उमेश बगाडे

इतिहासविचारातून वर्तमानाकडे पाहण्याच्या पद्धतींत आणि दृष्टिकोनांत कसा फरक पडतो हे चिपळूणकर, रानडे आणि फुले यांच्या लिखाणातून दिसते..

वैज्ञानिक विचारपद्धतीच्या अनुकरणातून आधुनिक इतिहासकल्पना आकाराला आली. तिने साधनांचा अस्सलपणा व विश्वासार्हता ठरवणारी चिकित्सेची पद्धत (साधनचिकित्सेची पद्धती) सार्वत्रिक केली. तथ्य शाबीत करण्याची व कार्यकारणभावाच्या चौकटीत गतकाळातील घटनाक्रमाची संगती लावण्याची पद्धतीही तिने रूढ केली. भूत, वर्तमानकाळ यांना परस्परांच्या संबंधांत समजून घेण्याची आणि सातत्य व बदल शोधण्याची दृष्टी तिने अंगीकारली. वैश्विक चौकटीत मानवी कर्तेपणाची संगती लावण्याची रीत तिने घालून दिली.

आधुनिक इतिहासाची ही कल्पना वासाहतिक काळात महाराष्ट्रात दाखल झाली. वासाहतिक शिक्षण-व्यवस्थेतून आणि विशेषत: ब्रिटिश अधिकारी, ख्रिस्ती मिशनरी व भारतविद्या-विशारदांच्या लेखनातून इतिहासाचे तत्त्वज्ञान, पद्धतीशास्त्र यांचा उलगडा नवशिक्षितांना झाला. वासाहतिक इतिहासलेखनातून चाललेल्या प्रभुत्व प्रस्थापनेच्या योजनेचे भानही त्यांना आले.

वसाहतवादी इतिहासलेखन

वसाहतवादी इतिहासलेखनात वर्चस्ववादाची तीव्र प्रवृत्ती आढळते. स्थळ-काळाचे एकवटीकरण करून भारताविषयी विधाने करण्याचा सपाटा दिसतो. उपयुक्ततावादी विचारवंत जेम्स मिल यांच्या ‘हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथात त्याचा पडताळा येतो. त्यांनी ‘अधिकात अधिक लोकांचे सुख’ या  उपयुक्ततावादी सूत्राचा मापदंड घेऊन प्राचीन भारताची नकारात्मक मीमांसा केली. भारतीय शासनपद्धतीला आशियाई जुलूमशाही म्हणून हिणवले. इथले धर्म, संस्कृती, समाज ज्ञान, विज्ञान यांची मागास, असभ्य म्हणून संभावना केली.

भारतविद्याविशारदांच्या प्रभावाखाली प्राचीन भारताच्या इतिहासाची गौरवपर संगती लावण्याचे काम अधिकाऱ्यांच्या एका गटाने केले. माऊंटस्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी लिहिलेल्या भारताच्या इतिहासातून त्याचे प्रत्यंतर येते. त्यांनी भारताच्या इतिहासाची साक्ष काढून हळूहळू सुधारणांना पुढे नेण्याची भूमिका घेतली. तत्त्वज्ञान, खगोल, गणित, आरोग्यविद्या अशा क्षेत्रांतील भारतीयांच्या कामगिरीची गौरवपर नोंद केली. मिल आणि एलफिन्स्टन यांच्या इतिहास मांडणीत असा फरक असला तरी वसाहतवादी हितसंबंधांबाबत त्यांचे मतैक्य होते, ब्रिटिश उदारमतवादी परंपरेकडे दोघेही गौरवाच्या भावनेनेच पाहात व त्या चौकटीत भारतात सुधारणा करण्याची भूमिका घेत होते.

उदारमतवादाची कास पकडत इंग्लंडमधली व्हिग इतिहासलेखन परंपरा आकाराला आली. घटनात्मक बांधिलकी, लवचीकता व धिम्या गतीचा सुधारणावाद ही व्हिग परंपरेची खास वैशिष्टय़े होती. ब्रिटनच्या लोकशाही संस्थांच्या विकास-परंपरेचा त्यांना अभिमान होता. इतिहास प्रगतीच्या दिशेने प्रवास करत असतो अशी त्यांची धारणा होती. थॉमस बाबिंग्टन मेकॉले, एडमंड बर्क हे या व्हिग इतिहासलेखन परंपरेचे प्रतिनिधी. मेकॉले यांनी इंग्लंडचा इतिहास लिहिला. तथ्यांच्या उपयोगितेची मातब्बरी मानण्याऐवजी युगप्रवृत्तीला अभिव्यक्त करणारे इतिहासलेखन करण्याची भूमिका त्यांनी घेतली. खरे तर, हे रोमँटिक इतिहासलेखन प्रवृत्तीचेच निदर्शक होते. मेकॉले यांच्या इतिहासलेखनात साहित्यिक भरजरी भाषा तसेच तुलनेची प्रवृत्ती आढळते. भारताच्या शिक्षणविषयक धोरणाचे ‘मिनिट्स’ लिहिताना भारताच्या ज्ञान-विज्ञानाबाबत त्यांनी जी तुच्छता व्यक्त केली त्यामुळे वसाहतवादी वर्चस्ववादाचे ते प्रतीक बनले.

