उमेश बगाडे
इतिहास-संगतीला विचारसरणीचे स्वरूप प्राप्त होण्याची उदाहरणे म्हणून १९व्या शतकातील ‘महाराष्ट्रधर्मा’च्या चर्चेकडे बोट दाखविता येते. छत्रपती शिवराय व मराठेशाही तसेच त्यापूर्वीच्या काळाच्या पुनशरेधातून तीन दृष्टिकोन स्थिरावले..
इतिहासाची कोणत्याही प्रकारची संगती ही, सातत्य व बदलाचा क्रम मांडून वास्तवाबाबतची एक विशिष्ट धारणा रूढ करत असते. समाजवास्तव आहे तसे राखण्याचा किंवा त्यात बदल घडवण्याचा तर्क पुढे आणत असते. वास्तवाला प्रभावित करण्याच्या या सामर्थ्यांमुळे इतिहासाला विचारसरणीचे रूप प्राप्त होते. आणि इतिहासलेखन हे विविध दृष्टिकोनांच्या व अन्वयार्थाच्या तणावांचे क्षेत्र बनते.
वास्तवातून इतिहासाकडे आणि इतिहासाकडून वास्तवाकडे पाहणारे अनेक दृष्टिकोन वसाहतकाळात दाखल झाल्यामुळे इतिहासाच्या विविध अन्वयार्थाचा तणाव महाराष्ट्रात उभा राहिला. सुधारणांना स्वीकारणारे आणि नाकारणारे असे इतिहासाचे अर्थ त्यातून पुढे आलेच, पण त्याबरोबर ‘जात’, ‘जमात’, प्रदेश, राष्ट्र अशा आत्मकल्पनांचे निरनिराळे ऐतिहासिक अर्थ प्रगट केले जाऊ लागले.
वसाहतवादी इतिहासविचार भारतीयांना अंकित भान देणारा, म्हणून तत्कालीन बुद्धिजीवी जातींतील शिक्षितांना खटकत असल्यामुळे त्याच्या प्रतिवादाची भूमिका त्यांनी घेतली. ‘वणवा पेटावा तसे’ छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य उदयाला आल्याचे सांगणारा ग्रँट डफ यांचा अन्वयार्थ त्यामुळे त्यांनी समूळ नाकारला. स्वराज्यामागे कोणताही विचार नसल्याचे तर्कट झुगारून शिवाजी महाराजांच्या राज्यामागे महाराष्ट्रधर्माचा विचार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मराठय़ांच्या इतिहासामध्ये आत्मगौरव पाहण्याची भूमिका नव्या बुद्धिजीवी वर्गात नांदत असली तरी वास्तवाबाबतच्या विभिन्न धारणांमुळे महाराष्ट्रधर्माच्या भिन्न भिन्न कल्पना एकोणिसाव्या शतकात उदयाला आलेल्या दिसतात. रानडे-भागवत, चिपळूणकर-राजवाडे आणि महात्मा फुले अशी महाराष्ट्रधर्माचा वा स्वराज्यामागचा विचार सांगणारी तीन प्रमुख प्रारूपे पुढे आलेली दिसतात.
रानडे-भागवत यांची समन्वय-कल्पना
राजारामशास्त्री भागवत आणि न्यायमूर्ती रानडे हे दोघेही उदारमतवादी सुधारणांचे पुरस्कर्ते होते, वारकरी भक्ती चळवळीच्या प्रागतिक विचाराचे अनुयायी होते. एकमेकांच्या प्रभावाखाली त्यांनी महाराष्ट्रधर्माचा विचार मांडला. महाराष्ट्रधर्मामागे वारकरी भक्ती विचार असल्याचे सांगून सामाजिक सुधारणेचा दृष्टिकोन त्यांनी महाराष्ट्रधर्मात गोवला. जातिभेदाचा निषेध, सोवळेओवळे- कर्मकांड- तीर्थयात्रा- अंधश्रद्धा यांना नकार, स्त्रियांना भक्तीचा अधिकार, नैतिक वर्तनावरचा भर, धर्मसमन्वय अशा वारकऱ्यांच्या प्रागतिक विचारसूत्रांना त्यांनी अधोरेखित केले.
