सत्या नाडेला आणि आर. आर. पाटील या दोघांत तसे काहीच साम्य नाही. नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील ते एक बडे प्रस्थ आहे. पाटील महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आहेत. एवढेच. परंतु त्या दोघांनाही सांधणारे एक समान सूत्र आहे. ते म्हणजे त्यांची असंवेदनशील वाचाळता. अनेकदा आपले आपल्या बोलण्यावर लक्षच नसते. त्यास असभ्य भाषेत बरळणे म्हणतात. त्याबाबत खुलासा करायचा असेल तर सभ्य भाषेत त्यालाच ‘भावनेच्या भरातील बोलणे’ असे म्हणतात. नुकतेच दोघेही तसे बोलले आणि अडचणीत आले. एका निवडणूक सभेत आर. आर. यांनी बलात्कारासंबंधी असंवेदनशील टिपणी केली. त्यांना टीका करायची होती मनसेच्या उमेदवारावर. सदर उमेदवारावर बलात्काराचे दोन आरोप आहेत. त्यातील एक निवडणूक जाहीर झाल्यानंतरचा. त्यावर बोलताना आर. आर. म्हणाले, की किमान बलात्कार करायचा तर निवडणुकीनंतर तरी. सत्या नाडेला हेही असेच बोलले. अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसमोर बोलताना नाडेला चक्क कर्मविपाक सिद्धांतातच घुसले. ते म्हणाले, की खरे तर पगारवाढ वगरे मागायचीच नसते. हा व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न असतो. याला चांगले कर्म असे म्हणतात. ते केले की त्याचे फळ मिळतेच. कोणाला तरी वाटतेच की ही व्यक्ती विश्वासू आहे. त्यामुळे तिला पगारवाढ द्या. आता यात टीका करण्यासारखे काय आहे असे कोणास वाटेल. पण नाडेला यांनी हे जे काही ‘कर्मण्येवाधिकारस्ते..’ सांगितले ते केवळ महिलांबाबत. अमेरिकेसह जगभरातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांना वेतनविषयक पक्षपातास सामोरे जावे लागते. त्यावरून महिला कर्मचाऱ्यांत बराच असंतोष आहे. त्या संदर्भात बोलताना त्यांनी हे मत मांडले. ते थेटच पुरुषसत्तावादी विधान होते.  नाडेला यांच्या भारतीयत्वाचाही उद्धार या निमित्ताने झाला आणि इकडे भारतात नेमक्या उलटय़ा कारणासाठी आर. आर. यांच्या भारतीयत्वावरही बोट ठेवण्यात आले. महाराष्ट्राच्या सुजाण, सुसंस्कृत नागरिकांनी आर. आर. यांना तर सोलूनच काढले. त्यातील अनेक सुसंस्कृतांची भाषा आणि विचार पाहून महाराष्ट्राच्या सुसंस्कृततेची व्याख्या बदलल्याची जाणीवही अनेकांना झाली असेल. याचे कारण या सगळ्याच्या मुळाशी आपली सांस्कृतिक दांभिकता आहे. गांधी, फुले यांच्यासारख्या महात्म्यांच्या प्रयत्नांतून भारतीय महिलांच्या मनावरील परंपरेचे पहाड उतरले. ‘पंछी बनू उडती फिरू’ अशी आकांक्षा काही आभाळातून पडत नसते. ती उगवण्यासाठी अनेक सुधारकांना आणि स्त्रीवाद्यांना येथे झगडावे लागले. पण पुरुषांच्या मनांचे काय? ज्या विचारांतून, संस्कृतीत सत्ता येते ती सोडण्यास पुरुष कसे तयार होणार? काळाच्या दडपणाने त्या सत्तेवर मर्यादा आल्या. महिलांना समान हक्क, आरक्षण अशा गोष्टी निदान कायद्याने तरी आल्या. परंतु पाच हजार वर्षांची जळमटे पाच-पन्नास वर्षांत कशी साफ होणार? नाडेला हे तसे आधुनिक विचारांचे. पण त्यांनाही महिलांबाबत बोलताना कर्मविपाकाची स्मृती येते आणि आर. आर. पाटील यांच्यासारख्या कायदा-सुव्यवस्थेच्या माजी रक्षणकर्त्यांलासुद्धा बलात्कार हा विनोद-उपरोधाचा विषय नाही याचे भान राहात नाही, या गोष्टी जाणिवेतून नव्हे तर नेणिवेतूनच येतात हे ध्यानी घेतले पाहिजे. तेव्हा त्यासाठी त्यांना एकटय़ालाच जबाबदार ठरविणे हे अयोग्यच. कारण तेही आपल्या सांस्कृतिक दांभिकतेचे बळी आहेत. केवळ तेच नव्हेत, तर त्यांच्यावर टीका करणारांतील अनेक जणही. साधा सवाल आहे.  यातील किती जणांनी आई-बहिणीवरील शिवीने आपली जीभ विटाळली नसेल? तेव्हा नाडेला ते आर. आर. ही आपल्याच सांस्कृतिक कर्माची फळे आहेत हे सगळ्यांनीच नीट लक्षात घ्यावे, हे बरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा