उमेश बगाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठल्याही रोगाच्या बहुव्यापी साथीत भेदरलेल्या समाजमनातून उमटलेल्या राजकीय-सामाजिक स्पंदनांना वर्षांनुवर्षांच्या मनोघडणीचा आधार असतो. हे सद्य करोनाच्या जागतिक साथीत जसे दिसते आहे, तसेच ते सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्लेग साथीतही दिसले होते. त्या साथीतील महाराष्ट्रीय समाजमनाचा हा कानोसा..

१८९६ मध्ये प्लेगची साथ महाराष्ट्रात आली, तेव्हा मध्यमवर्गाने- म्हणजे पारंपरिकता जपणाऱ्या नव्या बुद्धिजीवींनी मुख्यत: दोन प्रकारच्या भूमिका पार पाडल्या. एका बाजूला, ब्रिटिश प्रशासनाने प्लेगची साथ रोखण्यासाठी केलेल्या दडपशाहीच्या विरोधातील जनभावनांना त्यांनी आवाज पुरवला आणि दुसऱ्या बाजूला, जनमानसातील प्लेगविषयीच्या अविवेकी धारणा दूर करण्यासाठी समाजशिक्षकाची भूमिका पार पाडली.

या प्लेगातील राजकारणाचा उलगडा ‘सबाल्टर्न स्टडीज्’चे इतिहासकार डेव्हिड अर्नोल्ड यांनी ‘टचिंग द बॉडी : परस्पेक्टिव्ह्ज ऑन द इंडियन प्लेग १८९६-१९००’ या लेखातून केला आहे. इंग्रजी शिक्षित मध्यमवर्गाने आणि शोषित-अंकित जनतेने प्लेगचे नियंत्रण करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला दिलेल्या प्रतिसादाचे त्यांनी समालोचन केले आहे.

मध्यमवर्गाची जातवर्गीय पार्श्वभूमी आणि त्यात रुजलेला सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचारव्यूह हे प्लेगच्या अनुषंगाने उद्भवलेल्या मध्यमवर्गीय प्रतिसादामागचे मुख्य प्रेरक स्रोत होते. मात्र, याचा पुरेसा शोध अर्नोल्ड यांनी त्यांच्या लेखात घेतलेला दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, प्लेग साथीतील मध्यमवर्गीयांच्या प्रतिसादामागचे  काही सामाजिक आणि वैचारिक पैलू समजून घेऊ या..

सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचारव्यूह

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रवाह महाराष्ट्रात उदयाला आला. ब्रिटिश सत्तेच्या विरोधाचा आक्रमक तत्त्वविचार या स्वरूपात तो विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या विचारांतून प्रगट झाला. चिपळूणकरांनी भारतीय इतिहास व संस्कृतीची गौरवपर संगती मांडून स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश यांच्या अभिमानाचा राजकीय विचार उभा केला.

त्या काळात पौर्वात्यवादी ज्ञानव्यवहाराचे मिशनरी, उपयुक्ततावादी आणि भारतविद्याविशारद असे जे तीन प्रवाह होते त्यातील भारतविद्येच्या प्रवाहाचे चिपळूणकरांनी अनुसरण केले. भारतविद्याविशारदांनी संस्कृत भाषा आणि आर्याच्या वैदिक परंपरा व इतिहासाचा जो गौरव केला, तो चिपळूणकरांनी जसाच्या तसा स्वीकारला. त्यांच्या ‘वेदार्थयत्न’ या निबंधामध्ये संस्कृत भाषा व प्राचीन भारताच्या गौरवार्थ भारतविद्याविशारदांनी व्यक्त केलेले विचार उद्धृत केले आहेत.

चिपळूणकरांनी स्वजातीच्या अभिमानाला सुसंगत अशी राष्ट्रकल्पना उभारली. भारतीय इतिहास, धर्म आणि संस्कृतीचे एकसाचीकरण  वैदिक-ब्राह्मणी परंपरेच्या चौकटीत करण्याची रीत त्यांनी अनुसरली. भारतीय इतिहासाच्या निरूपणातून ब्राह्मणी कर्तृत्व आणि कर्तेपणाची तरफदारी केली. पेशवाईच्या वारशाचा अभिमान बाळगला.

