|| गौरव सोमवंशी
‘बिटकॉइन’ कार्यरत होऊन आता दशकभराहून अधिक काळ लोटला आहे. कोणतेही तंत्रज्ञान वा प्रणाली इतका काळ सुरळीत चालते, तेव्हा त्यामागे त्याआधी झालेल्या संशोधनाचे योगदान नक्कीच असते. ‘बिटकॉइन’च्या यशस्वी निर्मितीस ‘सायफरपंक’ या नव्वदच्या दशकात आकारास आलेल्या तंत्रचळवळीची वाटचाल कारणीभूत ठरली; ती कशी?
कल्पना करा की, पसा डिजिटल स्वरूपात रोज ‘छापला’ जातोय; पण हे करण्यासाठी वा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठले सरकार नाही किंवा कोणतीही बँक नाही. त्यात कोण्या एका व्यक्तीचा सक्रिय सहभागसुद्धा नाही. तसेच हे चलन कोणत्या एका देशापुरते मर्यादित नसून जागतिक पातळीवर कार्यरत आहे.. अशा प्रणालीत चुका होण्याच्या शक्यता किती तरी असू शकतील. दुसरे म्हणजे, ती मोडीत काढण्यासाठी अनेक संस्था प्रयत्नरत असतीलच.
काहीशा अशा परिस्थितीतच ‘बिटकॉइन’ला अविरत कार्यरत होऊन आता जवळपास ११ वर्षे झाली. कोणतेही तंत्रज्ञान वा प्रणाली इतकी वर्षे सुरळीत चालते, तेव्हा त्यामागे त्याआधी झालेल्या संशोधनांचे, आविष्कारांचे योगदान नक्कीच असते. अर्थात, ज्या उद्देशांसाठी ‘बिटकॉइन’ अस्तित्वात आले, ते उद्देश साधण्यासाठी दोन दशकांपासून अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रकार्यकर्ते सक्रिय होते. हे मुख्यत: ‘सायफरपंक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चळवळीशी संबंधित होते. त्यांनी यासाठी जगासमोर काही पर्यायसुद्धा ठेवले; पण काही ना काही कारणाने ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण ही सारी धडपड होत असताना छोटे-मोठे शोधाविष्कार होत गेले आणि अखेरीस ‘बिटकॉइन’ अस्तित्वात आले. जर इतर तंत्रकार्यकर्त्यांनी वा शास्त्रज्ञांनी ती धडपड केली नसती, तर आज ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान वा ‘बिटकॉइन’ अस्तित्वात आलेच नसते.
ज्या उद्देशासाठी ही धडपड सुरू झाली, त्याबद्दल आपण मागील लेखात (‘तत्त्व आणि तंत्र’, २७ फेब्रुवारी २०२०) पाहिलेच आहे. त्यात ‘सायफरपंक’ चळवळीची सुरुवात कशी झाली, याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतले होते. एरिक ह्य़ुज, टिमोथी मे आणि जॉन गिलमोर हे तिघे तंत्रज्ञ एकत्र आले आणि १९९२ साली त्यांनी एक गट सुरू केला. त्यास ते ‘सायफरपंक’ असे संबोधू लागले. पुढील दोनच वर्षांत त्यांच्या तंत्रज्ञ कार्यकर्त्यांची संख्या सातशेवर पोहोचली. याच दरम्यान, १९९३ मध्ये एक महत्त्वाची घटना घडली. एरिक ह्य़ुज यांनी एकपानी पत्रक प्रसिद्ध केले, ज्यामध्ये ‘सायफरपंक’ चळवळीचा मूळ गाभा सांगण्यात आला. ‘अ सायफरपंक मॅनिफेस्टो’ या नावाने हा दस्तावेज प्रसिद्ध आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये ही मंडळी वारंवार भेटू लागली. तोवर इंटरनेट वा ईमेल मुख्य प्रवाहात आलेही नव्हते; पण ते लवकरच येणार आणि त्याचसोबत सरकारी संस्थांचे किंवा हॅकर्सचे अथवा बँकांचे सामान्य जनतेवरील नियंत्रण नक्कीच वाढणार या खात्रीने ही मंडळी अगोदरच कार्यरत झाली होती. सुरुवातीच्या एका बैठकीत टिमोथी मे यांनी ‘सायफरपंक मॅनिफेस्टो’ वाचून दाखवला.
