेवाणीसाठी जी सामाईक वस्तू (किंवा धातू) आपण वापरणार आहोत, तिला स्वत:चे असे स्वतंत्र मूल्य असणे या दृष्टिकोनानुसार गरजेचे आहे. म्हणजे असे की, सोन्याचे किंवा चांदीचे शिक्के आपण चलन म्हणून वापरले नाहीत, तरी धातू म्हणूनही त्यांचा उपयोग आहेच. या ‘मेटॅलिस्ट’ दृष्टिकोनावर अनेकांनी विश्वास दाखवला आहे. प्राचीन ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटलच्या मते, एक वस्तू गरजेपेक्षा जास्त बनवली गेली आणि त्याच वेळी दुसऱ्या आवश्यक वस्तूंचे उत्पादन झाले नाही, अशा परिस्थितीत व्यवहार करण्यासाठी पशाचा उगम झाला. याच विचाराला अ‍ॅडम स्मिथने त्याच्या ‘द वेल्थ ऑफ नेशन्स’ या अजरामर पुस्तकातही नमूद केले आहे. स्मिथच्या मते, पशाचा उगम हा स्वतंत्र चलन म्हणून वापरता येईल अशा वस्तूंना किंवा धातूंना ओळखून झाला.

आता आपण पशाच्या उगमाविषयीचा दुसरा दृष्टिकोन पाहू. तो ‘चार्टालिस्ट’ (खूण किंवा चिन्ह-आधारित) दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. त्यानुसार, वस्तू-विनिमय (बार्टर सिस्टीम) पद्धतीतील त्रुटींचे- ‘गरजांचा योगायोग’ – खूप सोप्या रीतीने निराकरण करता येते. जसे अमुकअमुक वस्तू ही उसनी आहे किंवा ती वस्तू भेट म्हणून देत आहोत, याची नोंद कुठे तरी करून ठेवावी. इथून ‘ऋण’ किंवा ‘कर्जा’ची निर्मिती होते. या दृष्टिकोनानुसार पशाच्या निर्मितीआधी या ऋण किंवा कर्जाची नोंद करण्याच्या पद्धतीचा उगम झाला. म्हणजे कर्ज पहिले आले आणि पैसे नंतर! जी मंडळी हा दृष्टिकोन मान्य करतात, त्यांच्या बाजूने इतिहास उभा आहे. याचे कारण जगातील सर्वात प्राचीन आर्थिक प्रणालीची नोंद ही जवळपास चार हजार वर्षांपूर्वी बॅबिलोन (आजच्या इराक)मध्ये झाली. ही नोंद त्या काळच्या विधिसंहिता कोरलेल्या ‘हामुराबीच्या शिलालेखा’त वाचायला मिळते. त्यात एखाद्या ऋण किंवा कर्जाची परतफेड कशी करावी आणि ती न झाल्यास शिक्षा कशी मिळावी, याची सविस्तर नोंद केली आहे. मग या कर्जनोंदीला सोयीस्कर पद्धतीने दर्शवण्यासाठी पशाचा उगम झाला, असे या चार्टालिस्ट दृष्टिकोनाचे सांगणे आहे. या गटात जॉन मेनार्ड केन्ससारख्या अर्थशास्त्रींचा समावेश आहे, ज्यांना वाटते की पशाचा पुरवठा कमी-जास्त करून आपण आर्थिक परिस्थितीत बदल घडवू शकतो. कारण पसा हा कोणत्या वस्तू किंवा धातूशी निगडित नसून एक कामाची किंवा कर्जाची वा ऋणाची नोंद ठेवणारे सामाजिक तंत्रज्ञान आहे.

मग बिटकॉइन नेमके काय आहे? त्याला आपण मेटॅलिस्ट दृष्टिकोनातून पाहावे की चार्टालिस्ट दृष्टिकोनातून? तर, याचे उत्तर कुठे लिहून ठेवलेले नाही; पण बिटकॉइनकडे चार्टालिस्ट दृष्टिकोनातून पाहिले तर कोडे आपोआप उलगडते. शेवटी बिटकॉइन हे असे कोणते कॉइन किंवा शिक्के अथवा नाणे नाही; ते फक्त एक जागतिक नोंदवही आहे. कोणाचे कोणावर किती ‘कर्ज’ आहे हे सोयीस्कर पद्धतीने दर्शवण्यासाठी बिटकॉइनचा उपयोग करण्यात आला आहे. या जागतिक नोंदवहीतून आपण बिटकॉइन वेगळे करून बघू शकत नाही. कारण ती एकच गोष्ट आहे : नोंद करण्याची पद्धत, बस्स!

या लेखात आपण पैसे किंवा चलनाच्या उगमाबद्दलचे दोन भिन्न दृष्टिकोन आणि त्यावरून आपल्याला पशाच्या गुणधर्माबद्दल काय समजते, हे पाहिले. पुढील लेखात आपण याच सोन्याच्या किंवा अन्य धातूंच्या शिक्क्यांचे रूपांतर हे कागदी पशात कसे झाले, बँकांचा उगम कसा झाला आणि या आधुनिक प्रणालीतील त्रुटी काय आहेत, हे जाणून घेऊ.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

Story img Loader