त्यामुळेच स्वधर्मातील व समाजातील वैगुण्ये शोधणाऱ्या सुधारणा चळवळीची आत्मचिकित्सा चिपळूणकरांना गैरलागू वाटली. कोणतीही सुधारणा करण्यामध्ये हिंदू धर्म अडथळा बनत नसल्याचे त्यांनी जाहीर केले. सुधारणा चळवळीला परधार्जिणे ठरवले. सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज आणि आर्य समाज या सुधारणावादी पंथांवर त्यांनी ‘ख्रिस्ताळलेपणा’चा आरोप केला. सुधारकांना त्यांनी पाश्चात्त्यांचे लांगूलचालन करणारे ठरवले आणि स्वधर्मनिष्ठेला राष्ट्रीय वृत्तीचा निकष मानले.  जाती, धर्म व राष्ट्र यांच्या हितसंबंधांत त्यांनी एकत्व पाहिले. स्वातंत्र्यनाश ही भारतावरची सर्वात मोठी आपत्ती मानून राजकीय स्वातंत्र्याला त्यांनी अग्रक्रम दिला आणि सामाजिक स्वातंत्र्याचा उपहास केला.

मध्यमवर्गातले विविध स्तर

मध्यमवर्गात अनेक सामाजिक आणि वैचारिक स्तर होते. त्यात पारंपरिक भटभिक्षुक, शास्त्री, पंडित, कीर्तनकार, प्रवचनकार यांनी बनलेला एक स्तर होता. त्यातले बहुतांश लोक सनातनी विचारांचे असल्यामुळे त्यांना स्वधर्मरक्षण हे राष्ट्ररक्षण ठरवणारी आणि सुधारकांना परधार्जिणे ठरवणारी चिपळूणकरांची राष्ट्रकल्पना विशेषत्वाने भावली.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणाचे प्रमाण वाढून ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाचा विस्तार झाला. ग्रामीण व निमशहरी भागातले शिक्षित त्यातून कारकून झाले. पगार कमी असल्यामुळे ते मध्यमवर्गाच्या निम्नस्तराचे भाग बनले. या नव्या मंडळींना उच्चभ्रू सुधारकांच्या पाश्चात्त्य जीवनशैलीचे आकर्षण व असूयाही वाटत राहिली. जात्याभिमान, धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान यांचे एकत्व कल्पिणारा आणि सामाजिक सुधारणांची रेवडी उडवणारा चिपळूणकरांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद त्यामुळे त्यांना आत्मीय वाटू लागला.

उच्च शिक्षण घेतलेला तरुणांचा एक समूह चिपळूणकरांच्या आक्रमक लेखनशैलीने प्रभावित झाला. राष्ट्रीय हितसंबंधांव्यतिरिक्तचे हितसंबंध गौण मानून वसाहतवादविरोधी राजकारणात या तरुण मंडळींनी उडी घेतली. चिपळूणकरांचे अनुयायित्व पत्करलेल्या बाळ गंगाधर टिळकांनी हे सांस्कृतिक राष्ट्रवादाचे राजकारण पुढे नेले. ‘घर’ आणि ‘धर्म’ ही क्षेत्रे राष्ट्राची आंतरिक बाब मानून परक्या इंग्रज सरकारचा व परधर्मीयांचा हिंदू धर्म सुधारणेतील हस्तक्षेप त्यांनी गैरलागू ठरवला.

मध्यमवर्गात नांदणारे हे विभिन्न गट सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली आपापले सामाजिक संदर्भ व समज घेऊन प्लेगच्या साथीच्या काळात सरकारी जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र आले. प्लेगला आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने आखलेल्या नीतीची आणि व्यवहाराची चिकित्सा त्यांनी आरंभली.

ब्रिटिश सरकारचे प्लेगविषयक धोरण वंशवर्चस्वाच्या योजनेतून आकाराला आले होते. साथीच्या रोगापासून सत्ताधारी गोऱ्या समुदायाचे संरक्षण करण्याच्या हेतूने कायदे आणि अंमलबजावणीची यंत्रणा उभी करण्यात आली होती. प्लेगच्या जिवाणूंचा प्रसार कसा होतो, याचा शोध लागला नसल्यामुळे मानवी लागण रोखण्यावर त्यात भर देण्यात आला होता. रोग्याला निरोगी लोकांपासून अलग करणे, त्याला रुग्णालयामध्ये भरती करणे, रोग्याच्या वस्तू र्निजतुक करणे वा नष्ट करणे.. अशी नीती प्लेगची साथ रोखण्यासाठी आखण्यात आली होती.

