उमेश बगाडे
विश्वधर्माची भूमिका घेतल्यामुळे सत्यशोधक समाजाला सर्व जाती-धर्माचे अनुयायी लाभले. पण जातिविद्रोहाच्या मध्यवर्तित्वामुळे समाजाच्या कामात शूद्रातिशूद्र जातींतील नवशिक्षितांचा पुढाकार सर्वाधिक राहिला. १८७५-७६च्या सत्यशोधक समाजाच्या सभासद-यादीतून ही बाब स्पष्ट होते. डॉक्टर, वकील, विविध पदांवरचे सरकारी अधिकारी, सरकारी व खासगी आस्थापनांतील कारकून, प्राथमिक शिक्षक, उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी, दुकानदार, व्यापारी, कंत्राटदार आणि शेतकरी अशा पेशांतील सर्व शूद्रातिशूद्र जातींचे सभासद त्यात दिसतात.
धर्मचिकित्सा आणि जातीनिषेध
शूद्रातिशूद्र नवशिक्षितांच्या जागृतीमागे वासाहतिक विचारपद्धतीने रुजवलेल्या विवेकाप्रमाणेच भारतातील जातीविरोधी परंपरेचा विवेकही काम करत होता. वसाहतकाळातही जातीसमाजातील जीवनशैलीच्या (हॅबिटस) सातत्यक्रमामधून आलेला भक्ती चळवळीतील जातीनिषेध शिक्षित-अर्धशिक्षित शूद्रातिशूद्रांना विचारप्रवृत्त करत होता. सत्यशोधक समाजाच्या जातिविद्रोहाच्या लढय़ाला आत्मगत करण्यासाठी त्यांना प्रेरित करत होता.
सत्यशोधकांच्या अथक कृतिशीलतेचे प्रतीक असलेल्या कृष्णराव भालेकरांनी मिशनऱ्यांच्या शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. तरुणपणी, जंगली महाराजांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी धर्मचिकित्सेची व जातीनिषेधाची भूमिका घेतली होती. त्यामुळे फुलेंच्या संपर्कात येण्यापूर्वीच ब्राह्मणी धर्माकडून होणाऱ्या लुटीविरोधात, निर्थक कर्मकांडांच्या विरोधात त्यांनी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. कबीरपंथाचा वारसा लाभलेल्या ज्ञानोबा ससाणे यांनी १३व्या वर्षी संन्यास घेतला आणि रामानंदी पंथाच्या बैराग्याचे शिष्यत्व पत्करून धर्मतत्त्वांची चिकित्सा करण्याची प्रक्रिया आरंभली. पण समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे त्यांनी अध्यात्माचा नाद सोडून फुल्यांचे शिष्यत्व पत्करले. युरोपीय प्रबोधनाच्या विचारपद्धतीला भारतीय जातिउच्छेदक विचारपरंपरेची जोड मिळाल्यामुळेच शूद्रातिशूद्र नवशिक्षितांत असे बंडखोर आत्मभान निर्माण झाले. जाती-उतरंड त्यांना अन्यायकारक वाटू लागली. त्याविरुद्ध लढण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या छत्राखाली ते एकवटू लागले.
सत्यशोधक विचारांची आत्मिक बंडखोरी पत्करून धार्मिक चिकित्सेच्या रणात शूद्रातिशूद्र नवशिक्षित सामील झाले. ईश्वर आणि भक्त यांच्यातील मध्यस्थाला विरोध करण्याचे तत्त्व अंगीकारून पुरोहिताशिवाय धार्मिक विधी करण्याची चळवळ त्यांनी उभारली. लग्न, पिंडदान, वास्तुशांत असे विधी करताना त्यांनी ब्राह्मण पुरोहिताला वर्ज्य केले. धर्मभोळ्या चाली, अंधश्रद्धा मोडून काढण्याची त्यांनी धडपड केली. हरतालिका, उपासतापास करणे, गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, कोणत्याही कारणाने ब्राह्मणाला शिधा देऊन पाद्यपूजन करून अंगुलाचे तीर्थ घेणे, हुताशनीचा उत्सव करून शंखध्वनी करणे.. अशा अनेक निर्थक चाली बंद करण्याचे प्रयत्न केले.
