उमेश बगाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण कसे आहोत वा असले पाहिजे, यासाठी आपण कसे होतो याचा शोध घेणे गरजेचे असते. त्यासाठी, आपण कसे नव्हतो याचाही आधार घ्यावा लागतो. समाजाच्या आत्मकल्पनेसाठी आदर्शकाळ व ऱ्हासकाळ (युटोपिया/ डिस्टोपिया) यांचे चिंतनही केले जाते. ते विष्णुबावा आणि जोतीराव यांनी कसे केले?

आत्मकेंद्री व आत्मसंतुष्ट वृत्ती हे भारतातील पारंपरिक बुद्धिजीवींचे खास वैशिष्टय़ राहिले. १८व्या शतकात भारतभर मराठी सत्तेचा दबदबा निर्माण झाल्यावरही महाराष्ट्रातील ब्राह्मण वा तत्सम बुद्धिजीवी जातींची आत्ममग्नता भंग पावली नाही. युरोपातील विविध देशांतील व्यापाऱ्यांचा संबंध येऊनही जगाला समजून घेण्याची फारशी गरज त्यांना वाटली नाही. नाही म्हणायला नाना फडणविसांनी आपल्या शागिर्दाकडून जगाचा नकाशा बनवून घेतला. ज्यात इचलकरंजी हे शागिर्दाचे गाव जगाचे केंद्र मानले गेले होते आणि आफ्रिका खंडाचा मोघम आकार  होता.

वासाहतिक सत्तेच्या आगमनाने ब्राह्मण बुद्धिजीवींची आत्ममग्नता भंगली. वसाहतवादाने आणलेल्या आधुनिक विचारपद्धती  व प्रभुत्वशाली ज्ञानव्यवहारामुळे पारंपरिक विचारविश्वाला हादरे बसले. विशेषत: ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरच्या हल्ल्यामुळे आत्मगौरवाच्या भावनेला धक्का पोहोचला. जाती, धर्म, प्रदेश व राष्ट्र अशा साच्यात आत्मकल्पनेची नव्याने बांधणी करण्याचा प्रयत्न त्यातून सुरू झाला.

इतिहासदर्पणातील प्रतिमा

कोणतीही आत्मकल्पना परतत्त्वाच्या साह्य़ाने रचली जाते. परजाती, परधर्म, परराष्ट्र यांच्या संदर्भातच स्वजाती, स्वधर्म, स्वराष्ट्र यांची कल्पना केली जाते. आत्मतत्त्व व परतत्त्वांचे असे अर्थ व तपशील केवळ इतिहास व परंपरेच्या संगतीतून मिळत असल्याने, नवशिक्षितांनी सुरू केलेल्या आत्मकल्पनेच्या फेरमांडणी-प्रक्रियेत वसाहतवादी ज्ञानमीमांसा विशेषत: आधुनिक इतिहासमीमांसा महत्त्वाची ठरली.

आधुनिक इतिहासकल्पना एका राष्ट्राचा इतिहास जगातील इतर राष्ट्रांच्या सान्निध्यात उभा करत असते. त्या चाकोरीत भारताच्या इतिहासाला जगाच्या परिप्रेक्ष्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. परप्रतिमांचे रंग स्वप्रतिमेत भरण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया त्यातून घडून आली. पाश्चात्त्य वंशाच्या पौर्वात्यवादी अभ्यासकांनी वेदांच्या ऋचा रचणारे आर्य हे आमचे सहोदर असल्याचे जाहीर केले. मॅक्सम्युल्लरने इंडो-आर्यन भाषासमूहाच्या अतिव्याप्त चौकटीत वैदिक आर्याना उभे केले; तर टिळकांसारख्या राष्ट्रवादी पंडितांनी आर्यवंशाचा वारसा ब्राह्मणांमध्ये आरोपित करून त्यांना वंश श्रेष्ठत्वाच्या पायरीवर उभे केले.

इतिहासाच्या आरशात अनेकविध प्रतिमांची जी वर्दळ असते त्यात स्वप्रतिमेचा शोध घेणे म्हणजे पारा उडालेल्या आरशात पाहाण्यासारखा प्रकार असतो; अनेक धूसर परप्रतिमांच्या छायेत अडकलेल्या स्वप्रतिमेचा तितकाच गोंधळबाज अर्थ लावणे असते. परप्रतिमांनी सांधलेल्या अशा स्वप्रतिमेचा ऐतिहासिक अन्वयार्थ विरोधाभासांनी युक्त असतो. त्याचे प्रत्यंतर ‘आर्य’ या स्वप्रतिमेत पाहायला मिळते.