वारकरी चळवळीला प्रोटेस्टंट हिंदू धर्म संबोधून बंडाच्या प्रेरणेची रानडेंनी भलावण केली. वारकरी संप्रदायाच्या बंडामध्ये स्वातंत्र्य, स्वावलंबन, सहिष्णुता व न्यायाची आस अशी तत्त्वे त्यांनी पाहिली आणि त्यांचा संबंध महाराष्ट्रधर्माशी जोडला. मुस्लीम राजवटीतील अन्यायाचा प्रतिकार हे आंशिक उद्दिष्ट असले तरी सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक सुधारणावाद हेच महाराष्ट्रधर्माचे त्यांचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जातीजातींमध्ये एकोपा व सहकार्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या समान संस्कृतीला भागवतांनी श्रेष्ठ मानले. अभिजात व स्थानिक श्रद्धांचा मेळ घालणारे संस्कृती समन्वयाचे तत्त्व त्यांनी गौरवले. स्थानिक श्रद्धा व लोकाचारामध्ये जातिभेदाला उल्लंघणारी जी संस्कृती दिसते तीच महाराष्ट्राला अभिव्यक्त करते असे त्यांनी सांगितले. संग्राहकतेला महाराष्ट्रधर्मात मध्यवर्तित्व देताना मुस्लीम धर्माला वगळण्याची भूमिका भागवत यांनी नाकारली. महाराष्ट्रीय समाजाची, ब्राह्मण व ब्राह्मणेतरांच्या एकत्वाची व उत्साह शक्तीची अभिव्यक्ती मराठय़ांच्या इतिहासात पाहायला मिळते असा दावा त्यांनी केला. संग्राहकतेच्या आड येणाऱ्या जातीच्या संकुचिततेला भागवतांनी विरोध केला. महाराष्ट्रधर्माच्या धुरीणत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ब्राह्मण जातींना जाती-अस्मितेपलीकडे जाऊन महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या भूमिकेची त्यांनी आठवण करून दिली.
रानडे-भागवत यांच्या इतिहास संगतीमधून व महाराष्ट्रधर्माच्या चर्चेमधून काही सूत्रे हाती लागतात. पहिले म्हणजे प्राचीन महाराष्ट्र, मराठय़ांचा काळ आणि वर्तमान यांचे एकमेकांच्या प्रभावात आकलन करणे. अशा प्रकारच्या इतिहासमीमांसेतून महाराष्ट्राच्या समन्वयक एकतेचे अंत:स्वरूप भागवतांनी पुढे आणले आहे. महाराष्ट्रात आद्य वसाहत करणारा ‘मरहट्ट’ हा समूह आर्य-अनार्य संमिश्रण झालेला असल्याचे सांगून भागवतांनी त्याचा संबंध महाराष्ट्रधर्माचे सूत्र असलेल्या जातीधर्माच्या भिंतींना उल्लंघणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रागतिकतेशी आणि अंतिमत: वर्तमानातील समन्वयक राष्ट्रवादाच्या प्रयोजनाशी जोडला आहे. दुसरे म्हणजे विचार ही इतिहासाची प्रेरकशक्ती असल्याचे सूत्र स्वीकारून महाराष्ट्रधर्माला निरंतर विचारक्रांतीच्या स्वरूपात त्यांनी सादर केले आहे. तिसरे म्हणजे, इतिहासविचारातून आत्मकल्पनेला आकार देऊन या आत्मकल्पनेला ‘कर्तेपणा’त प्रवाहित करणे. मराठय़ांच्या इतिहाससंगतीमधून महाराष्ट्रधर्माच्या प्रादेशिक कल्पनेची घटना करून तिला राष्ट्रीय अस्मितेच्या कक्षेत उंचावून वासाहतिक महाराष्ट्रजनांच्या आत्मनिष्ठ कर्तेपणाला उदारमतवादी सुधारणावादाची आणि समन्वयक राष्ट्रनिर्माणाची दिशा रानडे-भागवतांनी दिली आहे.
राजवाडेंची शुद्धी-कल्पना
रानडे-भागवतांच्या प्रतिवादात आणि चिपळूणकरांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुशीत वि. का. राजवाडे यांनी महाराष्ट्रधर्माची कल्पना घडवली. महाराष्ट्रातला जयिष्णू हिंदू धर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म; स्वराज्य स्थापन करणे, धर्मसंस्थापना करणे, गो-ब्राह्मण प्रतिपालन करणे, मराठय़ांचे एकीकरण करून त्यांचे पुढारीपण करणे असा कृतिकार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रधर्म असे महाराष्ट्रधर्माचे अर्थ त्यांनी सांगितले.
रामदास स्वामींच्या विचार-चौकटीत महाराष्ट्रधर्माची कल्पना त्यांनी मांडली. वेदादी शास्त्रग्रंथांचे प्रामाण्य स्वीकारणे, बीजक्षेत्र शुद्ध अशी जातिसंस्था असावी असा कटाक्ष पाळणे या विचारांना त्यांनी अधोरेखित केले. शिवकाळासंदर्भात चातुर्वण्र्याच्या आदर्शाची कल्पना त्यांनी चितारली. ‘पुत्रधर्म’, ‘कुलधर्म’, ‘जातिधर्म’, ‘वर्णधर्म’, ‘आश्रमधर्म’, ‘देशधर्म’ या साच्यात प्रत्येक व्यक्ती बांधली गेल्यामुळे चातुर्वण्र्याचा आदर्श उभा राहिला असे प्रतिपादन त्यांनी केले.
चातुर्वण्र्याच्या आदर्शाच्या मांडणीमधून जातीविरोधी पंथांना वगळण्याचे सूत्र राजवाडेंनी मध्यवर्ती केले. लिंगायत, जैन, मानभाव, ख्रिस्ती वगैरे सर्व अल्पसंख्याक विपरीतबुद्धी यांना वगळण्यासाठी रामाची उपास्य दैवत म्हणून निवड रामदासस्वामी यांनी केली, असा अभिप्राय राजवाडे यांनी दिला. परकेपणा व विरोधाचा भाव केवळ परमुलखातील मुस्लीम व ख्रिश्चन धर्मीयांबाबत नव्हे तर एतद्देशीय अब्राह्मणी धर्मपंथांबाबतही त्यांनी पुरस्कारला.