चिपळूणकरांची इतिहासदृष्टी

इतिहासविचाराबाबत वासाहतिक वर्चस्ववादाचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी केला. ‘इतिहास म्हणजे इतिवृत्त’ अशी व्याख्या करून व्हॉन लिओपाल्ड रांकेच्या प्रत्यक्षार्थवादी इतिहासविचाराचे अनुसरण केले. इतिहासलेखनासाठी पडताळणीयोग्य प्रमाणाची गरज त्यांनी प्रतिपादली. प्राथमिक साधनांना प्राधान्य देण्याचा विचार अंगीकारून काव्यइतिहास संग्रहातून मराठय़ांच्या इतिहासाची प्राथमिक साधने प्रकाशित करण्याचा क्रम सुरू केला.

भारतीय आणि पाश्चात्त्य जीवनशैलींची तुलना करून गोऱ्या राज्यकर्त्यांच्या श्रेष्ठत्वाला त्यांनी आव्हान दिले. शास्त्रीय ज्ञानाच्या आधारे ख्रिस्ती धर्माच्या सृष्टीविषयक कल्पनेचे त्यांनी वाभाडे काढले. मद्य, मांस सेवन करणे, परपुरुषाबरोबर नृत्य करणे या युरोपीय चालीरीतींची ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाच्या नैतिकतेआधारे त्यांनी निर्भर्त्सना केली. हिंसक वृत्ती  आणि गुलामीची अमानुष प्रथा यांना लक्ष्य करून युरोपीय सभ्यतेच्या नैतिक श्रेष्ठतेला आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रीय बाण्यातून वसाहतवादी इतिहासकारांना ते लक्ष्य करत असले तरी मेकॉले, बर्क व मिल यांच्यासारखे इतिहासकार भारतात उदयाला येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

इतिहासाचा अभाव हे ‘भारताच्या प्राचीन विद्येचे व्यंग’ असल्याचे सांगून निवृत्तीवादी अध्यात्मविचारामुळे भारतीयांची इतिहासाची जाण दुबळी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिज्ञासा तृप्त करणे, सदुपदेश करणे, मनास उन्नती व प्रसन्नत्व देणे, मनोरंजन करणे, नीतिज्ञान देणे व मनाचे पोषण करणे असे इतिहासाचे उपयोग त्यांनी सांगितले. ‘इतिहास म्हणजे थोर पुरुषांची चरित्रें’ हे थॉमस कार्लाईलचे मत त्यांनी उचलून धरले. जगाचा इतिहास प्रगमनशील आहे अशी धारणाही त्यांनी स्वीकारली. गुण आणि कर्तृत्व परिस्थितीच्या अनुकूलतेतून आकार घेते असे मत त्यांनी मांडले.

गतकाळाविषयी आदर व आस्था दाखवणारी रोमँटिक इतिहासलेखनाची प्रवृत्ती त्यांनी अंगीकारली. लालित्यपूर्ण भाषा, भावनात्मकता आणि मध्ययुगीन इतिहासाची वर्णने याला त्यांनी पसंती दिली. इतिहासाला आत्मगौरवाची गाथा म्हणून पाहण्याची भूमिका त्यांनी घेतली. प्राचीन भारतीयांच्या संस्कृतीची, कर्तृत्वाची, ज्ञान-विज्ञानाची भलावण केली. भारताला जगद्गुरूची उपमा दिली. चिपळूणकरांच्या इतिहासविचारातून ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाच्या अस्तित्व-कर्तृत्वाला मध्यवर्तित्व देणाऱ्या राजकीय स्वातंत्र्याची व सांस्कृतिक राष्ट्रकल्पनेची घडण झाली.

