उमेश बगाडे
वासाहतिक काळात इतर जातींप्रमाणे ब्राह्मण जाती-अस्मिताही घडत असताना, विष्णुशास्त्री चिपळूणकर व लोकहितवादी त्याकडे भिन्न दृष्टिकोनांतून पाहतात..
कोणतीही ओळख वा अस्मिता घडवण्याच्या प्रक्रियेत संबोधक नामांचा उपयोग केला जात असतो. स्त्री-पुरुष, माता-पिता अशा लिंगभाववाचक अस्मिता असोत; सुतार, लोहार अशा जाती-अस्मिता असोत की धर्माच्या अस्मिता असोत; सर्व प्रकारच्या ओळखी वा अस्मिता त्या त्या संबोधक नामातून उभ्या केल्या जात असतात. संबोधक नामनिर्देशातून घडणाऱ्या अस्मितेच्या प्रक्रियेला लुई अल्थूझर या फ्रेंच समाजचिंतकाने ‘इंटरपेलेशन’ ही संज्ञा वापरली आहे.
अस्मितेची बांधणी
अल्थूझरच्या मतानुसार, विचारप्रणालीत्मक राज्य यंत्रणेच्या (आयडियोलॉजिकल स्टेट अॅपरेटस) मुशीत, सामाजिक संबंधाच्या रचनेत संबोधक नामे ओळखी व त्यांचे आत्मभान घडवत असतात. विचारसरणीच्या चौकटीत जी संबोधक नामे उभी राहात असतात, त्यातून सामाजिक स्थान व भूमिका प्रदान करणारे स्वभान दिले जात असते. ते जसे दिले जात असते, तसे अर्जितही केले जात असते. संबोधक नामातून येणाऱ्या ओळखीचे आत्मभान पत्करून त्या त्या भूमिकांचे व सामाजिक स्थानाचे कर्तेपण व्यक्ती साकारत असते. उदाहरणार्थ, ‘मुलगा’ व ‘मुलगी’ ही लिंगभावात्मक ओळख देणारी संबोधक नामे पितृसत्तेच्या विचारसरणीची द्योतक असतात. ती सामाजिक स्थान आणि भूमिका देणाऱ्या ओळखींच्या वर्तनचौकटींचा निर्देश करतात. त्यांचा अंगीकार करताना मुले आणि मुली त्यांच्या लिंगविशिष्ट भूमिकांना अनुरूप वागत असतात.
जातीसंबोधक नामांबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या मते, जातीच्या नावांमुळे जातीच्या अस्तित्वाला व अस्मितेला एक प्रकारची अचलता, बंदिस्तता व निरंतरता प्राप्त होत असते. जगात कुठेही लोहार, चांभार अशी व्यवसायवाचक नामे व्यक्तींच्या समूहाला चिकटवली जात नाहीत. भारतात मात्र ही जाती-नामे बनवून समूहाला कायमची चिकटवली जातात. त्यातूनच जातीच्या सामुदायिकतेची व आंतरिक स्वायत्ततेची घडण केली जाते. मुख्यत: ब्राह्मणवादाच्या वैचारिक-सांस्कृतिक मुशीत घडलेली जाती-नामे जातीच्या अस्तित्वकल्पना व त्या अनुषंगाने स्वायत्त वर्तनव्यवहार घडविण्यात अग्रभागी असतात.
‘इंटरपेलेशन’ची प्रक्रिया ब्राह्मण अस्मितेच्या घडणीमागेही काम करत होती. ब्राह्मण हे जातीसंबोधन विचारसरणी व इतिहासाचे ओझे घेऊन उभे होते. धार्मिक परंपरेने वर्णजाती-उतरंडीतील उच्चपद ब्राह्मणांना बहाल केले होते. त्यांना सर्व वर्णाचे गुरू ठरवले होते. शुद्धी, श्रेष्ठता, स्वामित्व व सन्मान ब्राह्मण संबोधनाशी जोडला होता. पण धर्मग्रंथांचा हा आदर्श वास्तवात नेहमीच तसाच राहात नव्हता. जातीसंघर्षांमुळे जातीचे सत्तासंबंध सतत बदलत होते. इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलणाऱ्या सत्तासंबंधाच्या चौकटीत ब्राह्मण या संबोधनाचे तडजोडीचे अर्थ निष्पन्न केले जात होते.
तरीही शुद्धी व श्रेष्ठता हे ब्राह्मण जातीकल्पनेचे अर्थ अस्मिता घडवण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती राहिले. ब्राह्मणांनी शुद्धीच्या परिघात स्वत:ला घडवण्याची भूमिका घेतली. त्रिकाल स्नान यांसारखे नियम पाळत देहाची शुद्धी ते सांभाळत राहिले. नित्य, नैमित्तिक कर्मकांड करून कार्मिक शुद्धी व जपजाप्य, तपाचरण करून आंतरिक शुद्धी प्राप्त करत राहिले. स्पर्शास्पर्श नियमांचा बडिवार पाळून सामाजिक शुद्धी सांभाळत राहिले.