आत्मकल्पनेची बांधणी करताना वर्तमानातील सत्तासंबंधात रुतलेल्या आत्मस्थितीमधून गतकाळाकडे व भविष्यकाळाकडे पाहिले जात असते. सत्तासंबंधातील विग्रह-चौकटीत गतकाळाचे मंथन करून भविष्याचा वेध घेतला जात असतो. आत्म-स्थितीतल्या बदलांची संगती लावताना काळपटलावर आदर्श काळ (युटोपिया) व पतन काळ (डिस्टोपिया) चितारला जात असतो. वॉल्टर बेंजामिन सांगतात, ‘स्वप्रतिमा-चौकटीतला इतिहास रचताना निवडक स्मृती ठेवल्या जातात; निवडक स्मृतींचे विस्मरण केले जाते’.

गतकाळात आदर्श काळ पाहण्याची प्रवृत्ती पौर्वात्यवाद्यांनी रूढ केली. समकालीन जीवनाच्या संदर्भात मानवी अस्तित्वाचा व कृतिशीलतेचा आदर्श प्रदान करणारा काळ या स्वरूपात प्राचीन काळातील सुवर्णयुगाचा शोध त्यांनी घेतला. व्यक्तिवाद, विवेकवाद, मानवतावादाचा ध्यास घेतलेल्या प्रबोधनाच्या समकालीन ईर्षेचे प्रतिबिंब उमटले, म्हणून ग्रीक व रोमन काळात त्यांनी सुवर्णयुग पाहिले. तर भारतीय संदर्भात प्रबोधनमूल्यांचे प्रतिबिंब वैदिक काळात उमटले म्हणून त्याला त्यांनी आदर्श काळ मानले.

स्वप्रतिमेच्या चौकटीत केलेल्या आदर्शचिंतनाची (युटोपिया) दोन रूपे आपल्याला १९व्या शतकातील महाराष्ट्रात पाहाता  येतात. विष्णुबावा ब्रह्मचारी यांनी ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ यामध्ये वेदवचनाचा हवाला देऊन आदर्श राज्याचे चित्र रेखाटले. तर महात्मा फुले यांनी प्राचीन आर्य-अनार्य संघर्षांच्या पार्श्वभूमीवर बळीच्या राज्याचे आदर्शचिंतन उभे केले.

विष्णुबावांचेआदर्शचिंतन

स्वप्नाळू समाजवाद्यांच्या विचारांपासून विष्णुबावांचा राज्यविचार प्रेरित झाला होता. विशेषत: सेंट सायमन यांचे विचार, ब्रिटिशांच्या राज्यशकटातील संदर्भ यांचा आधार त्यास होता. पण युरोपियन भूमीतले हे विचार वैदिक ब्राह्मणी परंपरेतून आले असल्याचा तार्किक अट्टहास त्यांनी केला. ‘सेतुबंधनी टीका’ लिहून गीतेच्या अन्वयार्थामध्ये त्यांचा आदर्श राज्यविचार कोंबण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

आपल्या राज्यविचारात साम्यवादी विचारांप्रमाणे सर्व सत्ता राज्यसंस्थेकडे सुपूर्द करण्याची भूमिका विष्णुबावांनी  घेतली. उद्योग व शेतीमधील उत्पादनाचे, सेवाक्षेत्रातील  श्रमकार्याचे संचालन करण्याचे काम आणि गरजेप्रमाणे सर्वाना समान पद्धतीने वितरण करण्याचे काम त्यांनी राज्याकडे सोपविले. वर्णभेद, जातीभेद न पाळता सर्वाना काम द्यावे, अशी भूमिका त्यांनी घेतली. वृद्ध झालेल्या मजुरांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी राज्याला सांगितली. राज्याने प्रत्येकास श्रम करणे बंधनकारक करावे असा आग्रह त्यांनी धरला. ‘राजाने सर्व मनुष्यांस  मजुरी व अन्नवस्त्र मिळावे अशासाठी देशोदेशी जगाला सुखोपयोगी असे कारखाने काढावेत,’ तसेच  रेल्वे, तारायंत्राचा विस्तार गावोगावी व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विष्णुबावांनी कुटुंबव्यवस्थेच्या सांभाळाची जबाबदारी राज्यसंस्थेवर सोपवली. स्वयंवर पद्धतीने विवाह जमवण्याची जबाबदारी राज्याने पार पाडावी. घटस्फोट व पुनर्विवाह यांना मोकळीक राज्याने द्यावी. पाच वर्षांवरील मुलांचा सांभाळ राज्याने करावा आणि त्याला ज्या खात्यात गती आहे त्या खात्यात टाकावे अशा सूचना त्यांनी केली. सर्वाना शिक्षण देण्याची जबाबदारी राज्याने पार पाडावी अशी भूमिका त्यांनी प्रतिपादली.