सत्यशोधकांची कृतिशीलता
आत्मोन्नतीचा मार्ग म्हणून शिक्षणप्रसाराच्या कामात सत्यशोधकांनी उडी घेतली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या योजना त्यांनी चालू केल्या. गरजू व गरीब विद्यार्थ्यांची फी भरणे, मुलींना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून चोळीचे खण बक्षीस देणे, पावसापासून मुलामुलींचे रक्षण करण्यासाठी मेणकापडाची डगली (रेनकोट) उपलब्ध करून देणे असे प्रयत्न करण्यात आले. अभ्यासात रुची नसलेल्या- खेळतमाशे पाहण्यात वेळ खर्ची घालणाऱ्या- मुलामुलींना शाळेत जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी दरमहा पाच रुपये पगारावर पट्टेवाला नेमण्यात आला. शूद्रातिशूद्र विद्यार्थ्यांना शेतकी व अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भांबुडर्य़ाला व हडपसरला शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नांना गती आली. बोर्डिग सुरू करण्याची योजनाही आखण्यात आली. सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न झाला. शूद्रातिशूद्र मुलांमध्ये आत्मविश्वासाने बोलण्याची व आपले प्रश्न विवेकसंगत पद्धतीने मांडण्याची कुवत येण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. अस्पृश्यांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला गवसणी घालणारे विषय स्पर्धेसाठी निवडण्यात आले. समाजाच्या सुरुवातीच्या वर्षांतील अहवालांमध्ये शिक्षणप्रसाराचे असे अनेक प्रयत्न नोंदवण्यात आले आहेत.
सत्यशोधक प्रेरणेतून परोपकार करण्याचे ब्रीद सत्यशोधकांनी अंगीकारले. लग्नाचा व अन्य धार्मिक विधींचा खर्च मर्यादित करून परोपकार करण्याचा मार्ग अनेकांनी स्वीकारला. संकटात सापडलेल्यांना निरपेक्षपणे मदत करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. अहमदाबादच्या पुरात उद्ध्वस्त झालेल्या हजारो लोकांना मोठा निधी देऊन मदत केल्याचा वृत्तान्त अहवालात सापडतो.
सत्यशोधक समाजाच्या ब्राह्मणवर्चस्व -विरोधातून शूद्रातिशूद्रांच्या आत्मउन्नयनाची व समतेची कामना जोर धरत होती. शेतकऱ्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणाऱ्या बालविवाह, लग्नातील डामडौल व स्त्रीशिक्षणाबाबतची अनास्था या प्रथा/प्रवृत्तींविरोधात लढण्यास ती उद्युक्त करत होती. दारू, जुगाराचे व्यसन, तमाशा, वेश्यांचे नाद, कर्जबाजारीपणाची सवय, एखाद्या हंगामात पुरेसे धान्य आल्यावर येणारे शैथिल्य, भांडकुदळपणा, कोर्टबाजीची सुरसुरी व गप्पिष्टपणा या शूद्रातिशूद्र जातींमधील दोषांना दूर करणाऱ्या प्रबोधनासाठी सत्यशोधक झटत राहिले.
सत्यशोधकांनी दास्यमुक्तीचा मानवी हक्कांचा संघर्ष जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तारला. त्यांनी फुल्यांच्या अनुभववादी व जातलक्ष्यी चिकित्सा पद्धतीच्या आधारे सर्व क्षेत्रांतील शोषण-शासनाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे खंडन करणारा, त्यातील दास्याची उकल करून मुक्तीची योजना मांडणारा जातीलढा त्यांनी संघटित केला. शेतकऱ्यांच्या शोषण-दमनाची संगती लावणारा शेतकरी लढा त्यांनी उभा केला.
शोषित/अंकितांच्या व्यक्तिगत अनुभवालाच ज्ञानाचा आधार मानण्याची सत्यशोधकांची भूमिका बंडखोर स्त्री जाणिवेला जन्म देणारी ठरली. स्त्रीजातीची कड घेऊन ताराबाई शिंदे यांनी ब्राह्मणी पितृसत्तेच्या सत्तासंबंधाचा वेध घेणाऱ्या, स्त्रीदास्याची उकल करणाऱ्या स्त्री-सत्त्वाच्या संघर्षांची पायाभरणी केली. तर मानवी हक्काची भूमिका घेऊन नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नांची तड लावणारा पहिला कामगारलढा संघटित केला.