श्रेष्ठता ही वर्चस्व-अंकिततेच्या सामाजिक संबंधातच उभी राहू शकत असल्यामुळे ब्राह्मण जातीची श्रेष्ठता अन्य जातींच्या कनिष्ठतेशी अंगभूतपणे बांधली गेली. वर्चस्व-अंकिततेचे संबंध विरोधी अस्मितांची घडण करत असतात. उदाहरणार्थ, राजाची आत्मप्रतिमा स्वामित्वभावी, तर त्याउलट प्रजेची आत्मप्रतिमा सेवकभावी असते. त्याच चालीवर ब्राह्मणश्रेष्ठत्व शूद्र-अधमत्वाच्या तत्त्वाशी बांधले गेले. शुद्धी, स्वामित्व, अधिकार-संपन्नता या चाकोरीत ब्राह्मण अस्मिता बांधण्याची प्रक्रिया शूद्रांना अधिकार, सन्मान नाकारण्याच्या दिशेने जात राहिली. कनिष्ठतादर्शक शूद्र अस्मितेच्या पडछायेत श्रेष्ठता-दर्शक ब्राह्मण अस्मिता उभारण्याच्या या पेचामुळेच इतिहासात वेळोवेळी जातीसंघर्ष उभे राहिले.
दोन दृष्टिकोन
वासाहतिक काळातील वर्गीय वळणावर ब्राह्मण जाती-अस्मिता घडणीचे सातत्य कायम राहिले. या काळात ब्राह्मण जातीच्या आत्मस्थितीबाबत मुख्यत: दोन दृष्टिकोन प्रगट झाले. पहिला दृष्टिकोन आत्मचिकित्सेची भूमिका बाळगणारा होता. त्याचे प्रतिनिधित्व लोकहितवादींनी केले. त्यांनी अर्थहीन कर्मकांड व घटपटादी ज्ञान, पोकळ पांडित्य यात गुंतून पडल्याबद्दल ब्राह्मणांना दोष दिला. ब्राह्मणांच्या आळशी, अज्ञानी, गतानुगतिक वृत्तीवर टीका केली. त्यांच्या संकुचित विश्वभानाची मर्यादा दाखवून, त्यामुळे होणाऱ्या समाजहानीची जाणीव करून दिली. ‘गुणेकरून जातीभेद मानावा, कुलेकरून मानू नये’ असे जाहीर करून वर्गीयतेकडे जाण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. ब्राह्मण अस्मितेला व हितसंबंधांना लोकहितवादींनी पूर्णत: नाकारले नाही. बुद्धिजीवी वर्ग म्हणून समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जाणाऱ्या परिवर्तनाचे धुरीणत्व त्यांनी ब्राह्मणांकडे सोपवले. आत्मचिकित्सेतून परिवर्तनाची दिशा प्राप्त होईल आणि अपराधबोधातून सुधारणेची इच्छा निर्माण होईल, अशी त्यांच्या मीमांसेमागची भूमिका होती.
याउलट, दुसरा दृष्टिकोन आत्मसमर्थनाची भूमिका घेणारा होता. त्याचे प्रतिनिधित्व विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी केले. इंग्रज वसाहतवाद्यांच्या मांडणीमधील प्रभुत्वाच्या योजनेवर हल्ला चढवण्याच्या मिषाने त्यांनी सुधारणावादी बुद्धिजीवींवर शस्त्र धरले. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाची निर्भर्त्सना करण्याच्या ओघात समाजहितासाठी पाश्चात्त्य विवेकवादाची कास धरणाऱ्या सुधारकांना ब्रिटिशधार्जिणे ठरवले. ख्रिस्ती धर्मातील तार्किक विसंगतीशी युरोपीय श्रेष्ठतेचा व भारतीय सुधारणावाद्यांचा संबंध जोडून त्यांची टिंगल उडवली. सुधारणावाद्यांकडून होणारी ब्राह्मणांवरील समाजहितैषी टीका वासाहतिक गुलामीचे प्रतीक मानत त्यांनी जात्याभिमान व देशाभिमान यांचे एकवट समीकरण मांडले. आत्मचिकित्सेच्या भूमिकेला अपमान व परवशतेशी जोडत अपराधबोधातून येणाऱ्या सुधारणांना त्यांनी गैरलागू ठरवले. ब्राह्मणांवरील आळशी व अज्ञानीपणाचा आरोप त्यांनी धुडकावून लावला. भारतीय ज्ञानपरंपरेला ब्राह्मणजातीचे कर्तृत्व मानत व पेशवाईचे गुणगान करत जातीश्रेष्ठत्वाचा गर्व करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले.
