पी. चिदम्बरम

आज आठवतात ते मी दिलेली माहिती ऐकताना काहीसे बुचकळ्यात पडूनही पक्षाचीच भूमिका ठामपणे चालविणारे वाजपेयीजी.. ‘मर्यादा २० टक्के केल्यास विमा विधेयक मंजूर होईल’ हे दिलेले आश्वासन पाळता आले नाही, म्हणून माफी मागणारे दिलदार वाजपेयीजी.. टीका करणाऱ्या स्तंभलेखकांवर सूडबुद्धीने कारवाई करण्याच्या राजकारणापासून नेहमीच दूर राहणारे वाजपेयीजी..

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय ९३)  यांचे  गुरुवारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यामुळे एक मोठा काळ पडद्याआड गेल्यासारखे झाले. पन्नासहून अधिक वर्षे तरी ते सक्रिय राजकारणात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. नंतर ते काही काळ जनसंघाचे सदस्य होते, कालांतराने जनसंघ हा जनता पक्षात विलीन करण्यात आला. त्यातून पुढे वाजपेयी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत भारतीय जनता पक्ष १९८० मध्ये स्थापन केला. शेवटच्या क्षणापर्यंत वाजपेयी भाजपशी एकनिष्ठ राहिले. त्यांचे अनेक सहकारी व रा.स्व संघातील काही लोक यांच्या मते अटलबिहारी म्हणजे इतरांपेक्षा ‘उजव्या’ पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी ‘उजवे’ नेते होते. इतर पक्षांतील नेत्यांच्या मते ते चुकीच्या पक्षातील चांगले नेते होते.

मी वाजपेयीजींना एका आदरयुक्त अंतरावरून पाहिले. मी १९८४ मध्ये संसदेत आलो, तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते. त्या वेळी बोफोर्स प्रकरणाने अनेक पक्षांना दारूगोळा पुरवतानाच ऊर्जितावस्थाही प्राप्त करून दिली होती. आधीच्या निवडणुकीत ज्या पक्षांना काहीच जागा मिळाल्या नाहीत, त्यांच्यासाठी हे प्रकरण हे आयते कोलीतच होते, पण यात अनपेक्षित जेते ठरले ते व्ही.पी. सिंह. १९८९ व १९९१ या काळात वाजपेयी व मी विरोधी पक्षाच्या आसनांवर बसत असू.  फरक एवढाच होता की,  त्यांच्या पक्षाने व्ही. पी. सिंह यांच्या सरकारला पाठिंबा दिलेला होता तर माझा पक्ष त्या सरकारचा विरोधक होता. त्या वेळी एकेकाळी काँग्रेसचे व पुढे काँग्रेसविरोधी नेते असलेले व्ही. पी. सिंह आणि भाजप यांच्यात अकरा महिन्यांत मतभेद झाले. निमित्त होते, ज्याला ‘मंडल विरुद्ध कमंडल’ वाद म्हटले जाते, त्याचे.

भाजपचा आश्वासक चेहरा

पुढे सहा वर्षांत भारतीय राजकारणामध्ये  कमकुवत काँग्रेस व उभारी घेत असलेला भाजप यांच्यात कडवट संघर्ष होत राहिला. यामागे प्रेरक शक्ती होते लालकृष्ण अडवाणी, पण आश्वासक चेहरा होता तो वाजपेयींचा. अटलबिहारी वाजपेयी यांनी तीनदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. म्हणजे तीनदा ते सत्तेवर आले. त्यांचे पहिले सरकार गणित चुकल्याने केवळ १३ दिवसांतच आटोपले. त्यांचे दुसरे सरकार कसेबसे १३ महिने चालले व नंतर कोसळले. केवळ एक मताने लोकसभेत त्यांचा पराभव झाला. काँग्रेसने वाजपेयी सरकारला पुढे काम करू द्यायला पाहिजे होते व त्यांच्या विरोधात मतदान करायला नको होते असे माझे व्यक्तिगत मत होते. कारण तसेही ते सरकार कधीतरी पडणार होतेच.

तेरा महिन्यांच्या त्या काळात वाजपेयी यांनी पोखरण-२ अणुचाचण्या करून व नंतर अमेरिकेने लादलेल्या र्निबधांना ठामपणे तोंड देऊन प्रतिमेला झळाळी दिली. एका मताने झालेला पराभव हा त्यांच्यासाठी सहानुभूतीची लाट निर्माण करणारा ठरला. त्याचा परिणाम म्हणून १९९९ मध्ये भाजपचे १८२ खासदार निवडून येऊन वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले.

सर्व मित्रच, शत्रू नाहीच

वाजपेयींच्या बाबतीत सांगायचे तर त्यांच्यासाठी तो सुवर्णकाळच होता. त्यांच्यासाठीच नव्हे तर पक्षांसाठीही ते सुखाचे  दिवस ठरले. त्यांनी त्याच काळात भाजपची आक्रमक किनार काहीशी सौम्य करताना सहकारी राजकीय पक्षांच्या रूपाने मित्र गोळा केले. त्यांना भुरळ घातली. त्यांच्या भांडणांत प्रसंगी मध्यस्थी केली, राजधर्म शिकवला, सहकाऱ्यांचे अधिकार मान्य केले. एक सम्यक अशी आर्थिक वाढ देशाला मिळवून दिली. त्यानंतर वाजपेयी यांनी डिसेंबर २००२ मध्येच असे सांगितले होते, की दोन ते चार वर्षांत मी निवृत्त होईन.

