साधारपणपणे कुठलाही चांगला लेखक आपल्या वयाच्या साठीनंतर कौडकौतुकाचा आणि मान-सन्मानाचा धनी होतोच. त्यामुळेच जन्मानं भारतीय आणि कर्मानं ब्रिटिश असलेले सलमान रश्दी यांना लंडनमधील पेन (ढएठ) या संघटनेचा या वर्षीचा नोबेल पारितोषिक विजेते नाटककार हेरॉल्ड पिंटर स्मृती पुरस्कार जाहीर झाला या बातमीत तसं विशेष म्हणावं असं काही नाही. २००९ पासून दरवर्षी हा पुरस्कार जन्मानं ब्रिटिश वा ब्रिटनमध्ये राहत असलेल्या आणि उल्लेखनीय साहित्यिक कामगिरी करणाऱ्या लेखकाला दिला जातो. गेली अनेक र्वष रश्दी ब्रिटनमध्ये राहत असल्यानं आणि त्यांची कामगिरीही तशी उल्लेखनीय असल्यानं त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली हे यथायोग्यच झालं. काही दिवसांपूर्वीच एका पत्रकार महिलेबरोबरची रश्दी यांची छायाचित्रं प्रसिद्ध झाली होती. त्यानिमित्तानं काही काळ त्यांचं नाव बातम्यांमध्ये झळकत राहिलं. तो झोत ओसरतो न ओसरतो तोच आता ही बातमी. या पुरस्काराचं वितरण ब्रिटिश लायब्ररीमध्ये ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तोपर्यंत रश्दी आपण बातम्यांत राहू याची तजवीज करून ठेवतील. आणि पुरस्कार प्रदान सोहळ्यात काही तरी वादग्रस्त विधान करून पुन्हा मागील पानावरून पुढे चालू लागतील. सामाजिक न्यायासाठी आपली लेखणी झिजवणारे हेरॉल्ड पिंटर हे रश्दी यांचे मित्र. दोघेही सामाजिक न्यायाचे आणि आविष्कार स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते. त्यामुळे रश्दी यांना हा पुरस्कार जाहीर होणं, हे अतिशय उचित आहे खरं, पण या निमित्तानं तरी रश्दी यांनी पिंटर यांच्या सामंजस्य, धीरोदात्त आणि उच्चतम नैतिकता या गुणांचा गांभीर्यानं विचार करून पाहायला हरकत नसावी.
रश्दी पुन्हा बातम्यांमध्ये!
साधारपणपणे कुठलाही चांगला लेखक आपल्या वयाच्या साठीनंतर कौडकौतुकाचा आणि मान-सन्मानाचा धनी होतोच.
First published on: 21-06-2014 at 12:43 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman rushdie in news again