आपल्या राज्यविचाराचे अनुसरण केल्यामुळे जगातील अन्याय, विषमता, दु:ख, दारिद्रय़, भांडण नाहीसे होऊन आध्यात्मिक, सद्गुणयुक्त, परस्पर मैत्रीने बांधलेला समाज अस्तित्वात येईल असा विश्वास विष्णुबावांनी व्यक्त केला. ही राज्यनीती गुलामीच्या वृत्तीचा नायनाट करून राष्ट्रनिर्माण करेल असा दावाही त्यांनी केला.  विष्णुबावांनी भारतात पहिल्यांदा मराठी भाषेत साम्यवादी राजनीती सांगितली  म्हणून अनेकांना अचंबा वाटला. आचार्य जावडेकरांनी विष्णुबावांच्या या राज्यविचाराला संन्याशाचा समाजवाद म्हटले. तर इतरांनी त्याला वैदिक साम्यवाद म्हणून गौरवले.

जोतीरावांचे आदर्शचिंतन

जोतीराव फुले यांनी बळीच्या राज्याचे आदर्शचिंतन उभे केले. बळीचे राज्य म्हणजे लोकसत्ताक, समताप्रधान, कला व ज्ञानाचा विकास घडवणारे, जनजीवनाशी एकरूप होऊन त्यांची चिंता वाहणारे, न्यायी, पराक्रमी, कार्यक्षम, प्रजाहितदक्ष अधिकारी असलेले राज्य असा आदर्श जोतीरावांनी रेखाटला. जोतीरावांनी बळीला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून पेश केले. सर्व प्रकारच्या गुलामीविरोधात लढण्याची प्रेरणा देणारा आदर्श म्हणून सादर केले. सर्व जगामध्ये वैश्विक नीतीचा आदर्श प्रदान करणारे रूपक म्हणून प्रस्थापित केले. बळीच्या प्रतीकातून येणाऱ्या मूल्यसरणीच्या आधारे तिचे सार्वत्रिकीकरण केले. बुद्ध, ख्रिस्त, वॉशिंग्टन यांच्यामध्ये बळीचे रूप त्यांनी पाहिले.

आदर्शचिंतनाची दोन रूपे

विष्णुबावा ब्रह्मचारी व जोतीराव फुले यांची आदर्शचिंतने सामाजिक व वैचारिक वेगळेपण घेऊन उदय पावली होती. विष्णुबावांचे आदर्शचिंतन ख्रिस्ती मिशनऱ्यांबरोबरच्या वादात आकारास आले. मिशनऱ्यांविरोधात व वासाहतिक संस्कृतीच्या वर्चस्वाविरोधात युक्तिवादासाठी स्वसमर्थनाचा सनातनी पवित्रा त्यांनी घेतला. वैदिक धर्म प्राचीन असून सर्व धर्ममते त्यातून निघाली असा दावा त्यांनी त्यामुळे केला. आदर्शचिंतनाच्या आरशात वर्तमानकाळाची प्रतिमा पाहिली  जात असते या फुकोच्या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर विष्णुबावांनी वैदिक आदर्शात वैदिक धर्माच्या श्रेष्ठतेची आत्मस्थिती पाहिली होती. स्वप्नाळू समाजवाद्यांच्या विचाराला वैदिक राज्याविचार म्हणून पेश करणे ही त्यांच्यासाठी केवळ वादापुरती बाब होती. त्यामुळे आदर्शचिंतनाला व्यवहारात उतरवण्याची कोणतीच योजना त्यांनी किंवा त्यांच्या अनुयायांनी विचारातसुद्धा घेतली नाही.

जोतीरावांचे आदर्शचिंतन जातिव्यवस्थेच्या विरोधात विकसित झाले होते. थॉमस पेन यांच्या आधुनिकतावादी तत्त्वाशयावर आधारलेले सर्व प्रकारच्या गुलामीविरोधातले ते तत्त्वज्ञान होते. बळीच्या राज्याच्या आदर्शात समकालीन जातीविद्रोहाचे व मानवी मुक्तीच्या लढय़ाचे, पर्यायी संस्कृतीचे व राष्ट्र प्रतिमेचे तत्त्वभान जोतीरावांनी पाहिले. त्यामुळे भारतातील समाजक्रांतीची प्रेरणा व मूल्यभान प्रवाहित करण्यात ते अग्रेसर राहिले.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

ईमेल : ubagade@gmail.com