मध्यमवर्गातून वगळल्याचा अनुभव
सत्यशोधक समाजाच्या विचार-कृतिशीलतेच्या वाटेने चालताना शूद्रातिशूद्र नवशिक्षितांना स्व-जातवर्ग घडणीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. विशेषत: प्रस्थापित मध्यमवर्ग त्यांच्या वर्गीय उन्नतीची दखल जातिहीनतेशी सांगड घालूनच करत होता. सत्यशोधक समाजाच्या अहवालाच्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी केलेल्या खवचट समीक्षेतून ही बाब स्पष्ट होते. महात्मा फुलेंच्या शुद्धलेखनावरून, ‘तुकोबा, सदोबा’ या शूद्रातिशूद्रांमध्ये प्रचलित असलेल्या नावांवरून चिपळूणकरांनी सत्यशोधक समाजाची टिंगल उडवली. निम्नजातीय जीवनशैली वर्ग प्रतिष्ठेसाठी पात्र नसल्याची धारणाच त्यातून प्रगट झाली.
ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाच्या समाजव्यवहारात वगळण्याचाच अनुभव वाटय़ाला येत असल्यामुळे शूद्रातिशूद्रांचे मध्यमवर्गीयत्व ना त्यांना पुरेशी प्रतिष्ठा देत होते, ना वर्गोन्नतीच्या पायरीने गतीने पुढे सरकण्याची संधी. त्यांचे वर्गीयत्व जात-पितृसत्तेशी व जातीच्या भागधेयाशी जखडले जात होते. त्यामुळे जात्युन्नतीच्या मार्गानेच वर्गोन्नती साधण्याचा मार्ग त्यांनी अनुसरला.
मध्यमवर्गाची ओळख पाश्चात्त्यीकरण व ब्राह्मणीकरणाच्या प्रक्रियेतून प्राप्त होत असल्यामुळे शूद्रातिशूद्र नवशिक्षितांच्या जात-वर्गीय अस्मितेची कोंडी अधिकच वाढली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी गंगारामभाऊ म्हस्के या मराठा जातीतील प्रथितयश वकिलाच्या भेटीचा जो अनुभव सांगितला, त्यातून या कोंडीचे काही पैलू स्पष्ट होतात. पुण्यातील लष्कर भागातील उच्चभ्रूंच्या वस्तीतील गंगारामभाऊंचे घर, दिवाणखाना, जमिनीवर अंथरलेले गालिचे, मधोमध ठेवलेले गोल मेज, गुबगुबीत खुच्र्या, त्यांचे आरामखुर्चीवरचे पहुडणे, तोंडातील चिरूट, इंग्रजीतील संभाषण, वागण्यातला साहेबी तुटकपणा या शिंदेंनी नोंदवलेल्या गोष्टी एकेकाळच्या सत्यशोधकाच्या वर्तनात रुजलेली पाश्चात्त्य वळणाची वर्गीयता स्पष्ट करतात. पण ही पाश्चात्त्य वळणाची वर्गीयता शेतीश्रमाच्या जातीवारशाशी घट्टपणे बांधलेल्या मराठा जातीतील नवशिक्षितांना अंगीकारणे शक्य नव्हते. गंगारामभाऊंइतकी प्रतिष्ठा त्यांच्या ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ या संस्थेची शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना कधी प्राप्त करता आली नाही, हे शिंदे यांचे भाष्य बोलके ठरते.
शूद्रातिशूद्रांना शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेतच ब्राह्मणीकरणाच्या साच्यातील वर्गीयतेला सामोरे जावे लागत होते. पांढरपेशेपण, टापटीप, शहरी उपभोग संस्कृती, संस्कृतप्रचुर भाषा, कर्मकांडी नैतिकता, स्वनियमनाची शिस्त अशी ब्राह्मणबहुल मध्यमवर्गीयांच्या कुंपणांतील मानके त्यांना आकर्षित करत होती. तथापि, ब्राह्मण जातीच्या अनुकरणातून वर्गीयता प्राप्त करण्याचा हा
मार्ग सत्यशोधक विचारनिष्ठा पत्करलेल्या नवशिक्षितांना आत्मवंचनेचा वाटला. त्यांनी एका बाजूला जातीसंघर्षांच्या, तर दुसऱ्या बाजूला वैश्विकतेला गवसणी घालणाऱ्या आधुनिकतेच्या मूल्यचौकटीत जात-वर्गीय सत्त्व शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल : ubagade@gmail.com