राजवाडेंची इतिहाससंगती वर्णजातिव्यवस्थेतील शुद्धीचा तर्क मध्यवर्ती करते. शूद्र स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या नंद राजापासून पतनाला सुरुवात झाली, महाराष्ट्रात वैदिक परंपरा तुलनेने शुद्ध रूपात राहिल्यामुळे शिवाजी महाराजांचे राज्य उदयाला आले, उत्तरेतून आलेल्या शुद्ध कुळाच्या क्षत्रियांनी मराठय़ांवर राज्य केले अशी अनेक विधाने शुद्धीच्या तर्काला गृहीत धरूनच त्यांनी केली आहेत. राजवाडेंनी प्रतिपादलेला महाराष्ट्रधर्म ब्राह्मण व क्षत्रियांना वर्णजात्याभिमान देतो, कर्तेपणाची भूमिका देतो, परतत्त्वाचा बीमोड करण्याची वर्ण-जाती-पितृसत्तेच्या नियमनांचा निर्वाह होईल हे पाहण्याची जबाबदारी देतो आणि स्त्री-शूद्रातिशूद्रांना अंकितस्थान देतो.
जोतीरावांची विद्रोही कल्पना
शिवाजी महाराजांच्या राज्यामागचा विचार काय होता हे सांगण्यासाठी जोतीराव फुले यांनी महाराष्ट्र धर्माची चौकट वापरली नाही. १८६९ मध्ये लिहिलेल्या पोवाडय़ातून शिवाजी महाराजांच्या राज्यामागचा विचार त्यांनी सांगितला. आर्य-ब्राह्मण व अनार्य शूद्रातिशूद्र यांच्यात इतिहासकाळापासून चालत आलेल्या संघर्षांचा वारसा सांगून जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजांना आत्मबोध दिला अशी नोंद त्याअनुषंगाने त्यांनी केली. तुकाराम महाराजांच्या जातिविद्रोहाच्या तत्त्वज्ञानाचा शिवाजी महाराजांशी असलेला संबंध त्यांनी त्याअनुषंगाने सांगितला. गो-ब्राह्मण प्रतिपालक, धर्मरक्षक, हिंदुराज्य संस्थापक ही शिवाजी महाराजांच्या प्रतिमेऐवजी शूद्रातिशूद्रांचा रक्षणकर्ता, शेतकऱ्यांचा तारणहार, पराक्रमी राजा असे या प्रतिमेचे स्वरूप त्यांनी अधोरेखित केले.
जोतीरावांनी इतिहाससंगतीमधून लोकसत्ताक, समताप्रधान, देशाभिमानी असा बळीच्या राज्याचा आदर्श मांडून त्या आदर्शाच्या पुनर्उभारणीचा कार्यक्रम त्यांनी इतिहासविचारात गोवला. जातिसंघर्षांच्या सातत्यक्रमाच्या आधारे गतकाळ व वर्तमानकाळातील संबंध उलगडताना अनार्य शूद्रातिशूद्रांची एतद्देशीयता त्यांनी अधोरेखित केली. स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक अवकाशाला त्यांनी व्याख्यांकित केले. शोषण, पीडन वा अन्यायाच्या प्रतिकारात इतिहासाला वळण देणारी विचारशक्ती असल्याचे त्यांनी ओळखले. विश्वधर्माच्या चौकटीत केवळ शोषण-पीडन करणाऱ्या समूहामध्ये त्यांनी परत्व पाहिले. एतद्देशीय अनार्य अस्मितेच्या साच्यात स्त्री-शूद्रातिशूद्रांचे कर्तेपण प्रवाहित करताना त्यांनी जातिव्यवस्थाक पितृसत्तेच्या जोखडातून म्हणजे पर्यायाने ब्राह्मणी धर्माच्या जुलमातून मुक्त होण्याचा कार्यक्रम दिला.
महाराष्ट्राचा विचार देणारी ही तीनही इतिहास-कल्पित प्रारूपे महाराष्ट्राच्या वसाहतीकरणाबद्दल निरनिराळी मते प्रगट करतात. स्वराज्यामागच्या विचाराबाबत भिन्न धारणा प्रगट करतात. अन्यायाच्या प्रतिकाराच्या त्यांच्या कल्पना भिन्न आहेत. अस्मिता व कर्तेपणाचे त्यातून आलेले साचेही भिन्न आहेत. वास्तवाला बदलण्याबाबतच्या त्यांच्या धारणा भिन्न आहेत. त्यांच्यात त्यामुळे कमालीचा विरोधाभास आहे. पण तरीही एकमेकांशी संघर्ष करत आणि एकमेकांमध्ये मिसळत त्यांनी महाराष्ट्राच्या आत्मिकतेला वळण दिले आहे.
लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत.
ईमेल : ubagade@gmail.com