मात्र, प्लेगचा रोगी शोधण्यासाठी घराची झडती घेणे, संशयित रुग्णाची शारीरिक तपासणी करणे, सर्वादेखत  रेल्वेतील स्त्री-पुरुष प्रवाशांची शारीरिक तपासणी करणे या सरकारी उपद्व्यापांना मध्यमवर्गाकडून मोठा विरोध झाला. विशेषत: परपुरुषांकडून होणारी स्त्रियांची शारीरिक तपासणी ‘शुद्धी’च्या चष्म्यातून पाहिली गेल्यामुळे तीव्र निषेधाची बाब बनली.  सरकारी यंत्रणेकडून केला जाणारा घराच्या आणि स्त्रियांच्या मर्यादेचा भंग हा विटंबना व अपमानाचे कारण मानण्यात येऊ लागला. त्यामुळे मध्यमवर्गाच्या धुरीणत्वाखाली सामान्य जनतेचा असंतोष सामुदायिक स्वरूपात व्यक्त झाला.

रँड, टिळक आणि चाफेकर

टिळकांनी प्लेगविरुद्धच्या संघर्षांत आघाडी घेतली. प्लेगच्या निर्मूलनात सरकारी यंत्रणेकडून होणाऱ्या अतिरेकाच्या व जुलमाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. प्लेग कमिशनर म्हणून पुण्यात आलेल्या वॉल्टर रँडने म्युन्सिपालटीचे अधिकारक्षेत्र संपुष्टात आणले. स्थानिक नेतृत्वापेक्षा लष्करी जवान हे प्रामाणिक व शिस्तबद्ध असल्याचे सांगून प्लेग निर्मूलनाचा कारभार लष्कराच्या ताब्यात दिला. म्हणून रँडच्या धोरणावर टिळकांनी टीका केली. प्लेगचे नियंत्रण करण्यासाठी सरकारने आखलेल्या उपाययोजनांबाबत त्यांची तक्रार नव्हती; त्यांचा रोख अंमलबजावणीतील अतिरेकावर होता.

सामान्य लोकांमध्ये पाश्चात्त्य वैद्यकीय ज्ञानाचे भय नांदत होते. रुग्णालयांमध्ये विष दिले जाते, प्लेगप्रतिबंधक लसीमुळे पुरुष नामर्द बनतात, तर स्त्रिया वंध्य होतात, अशा अफवा सर्वदूर पसरल्या होत्या. त्यातच हिंदू-मुस्लीम धर्मातील पारंपरिक बुद्धिजीवींनी पाश्चात्त्य वैद्यक ज्ञानाविरोधी भूमिका घेतली. ‘मशीद हेच रुग्णालय’ असल्याचे मुल्ला- मौलवींनी जाहीर केले; तर ‘आयुर्वेदामध्ये प्लेगचा उल्लेख असून दमट हवेमुळे, कफकारक व पचायला जड अन्नपदार्थाचे सेवन केल्यामुळे आणि ओल्या अंथरुणावर निजल्यामुळे प्लेग होतो’ असे एका वैद्याने जाहीर केले. जनमानसात पसरलेल्या अशा अविवेकी धारणांचे टिळकांनी खंडन करण्याचा प्रयत्न केला. पाश्चात्त्य वैद्यकीय ज्ञानाचे महत्त्व त्यांनी आग्रहाने प्रतिपादले. मात्र, प्लेग निर्मूलनात सरकारी यंत्रणेकडून सोवळेपणाचे उल्लंघन होत असल्याच्या उच्च जातीयांच्या धारणांचा निरास करण्याच्या फंदात ते पडले नाहीत.

सोवळेओवळेपणाच्या नियमांचे उल्लंघन हे ब्राह्मणबहुल मध्यमवर्गीयांच्या असंतोषाचे प्रबळ कारण होते. चाफेकरांच्या ‘आत्मवृत्ता’त त्याची नोंद सापडते. देवधर्म, सोवळेओवळे यांचा उपमर्द होईल अशी गोऱ्या अधिकाऱ्याची वर्तणूक रँडसाहेब खुशीने पाहात असतो, याचा त्यांना राग आला. परधर्मीय आणि अशुद्ध म्हणून त्यांनी ब्रिटिशांचा विरोध केला. ‘अरे मारतो वासरे आणि गाई महादुष्ट चांडाल, जैसे कसाई हराक्लेश तिचे मरा-आंग्ल मारा, रिकामे नका राहू भूमिभारा।।’ या त्यांच्या कवनातून ब्रिटिशांचे परकेपण आणि अशुद्धता जाहीर केली. आर्यपुत्राचे कर्तव्य पार पाडण्याच्या भूमिकेतून त्यांनी रँडला ठार मारले. सांस्कृतिक राष्ट्रवादामध्ये राष्ट्रीय आत्मतत्त्व शुद्धीने, तर परतत्त्व अशुद्धीने चिन्हित होत असल्याचीच ही परिणती होती.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल : ubagade@gmail.com