‘सायफरपंक’ चळवळीतील अनेक मंडळींच्या वैयक्तिक मतांचा झुकाव भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठेकडे असला, तरी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्याची सुरुवात कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांच्या ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’प्रमाणेच केली. त्यात असे भाकीत केले होते की, आता पुढील क्रांती ही ‘क्रिप्टोग्राफी (कूटशास्त्र)’मुळे येईल! डिजिटल युगाची सुरुवात होताना सर्व नियंत्रण बळकट संस्थांकडे न जाऊ देता क्रिप्टोग्राफीने ते सामान्य जनतेकडे वळवता येईल, असा मूळ मुद्दा त्या जाहीरनाम्यात मांडला गेला होता. मुख्य म्हणजे, यात त्यांनी सगळा भर हा ‘गोपनीयते (प्रायव्हसी)’वर दिला आहे; आणि ती ‘गुप्तते (सिक्रसी)’पासून कशी वेगळी आहे, ते अधोरेखित केले आहे. एका अर्थाने पाहिले तर, ज्याला थेट ‘ब्लॉकचेन’ किंवा ‘बिटकॉइन’सोबत जोडता येईल, असा विशिष्ट व्यापक दृष्टिकोन ‘सायफरपंक’ चळवळीचा अगोदरपासून नव्हताच. ते सारे टप्प्याटप्प्याने होत गेले. पक्ष्यांची उत्क्रांती होताना ती अचानक झाली नाही, तसेच काहीसे. म्हणजे सर्वप्रथम वेगाने धावणारे प्राणी आले, नंतर त्यांना दूपर्यंत झेप घेता येईल यासाठी पिसे आली आणि मग कुठे ते प्राणी उडायला सक्षम झाले. अगदी तसेच, ‘आपण जागतिक अर्थव्यवस्थेला एक पर्याय देऊ’ असा विचार ‘सायफरपंक’ चळवळीने सुरुवातीच्या काळात केला नव्हता. तो विचार हळूहळू उत्क्रांत होत गेला. याची सुरुवात झाली ती ‘गोपनीयते’च्या संकल्पनेपासून. एकाने दुसऱ्याला पाठवलेला संदेश हा तिसऱ्या व्यक्तीला वा संस्थेला कळू नये म्हणून. नंतर यावर काम सुरू झाले. आपण जे काही आर्थिक व्यवहार करतो त्यांची फक्त गरजेपुरतीच माहिती बँकेपर्यंत पोहोचायला हवी आणि बँकांनासुद्धा एका मर्यादेपलीकडे दुसऱ्याची माहिती बघण्याचा अधिकार नसावा, असा विचार त्यातून पुढे आला. पुढे अशी कल्पना निघाली की, आपण बँकांनाच बाजूला सारून, सरकार आणि बँकांचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रणच पूर्णपणे नष्ट करून एक नवीन पर्याय देऊ.. आणि मग जन्म झाला- ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान व ‘बिटकॉइन’ या चलनाचा!
परंतु यावरून ही सारी मंडळी केवळ ‘सायफरपंक’ चळवळीशीच निगडित होती, तिच्या सर्वच विचारांशी बांधील होती, असे मात्र नाही. त्यांच्यात अनेक मुद्दय़ांवर मतभेदसुद्धा होतेच. कोणाला वाटे, सरकार आणि बँका या एका मर्यादेपर्यंत गरजेच्या संस्था आहेत; तर काहींच्या मते, या संस्थांना पूर्णपणे बाजूला सारणे अत्यंत गरजेचे आहे. यातील काहींनी ‘अॅनानीमस री-मेलर’सारखे तंत्र निर्माण केले, ज्यामध्ये ईमेल कोणी पाठवला हे कळणे अशक्य असेल आणि याचा उपयोग हॅकर्स वा संस्थांपासून होणाऱ्या हेरगिरीपासून वाचण्यासाठी होईल. तसेच काहींनी मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्पसुद्धा हाती घेतले. उदाहरणार्थ, टिमोथी मे यांनी बनवलेले ‘ब्लॅकनेट’; ज्याचे काम ज्युलियन असांजच्या ‘विकिलीक्स’शी अत्यंत मिळतेजुळते होते.
अशा ‘सायफरपंक’ चळवळीत काही मूलगामी विचार वगळता, इतर अनेक मुद्दय़ांवर टोकाची भूमिका घेणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रकार्यकर्ते होते. त्यांनी आपापल्या परीने या चळवळीला आपला आधार बनवून अनेक नवीन प्रकल्प जगासमोर सादर केले. त्यातील अनेक प्रयोग फसले; पण काही प्रचंड यशस्वी होऊन प्रसिद्धसुद्धा झाले. उदाहरणार्थ, ज्युलियन असांज यांचे ‘विकिलीक्स’!
या यशस्वी ठरलेल्या आणि अपयशातूनही धडपडत राहणाऱ्या मंडळींच्या कष्टावरच आज ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान उभे आहे. सातोशी नाकामोटो ही जी कोणी व्यक्ती/ समूह असेल, तिने या चळवळीतून निर्माण झालेल्या आविष्कारांना आपल्या ‘बिटकॉइन’चा पाया बनवून त्यामध्ये स्वत:चे काही स्वतंत्र योगदान दिले आहे.
तंत्रउत्क्रांतीच्या या क्रमात पाच नावे प्रामुख्याने समोर येतात. अनेकांच्या मते सातोशी नाकामोटो हा या पाच व्यक्तींपैकीच एक असावा. यावरून या पाच जणांचे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान उभारणीतील योगदान ध्यानात यावे. यापैकी काहींच्या नावांचा उल्लेख या लेखमालेतील पहिल्या लेखातसुद्धा (‘काचेचे इंजिन!’, २ जानेवारी २०२०) झाला होता. हे पंचमंडल आहे- डॉ. अॅडम बॅक, हॅल फिनी, निक झाबो, डेव्हिड चॉम आणि वेई दाई! यांनी केलेल्या शोधाविष्कारांबाबत पुढील लेखात जाणून घेऊ. कारण ‘बिटकॉइन’ व ‘ब्लॉकचेन’ हे या मंडळींच्या योगदानाचे फलित आहे.
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io