उमेश बगाडे
पाश्चात्त्य प्रेमकल्पनेचा स्वीकार करताना व्यक्तिस्वातंत्र्य व रूढींपाशी अडखळलेले १९ व्या शतकातील बुद्धिजीवी, साहित्यातून ‘शुद्ध प्रेमा’चा पुरस्कार करू लागले. ताराबाई शिंदे यांनी या आस्वादातील पुरुषप्रधानता उघड करणारे स्त्री-भान दिले..
उगवत्या इंग्रजी शिक्षित मध्यमवर्गाने वर्गीय ओळख सांगण्यासाठी ‘साहेबाच्या’ जीवनशैलीसह पेहराव, केशभूषा, अभिवादन पद्धती, चालणे-बोलणे अशा व्यक्तित्वदर्शक चालीरीती; कात्री, कागद, टाक, पुस्तके वगैरे वस्तू; मेज, खुर्ची असे फर्निचर; दिवाणखाना, स्वयंपाकघर असा घराचा अवकाश या उपभोगाच्या वस्तू; छंद, खेळ, सहल अशा विरंगुळ्याच्या गोष्टी, विचार वा तर्क करण्याच्या पद्धती, अभिवृत्ती, सौंदर्यासक्ती अशा आत्मिक बाबींचे अनुकरण केले. या प्रक्रियेत पाश्चात्त्य मध्यमवर्गीय समाजपरिवेशातील प्रेमकल्पनेचा परिचय नवशिक्षितांना झाला. ही प्रेमकल्पना भांडवली आधुनिकतेच्या मुशीत घडली असल्याने व्यक्तिस्वातंत्र्याची मूल्ये जपणारी होती. स्त्री-पुरुषांना जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य आणि लग्नापूर्वीच्या प्रियाराधनाची (कोर्टशिप) मोकळीक देणारी होती. प्रियाराधनातल्या समानतेचा व त्यातील रोमँटिक स्वरूपाच्या उत्कट जवळिकीचा अनुभव देणारी होती.
पाश्चात्त्य प्रेमकल्पनेच्या तात्त्विक रूपाबरोबर प्रेमाची नवी भाषा आणि तिचे उत्कट प्रतिमाविश्व पाश्चात्त्य साहित्यातून नवशिक्षितांना समजू लागले. रोमँटिसिस्ट साहित्यप्रवाहाने भावनिक प्रेमाची स्थळकाळातीत, वैश्विक कल्पना उचलून धरली. व्यक्ती म्हणून प्रेमाच्या उत्कट, कल्पनारम्य जवळिकीच्या नात्याला, आंतरिक उमाळ्याला प्रकट करण्याची भूमिका घेतली. वर्डस्वर्थ, कोलरिज, किट्स, शेली, बायरन अशा कवींनी प्रेमातील तरल पण अस्थिर मनोवस्था व्यक्त केली, प्रेमाचे नवे प्रतिमाविश्व घडवले, प्रेमाच्या भावनिक निष्ठेचे उदात्तीकरण केले.
वासाहतिक समक्षतेमधून स्त्री-पुरुष संबंधांच्या व आदर्शाच्या नव्या प्रतिमा नवशिक्षितांसमोर येऊ लागल्या. शेक्सपियरच्या ‘रोमिओ अॅण्ड ज्यूलिएट’ नाटकातून समर्पित प्रेमिकांची कल्पना पुढे आली. कविता, कथा, कादंबरी, नाटक यातून कामुक, भावुक, नैतिक प्रेमसंबंधांच्या प्रतिमा चितारण्यात आल्या. स्त्री-पुरुषांच्या रूप-सौंदर्याची व त्यांच्या आंतरिक गुण-कौशल्याची प्रतिमाने त्यात रंगवण्यात आली. विशेषत: सहनशील, गृहकृत्यदक्ष, शालीन, समर्पित स्त्रीची तर उदार, सभ्य, कर्तृत्ववान व पराक्रमी पुरुषाची प्रतिमा व्हिक्टोरियन साहित्यातून रंगवण्यात आली. ख्रिस्ती विवाहातील सख्यभावी प्रेमाचे प्रतिमानही त्यात चितारण्यात आले.
प्रचलित समाजात आधुनिक प्रेमकल्पनेला थारा नसल्याचे इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींच्या लक्षात आले. वर्गोन्नतीनंतरही जात-पितृसत्तेचे नियमन कायम राहत असल्याने व्यक्तीच्या स्वायत्ततेला वाव नव्हता. बालविवाहाच्या पारंपरिक चालीमुळे जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याची कल्पनाही करता येत नव्हती. शिक्षणबंदी, विधवाविवाह प्रतिबंध अशा चालींमुळे प्रियाराधनातील संवादाच्या समतेची स्थिती स्त्रिया गाठू शकत नव्हत्या. खासगीपणाचा अवकाश अत्यल्प, म्हणून सख्यभावी प्रेमाला आधार सापडत नव्हता.
प्रेमकल्पनेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान लक्षात घेऊन विवाहसंस्थेतील सुधारणेचा पुरस्कार सुधारकांनी केला. पूर्वपरंपरेतील स्वयंवराचे व गांधर्व विवाहाचे उदाहरण देऊन जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य त्यांनी अधोरेखित केले. स्त्रीशिक्षणबंदी, बालविवाह, विधवाविवाह प्रतिबंध अशा स्त्री स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या प्रथांविरोधात त्यांनी लढाई सुरू केली. पती-पत्नीमधील सख्यभावी प्रेम फुलण्यासाठी स्त्री शिक्षणाची आवश्यकता त्यांना वाटली. पतिव्रता धर्माचे व उत्तम गृहिणी बनवण्याचे शिक्षण स्त्रियांना देण्याचा आग्रह त्यांनी धरला.
आधुनिक प्रेमकल्पनेचे तीव्र आकर्षण आणि कुटुंब, जात-पितृसत्तेची अधीनता पत्करण्याची भूमिका या द्वंद्वात सुधारक अडकलेले दिसतात. त्याची सोडवणूक न्यायमूर्ती रानडेंनी त्यांच्या परीने केली. ‘रत्नप्रभा’ कादंबरीवर अभिप्राय लिहिताना स्त्री-पुरुषातील प्रेमाची महत्ती त्यांनी गायली. प्रकृतिधर्माचे सर्व बंधारे फोडून माणसाला उदात्त स्वार्थत्याग करायला लावणारा प्रेम हा विकार असल्याचे सांगून विवाहबंधनात परिणत होणारे उभयपक्षी प्रेम त्यांनी इष्ट मानले. हिंदू धर्मात प्रेमाला अणुमात्र स्थान नसल्याबाबतची खंत व्यक्त करताना प्रेमातील स्वातंत्र्यापेक्षा त्यागाची बाजू मांडून परंपरारक्षणाची भूमिका त्यांनी घेतली.
वैदिक परंपरेच्या चाकोरीत विवाहसंस्थेत सुधारणा करण्याची भूमिका घेतल्यामुळे प्रेमाचे समान स्वातंत्र्य देणारी पाश्चात्त्य प्रेमकल्पना रानडेंना हिंदू कुटुंब व विवाहसंस्थेला आव्हान देणारी वाटली. त्यांनी त्याबाबत धोक्याचा इशारा दिला. भारतात उदार वाटणाऱ्या पूर्वपरंपरेतही स्त्रीला कुटुंबसंस्थेच्या अधीन राहण्यासाठी भाग पाडले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वयंवरात पित्याने ठेवलेला ‘पण’ जिंकणाऱ्या पुरुषाशी विवाह करणे स्त्रीला बंधनकारक होते आणि स्त्री-पुरुषाच्या उभयपक्षी कर्तेपणाला वाव देणारे गांधर्व विवाह अपवादानेच घडत होते असे तर्क देऊन स्वातंत्र्यावर भर देणाऱ्या पाश्चात्त्य प्रेमकल्पनेचा अव्हेर त्यांनी केला.
गोपाळ गणेश आगरकरांनी मात्र स्त्री-पुरुषांच्या समान स्वातंत्र्याला अधोरेखित करणाऱ्या प्रेमाच्या कल्पनेला उचलून धरले. निसर्गातील पशुपक्षी, वनस्पतींची स्वयंवरे सहमतीनेच होतात, असे सांगून प्रेम-निर्णयाच्या स्वातंत्र्याला त्यांनी अधोरेखित केले. बालविवाहाची प्रथा या मूलभूत स्वातंत्र्यालाच मोडून काढणारी असल्याने त्यावर त्यांनी कोरडे ओढले. परपुरुषाचे व परस्त्रीचे चिंतन न करणारे किती लोक आहेत? शकुंतला, मालती, वत्सला, सुभद्रा, दमयंती यांच्या प्रेमकलापांच्या पौराणिक कथांमध्ये तुम्ही रस का घेता? असे प्रश्न विचारून भारतीयांच्या दांभिकतेवर त्यांनी प्रहार केला.
प्रेमातून विवाहबंधनाकडे जाणाऱ्या पाश्चात्त्य रीतीची त्यांनी भलावण केली. तारुण्यसुलभ वृत्ती जागवल्यावर वाटणाऱ्या आकर्षणातून परस्परांना प्रिय होण्यासाठी धडपडणे, विद्या, वित्त व सौंदर्य अशा गुणांनी एकमेकांना मोहात पाडणारे प्रियाराधन करून विवाहमैत्री करणे या पाश्चात्त्य रीतीचे त्यांनी कौतुक केले. स्त्री स्वातंत्र्याची गरज त्यांनी मानली. स्त्रियांना हवे ते कपडे, दागिने लेण्याचे, विवाह करण्याचे व घटस्फोटाचे निर्णयस्वातंत्र्य असले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. विधवाविवाह, मिश्र विवाह यांचे आगरकरांनी स्वागत केले.