रानडेंचा इतिहासविचार

व्हिग विचार परंपरेतील एडमंड बर्क यांचा प्रभाव न्यायमूर्ती रानडेंवर पडला होता. बर्क हा धिम्या गतीच्या सुधारणांचा प्रणेता होता. फ्रेंच क्रांतीचा टीकाकार होता. फ्रेंच क्रांतीतील जनतेच्या उठावावर अनियंत्रित वर्तनाचा शेरा त्याने मारला. विचारांच्या विकासाची पूर्वअट वर्तनाचा विकास असल्याचे त्यांनी जाहीर केले. स्वातंत्र्य या कल्पनेतील सूक्ष्मता फ्रेंच क्रांतीला उमजली नाही; केवळ संस्थात्मक विकासातूनच समता प्रस्थापित होते याचे भान आले नाही अशी टीका त्याने फ्रेंच क्रांतीवर केली. परंपरेला वाट पुसत सुधारणा करण्याचा मार्ग बर्क यांनी सांगितला. त्या प्रभावाखाली संयत सुधारणावादाची कास रानडेंनी धरली. समाज व व्यक्तीचा संबंध जैविक असतो. व्यक्ती स्वयंभू नसून समाजाधीन असतात, हे बर्कचे सूत्र त्यांनी अंगीकारले.

उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या चौकटीत इतिहास प्रगती करत असतो असे रानडे यांनी मानले. इतिहासाला विचार वळण देत असतात हे विल्हेम हेगेलचे सूत्र त्यांनी मान्य केले. ‘राइज ऑफ मराठा पॉवर’ या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामागे ‘महाराष्ट्र धर्म’ ही विचारशक्ती काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारकरी भक्ती चळवळीला प्रोटेस्टंट हिंदुधर्म असे त्यांनी संबोधले. जातिभेदास नकार, समाजऐक्याचा विचार, धर्मसमन्वय व नीतीचा आग्रह या चळवळीच्या तत्त्वांनी महाराष्ट्रधर्मास आकार दिला असे रानडे सांगतात.

विचार ही इतिहासाची प्रेरकशक्ती असते हे हेगेलचे सूत्र जरी रानडेंनी स्वीकारले असले तरी हेगेलचा द्वंद्वात्मकतेचा सिद्धांत मात्र त्यांनी स्वीकारलेला दिसत नाही. जैविक उत्क्रांतिक्रमाचे सूत्र त्यांच्या इतिहासलेखनात दिसते. जमिनीची मशागत, बीज लावले, बीज अंकुरले, वृक्ष बहरला, वृक्षाला फळे आली अशी शीर्षके त्यांनी ग्रंथातील प्रकरणांना दिली आहेत. रानडेंचा इतिहासविचार भूतकाळाचा वर्तमानकाळाशी असलेला संबंध सांगत होता. सर्वागीण संयत सुधारणावाद व समावेशक राष्ट्रवाद यांची घटना करत होता.

जोतीराव फुलेंचा इतिहासविचार

एडमंड बर्क यांच्या वैचारिक विरोधात उभ्या असलेल्या थॉमस पेन यांचा विचार जोतीरावांनी स्वीकारला. पेन हे फ्रेंच क्रांतीचे ते समर्थक होते. मानवी हक्काच्या विचारांचा पुरस्कार करताना समतेचे सर्वंकष समर्थन केले. इतिहासक्रमात जुनी व्यवस्था व परंपरा मोडण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादली. पेनच्या विचारांच्या पायावर भारतात जातिअंताची समाजक्रांती करण्याची भूमिका जोतीरावांनी घेतली.

जोतीरावांनी लिखित पुराव्याला महत्त्व देणाऱ्या रूढ इतिहास पद्धतीमुळे शूद्रातिशूद्रांच्या इतिहासाची झालेली कोंडी गॅम्बाटिस्ता विको या तत्त्वज्ञाच्या विचारपद्धतीची मदत घेऊन फोडली. व्हिग इतिहासलेखन परंपरेच्या प्रभावाखाली महाराष्ट्रात केवळ राजकीय इतिहास लिहिला जात असताना सामाजिक इतिहासाची मांडणी केली. भारतीय इतिहासातील सामाजिक द्वंद्व अचूकपणे ओळखले, भारतात अव्याहत चाललेल्या वर्णजाती संघर्षांची मांडणी केली. विचार व हिंसा या इतिहासाच्या प्रेरक शक्ती असल्याचे मत मांडले.

इतिहास प्रगतीच्या दिशेने जात असतो हे तत्त्व स्वीकारताना उत्क्रांतिक्रमात मानवी इतिहासाला जोतीरावांनी उभे केले. फुलेंप्रमाणे चिपळूणकरांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मानला असला तरी ‘सक्षम ते टिकतील’ या सूत्राआधारे ब्राह्मण वर्चस्वाची भलावण झाली होती. रानडेंनी परंपरा न मोडता संयत सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठी उत्क्रांतीचा सिद्धांत वापरला. जोतीरावांनी मात्र उत्क्रांतिक्रमात क्रांती होऊ शकते अशी भूमिका घेतली. जोतीराव फुले यांचा हा इतिहासविचार सामाजिक दास्यमुक्तीच्या संघर्षांची आणि जातीउच्छेदक राष्ट्रवादाची मांडणी करतो.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

ईमेल : ubagade@gmail.com

Story img Loader