चिपळूणकरांच्या ‘वावदूक विद्वत्तेमधून’ व तिखट लेखनशैलीतून आलेली आत्मसमर्थनाची भूमिका ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाला विलक्षण भावली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वेगाने वाढत गेलेल्या ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या समूहाला तिची सर्वाधिक भुरळ पडली. पाश्चात्त्य वळणाच्या वर्गीय श्रेष्ठतेपेक्षा ब्राह्मण जातीश्रेष्ठत्वाचा गर्व करण्याची भूमिका त्यांनी अधिक पसंत केली. चिपळूणकरांची ही भूमिका अंतरंगात उतरवून तिचे कर्तेपण निभावण्याची भूमिका नवविद्यार्थ्यांनी अंगीकारली आणि शिक्षणामुळे प्राप्त झालेल्या वर्गीय अवकाशाला जातीय अस्मितेचा रंग चढवला.
सत्यशोधकांच्या जातिविद्रोहाला दिलेल्या प्रतिसादावरून आत्मचिकित्सा व आत्मसमर्थन करणाऱ्या दोन दृष्टिकोनांमधील फरक लक्षात येतो. आत्मचिकित्सेचा दृष्टिकोन राखणाऱ्या सुधारकांनी ब्राह्मणश्रेष्ठतेला आव्हान देणाऱ्या सत्यशोधकांच्या बंडाकडे विरोधाच्या नजरेने पाहिले नाही. उलट, वर्गीय समावेशकतेच्या चौकटीत सत्यशोधकांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली.
जातिविद्रोहाला दिलेला प्रतिसाद
याउलट, आत्मसमर्थनाच्या भूमिकेतून ब्राह्मण जात्याभिमानाकडे परतलेल्या चिपळूणकरांना व त्यांच्या अनुयायांना सत्यशोधकांच्या बंडातील स्वातंत्र्य व समतेची मागणी लक्षात घ्यावीशी वाटली नाही. ‘पूर्वीचे मराठा वगैरे इतर जातीचे लोक फार उदार होते. त्यांस जेवावयास दूर वाढले तरी आपला अपमान झाला असे ते मुळीच मानत नसत..’ हे पुरुषोत्तमराव खरे यांचे उद्गार शूद्रातिशूद्रांमधील आत्मसन्मानाची आस ब्राह्मण जात्याभिमानी दखलपात्र मानायला तयार नव्हते, हेच स्पष्ट करते.
ब्राह्मण जातीअस्मितेच्या कोशात श्रेष्ठता ही शूद्रातिशूद्रांवर लादण्यात आलेल्या हीनतेशी अंगभूतपणे जोडलेली असल्यामुळे शूद्रातिशूद्रांच्या आत्मोन्नतीच्या प्रेरणेकडे चिपळूणकरांनी तुच्छतेनेच पाहिले. ‘ज्यांचा त्यांचा ब्राह्मणांवर कटाक्ष’ या ‘केसरी’तील लेखात वर्गोन्नतीची आस बाळगणाऱ्या शूद्रांना त्यांनी ललकारले. ‘आमच्या नोकऱ्या व व्यवसाय तुम्हाला करायचे असतील, तर आम्ही त्या तुम्हाला देतो व तुमची सुतार, शेतकरी व लोहार ही कामे आम्ही करतो. बुद्धिसामर्थ्यांने व शरीरसामर्थ्यांने आम्ही तुमची राजलक्ष्मी हिरावून घेतली तसे तुमचे धंदे आम्ही हिरावून घेऊ,’ अशी वल्गना करून चिपळूणकरांनी ब्राह्मणश्रेष्ठत्वाची भावना प्रगट केली.
वासाहतिक संदर्भात ब्राह्मण अस्मितेची बांधणी इतिहासज्ञानाच्या आधारावर करण्याची भूमिका चिपळूणकरांनी पुरस्कारली. जातीअस्मितेच्या अशा बांधणीमुळे ब्राह्मणबहुल मध्यमवर्गात श्रेष्ठतेचा मनोगंड घट्ट होत राहिला. त्यामुळेच शूद्रांनी ब्राह्मणाशी बरोबरी करणे या तत्कालीन मंडळींस असह्य़ वाटू लागले. १८९९च्या दरम्यानच्या वेदोक्ताच्या वादात छत्रपती शाहू महाराजांना व पर्यायाने मराठा जातीला शूद्र ठरवून वेदोक्ताचा अधिकार नाकारला गेला. जातीश्रेष्ठत्वाचा मनोगंड घेऊन वेदोक्ताच्या लढाईत ब्राह्मण समूहाने एकवटले. त्यांनी वेदोक्ताच्या वादात जाती-अस्मितेला पणाला लावून स्वजातीबरोबरच शूद्रातिशूद्र जातींनाही जातीच्या चौकटीतच मध्यमवर्गीय अवकाश शोधण्याच्या मार्गाकडे ढकलले.
लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत.
ईमेल : ubagade@gmail.com