स्त्री-भानाचा प्रतिसाद
पाश्चात्त्य प्रेमकल्पनेने चाळवलेल्या नवशिक्षितांनी प्रेमाचे चित्रण करण्याचा उद्योग आरंभला. पाश्चात्त्य चटोर साहित्याबरोबर संस्कृत साहित्यातील, पुराणकथांमधील प्रेमसंबंधाचे संदर्भ गोळा करून कथा, कादंबऱ्या, नाटक, कवितांमधून त्याचे वर्णन करण्यास सुरुवात केली. कामुक प्रेमवर्णनाच्या आणि स्त्री-देहाच्या वस्तुकरणाच्या संस्कृत साहित्यातील प्रवृत्तीचे त्यांनी अनुसरण केले. मराठी साहित्यातील या प्रवृत्तीवर ताराबाई शिंदे यांनी जोरदार हल्ला चढवला. भर्तृहरीच्या काव्यातील स्त्रीच्या अतिरंजित वर्णनावर त्यांनी टीका केली. स्त्रीधर्म, स्त्रीचरित, स्त्रीस्वभाव अशा अवास्तव चौकटीत स्त्रीचित्रण करण्याच्या प्रवृत्तीवर त्यांनी कोरडे ओढले.
प्रेमसंबंधाच्या चित्रणात स्त्रियांची अवास्तव स्खलनशील प्रतिमा का रेखाटली जाते असा प्रश्न ताराबाईंनी उपस्थित केला. पती-पत्नीमधील वास्तविक प्रेमसंबंध हा स्वामी-सेवक संबंधात उभा असतो, स्वामित्वभावी पुरुषाच्या हाती हिंसेचा बडगा असतो तर स्त्रीच्या बाजूला असहायता असते. पतीच्या प्रेमाचे दोन शब्दही तिच्या वाटय़ाला येत नसतात. स्त्रियांवर गुलामी लादणाऱ्या समाजातील प्रेमसंबंधात स्त्रिया सावजाच्या स्थितीत असतात तर पुरुष शिकाऱ्याच्या भूमिकेत असतात या समाजवास्तवाकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्त्री-पुरुषांच्या विषम संबंधात प्रेमाची जबाबदारी स्त्रियाच घेत असल्याचे ताराबाईंनी नजरेस आणले. काळजी, सेवा, संगोपन स्त्रियाच करत असतात; प्रेमातील समर्पणभाव त्याच बाळगत असतात; आग्यावेताळ नवऱ्याच्या घराला घरपण देण्याचे कामही त्याच करत असतात याचे भान त्या करून देतात. पतीसाठी आणि कुटुंबासाठी अग्नीसारखे जळत राहून स्वत्वाभिमानाचा संघर्ष स्त्रियांनी करावा असे आवाहन त्या करतात. आणि त्यातून पत्नीप्रेमाचा लढाऊ प्रतिआदर्श उभा करतात.
पुरुष-भानाची कोंडी
सख्यभावाच्या प्रेमकल्पनेने नवशिक्षित पुरुषांवर गारुड केल्यामुळे स्वस्त्रियांना शिक्षित करून बरोबरीला आणण्याची धडपड सुरू झाली. मात्र, स्वामित्वभावी पुरुषाच्या नियमनाखाली शिकण्याचा स्त्रियांचा अनुभव विलक्षण जाचक होता. गोपाळराव व आनंदीबाई जोशी, न्यायमूर्ती आणि रमाबाई रानडे या उदाहरणांतून त्याचा प्रत्यय येतो. बरोबरीचे स्थान न देता बरोबरीला आणण्याच्या या प्रयत्नात पती-पत्नी प्रारूपातील गुरू-शिष्य, स्वामी-सेवक संबंध कायम राहात असल्यामुळे सहजीवनातील प्रेमसाफल्याचे काही क्षण मिळाले तरी सख्यभावाचे प्रेम मात्र त्यात दुरावत राहिले.
जात-पितृसत्तेच्या दावणीला बांधलेल्या स्वस्त्रीची प्रतिमा आधुनिक स्त्रीप्रतिमेशी जुळत नसल्याने शिक्षित पुरुषांच्या प्रेमकल्पनेची कोंडी होऊ लागली. त्यातून कल्पनारम्य रोमँटिक प्रेमाचा आश्रय घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. बालविवाहाच्या प्रथेमुळे विवाहपूर्व प्रियाराधनाची शक्यता नसल्यामुळे त्यात भरच पडली. त्यामुळे सामाजिक वास्तवाचा वेध घेणाऱ्या केशवसुतांच्या आधुनिक कवितेने प्रेमाच्या बाबतीत कल्पनारम्यतेचा मार्ग पकडला. स्वप्रतिमेच्या पडछायेत प्रेमपात्राची कल्पना त्यांनी केली. मर्यादा उल्लंघून प्रियकराशी एकरूप होणाऱ्या प्रेमिकेची प्रतिमा रंगवून तिने प्रेमी म्हणून आपल्याला संबोधावे अशी आर्जवे त्यांनी केली. पती-पत्नी संबंधात होणाऱ्या सख्यभावी प्रेमाच्या कुंठेतून कल्पनेचे व इच्छांचे विश्व रचायचे आणि त्या चौकटीत परतून पती-पत्नी संबंधाकडे पाहायचे या द्वंद्वात १९व्या शतकातील नवशिक्षित अडकले.
लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत.
ईमेल : ubagade@gmail.com