सहा वर्षांच्या काळात वाजपेयी यांनी अनेक मित्र जमवले. त्यांना शत्रू कुणीच नव्हते. ते वाजपेयींचे वेगळे वैशिष्टय़ होते. जेव्हा त्यांनी मे २००४ मध्ये पद सोडले तेव्हा व गेल्या आठवडय़ात ते निवर्तले तेव्हा सर्वानीच त्यांची प्रशंसा केली. त्यांच्या कार्याचा सतत गौरव केला. ज्या नेत्याविषयी नेहमीच चार चांगले शब्द बोलले गेले असा हा नेता वेगळाच.

वाजपेयी व माझ्याशी संबंधित दोनच घटना इथे सांगाव्याशा वाटतात. पहिली घटना आहे १९८८-८९ मधली. त्या वेळी बोफोर्स प्रकरणाने राजीव गांधी सरकारला घेरले होते. त्या प्रकरणाची माहिती संसदेत पाठोपाठ आलेल्या अनेक मंत्र्यांनी पाहिली होती, नंतर १९८८ च्या अखेरच्या काळात ती माझ्याकडे आली. एबी बोफोर्सने हे कंत्राट मिळवण्यासाठी पैसे दिले, या निष्कर्षांप्रत मीही आलो. पण कुणाही भारतीय मंत्र्याने किंवा अधिकाऱ्याने पैसे घेतल्याचा पुरावा मात्र नव्हता. मी राजीव गांधींची परवानगी घेऊन या प्रकरणी निवेदन करण्याची संधी घेतली. अर्थात त्या संधीची मला वाट पाहावी लागली. शेवटी काही दिवसांत ती संधी मिळाली; ती वाजपेयी यांनीच बोफोर्स प्रकरणावर संसदेत पुन्हा चर्चा सुरू केली होती. त्या वेळी सरकारच्या वतीने उत्तर देताना मी माझ्या निष्कर्षांवर आधारित निवेदन केले. ते ऐकताना वाजपेयीजी बुचकळ्यात पडले आहेत असे मला जाणवले. ते त्यांच्या चेहऱ्यावरून सूचित होत होते. तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. नंतर वाजपेयीजी उठले ते मात्र मला विरोध करण्याच्या इराद्यानेच. ते म्हणाले की, लाचखोरांना दोषमुक्त करणारे निवेदन मला चिदम्बरम यांच्याकडून अपेक्षित नाही..  किंबहुना अशा स्वरूपाचे काही तरी ते बोलले. त्यावर मी,  ‘मी सत्य सांगतो आहे,’ असे आग्रहाने सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काहीच ऐकून घेतले नाही. (४ फेब्रुवारी २००४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्यावरचे बोफोर्स प्रकरणातील आरोप भिरकावून दिले.)

मोठय़ा मनाचा माणूस

त्यांची माझ्याशी संबंधित असलेली आणखी एक आठवण १९९७-९८ मधली. त्या वेळी मी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री होतो. विमा क्षेत्र खासगी व परदेशी गुंतवणूकदारांसाठी खुले करण्यासाठीचे विधेयक त्या वेळी मांडले होते. त्याला कडाडून विरोध झाला तो अर्थात भाजपकडून. त्यात परदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर भाजपची हरकत होती. त्या वेळी विरोधकांनी या प्रस्तावाला मंजुरी द्यावी यासाठी मी परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वीस टक्क्यांपर्यंत खाली आणली. वाजपेयीजी त्यावर सहमत झाले. परंतु तरीसुद्धा अडथळा होता तो मुरलीमनोहर जोशी यांचा. पण ‘या विधेयकास भाजप पाठिंबा देईल; काळजी करू नका’ असे वाजपेयी यांनी मला सांगितले आणि मी आश्वस्त झालो. त्या विधेयकावर संसदेत चर्चा सुरू झाली, संपली आणि आता मतदान सुरू झाले. कलम दोन ते १२ संमत झाले. पण मुरलीमनोहर जोशी यांनी परदेशी गुंतवणुकीबाबतच्या कलम १३ ला विरोध केला. तेव्हा वाजपेयीजींनी मला लोकसभाध्यक्षांच्या आसनाच्या मागे नेले व दिलेले आश्वासन पाळू शकलो नाही, असे सांगून माफी मागितली.

ते विधेयक पराभूत झाले. पण मी ते मागे घेण्यास नकार दिला. पंतप्रधान इंदरकुमार गुजराल त्या वेळी मध्यस्थीस आले. विधेयक अखेर मागे घ्यावे लागले. पण नंतर काव्यगत न्याय म्हणतात तसे घडले. १९९९ मध्ये वाजपेयी सरकारने त्याच तेराव्या कलमासह ते विधेयक आणले व ते मंजूरही झाले.

१९९९ ते २००४ या काळात मी संसदेचा सदस्य नव्हतो. मी स्तंभलेखक झालो होतो. तेव्हा मी वाजपेयी सरकारवर टीकेची संधी सोडली नाही. पण त्या वेळी ‘त्यांच्या सरकारमधील कुणीतरी माझ्यावर नजर ठेवत आहे,’  किंवा ‘सरकारवर टीकेतून लगावलेले ठोसे मोजत माझ्याविरोधात सुडाने कारवाई करण्याचे मनसुबे आखले जात आहेत’, अशा कोणत्याही प्रकारची भीती कधीच माझ्या मनात नव्हती.. कारण ते सरकार सुडाचे राजकारण करणारे नव्हते.

वाजपेयी हे लोकशाहीचे खऱ्या अर्थाने रक्षणकर्ते होते व विरोधी पक्षाची वैधानिक भूमिका काय असते, याची समज त्यांना राजकीय परिपक्वतेतून आलेली होती. इतिहास त्यांची नोंद एक चांगला, सहृदय व सभ्य माणूस म्हणून घेईल यात शंका नाही.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN

Story img Loader